श्रीशुक उवाच - अथ कृष्णः परिवृतो ज्ञातिभिर्मुदितात्मभिः ।
अनुगीयमानो न्यविशद् व्रजं गोकुलमंडितम् ॥१॥

कालीय दवडूनि यमुनाजळ । केलें अमृतोपम निर्मळ । स्वजनांसाठीं दावानळ । गिळी गोपाळ हे गतकथा ॥२७॥
यानंतरें तो श्रीकृष्ण । सुहृदस्वजनीं परिवारोन । परमानंदें व्रजभुवन । गोधनेशीं प्रवेशला ॥२८॥
श्रीकृष्णवियोगाचें दुःख । कृष्णदर्शनें गेलें निःशेष । तेणें ज्ञातीसि परमसुख । पाहती मुख सप्रेमें ॥२९॥
दावानळें जळतां स्वजन । श्रीकृष्णें रक्षिले त्यापासोन । तेणें ज्ञाति सुखसंपन्न । गुणवर्णन करिताती ॥३०॥
म्हणती कृष्ण ऐश्वर्यनिधि । एक म्हणती विशाळबुद्धि । एके याचिये सन्निधी । सिद्धी समृद्धि म्हणताती ॥३१॥
एक म्हणती तूं ईश्वर । एक म्हणती करुणाकर । एक म्हणती मनोहर । सुखसागर सर्वार्थीं ॥३२॥
एक वर्णिती अनेक यशें । एक कवळिती स्नेहावेशें । एक सप्रेम मानसें । सुखसंतोषें तोषती ॥३३॥
एक नाचती कृष्णापुढें । एक वीजिती देव्हढे । एक वर्णिती पवाडे । दैत्य गाढे वधिले ते ॥३४॥
एक वाजविती पेंपारी । एक वाजविती मोहरी । एक पावे तल्लालोरी । गोप गजरीं चालती ॥३५॥
एक करिती सुमनवृष्टि । पुष्पें खोंविती कृष्णमुकुटीं । कृष्णगुणांच्या वदती गोष्टी । सुखसंतुष्टि स्वानंदें ॥३६॥
ऐसा अनुगीयमान हरि । प्रवेशता झाला व्रजपुरीं । तेथींची ही नवलपरी । शुकवैखरी वर्णितसे ॥३७॥
उदयाचळीं अंशुमाळी । झळकोनि समस्त दिशा धवळी । तेंवि स्वप्रवेशें वनमाळी । करी गोकुळीं मंडन ॥३८॥
जैसें सुप्तांचें शरीर । भासे केवळ प्रेताकार । ऐसें उद्वस जें व्रजपुर । प्रवेशें श्रीधर शोभवी ॥३९॥
गाई हुंबरती स्नेहभरें । देती प्रतिवचनें वांसुरें । प्रेमपान्हा स्तनीं न धरे । दुग्ध पाझरे भूमंडळीं ॥४०॥
गोप गोपी घरोघरीं । प्रवर्तती निजव्यापारीं । पाहती कृष्ण अभ्यंतरीं । क्रिया संसारीं तद्वेधें ॥४१॥
ऐसें गोकुल मंडित । व्रजीं प्रवेशला कृष्णनाथ । इतुका सांगुनि वृत्तांत । कथा कथी तयापुढें ॥४२॥

व्रजे विक्रीडतोरेवं गोपालच्छद्ममायया । ग्रीष्मो नामर्तुरभवन्नातिप्रेयान् शरीरिणाम् ॥२॥

ऐशिया परी मधुसूदन । व्रजीं करूनि गोपालन । आपुलें ऐश्वर्य आच्छादून । म्हणवी नंदन नंदाचा ॥४३॥
गोपालच्छद्में हरि । व्रजीं क्रीडतां निरंतरीं । ग्रीष्मऋतु स्वसामग्री । प्रकट करी निजकाळीं ॥४४॥
वनश्रीवनितेचा कांत । सर्वांसि प्रियकर वसंत । तो होतांचि तिरोहित । मानिती समस्त अप्रिय ॥४५॥
जैसें पर्युषितभोजन । तेंही करी क्षुधाहरण । परंतु प्रियतम जैसें उष्ण । तैसें अनुष्ण नोहे कीं ॥४६॥
वसंताहूनि जैसा ग्रीष्म । न वाटे अत्यंत प्रियतम । एरवीं करी योगक्षेम । यथाकाम अवघेची ॥४७॥
ग्रीष्मीं भ्रमती चक्रवात । तेणें प्राणी क्लेशभूत । जळें आटिली समस्त । तेणें आकांत जलचरां ॥४८॥
ग्रीष्मीं वाळूनि गेलिया तृणें । वणवां जळती शुष्कपर्णें । तेथें जंतु मुकती प्राणें । स्थावर जंगम अनेक ॥४९॥
औषधीशस्यां होय झाडी । भूचरखेचरां क्षुधा पीडी । फळें निःशेष होती झाडी । बळें झडाडी दुर्वातें ॥५०॥
मही संतप्त चंडकिरणें । श्रम पावतीं श्वापदें हरणें । पश्वादिकां न मिळतीं तृणें । मानवें उष्णें करपती ॥५१॥
पांथ चालों न शकती वाट । ऐसा ग्रीष्मकाळ कनिष्ठ । वृंदावनीं श्रीवैकुंठ । करितो श्रेष्ठ सुखतमें ॥५२॥

स च वृंदावनगुणैर्वसंत इव लक्षितः । यत्राऽऽस्ते भगवान्साक्षाद्रामेण सह केशवः ॥३॥

ऐसा ग्रीष्म तापकर । तोही वृंदावनीं शीतलतर । तेणें भासे वसंताकार । हें विचित्र तेथींचें ॥५३॥
ऐसे अनेक उत्तम गुण । जेणें निवती समस्त जन । तिहीं करूनि वृंदावन । वसंतासमान ग्रीष्मींही ॥५४॥
तें व्हावया काय विशेष । बळरामेंशीं श्रीपरेश । षड्गुणैश्वर्याचा ईश । लीलाविलास जेथ करी ॥५५॥
तरी वसंतेंशीं समान । जिहीं गुणीं तें वृंदावन । तया गुणांचें शुक भगवान । करी वर्णन चौश्लोकीं ॥५६॥

यत्र निर्झरनिर्ह्रादनिवृत्तस्वनझिल्लिकम् । शश्वत्तच्छीकरर्जीषद्रुममंडलमंडितम् ॥४॥

जया वृंदावनाचे ठायीं । ग्रीष्मकाळींही सजला मही । जळें स्रवती ठायीं ठायीं । ध्वनि प्रवाहीं ऊठती ॥५७॥
उच्च स्थळींची पडतीं उदकें । तया प्रतापें फुटती खडकें । घोषें दणाणिती तवकें । लोपतीं झिल्लिकागायनें ॥५८॥
झिल्लि म्हणिजे सूक्ष्मकीट । परंतु ज्यांचा कठोर कंथ । कर्कश ध्वनीची कटकट । करिती बोभाट सर्वदा ॥५९॥
जलप्रपातघोषापुढें । झिल्लिकांचें तें नयन दडे । ऐसा वृंदावनीं चहूंकडे । शीतल सुरवाडे भूभाग ॥६०॥
प्रस्रवोदकांचे अंबुकण । पवनें विखुरतां भासे घन । तया मार्दवें पादपगण । सुरवाडोनि लसलसिती ॥६१॥
दृमी ओळघल्या वल्ली लता । पत्रीं फळीं सुपुष्पिता । तेणें निदाघ न वाटे भूतां । जीवां समस्तां आनंद ॥६२॥
ऐशीं दृमांचीं मंडलें । ठायीं ठायीं अतिकोमळें । वसंतासम ग्रीष्मकाळें । सुख आगळें तद्योगें ॥६३॥

सरित्सरःप्रस्रवणोर्मिवायुना कह्लारकंजोत्पलरेणुहारिणा ।
न विद्यते यत्र वनौकसां दवो निदाधवह्न्यर्कभवोऽतिशाद्वले ॥५॥

निदाघ शब्दें ग्रीष्मकाळ । ते काळींचा अर्क अनळ । बाधूं न शकेचि अळुमाळ । अति शाद्वलभूभागीं ॥६४॥
शाद्वलें म्हणिजे हरितें तृणें । लसलसित जीं कोमळपणें । त्यांच्या आंगींच्या शीतलगुणें । प्राणी उष्णें न पोळती ॥६५॥
अथवा शाद्वलातीत जे मही । ताप न बाधी ते ठायीं । म्हणसी याचें कारण कायी । हे सुरसायी पवनाची ॥६६॥
सरिता आणि सरोवरें । हेलावती ऊर्मिभरें । आणि प्रस्रवती निर्झरें । तें तें समीरें झगटती ॥६७॥
प्रस्रवाचे अंबुकण । जलोर्मींचें शीतलपण । कंजोत्पलांचे परागरेण । घेऊनि पवन प्रवाहे ॥६८॥
कल्हारें जीं जलप्रसूतें । कंजें म्हणिजे साधारणें । उत्पलें जीं रविशशिकिरणें । कुमुदें पयोजें ज्या म्हणती ॥६९॥
याच्या योगें अतिसुगंध । द्रुमांमाजोनि मंदमंद । जलसंयोगें शीतलसुखद । वायु त्रिविध प्रवाहे ॥७०॥
तया वायूच्या संस्पर्शें । संताप नेणती वनौकसें । ग्रीष्मीं कुसुमाकरासरिसें । सुख उल्हासें क्रीडती ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP