श्रीमद्गोविंदात्मने नमः ।
अनिष्टहरणा अभीष्टकरणा । नमो सद्गुरो करुणापूर्ण । स्वकारुण्यें अबुधोद्धरणा । शरणागतवत्सला ॥१॥
स्वसंवेद्य ब्रह्म निर्गुण । तेथ मिथ्या मायास्फुरण । होतां भ्रमासि अधिष्ठान । द्वैतभवभान भासलें ॥२॥
जागतांचि निद्राधारें । स्वप्नसृष्टीमाजीं भरे । नाथिलेंचि मानी खरें । मग वोथरे सुखदुःखें ॥३॥
तैशा मायेच्या दोन्ही शक्ती । आवरणविक्षेप ज्यांतें म्हणती । दोहींमाजीं एकचि भ्रांति । दावी लपवी सर्वत्र ॥४॥
वास्तवबोधाचा जो विसर । आवरणशक्ति तें साचार । विक्षेपरूपें बोधपर । मानी ईश्वर आपणा ॥५॥
कनकबीजांची भरली भुली । राजप्रतिष्ठा भ्रमें धरिलीं । क्षणैक तेथूनि धांव घाली । अवगे चाली अनेका ॥६॥
तैसा सर्वज्ञ आणि सर्वकर्ता । सर्वसाक्षी सर्वनियंता । ऐशी समष्टिउपाधि जडतां । पुन्हां मूढता । स्वीकारी ॥७॥
मुळींचें आवरितां वस्तुत्व । कवळीं विक्षेपें साक्षित्व । तेंहि आवरितां मूढत्व । गाढ शून्यत्व उपलभे ॥८॥
तमें स्वशून्यत्व केलें । तें मलिन सत्या विक्षेपिलें । स्वप्नजागृतिरूपें स्फुरिलें । विपरीत ज्ञान दृश्यत्वें ॥९॥
पंचभूतें त्रिगुणात्मक । वास्तविसरें विक्षेप मुख्य । ते हे अविद्या पृथक । योनि अनेक प्रस्फुरवी ॥१०॥
ऐसा शिवजीवत्वें सभेद । कवळूनि विवळे अवेदवेद । स्वयें नेणोनि सच्चिदानंद । विषयानंद अवलंबी ॥११॥
तया विषयसुखाच्या लाभें । अनिष्ट इष्टत्वें कवळीं क्षोभें । तें परिहरूनि अभीष्टलाभें । निजात्मप्रभे मेळविती ॥१२॥
चंद्र परिपूर्ण परिमळें । कीं गार सबाह्य कोंदली जळें । तेवीं करुणापूर्णें श्रीदयाळें । अबुधें अबळें तारिलीं ॥१३॥
स्वकीयांचे करुणेसाठीं । पूर्णकारुण्यें कळवळूनि पोटीं । नटूणि सगुणपणाचे नटीं । स्वबोधे गोष्टी प्रकटिसी ॥१४॥
जाणोनि सप्रेम स्वचरणाशरण । तद्वात्सल्यें जाकळून । बळेंचि आणिसी । बुद्धि वेधून सद्भावीं ॥१५॥
जैशी जातमात्र तोकीं । स्तनपानीं अनोळखी । माता बळेंचि घालुनि मुखीं । तर्पणतोखीं लांचवी ॥१६॥
अविद्याभ्रमाची निरसतां भुली । मिथ्या भवसुखें जाणवलीं । निजात्मतृप्ति वास्तव रुचली । गुरुमाउलीप्रसादें ॥१७॥
तेथें कायावाचमनें । अव्यभिचारें दास्य करणें । नमनें स्मरणें अनन्यपणें । भिन्न नुरणे वरभाग्यें ॥१८॥
यया महद्भाग्याकारणें । कठोर तपें पुरश्चरणें । आचरिताती सकामपणें । उदारकरुणें पुरवावें ॥१९॥
ऐकोनि म्हणती सद्गुरुनाथ । कैंचा भेदासि ठाव एथ । अभेदबोधा ओपूनि ग्रंथ । वदवूं यथार्थ तव वदनें ॥२०॥
येणें वरें दयार्णव । स्वमिकृपेचें गौरव । लाहतां प्रज्ञा कवळी हांव । वासुदेवगुणकथनीं ॥२१॥
दशमस्कंधींचा अष्टादश । अध्यायगर्भींचा कथाविशेष । श्रवणें भवाचा करी नाश । स्वप्रकाश प्रकटूनी ॥२२॥
अष्टादशीं ग्रीष्मकाळ । वसंतगुणें सुशीतळ । तेथ स्कंधीं वळघोनि बळ । वधी तत्काळ प्रलंबा ॥२३॥
कालियफणां यमुनाजळीं । स्वयें नाचोनि वनमाळी । आतां अग्रजाची पाळी । नभोमंडळीं नाचवी त्या ॥२४॥
प्रलंबखांदां उच्चत्तर । बैसवूनियां बलभद्र । करितां नभोगर्भीं संचार । करवी संहार तयाचा ॥२५॥
इतुकी कथा अष्टादशीं । शुक निरूपी कुरुवर्यासी । श्रोतीं बैसोनी तत्पंक्तीसी । श्रवणामृतासी सेवावें ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP