आचेरुर्विविधाः क्रीडा वाह्यवाहकलक्षणाः । यत्राऽऽरोहंति जेतारो वहंति च पराजिताः ॥२१॥

गडी वांटूनि घेतल्यावरी । नानाक्रीडांचिये परी । खेळते झाले राममुरारि । बाळकांपरी नटनाट्यें ॥७७॥
जितुके गडी बळरामाचे । कृष्णसंवगडे नेत्र त्यांचे । झांकिती तैसेचि तेही यांचे । यथाविभागें झांकिती ॥७८॥
वाटिले जैसे ज्यांचे । परस्परें नेत्र त्यांचे । झांकूनि बैसती वर्तिकेचें । क्षेपण करिती रामहरि ॥७९॥
मग सोडूनि त्यांचे डोळे । वर्ति हुडकिती ढाळेंढाळें । सांपडलिया उत्साहमेळें । पृष्ठभागीं वळघती ॥१८०॥
शतधनुष्यें करूनि सीमा । पृष्ठीं वाहती जिंकिल्या नियमाम । परस्परें कृष्णरामां । क्रीडाकामा तोषविती ॥८१॥
ऐसा सुरंगवातीखेळ । अवघे खेळती गोपबाळ । कोठें राम आणि घननीळ । क्रीडाकुशल बैसती ॥८२॥
विटीदांटू नानापरी । चेंडूक्रीडा विविधाकारीं । जिंकिल्या बैसती पाठीवरी । परस्परीं पूर्वोक्त ॥८३॥
येक पाद अतिक्रमणें । तोबा करूनि परिभ्रमणें । वधूवरसंज्ञेच्या पाषाणें । स्वारी घेणें जयव्याजें ॥८४॥
तिंतिडीबीजें ऐकीबेकी । कोठें खेळती वराटकीं । कोठें बदरी आमलकी । स्वारी जिंकी तयाची ॥१८५॥

वहंतो वाह्यमानाश्च चारयंतश्च गोधनम् । भांडीरकं नाम वटं जग्मुः कृष्णपुरोगमाः ॥२२॥

जिंकिती ते स्वारी घेती । हारती ते पृष्ठीं वाहती । ठायीं ठायीं क्रीडा करिती । गाई चारिती तच्छंदें ॥८६॥
भांडिरकनाम न्यग्रोधतरु । जो कां गरुडाचा अवतारु । तापिनीमाजीं हा विस्तारु । अथर्वणींच्या उपनिषदीं ॥८७॥
तया भांडीरवटाप्रती । रामकृष्णप्रमुख जाती । पुन्हां खेळ आरंभिती । यथार्थपूर्व स्वारीचा ॥८८॥
निंबुटिंबु क्रीडा करिती । पदार्थ चिंतूनि गडियां पुसती । भांडिरवटाचे छायेप्रती । बैसोनि खेळती हा खेळ ॥८९॥

रामसंघट्टिनो यर्हि श्रीदामवृषभादयः । क्रीडायां जयिनस्तांस्तानूहुः कृष्णादयो नृप ॥२३॥

परस्परीं खेळतां ऐसें । राया अपूर्व वर्तलें कैसें । श्रीकृष्णाच्या इच्छावशें । होती पिसे ब्रह्मादिक ॥१९०॥
बळरामाच्या संवगडियांनीं । डाई जिंकिली खेळांत पणीं । कृष्णगडियांतें झोंबोनी । आरोहणीं प्रवर्तलें ॥९१॥
श्रीदाम झोंबे श्रीकृष्णासीं । वृषभ झोंबे भद्रसेनासी । संकर्षण प्रलंबासी । स्वारी घेयासि उद्यत ॥९२॥
आली डाई देणें खरें । यथाविभागें परस्परें । पृष्ठभागीं घेऊनि पोरें । कृष्णादि सारे वाहती ॥९३॥

उवाह कृष्णो भगवान् श्रीदामानं पराजितः । वृषभं भद्रसेनस्तु प्रलंबो रोहिणीसुतम् ॥२४॥

श्रीदामातें पृष्ठभागीं । जिंकिल्या कृष्ण वाहे वेगीं । षड्गुणैश्वर्य असतां आंगीं । प्रतिज्ञा वाउगी न करवे ॥९४॥
भद्रसेनें यथोचितें । पृष्ठीं बैसविलें वृषभातें । प्रलंबें रोहिणीसुतातें । पृष्ठावरौतें घेतलें ॥१९५॥
कृष्णसंवगडियांवरी ऐसे । रामसंवगडे बैसले तोषें । तेव्हां प्रलंबें मानसें । असह्य मानिलें कृष्णातें ॥९६॥

अविषह्यं मन्यमानः कृष्णं दानवपुंगवः । वहन् द्रुततरं प्रागादवरोहणतः परम् ॥२५॥

दानवांचा अग्रगणी । प्रलंब कापट्याची खाणी । कृष्णा अजिंक्य मानुनी । बुद्धि मनीं विवरिली ॥९७॥
श्रीकृष्णाची चुकवूनि दृष्टि । संकर्षणा घेऊनि पृष्ठीं । सवेग सरकला जगजेठी । दुष्ट कपटी दुरात्मा ॥९८॥
शतधनुष्याचिया नेमा । लंघूनि अवरोहणाची सीमा । पृष्ठीं येऊनि बलरामा । सवेग व्योमा आक्रमी ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP