अध्याय २७ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
पिता गुरुस्त्वं जगतामधीशो दुरत्ययः काल उपात्तदंडः ।
हिताय चेच्छातनुभिः समीहसे मानं विधुन्वञ्जगदीशमानिनाम् ॥६॥
लालनयोगें बहुत दोष । ताडनामाजि गुणविशेष । तदर्थ करितां हितोपदेश । स्वपुत्र शिष्य ताडावे ॥९३॥
तूं जगाचा वास्तव जनक । तरी दंड धरणें आवश्यक । प्रवृत्तिनिवृत्तिप्रबोधक । तूं देशिक गोविंदा ॥९४॥
लोकत्रयात्मक तुझिया प्रजा । विश्वाधीश तूं गरुडध्वजा । अनुग्रहार्थ दंड तुझा । कल्याणबीजावर्धना ॥९५॥
एवं त्रिविध दंडकारणें । निरूपिलीं यथाज्ञानें । परी अलौकिकें तव शासनें । प्राकृतगुणें नुपमती ॥९६॥
प्राकृत पिता क्षुब्धकाम । स्त्रीसंयोगें मैथुनाराम । तत्प्रसंगें प्रजाजन्म । परी तें वर्म तो नेणे ॥९७॥
जननीजनकें अभीष्ट रमती । दैवयोगें प्रजोत्पत्ति । तेही तुझीच अगाध शक्ति । प्रजासंभोतिकारक ॥९८॥
अतर्क्य करिसी गर्भोद्भव । गर्भीं निर्मूनि अवयव । अक्षत रक्षूनि मास नव । करिसी प्रसव कृपेनें ॥९९॥
पिता वेगळा भोगूनि रति । नेणे गर्भाची संभूति । तेथ तो रक्षील काय माती । चिंती श्रीपति सर्वार्थ ॥१००॥
तुझेनि प्रजाचें जननावन । अचिंत्यैश्वर्य तूं भगवान । प्राकृतजन कें तुजसमान । कोण सज्ञान मानील ॥१॥
प्राकृत गुरु विद्योपदेष्टे । बोधिती तदुचित कर्मनिष्ठे । फलप्रलोभें इष्टानिष्टें । दुःखें दुर्घटें वोपिती ॥२॥
तुझा अनुग्रह ज्यांवरी घडे । पूर्ण विवेक त्या उजेडें । तव पदभजनीं प्रेम वाढे । प्रपंचाकडे वैरस्य ॥३॥
अंतर्यामीं तूं उपदेष्टा । तैं उपलभे स्वरूपनिष्ठा । सहजचि वोहट पडे कष्टां । होय प्रतिष्ठा तित्सुखीं ॥४॥
जे काळीं जें जें होणें । तें तें तुझेनि अनुशासनें । प्राकृत भूपति आधिशरपणें । तुझिये तुलने केंवि तुळती ॥१०५॥
तूं कालात्मा अप्रमेय । तुझें शासन दुरत्यय । कोणा लंघिलें नव जाय । तुझेनि होय यम यमिता ॥६॥
तुझी अतर्क्य दंडधारणा । प्रकटी लीलाचरित्रगुणां । समीहसे म्हणिजे करुणा । चेष्टसी नाना अवतारें ॥७॥
तये अवतारलीले आंत । संहारिसी दैत्य दुष्कृत । धर्म स्थापूनि साधु स्वस्थ । रक्षूनि स्मयहत सुर करिसी ॥८॥
आम्ही त्रिजगाचे नियंते । वाहता पृथक्त्वें अहंते । तो मद भंगूनि निजांकितें । करूनि सनाथें अनुग्रहिसी ॥९॥
लेंकुरें अज्ञानें आडरानीं । भरतां देखूनि कृपाळु जननी । दंडूनि सन्मर्गावरी आणी । आम्हांलागूनि तूं तैसा ॥११०॥
दंड नव्हे हा अनुग्रह । बिभीषा दावूनि प्रकटिसी स्नेह । तो तूं सच्चित्सुखविग्रह । करिसी निर्मोह दंडमिसें ॥११॥
हें कैसें गा म्हणसी तरी । यदर्थीं ऐकावें श्रीहरि । दंडें भंगूनि गर्वलहरि । सुखसागरीं नांदविसी ॥१२॥
ये मद्विधाज्ञा जगदीशमानिनस्त्वां वीक्ष्य कालेऽभयमाशु तन्मदम् ।
हित्वाऽऽर्यमार्गं प्रभजंत्यपस्मया ईहाखलानामपि तेऽनुशासनम् ॥७॥
जे कां मादृश विधि हर सुर । स्वपदाभिमानें अज्ञानप्रचुर । तवैश्वर्य अगाधतर । देखोनि सत्वर नत होती ॥१३॥
कुंडामाजील दर्दुर । वरुणा होऊनि म्हणवी थोर । तेणें देखिलिया सागर । गर्व समग्र मग सांडी ॥१४॥
कीं उदुंबरगर्भींचे जंतु । उदुंबरगर्भींए जंतु । उदुंबरगर्भींच शक्तिमन्तु । गरुडाहूनि ब्रह्मांडांत । आपन विख्यात मानिती ॥११५॥
ते हे आम्ही स्वपदाभिमानी । जगदीश म्हणवूं आपले स्थानीं । तुझा देखोनि ऐश्वर्यतरणि । खद्योत होऊनि हारपों ॥१६॥
सर्वांसही प्रळयकाळ । भयें कांपवी ग्रसनशीळ । त्यासी न गणूनि निर्भय प्रबळ । देखती केवळ तुज जेव्हां ॥१७॥
मग सांडूनि अनार्यमार्ग । जो कां पृथक अहंतासंग । करूनि मदगर्वाचा भंग । भजती सवेग आर्यपथा ॥१८॥
तो आर्यपथ म्हणसी कोण । जें कां अभेद तव पदभजन । अखिलमंगल निर्भय पूर्ण । जाणोनि मुनिजन आश्रयिती ॥१९॥
मायाचक्रें काळकलनीं । माजी भ्रमती जीवश्रेणी । तेथें अजस्र तव पदभजनीं । निवटोनि मुनि भ्रमरहित ॥१२०॥
तयां संतत भजननिरतां - । साठीं अवतरसी भगवंता । लीलाचरणें भजनपथा । स्वधर्मसंस्था वाढविसी ॥२१॥
धर्म स्थापूनि दंडिसी दुष्टा । वोपिसी साधूंतें अभीष्टा । स्वभक्तांच्या छेदूनि कष्टां । करिसी प्रतिष्ठा निजधामीं ॥२२॥
जे मादृश जगदीश मानी । पदाभिमानात्मक अज्ञानी । ऐसी तव लीला देखूनि । होती लाजोनि गतगर्व ॥२३॥
मग ते अगर्व विगतमान । सबाह्य अभेद अनन्यशरण । सवेग आश्रयिती श्रीचरण । सप्रेमभजनसंस्कारें ॥२४॥
ऐसी तुझी सहज लीला । न दंडूनि दंडी कुटिला । झाडूनि दुर्मद वेगळा । भजनचित्कला प्रकाशी ॥१२५॥
प्रळयकाळाहूनि कठिण । व्रजभंगार्थ म्यां केलें विघ्न । तुवां उचलूनि गोवर्धन । केलें भंजन विघ्नाचें ॥२६॥
प्रयीयमेघ संवर्तक । सहित मरुद्गाणांचें कटक । माजि दंभोलि भयानक । दिनसप्तक वर्षतां ॥२७॥
तुवां गोवर्धनातळवटीं । व्रज रक्षिला कृपादृष्टी । हें देखोनि आमुच्या पोटीं । शंका उफराटी उपजली ॥२८॥
जाणोनि नेणोनि तव महिमान । म्यां दुर्जनें केलें विघ्न । तो अपराध क्षमापन । कीजे संपूर्ण प्रभुत्वें ॥२९॥
या श्लोकीं भगवंतासी । अपराध न लवोनि परिहारेशीं । आपली अर्हता दंडासी । अंगीकारेंशीं स्तवियेलें ॥१३०॥
तथापि मी दंडाई जरी । क्षमासंपन्न तूं श्रीहरि । प्रभुत्वें अपराधक्षमा करीं । हें यावरी प्रार्थितसें ॥३१॥
स त्वं ममैश्वर्यमदप्लुतस्य कृतागसस्तेऽविदुषः प्रभावम् ।
क्षंतुं प्रभोऽथार्हसि मूढचेतसो मैवं पुनर्भून्मतिरीश मेऽसती ॥८॥
अल्प कुल्या उचंबळती । क्षोभें सागरावरी लोटती । प्रभुत्वें तो अगाधस्थिति । अक्षोभवृत्ति गांभीर्यें ॥३२॥
तेंवि ऐश्वर्यमदें घूर्णित । विबुधपति तो मी अबुधवत् । गर्वा चढोनि जें दुश्चरित । हें साहणें उचित प्रभुत्वें ॥३३॥
गर्वा चढोनि जें म्यां केलें । मूर्खाचरणामाजि तें पडलें । प्रभुत्वें पाहिजे क्षमा केलें । स्वजनवात्सल्यें प्रभुवर्यें ॥३४॥
चित्तासि मौढ्याचें आवरण । नेणेचि विवेकविवरण । त्याचे विरुद्ध कर्माचरण । प्रभुत्वें संपूर्ण साहिजे ॥१३५॥
सोढव्यशक्ति तुजपासूनी । लाहोनि क्षमासंपन्न धरणि । त्या तुज अपराधक्षमापनीं । न लगे विनवणी गोविंदा ॥३६॥
परंतु एक विज्ञापना । सेवेसि कीजतसे सर्वज्ञा । ते देइजे अंकितगणा । मज अल्पज्ञा लागुनी ॥३७॥
अंतर्यामीं तूं प्रेरक । प्रेरिसी संकल्पमति विवेक । तरी हा असन्मतिकळंक । मज निष्टंक नुपजो कीं ॥३८॥
म्हणसी तूंचि सावध राहें । सर्वदा विचार विवरूनि पाहें । तरी मी कवळिला महामोहें । शक्ति न लाहें विवरणीं ॥३९॥
कनकबीज कां महामद्य । जैं सेवी सर्वज्ञ शास्त्रकोविद । तोही होऊनि बुद्धिमंद । यथेष्ट विरुद्ध आचरें ॥१४०॥
तैसें आसव वासवपद । मी सेवूनि झालों मंद । आत्मविचारीं केवळ अंध । कुमतिकोविद सगर्व ॥४१॥
सुरपूज्य मी विबुधपति । असदाचरणें अबुधमति । तेणें भोगीं भवविपत्ति । आतां श्रीपति हें न घडो ॥४२॥
अहल्येचा सकाम लोभ । धरूनि गौतमा आणिला क्षोभ । तेणें यातना झाल्या सुलभ । पुन्हा दुर्लभ शक्रत्व ॥४३॥
शिवगणांवरी क्रोध केला । तेणें जालंधर निर्माण झाला । ते विपत्ति त्रैलोक्याचा । भोगितां झाला प्रळयांत ॥४४॥
ऐशा कामक्रोधांच्या पीडा । उपजोनि विवेक करिती कुडा । मति पालटे त्याचिया भिदा । धरी रोकडा असत्पथ ॥१४५॥
तये असन्मतीच्या गुणें । चिरकाळ जाजावलोंही शीणें । सवेंचि विसरोनि मागील उणें । पुन्हा दुर्गुणें भांबावें ॥४६॥
विपत्ति भोगिली रावणाघरीं । बळीनें केलें पैं भिकारी । तारकासुरें दारोदारीं । गिरिकंदरीं फिरविलें ॥४७॥
ऐसें असन्मतीच्या गुणें । पुनः पुनः भोगीं उणें । परंतु न राहें सावधपणें । कामादिदुर्गुणें कवळिलिया ॥४८॥
दैवें प्रभूशीं झाली भेटी । म्हणोनि आजि हे कथिली गोठी । सोडूनि हृदयांतील गांठी । दाविला दृष्टी हद्रोग ॥४९॥
सर्ववेत्ता तूं गोविंद । अंतरात्मा आनंदकंद । जाणोनि अकृत्रिम अनुवाद । प्रसीद प्रसीद परेशा ॥१५०॥
पुन्हा असन्मति नुपजो मज । इतुकें प्रार्थनेमाजि गुज । प्रभूसि निवेदन केलें सहज । यावरी पदरज वांछीतसें ॥५१॥
महा अपराध अनयगुणें । केला तो कां क्षमा करणें । स्वामी सहसा ऐसें न म्हणें । मत्प्रार्थनें परियेसीं ॥५२॥
तवावतारोऽयमधोक्षजेह स्वयंभराणामुरुभारजन्मनाम् ।
चमूपतीनामभवाय देव भवाय युष्मच्चरणानुवर्तिनाम् ॥९॥
पूर्वीहूनि प्रतिपाळिलें । कृपाधिकारीं । नियोगिलें । तेणें अनार्य प्रमादें केलें । परी तें साहिलें पाहिजे ॥५३॥
घेऊनि अमरांचा कैवार । युगीं युगीं कृतावतार । धर्म स्थापूनि मारिसी असुर । निजकिंकर रक्षूनी ॥५४॥
हाही अवतार अधोक्षजा । येथ आमुच्या कल्याणकाजा । तोही वरदानुग्रह तुझा । बरवे वोजा मी जाणें ॥१५५॥
ज्यांच्या भारें दाटली धरणि । ते दुरात्मे दुष्टाचरणी । प्रजापीडक ज्यांची करणी । त्यांच्या श्रेणी असंख्य ॥५६॥
आपण पृथ्वीसि भाररूप । होऊनि करिती अपार पाप । पुढें बोधूनि पापसंकल्प । भार अमूप प्रसवती ॥५७॥
वनीं पेटूनि एक काडी । पावका चेतवी निजांगवाढी । पुढें पुढें सहर कोडी । पेटवी परवडी तृणशाखा ॥५८॥
तेणें प्रचंड दावानळ । माजे वनौकसांसि काळ । तैसे भूभार भूपाळ । दुष्कृतकुळ वाढविती ॥५९॥
त्यांच्या भारें दाटली धरणि । त्रास पावोनि दुष्टाचरणीं । ब्रह्म्यापाशीं त्यांची करणी । तिनें येऊनि निवेदिली ॥१६०॥
तेव्हां विधिहरसुरवर आम्हीं । येऊनि तुजला स्तविलें स्वामी । तंव गौरविलें वरदनियमीं । तें हृत्पद्मीं मज स्मरतें ॥६१॥
तुझा येथ हा जो अवतार । उतरावया धरित्रीभार । मारावया दुष्ट दुष्कर । स्वपदानुचर रक्षावया ॥६२॥
तव चरणानुवर्ती गणा । माजील सर्वांहूनि उणा । प्रमादें आचरलों दौर्जन्या । तर्ही स्वशरणा नुपेक्षीं ॥६३॥
जर्ही अपत्यें दिधला त्रास । तथापि जनकें नेच्छिती नाश । मज जाणोनि निज औरस । अपराधास क्षमावें ॥६४॥
ऐसें विनवूनि बहुतांपरी । विनीत होऊनि नमस्कारी । ते हे नमनात्मक वैखरी । पौरंदरी शुक वर्णी ॥१६५॥
नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने । वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः ॥१०॥
अचिंत्यैश्वर्यसंपन्ना । नमो अनंतगुणपरिपूर्णा । तुजकारणें नमो कृष्णा । स्वभक्तकरुणा स्नेहाळा ॥६६॥
सर्वांतर्यामीं तूं पुरुष । अखिल कर्मांचा स्वयंभ साक्ष । माझे न गणावे गुणदोष । मी कृतागस वंदितसें ॥६७॥
म्हणसी पुरुष मी जीवात्मा । तरी हें न म्हणें पुरुषोत्तमा । सर्वव्यापी तूं महात्मा । इंद्रियग्रामा अगोचर ॥६८॥
सर्वनिवासी वासुदेव । चराचरासि तुजमाजि ठाव । सर्व तुझेचि भावाभाव । नमो स्वयमेव स्वस्वरूप ॥६९॥
सूर्यासंमुख करितां दृष्टि । सूर्य बिंबे दृष्टीपोटीं । तैसी तुजमाजि सकळ सृष्टि । सृष्टिपोटीं तूं अवघा ॥१७०॥
सात्वतपति भक्तपति । सुरनरपति यादवपति । प्रणतपाळक गोकुळपति । नमो गोपति गोऽगम्या ॥७१॥
यादवपति मी यादवां । समान ऐसें न मनीं देता । जाणोनि भक्तांच्या सद्भावा । आविर्भावा तूं करिसी ॥७२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP