अध्याय १२ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तावत्प्रविष्टास्त्वसुरोदरांतरं परं न गीर्णाः शिशवः सवत्साः ।
प्रतीक्षमाणेन बकारिवेशनं हतस्वकांतस्मरणेन रक्षसा ॥२६॥

पुढें घालूनि वत्सें सकळ । मागें वत्सपांचा मेळ । असुरवदनीं उतावीळ । झाले तत्काळ प्रविष्ट ॥२९॥
कोणी स्वेच्छें विवरीं रिघती । त्यांसी वर्जितां फिरोनि निघती । तेंवी वत्सपां श्रीपति । कां पां मागुतीं न बाहे ॥३३०॥
तरी हें तैसें नव्हे राया । वत्सप वदनीं प्रवेशलिया । असुरें ग्रासूनि नेता विलया । गरें आहळून राहिले ॥३१॥
पूतना बकातें जो मारी । तो कां नये अजूनिवरी । म्हणोनि कृष्णाची प्रतिक्षा करी । वैर अंतरीं स्मरोनि ॥३२॥
एवं बकारिप्रवेशप्रतीक्षा करितां । तेणें वत्सवत्सपां समस्तां । ग्रासिलें देखोनि रमाकांता । आली द्रवता कारुण्यें ॥३३॥

तान्वीक्ष्य कृष्णः सकलाभयप्रदो ह्यनन्यनाथान्स्वकरादवच्युतान् ।
दीनांश्च मृत्योर्जठराग्निघासान् घृणाऽर्दितो दिष्टकृतेन विस्मितः ॥२७॥

मामकातें मोह गिळी । तेव्हां वृथा मद्योगशैली । म्हणोनि कळवळिला हृत्कमळीं । श्रीवनमाळी जगदात्मा ॥३४॥
ऐकोनि विधीचें प्रार्थन । ज्याचें सकळांसी अभयदान । अघें ग्रासितां त्याचेचि स्वगण । श्रीकृष्ण विस्मयें दाटला ॥३३५॥
अमृतासीच आलें मरण । कल्पतरूसी पातलें दैन्य । हिंवें कांकडला हुताशन । कीं उष्णें जीवन तान्हेलें ॥३६॥
तैसे कृष्णेंवीण जे अनाथ । म्यां श्रीकृष्णें जे सनाथ । त्यांतें गिळिता झाला दैत्य । दैव विपरीत हें कैसें ॥३७॥
सकळां अभयद माझें नांव । त्या मज कृष्णाचे अवयव । गिळिता झाला अघदानव । हें लाघव दैवकृत ॥३८॥
आपुला जेथ न पवे हात । तेथ वत्सपवत्सेंसहित । शिरकले देखोनि श्रीअच्युत । हृदयीं द्रवत कारुण्यें ॥३९॥
अज्ञान बाळक धरिलें करीं । तें जेंवी गळोनि पडले विहिरीं । भक्तकारुण्यें श्रीहरि । द्रवे अंतरीं तैसाची ॥३४०॥
मृत्युजठराग्नीवरी तृण । जळे वत्सें वत्सप गण । परम दीन जे अज्ञान । देखोनि सघृण कळवळिला ॥४१॥
आतां एथ कोण उपाय । मनीं विवरी देवकीतनय । दैत्यां भय स्वजनां अभय । ओपी सदय तें ऐका ॥४२॥

कृत्यं किमत्रास्य खलस्य जीवनं न वा अमीषां च सतां विनाशनम् ।
द्वयं कथं स्यादिति संविचिंत्य तज्ज्ञात्वाऽविशत्तुंडमशेषदृग्घरिः ॥२८॥

वत्सवत्सप गिळिले येणें । प्रतीक्षा करी मजकारणें । एथ उपाय कैसा करणें । हें श्रीकृष्णें विवरिलें ॥४३॥
या दुष्टाचें जीवित न थरे । आणि स्वकीयामाजीं कोणी न मरे । हें द्विविध कार्य एकसरें । कोणा विचारें साधेल ॥४४॥
ऐसें लाघव विचारूनी । निश्चय करूनि अंतःकरणीं । सर्वद्रष्टा चक्रपाणि । अघावदनीं प्रवेशला ॥३४५॥
मोहअघासुरापोटीं । प्रवेशोनिया जगजेठी । स्वकीय जीववी कृपादृष्टी । मारी कपटी अघनामा ॥४६॥
हें नेणोनि त्रिभुवनीं । कृष्ण पडला अघावदनीं । हाहाकारें आक्रोशध्वनि नरसुरगणीं वाजिला ॥४७॥

तदा धनच्छदा देवा भयाद्धाहेति चुक्रुशुः । जहृषुर्ये च कंसाद्याः कौणपास्त्वघबांधवाः ॥२९॥

तेव्हां विमानयानीं देव । मेघाआडूनि पाहती सर्व । अघें गिळितां श्रीकेशव । त्यांचे जीव घाबिरले ॥४८॥
हाहाकारें शोक करिती । विपरीत कैशी कर्मगति । केवढी राक्षसाची शक्ति । अघें श्रीपति ग्रासिला ॥४९॥
आतां कोण करील भूभारहरण । आणि हें धर्मसंस्थापन । साधुजनांचें पालन । निर्बर्हण असुरांचें ॥३५०॥
ऐसे सशोक झाले देव । हर्ष पावले असुर सर्व । कौणपादि अघबांधव । दुर्मानव कंसादि ॥५१॥
अघें कृष्ण गिळिला वनीं । दैत होते आपुले स्थानीं । कैसें कळलें त्यालागूनी । काय म्हणोनि हरिखले ॥५२॥
तरी आच्छादिलिया श्रीकृष्णतरणी । तमें दाटली गगनधरणी । दैत्य जंबुकादि श्वापदश्रेणी । ते स्वसदनीं तोषले ॥५३॥
जेव्हां देवता होती म्लान । तेव्हां दैत्यांसि उत्साह पूर्ण । जेवीं चांदणां तोषती सज्जन । दस्यु दुरजन काळवखा ॥५४॥
एकें स्वातीच्या वृष्टिजळीं । पिकिजे कर्पुरादि मुक्ताफळीं । विषोत्पत्ति वृश्चिकव्याळीं । अविकल्पिही नाशिती ॥३५५॥
तैसा गिळिता हृषीक्श । देवां दुःख दैत्यां तोष । म्लानामान उभयतांस । यश अपयश स्वभावें ॥५६॥
कुणप म्हणजे प्रेत जाण । त्यातें करितीं जें प्राशन । ते कौणप म्हणिजेत राक्षसगण । कंसादि जाण अघबंधु ॥५७॥
नैरृत्य कोणपांचा अधिपति । तो कोणप शब्दें बोलिजे निरृति । त्याचे जे जे राक्षस होती । ते म्हणिजती कोणप ॥५८॥
द्रुमल्य दैत्याचा रेतजात । तो हा केवळ कंसदैत्य । कालनेमीचा अवतार मूर्त । हें विख्यात तुज कथिलें ॥५९॥
देवदैत्यांचा खेद मोद । ऐकोनि अतींद्रिय गोविंद । अघवधाचा केला विनोद । तो तूं विशद अवधारीं ॥३६०॥

तच्छ्रुत्वा भगवान् कृष्णस्त्वव्ययः सार्भवत्सकम् । चूर्णीचिकीर्षोरात्मानं तरसा ववृधे गले ॥३०॥

षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो हा श्रीकृष्ण भगवान । मनोगत अघाचें जाणोन । काय विंदाण आदरिलें ॥६१॥
सर्वांतरीं ज्याचा वास । सर्व विदित सर्वज्ञास । स्वयें अव्यय त्या कैंचा नाश । जो हृषीकेश जगदात्मा ॥६२॥
अघासुराचें मनोगत । अर्भकवत्सेंशीं श्रीकृष्णनाथ । चूर्ण करीन निमेषांत । हें हृदयस्थ हरि जाणे ॥६३॥
आपणातें चूर्ण करूं । इच्छिता जो कां अघासुरु । त्याचे त्वरेहूनि सत्वरु । वाढे श्रीधरु तत्कंठीं ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP