अध्याय १८ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तमुद्वहन् धरणिधरेंद्रगौरवं महाऽसुरो विगतरयो निजंग वपुः ।
स आस्थितः पुरटपरिच्छदो बभौ तडिद्युमानुडुपतिराडिवांबुदः ॥२६॥
राम घेऊनि पृष्ठावरी । प्रलंब उडाला अंबरीं । तंव तो गुरुतर जैसा गिरि । गति खेचरी खुंटली ॥२००॥
विगतवेग झाला असुर । नुचले बळभद्राचा भार । मग दानवी निज शरीर । केलें गोचर ते कालीं ॥१॥
जैसे सजल मेघपटल । तैसें आसुरी देह विशाळ । वरी चंद्रमा जैसा धवळ । रोहिणीबाळ शोभतसे ॥२॥
मेघीं विद्युल्लता झळकती । तैशा भूषणांचिया दीप्ति । सुवर्णजडितरत्नपंक्ति । झळकताती त्यांपरी ॥३॥
चंद्रोपमा शोभे रामा । विद्युत्साम्य हेमललामा । मेघोपमा दैत्या अधमा । बोले महात्मा शुकयोगी ॥४॥
उडुपतीतें माथां वाहे । सजल मेघ गगनीं राहे । माजी विद्युल्लतांच्या समूहें । शोभता होय तो जैसा ॥२०५॥
असो दैत्याचें उत्प्लवन । आणि उमगासादृश्यकथन । दैत्यें कपटवेश टाकून । धरिलें प्राचीन निजदेहा ॥६॥
जें कां परम भयानक । पुढिले श्लोकीं वर्णी शुक । श्रोती तयाचा विवेक । सकौतुक परिसावा ॥७॥
निरीक्ष्य तद्वपुरलमंबरे चरत् प्रदीप्तदृग्भृकुटितटोग्रदंष्ट्रकम् ।
ज्वलच्छिखं कटककिरीटकुंडलत्विषाद्भुतं हलधर ईशदत्रसत् ॥२७॥
दैत्यदेह भयंकर । देखोनि रामाचें अंतर । त्रास पावलें ईशन्मात्र । मा इतर धीर कोण धरी ॥८॥
काजळाचेंही काळेपण । कांति तुकितां गमे गौण । भृकुटितटीं प्रदीप्त नयन । जेवीं कृशान प्रलयींचा ॥९॥
उग्र दंष्ट्राग्रें तीक्ष्णें । मुखीं न समाती दारुणें । सधूम्रज्वाळ हुताशन । स्फुरती तैसे मूर्धज ॥२१०॥
शुष्क सरितेच्या ह्रदापरी । विषाळ गर्ता भासे उदरीं । वितृण खडकीं जैसा गिरि । अस्थिपंजरीं समसाम्य ॥११॥
गिरिकंदरीं सलंब कडे । तैसें करचरण देहुडे । आपणा पृष्टीं घेऊनि उडे । रामें निवाडें लक्षिलें ॥१२॥
किरीटकुंडलांची दीप्ति । रामें ऐशी दैत्याकृति । अद्भुत देखोनियां चित्तीं । दिधली वसति त्रासासी ॥१३॥
हरिवंशींचें ऐसें मत । रामासि गगनीं नेतां दैत्य । कृष्णें बोधोनि वृत्तांत । केलें प्रदीप्त बलरामा ॥१४॥
अथागतस्मृतिरभयो रिपुं बलो विहाय सार्थमिव हरंतमात्मनः ।
रुषाहनच्छिरसि दृढेन मुष्टिना सुराधिपो गिरिमिव वज्ररंहसा ॥२८॥
असो रामें गगनोदरीं । ते देखोनि आकृतीतें आसुरी । हृदयीं प्रवेशली त्रासलहरी । बाळकापरी नटनाट्यें ॥२१५॥
मग दैत्याचा देखोनि निकुर । लब्धस्मृति झाला सत्वर । मानव नव्हें मी ईश्वर । आलों भूभार उतरावया ॥१६॥
भयत्रस्तासि पक्षपाती । अभय देवोनि निर्भय करिती । रामा तैशी निजात्मस्मृति । अभय करिती पैं झाली ॥१७॥
गडी नव्हे हा प्रलंब दैत्य । सांडोनि संवगडे समस्त । गगनगर्भी मजला नेत । चोर हरित जेंवि धन ॥१८॥
ऐसें त्यातें जाणोनि रिपु । हृदयीं प्रकटला काळकोपु । मौळीं मुष्टींचा निक्षेपु । करोनि प्रतापु दाविला ॥१९॥
महेंद्र वज्रें हाणितां गिरि । सवेग खचे पृथ्वीवरी । तैसा प्रलंब मुष्टिप्रहारीं । पृथ्वीवरी रिचवला ॥२२०॥
स आहतः सपदि विशीर्णमस्तको मुखाद्वमन् रुधिरमपस्मृतोऽसुरः ।
महारवं व्यसुरपतत्समीरयन् गिरिर्यथा मधवत आयुधाहतः ॥२९॥
मुष्टिघातें तो हाणितां दैत्य । मूर्च्छा पावला अकस्मात । मुखें भडभडां रुधिर वमित । झाला अस्त स्मृतीचा ॥२१॥
उंबर जैसें घनाच्या प्रहारीं । विशीर्ण मस्तक तया परी । प्राण सोडी ते अवसरीं । गर्जना करी भयानक ॥२२॥
अकस्मात महासुर । गर्जना करूनि भयंकर । प्राणें वीण पर्वताकार । टाकी शरीर भूपृष्ठीं ॥२३॥
मघवा म्हणिजे पुरंदर । त्याचें आयुध तें महावज्र । त्याच्या घातें भंगे कुध्र । तैसा असुर उलथला ॥२४॥
अपस्मृती म्हणिजे मूर्च्छागत । ऐसें कल्पी आमुचें चित्त । किंवा कांहीं विशेष अर्थ । शुक समर्थ सूचवी ॥२२५॥
ऐशी आशंका श्रोतीं केली । तेणें प्रज्ञा पांगुळली । तेव्हां हृत्कमळीं चिंतिली । निजमाउली गुरुकृपा ॥२६॥
तत्प्रसादें बोलेल वाणी । श्रोतीं घेऊनियां ते श्रवणीं । विवरूनियां अंतःकरणीं । कीजे हानि शंकेची ॥२७॥
मूर्च्छना म्हणिजे क्षणैक आली । सावध होतां स्मृति चेइली । जेंवि निद्रा भंगतां पहिली । लाहे आपुली जागृति ॥२८॥
कां जैशी प्रवर्तलिया राती । तमें दाटे द्यावाक्षिति । प्रकटलिया गभस्ति । पदार्थ दिसती पूर्ववत ॥२९॥
तैसें सुषुप्ति मूर्च्छा मरण । तीन्ही अवस्था समसमान । क्षणैक होय विस्मरण । पुन्हा स्मरण पहिलेंची ॥२३०॥
सुषुप्तिगाढमूढ दाटे । अहंभाव निःशेष आटे । परी स्मृति येऊनि भेटे । तैं दुणवटे पूर्वोक्त ॥३१॥
स्मृति भेटवी जैं जागरा । तैं दृश्य प्रकाशी करणद्वारा । साचचि वाटे भवउभारा । येरी मोहरा शून्यत्व ॥३२॥
अथवा लिंगदेहाची स्मृति । स्वप्नावस्था उभारी चित्तीं । ते अन्यथा नवटे भयसंविती । प्रकटे स्फूर्ति संकल्पें ॥३३॥
स्व्पन जागर पुन्हा न येतां । ते सुषुप्ति नव्हे ते सायुज्यता । जरा मृत्यु अन्नेंच हरतां । तैं त्या अमृता न मनावें ॥३४॥
पुन्हा जागृति स्वप्नें दावी । म्हणूनि सायुज्य न म्हणावी । तैशीच मूर्च्छा विवंचावी । जे पुन्हां भेटवी स्मृतीचें ॥२३५॥
स्थूल देहासि होय अंतु । तया नांव बोलिजे मृत्यु । पुन्हा स्मृति संसार जनितु । लाहोनि जन्मत संसारीं ॥३६॥
अंतीं जेथ गुंते मति । तीमाजि लपोनि ठाये स्मृति । पुन्हा होतां देहप्राप्ति । पूर्ण स्थिति प्रकाश ॥३७॥
म्हणोनि अपस्मृती जो आला । त्रिविध भेदा तो मुकला । परमामृतीं समरसला । नवचे निवडला कल्पांतीं ॥३८॥
निःशेष स्मृतीचा होय अंत । तैं त्या म्हणिजे परमामृत । संकर्षणाचा मुष्टिघात । लागतां दैत्य उद्धरला ॥३९॥
विरोधभजनें मोक्षाधिकारी । दैत्य विविध देहधारी । ते जन्मले कृष्णावतारीं । राममुरारि तारक त्यां ॥२४०॥
कृष्णदर्शनें स्पर्शनें । द्वेषध्यासें संभाषणें । भयें सक्रोधचिंतनें । विरोधभजनें उद्धरती ॥४१॥
धातुर्वाद पावतां शीण । लोहीं न जोडे सुवर्ण । स्पर्शमणि न लगतां क्षण । करी कांचन संस्पर्शें ॥४२॥
करितां तेवीं साधनकोडी । नोहे कैवल्याची जोडी । प्रलंबासि न लगतां घडी । सिद्धि रोकडी रामकरें ॥४३॥
यालागीं तो अपस्मृत । जैं स्मृतीचा निःशेष अंत । झाला तेणें जन्ममृत्य । रहित अमृत पावला ॥४४॥
झालें आशंकानिरसन । प्रलंब पडिला गतप्राण । आले संवगडे धांवोन । घोष ऐकोन पतनाचा ॥२४५॥
दृष्ट्वा प्रलंबं निहतं बलेन बलशालिना । गोपाः सुविस्मिता आसन् साधु साध्विति वादिनः ॥३०॥
शोभा बलाची आगळी । म्हणोनि संकर्षण बळशाली । तेणें मारिला प्रलंब बळी । पिटिली टाळी गडियांनीं ॥४६॥
विकराळ दैत्यदेह पडिले । देखोनि अवघे विस्मित झाले । संकर्षणा सन्मानिले । भलारे भला म्हणोनी ॥४७॥
बरी पादविली बोचाळी । कपटें खेळूं आली मेळीं । राम आमुचा महाबळी । येणें तत्काळीं लोळविली ॥४८॥
पहारे लेकाचे विकराळ दांत । म्हणूनि डांगांहीं विचकित । एक नाकपुडिया आंत । खोली पहात विवराची ॥४९॥
एक बाबरझोंटींचा ढीग । एक पाहती मोकळें लिंग । रोमावळीचे दाट दांग । भीम सर्वांग नगनिभ ॥२५०॥
कपटरूपें खेळूं आला । खेळतां राम गगना गेला । तेणें मारूनि वज्रटोला । बळें फोडिला मस्तक ॥५१॥
भला गा भला म्हणती रामा । बरा कुंथविला दुरात्मा । वर्णितां रामबळाची गरिमा । देती क्षेमा सप्रेमें ॥५२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP