अध्याय १२ वा - श्लोक १५ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एते यदा मत्सुहृदोस्तिलापः कृतास्तदा नष्टसमा व्रजौकसः ।
प्राणे गते वर्ष्मसु का नुं चिंता प्रजाऽसवः प्राणभृतो हि ये ते ॥१५॥
सबळ म्हणिजे ससैन्येशीं । वत्सेंसहित वत्सपेंशीं । कृष्ण मारूनि तिळोदकासी । अग्रजांसीं कल्पीन ॥८७॥
कृष्णेंसहित वत्स वत्सप । अग्रजा कल्पीं हेंचि तिळाप । येर उरले व्रजींचे पशुप । ते प्रेतरूप सहजेंची ॥८८॥
ममतावंत जे गृहस्थ जन । अपत्यें केवळ त्यांचे प्राण । त्यांच्या नाशें ते यतप्राण । पावती मरण न मारितां ॥८९॥
इति व्यवस्याजगरं बृहद्वपुः स योजनायाममहाद्रिपीवरम् ।
धृत्वाऽद्भुतं व्यात्तगुहाननं तदा पथि व्यशेत ग्रसनाशया खलः ॥१६॥
ऐसा विचार करूनि मनीं । अजगरशरीर धरूनि । पसरिला मार्गी येऊनि । वैर स्मरोनि मागिलें ॥२९०॥
तं अजगरहरीर म्हणसी कैसें । स्थूळ पीवर पर्वता ऐसें । विस्तीर्ण योजनायतावकाशें । महा आवेशें विक्राळ ॥९१॥
पर्वतगुहेसारिखें वदन । महा अद्भुत पसरिलें जाण । वत्सेंवत्सपसहित कृष्ण । कपटेंकरून ग्रासावया ॥९२॥
कैसें अद्भुत त्याचें वदन । पुडिले श्र्लोकी श्रीभगवान । करा विशेषें व्याख्यान । श्रोतीं श्रवण तें किजे ॥९३॥
धराधरोष्ठो जलदोत्तरोष्ठो दर्याननांतो गिरिशृंगदंष्ट्रः ।
धांतांतरास्यो वितताध्यजिह्वः परुषानिलश्वासदेवेष्णः ॥१७॥
अधरओष्ट पसरिला मही । ऊर्ध्व्व ओष्थ नभाच्या ठायीं । मेघपटलासारिखा पाहीं । वितर्क कोणाही न करवे ॥९४॥
पर्वताच्या जैशा दरकुटी । तैशा दोन्ही वदनकोटी । सृक्किणीमाजीं दंष्ट्रा दाटी । गिरिकूटथाटी सारिख्या ॥२९५॥
गुहागव्हरीं अंधकार । तैसें वदनगर्भीं शर्वर । जिव्हा पसरली सविस्तर । भासे सुंदर पथ जैसा ॥९६॥
मुखश्वासाच्या निघती अह्या । तुल्य गमती त्या वणव्या । वाफा झोंबती प्राणियां । तप्ततैलासारिख्या ॥९७॥
पेटलीं पर्वाताचीं जेवीं मौळें । तैसे प्रज्वळित उष्ण डोळे । नयजदीप्ति श्वानासलॆं । शलभपळें आहळती ॥९८॥
दृष्ट्वा तं तादृशं सर्वे मत्वा मृदावनश्रियम । व्यात्ताजगरतुंडेन दृत्प्रेक्षन्ते स्म लीलया ॥१८॥
सर्व वत्सप ऐसे परी । देखोनि अद्भुत तनु अजगरी । वृदावनींची शोभा खरी । ऐसें अंतरीं मनिती ॥९९॥
वृंदावनींची ही वनश्री । सप्रर्वत गिरिदरी । सजीव सर्शरीरापरी । परस्परें निर्धारिती ॥३००॥
पसरलें अजगरतुंडे जैसें । पर्वतदरीसी हेंही तैसें । तुळिती करूनियां उत्प्रेक्षे । विपरीत कैसें मानित ॥१॥
वत्सपा ऊचुः - अहो मित्राणि गदत सत्त्वकूटं पुरःस्थितम् । अस्मत्संग्रहनव्यात्तव्यालतुंडायते न वा ॥१९॥
पहा रे गडी हो आश्चर्य कैसें । सांगा काय रे पुढें असे । सजीव पर्वत जैसा भासे । तैसें दिसे कीं ना रे ॥२॥
दुसरा म्हणे पहा रे दृष्टी । आमुचा ग्रास करावयासाठीं । पसरली सर्पाची मुखवटी । तैशी दरकुटी नव्हे ॥३॥
सत्यमर्ककरारक्तमुत्तराहनुवद्घनम् । अधराहनुवद्रोधस्तत्प्रतिच्छाययाऽरुणम् ॥२०॥
खरें रे खरें म्हणती एक । मेघपटलामाजीं अर्क । ऊर्ध्वभागीं सर्पमुख । तेवीं लखलख रक्तिमा ॥४॥
ऊर्ध्व ओष्ठ आणि टाळा । ऐशी लोहीव या अभ्रपटळा । त्या प्रतिबिंबाची अरुणकळा । अधरोष्ठशकलासम कां रे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP