अध्याय २७ वा - श्लोक २६ ते २८
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नानारसौघाः सरितो वृक्षा आसन् मधुस्रवाः । अकृष्टपच्यौषधयो गिरयोऽबिभ्रदुन्मणीन् ॥२६॥
मधुदुग्धादि इक्षुरस । ऐसे अनेक रसविशेष । वोघें वाहती बारा मास । सर्वां संतोष सर्वदा ॥८॥
दुग्धसरितांचिया कांठें । नवनीताचा कर्दम दाटे । इक्षुरसाच्या गंगातटें । वाळुवंटें शर्करेचीं ॥९॥
सर्व वृक्ष स्रवती मधु । कमलेसमान अवघ्या वधू । प्राणिमात्र झाले साधु । अगाध बोधु अबळांसी ॥५१०॥
कुळवनांगरकर्षणाविणें । अमर्याद पिकती धान्यें । सर्व ऋतूंचीं फळें प्रसूनें । सुलभपणें सर्वत्र ॥११॥
ऊषरगिरिवरप्रस्तरखडकें । सर्वत्र धान्यसमृद्धि पिके । या वेगळीं धातुकनकें । रत्नें माणिक्यें गिरि स्रवती ॥१२॥
धरा निर्धन नाहींच कोठें । परी कृष्णाचें ऐश्वर्य मोठें । पोटींचीं द्रव्यें रत्नसांठे । केलें प्रकट गिरिवरीं ॥१३॥
ब्रह्मांडभुवनींचा चक्रवर्ती । जेथ क्रीडे तो श्रीपति । वैकुंठादिकसुरसंपत्ति । कां पां न येती त्या ठायां ॥१४॥
सर्व तरुवर कल्पतरु । सर्व गिरिवर रत्नाकरु । सर्व वनचरनरकिन्नर । खेचर भूचर सुरसाध्य ॥५१५॥
पीयूषवाहिनी सरिता सर्व । सनकादिकां तो सुसेव्य ठाव । चिंतामणि जेथींचे ग्राव । राबती अगर्व अणिमादि ॥१६॥
शुकसारिका परस्परीं । सिद्धांतपूर्वपक्षोत्तरीं । संवादप्रबोधकुसरीं । मुक्ति चार्ही नाचविती ॥१७॥
उपनिषत्पाठें पारापत । घुमती सोहंबोधभरित । नाहं मम या बोधें नित्य । करिती नृत्य कलापी ॥१८॥
कृष्णेऽभिषिक्त एतानि सत्त्वानि कुरुनंदन । निर्वैराण्यभवंस्तात क्रूराण्यपि निसर्गतः ॥२७॥
ब्रह्मांडसाम्राज्यपट्टाभिषेक । कृष्णासि केला असतां देख । क्रूर प्राणीही सम्यक । निर्वैर निःशंक क्रीडती ॥१९॥
धेनुव्याघ्र एके ठायीं । चाटिती बैसोनी शीतळ सायीं । अजाअविकांची नवाई । वर्तती सोयी वृकव्याघ्रां ॥५२०॥
करी केसरी कुरंगें शुनक । खग पन्नग बिडाळ मूषक । निर्भय धनि जल पावक । काक कौशिक निर्वैर ॥२१॥
इत्यादि अनेक निसर्गवैरें । टाकूनि सत्त्वें परस्परें । स्नेहें वर्तती सप्रेमभरें । इंद्र श्रीधर जालिया ॥२२॥
इति गोगोकुलपतिं गोविंदमभिषिच्य सः । अनुज्ञातो ययौ शक्रो वृतो देवादिभिर्दिवम् ॥२८॥
अभिषेककथोपसंहार । सुरभि आणि पुरंदर । विधिआज्ञेनें मुरलीधर । केला इंद्र देवेंशीं ॥२३॥
गोशब्दार्थें समस्त स्वर्ग । गोकुलशब्दें गोगणवर्ग । यांतेम वेत्ता अंतरंग । तो गोइंद्र गोविंद ॥२४॥
ऐसी केली नामसंज्ञा । येथींचा अर्थ उमजे सुज्ञां । येरा प्राकृतां अल्पज्ञां । यदर्थी प्रज्ञा न प्रकटे ॥५२५॥
एके रोमेंसि मुंगी डसे । ते त्वगिंद्रियासि जाणवे जैसें । तेचि इतरा देहीं स्पर्शें । तेणें न लसे सुख दुःख ॥२६॥
तैसें सर्वही स्वौपाधिक । ज्ञाते असती पृथक् पृथक् । कृष्ण जाणोनि सर्वात्मक । म्हणणें सम्यक गोविंद ॥२७॥
ज्याचें ज्ञान जेथवरी । तो तेथवरी गोपन करी । जाणोनि सर्वज्ञ श्रीहरि । गोविंद गजरीं सुर गाती ॥२८॥
शापविपत्ति जाणता भावी । तरी इंद्र अहल्या भोगिता केंवि । अल्पज्ञ म्हणोनि पडली गोवी । बुध गोसांवी गोविंद ॥२९॥
शंकर भावी जरी जाणता । तरी भस्मासुरासि वर न देता । संकटीं पाळी अल्पज्ञता । सर्वज्ञ गोप्ता गोविंद ॥५३०॥
भावी आपणा करिती कष्टी । ऐसी कळली असती गोष्टी । तरी शंखासुरादि असुरसृष्टि । सहसा परमेष्ठी न सृजिता ॥३१॥
एवं विधिहरसंक्रंदन । स्वोपाधिपर्यंत अभिज्ञ । कृष्ण परमात्मा परिपूर्ण । त्रिकालज्ञ गोविंद ॥३२॥
पितरां भूतार्थ दर्शविल । वर्तमानार्थ प्रकट केला । भावी जाणोनि पांडवाला । उपाय सूचिला स्थळोस्थळीं ॥३३॥
नारदशाप गुह्यकांसी । भूतार्थ जाणोनि मानसीं । स्वयें उद्धरी यमलार्जुनांसी । हृषीकेशी सर्वज्ञ ॥३४॥
पूतनेचें वर्तमान । जाणोनि प्याला सगर स्तन । तीसि दिधलें सायुज्यसदन । एवं सर्वज्ञ गोविंद ॥५३५॥
एवं जाणोनि सर्वज्ञपति । ब्रह्मांडाची गोपनशक्ति । लक्षूनि श्रीकृष्णाचे हातीं । नाथ समस्तीं स्वीकेला ॥३६॥
कृष्ण करूनि आपुला नाथ । विधिहरशक्रादि समस्त । होऊनि ऐश्वर्यें सनाथ । म्हणविती समर्थ तद्योगें ॥३७॥
मग करूनि जयजयकार । सर्वीं केला नमस्कार । तेथील अनुज्ञाप्रकार । सविस्तर परिसावा ॥३८॥
बद्धांजळि कृष्णाप्रति । आज्ञा मागतां सुरपति । कृष्णें कथिली रहस्ययुक्ति । निजएकांतीं नेऊनी ॥३९॥
जगत्रयाच्या परिपालना । अवतरलों हे जाणोनि सूचना । समयीं समयीं तदुपकरणा । वंदोनि आज्ञा अर्पिजे ॥५४०॥
बालक्रीडेचा विनोद । जंववरी हो कंसवध । तंववरी निःशस्त्र मल्लयुद्ध । दैत्य विरुद्ध मारीन ॥४१॥
पुढें जरासंधेंशीं समर । होतां शस्त्रास्त्ररंहवर । तुवां पाठविजे सत्वर । संकेत मात्र जाणोनि ॥४२॥
पुन्ह कालयवनाच्या समरीं । सिंधुगर्भीं नेतां पुरी । तेव्हां सर्वही सामग्री । सभा साजिरी आणावी ॥४३॥
आतां संभ्रम हा समस्त । दिव्यैश्वर्य पावो अस्त । गोपशैशवनाट्यें व्यस्त । मज प्रशस्त विचरणें ॥४४॥
इतुका इंद्राशीं एकांत । करूनि मस्तकीं ठेविला हात । अंगीकारूनि तो संकेत । तेणें श्रीकांत वंदिला ॥५४५॥
समस्तांसि दिव्याभरणें । तांबूलादि दिव्य वसनें । दिव्य सुगंध अनुलेपनें । माळासुमनें समर्पिलीं ॥४६॥
सर्वीं साष्टांगनमनें केलीं । सुमनें हरिचरणीं गोविलीं । मूर्ति हृत्कमळीं ठेविली । मग आदरिलीं प्रयाणें ॥४७॥
ऐसा समस्त सुरांसहित । लब्धानुज्ञा अमरनाथ । गणगंधर्वीं परिवारित । जाता झाला निजधामा ॥४८॥
कामधेनुनिर्मित विभव । इच्छामात्रें लोपलें सर्व । स्वधामा गेले समस्त देव । श्रीवासुदेव वंदूनी ॥४९॥
यथापूर्व गोवर्धन । यमुना गोकुल वृंदावन । धेनु गोप गोपी स्वजन । मानिती स्वप्नसंभ्रम तो ॥५५०॥
मुळीं विस्तार न सिदे इतुका । झणें अल्पज्ञ घेती शंका । ज्यांसि अनुक्रम हा ठावुका । ते या विवेका जाणती ॥५१॥
नोहे निराधार वैखरी । पहावें नारदपांचरात्रीं । मानसपद्धती माझारी । सविस्तारीं उत्सव हा ॥५२॥
वाखाणितां दशमस्कंध । पांचरात्रेंशीं संबंध । सहसा न मनावा विरुद्ध । ऐका प्रसिद्ध उपपत्ति ॥५३॥
राम रावण मारूनि रणीं । सुरनरउरगां साम्राज्यसदनीं । बिभीषण लंके संस्थापूनी । सीता आणुनी नृप जाला ॥५४॥
इतुकें संकेतें रामायण । ज्यांसी सविस्तर पूर्वीं श्रवण । याचिवरूनी त्यां उमजे खुण । येरां निरूपण शतकोटी ॥५५५॥
समरांगण कां द्विजतर्पण । एका शब्दें होय कथन । तेंचि कथितां विस्तारून । वाढे व्याख्यान बहु फार ॥५६॥
योद्धे भोक्ते पदार्थनांवें । प्रेरणअर्प्णविधान बरवें । करितां निर्मूळ केंवि म्हणावें । तें जाणावें तज्जनित ॥५७॥
श्रोता परीक्षिति मरणोन्मुख । जाणोनि संकेतें वदला शुक । जैं श्रोते वक्ते स्वस्थ सविवेक । तैं टीका सम्यक् कां न कीजे ॥५८॥
श्रोते सर्वज्ञ समर्थ । तेथ परिहार हा किमर्थ । एवं टीका हे यथार्थ । पूर्ण परमार्थ हरिवरें ॥५९॥
ऐसा कथूनि कृष्णाभिषेक । परीक्षितीसि म्हणे शुक । कृष्णलीला अपूर्व ऐक । स्वस्थ नावेक होउनी ॥५६०॥
राया असार हा संसार । यामाजि नवविधभजन सार । त्याही साराचें निजसार । कीर्तनश्रवण हरीचें ॥६१॥
तें फावलें आम्हां तुम्हां । या भाग्यासि नाहीं सीमा । जेथ ज्यांचा निःसीम प्रेमा । पुरुषोत्तमा प्रियतम तो ॥६२॥
यावरी कथा वक्ष्यमाण । नंद अकाळीं करितां स्नान । वरुणें नेला तो बांधोन । कृष्णें जाऊन सोडविला ॥६३॥
ऐशी देखूनि अद्भुत शक्ति । बल्लवीं प्रार्थितां कृष्णाप्रति । वैकुंठदर्शनाची प्राप्ति । करी श्रीपति तयांतें ॥६४॥
तये कथेचिया श्रवणा । श्रोतीं सावध कीजे मनना । सप्रेमश्रवणीं गुंततां मना । समस्त विघ्ना उपशमन ॥५६५॥
ब्रह्मांडसाम्राज्यसिंहासनीं । एकनाथ सर्वां मूर्घ्नि । चिदानंदें विजयध्वनि । स्वानंद गननीं न समाये ॥६६॥
पट्टाभिषिक्तगोविंदाव्हा । ऐकोनि संतोष सर्वीं सर्वां । करितां सप्रेम रसवर्षावा । दयार्णवातें सुखभरतें ॥६७॥
ऐशी श्रीमद्भागवतीं । अठरासहस्र संहितागणती । दशमस्कंधीं नृपाप्रति । शुकभारती निरूपी ॥६८॥
तो हा अध्याय सत्ताविसावा । भोगिजे स्वसत्ताविसांवा । हृदयीं स्मरोनि चोव्विसावा । दयार्णवा अनुलक्षें ॥६९॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायाममरेंद्रहरब्रह्मेंद्रसाम्राज्यगोविंदपट्टाभिषेको नाम सप्तविंशतितमोऽध्यायः ॥२७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥२८॥ टीका ओव्या ॥५६९॥ एवंसंख्या ॥५९६॥ ( सत्ताविसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १३८५४ )
सत्ताविसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP