अध्याय २७ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
स्वच्छंदोपात्तदेहाय विशुद्धज्ञानमूर्तये । सर्वस्मै सर्वबीजाय सर्वभूतात्मने नमः ॥११॥
स्वकीयस्वजनच्छंदानुसार । देह धरिसी वारंवार । तेही विशुद्धज्ञानप्रचुर । नोहे सविकारभूतमय ॥७३॥
नमो विशुद्धज्ञानमूर्ति । नमो विश्वकल्यानकीर्ति । नमो परतर परंज्योति । विश्वसंवित्ति तुज नमो ॥७४॥
मायेकरूनि सर्वरूपी । वास्तव अरूप विश्वव्यापी । अनादिस्मरणाचा संकल्पी । बीजजल्पीश्रुति गाती ॥१७५॥
बीजशब्दें आदिकारण । सत्यसंकल्प मुख्य स्फुरण । त्या तुजकारणें माझें नमन । अनार्य पूर्ण क्षमावया ॥७६॥
सर्वभूतें तुझ्या ठायीं । होती जाती वर्तती पाहीं । तूं भूतात्मा तुजवीण कांहीं । वेगळें नाहीं उर्वरित ॥७७॥
तन्मात्रकें कर्म करणें । ज्ञान चेष्टा कर्तृकरणें । जें अनार्य एकदाचरणें । तें तुजविण भिन्न नसे ॥७८॥
एवं अभेद सर्वात्मका । तुज नमो जी विश्वव्यापका । आतां माझी अपराधशंका । जगन्नायका जाणोनी ॥७९॥
मयेदं भगवन् गोष्ठनाशायासारवायुभिः । चेष्टितं विहते यज्ञे मानिना तीव्रमन्युना ॥१२॥
कृतापराध मी निश्चयात्मक । किमर्थ कैसा तें तूं ऐक । माझा वर्जिला विहित मख । प्रतिवार्षिक अनुष्ठिला ॥१८०॥
तेणें तीव्र चढला क्रोध । मानभंगें झालों अंध । मग म्यां अनुष्ठिलें विरुद्ध । तेंही प्रसिद्ध बोलतों ॥८१॥
षड्गुणैश्वर्यसंपन्ना । तुज न गणूनि जनार्दना । व्रजनाशार्थ प्रेरिलें घना । विद्युत्पतना अनिळेंशीं ॥८२॥
मानभंगें क्षुब्धचित्त । होऊनि मी जें दुश्चेष्टित । आचरलों तें इत्थंभूत । तुज समस्त निवेदिलें ॥८३॥
तथापि प्रभुत्वें अनुग्रह । मजवरी केला परमस्नेह । जेणें ध्वस्तमहामोह । सप्रेमरोह श्रीचरणीं ॥८४॥
त्ययेशानुगृहीतोऽस्मि ध्वस्तस्तंभो हतोद्यमः । ईश्वरं गुरुमात्मानं त्वामहं शरणं गतः ॥१३॥
तुवां ईश्वरें अनुग्रहिलों । गर्वापासूनि ध्वस्त केलों । प्रभुत्वप्रतापें सांडवलों । मग उमजलों तव महिमा ॥१८५॥
तूं न करितासि मानभंग । असता प्रताप जैं अभंग । तैं मग तव चरणीं अनुराग । कैसेनि सांग उपजता ॥८६॥
यालागिं स्वामी गरुडध्वजा । दंड नव्हे हा अनुग्रह तुझा । मजवरी करूनि बरवे वोजा । सहजी सहजा उमजविलों ॥८७॥
विश्वनियंता तूं ईश्वर । जगदात्मा तूं जगद्गुरु । शरणागत मी तव किंकरु । वारंवार वंदीतसें ॥८८॥
ऐसा इंद्रें विनयोत्तरीं । स्तविला जगदात्मा श्रीहरि । काय वदली शुकवैखरी । ते यावरी परियेसा ॥८९॥
शुक उवाच - एवं संकीर्तितः कृष्णो मघोना भगवानमुम् । मेघगंभीरया वाचा प्रहसन्निदमब्रवीत् ॥१४॥
ऐसा इंद्रें चक्रपाणि । संप्रार्थिला करुणावचनीं । तो इंद्रातें हास्यवदनीं । मेघस्वनीं बोलतसे ॥१९०॥
श्रीभगवान् उवाच - मया तेऽकारि मघवन् मखभंगोऽनुगृह्णता । मदनुस्मृतये नित्यं मत्तस्येंद्रश्रिया भृशम् ॥१५॥
इंद्रश्रियेच्या मदेंकरून । तुज चढला जो पदाभिमान । त्याचें करावया निरसन । मखरोधन म्यां केलें ॥९१॥
अखंडैकमदननुस्मृति । जागवावया तुझ्या चित्तीं । मख रोधोनि गर्वोपहति म्यां निश्चिती योजिली ॥९२॥
दंडरूपें अनुग्रहीता । त्या मज नोळखती तत्त्वता । त्यांची समस्त मदगर्वता । मी संहर्ता प्रतापें ॥९३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP