अध्याय २७ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
मामैश्वर्यश्रीमदांधो दंडपाणिं न पश्यति । तं भ्रंशयामि संपद्भ्यो यस्य चेच्छाम्यनुग्रहम् ॥१६॥
ऐश्वर्यश्रीमदें जो अंध । न मनी स्वैराचरण विशुद्ध । न पाहेचि विधिनिषेध । केवळ बद्ध देहात्मा ॥९४॥
देहअहंतेचिया भुली । विवेकसन्मति हारपली । विषायचरणीं सरळी दिधली । नाहीं सूचली भयशंका ॥१९५॥
ब्रह्मादिकांचिये मूर्ध्नि । मी नियंता दंडपाणि । श्रुतिस्मृतीच्या पाहोनि नयनीं । यथाशासनीं दंडिता ॥९६॥
अणूपासूनि सूक्ष्मतरें । शरीरें वोपीं कर्मानुसारें । ईश्वरपर्यंत लहानें थोरें । नीतिनिर्धारदंडिता ॥९७॥
माझ्या दंडाभेणें गगन । सच्छिद्र असोनि न गिळी पवन । अफाट वायु तो उदान प्राण । व्यान समान मित वाहे ॥९८॥
जितुका मारुत जये ठायीं । बिभागें नियमूनि स्थापिला देहीं । माझ्या दंडाभेणें कांहीं । अन्यप्रवाहीं तो न वचे ॥९९॥
सूर्य वाहे मितल्या तापा । अग्नि शोखी परिमित आपा । आप विषामृतादिरूपा । मत्संकल्पा जग जोपी ॥२००॥
मच्छासनें विश्वंभरा । होऊनि भौतिकां प्रसवे धरा । सृजनावनप्रलयांतरा । सचराचरा यमनियमीं ॥१॥
जन्मस्थितिप्रळयकाळ । वर्ते ममाज्ञानियमशील । काळाचाही महाकाळ । मी गोपाळ गोगोप्ता ॥२॥
तो मी दंडपाणि । सुरवर तत्पर विधिपालनीं । जो मदांध विषयाचरणीं । न पाहे न गणी दंडभय ॥३॥
मग मी त्यावरी दंडधारी । क्षोभोनि कृपेनें अनुग्रह करीं । त्याची संपत्ति अवघी हरीं । गोपीं शरीरीं अनुस्मृति ॥४॥
ज्यासि अनुग्रह करूं इच्छीं । त्यासि न गोवीं विषयीं तुच्छीं । मद भंगूनि भजनीं स्वच्छीं । योजीं अनिच्छीं सत्संगीं ॥२०५॥
श्रीमदांधा मदनुग्रह । हाचि दुर्लभतर पुण्याह । येरां कवळी महामोह । तेणें दुर्देह बहु धरिती ॥६॥
परम धन्य तूं संक्रंदन । पावतां मखभंगें अपमान । सत्त्वर सांडूनि पदाभिमान । मदंघ्रिभजन आदरिलें ॥७॥
दोन मुहूर्त वृक्षातळीं । पांथ राहतां मध्याह्नकाळीं । दुजा राहूं येतां जवळी । माजवी कळी प्राणान्त ॥८॥
होता स्वराज्यपदाभिमान । तुझा उतरला मत्कृपेंकरून । विनीत होऊनि केलें स्तवन । झालों प्रसन्न मी तेणें ॥९॥
गम्यतां शक्र भद्रं वः क्रियतां मेऽनुशासनम् । स्थीयतां स्वाधिकारेषु युक्तैर्वः स्तंभवर्जितैः ॥१७॥
आतां तुम्हांसि कल्याण असो । आपुलाली पदवी विलसो । पुन्हां विपत्तिसंशय नसो । भ्रांति न वसो पुढती हे ॥२१०॥
एका इंद्रा आज्ञा देणें । कृष्ण वदला कां बहुवचनें । ऐसा संशय श्रोतीं मनें । न लगे करणें या ठायीं ॥११॥
कोणी एक अपराध करी । तया अनयाच्या परिहारीं । बहुतीं अनय घेऊनि पदरीं । चरणावरी घालिजे ॥१२॥
तैसे वरुणादि दिग्पति । समस्तीं येऊनि कृष्णाप्रति । इंद्रापराधनिवृत्ति । मौनस्थिति वांछिली ॥१३॥
त्यामाजि इंद्रें होऊनि शरण । अपराधाचें क्षमापन । करावया केलें स्तवन । शुकें संपूर्ण तें कथिलें ॥१४॥
ऐशाच समस्तांचिया स्तुति । कथितां विस्तार होईल ग्रंथीं । मुमूर्ष जाणोनि परीक्षिति । शुक संकेतीं बोलिला ॥२१५॥
एकवाक्यें संबोधन । बहुवचनोक्ती आज्ञापन । हें मुनीचें चातुर्य पूर्ण । शास्त्रप्रवीण जाणती ॥१६॥
अरे इंद्रा तुम्हीं समस्तीं । जावें म्हणतां तिहीं विनति । विनीती केली कृष्णाप्रति । ते हे श्रोतीं परिसिजे ॥१७॥
येथूनि कोठें जावें स्वामी । जरी तूं म्हणसी स्वर्गधामीं । तेथ ऐसेचि क्रोधादिकामी । पुढती आम्ही जाजावों ॥१८॥
हें ऐकोनि म्हणे हरी । मम शासना वंदूनि शिरीं । तुम्ही वर्ततां निजाधिकारीं । पुन्हा षड्वैरि न बाधिती ॥१९॥
मदनुशासनीं होऊनि युक्त । पृथगैश्वर्यें न होईजे मत्त । गर्वाहंकारवर्जित । स्मृति संतत राखावी ॥२२०॥
युक्त होऊनि इहीं लक्षणीं । सावध स्वपदसंरक्षणीं । पदीं वर्ततां अर्धक्षणीं । तुम्हां लागूनि न विसंबें ॥२१॥
शुक उवाच - अथाऽऽह सुरभिः कृष्णमभिवंद्य मनस्विनी । स्वसंतानैरुपामंत्र्य गोपरूपिणमीश्वरम् ॥१८॥
एवं अपराध करूनि क्षमा । इंद्रा धाडिलें अमरधामा । पुढें सुरभि कुरुसत्तमा । पुरुषोत्तमा स्तवीतसे ॥२२॥
कृष्णें इंद्र आज्ञापिला । परी तो स्वधामा नाही गेला । कृष्णा अभिषेक पाहिजे केला । म्हणोनि राहिला तिष्ठत ॥२३॥
इंद्रस्तुति संपल्यावरी । सुरभि कृष्णातें नमस्कारे । सहितस्वसंतानपरिवारीं । कृष्णा आमंत्री संबोधनीं ॥२४॥
मनोऽनुकूला मनस्विनी । स्तविती झाली मधुरवचनीं । जो कां ईश्वर पूर्णपणीं । चक्रपाणि गोपरूपी ॥२२५॥
तैं सुरभिमुखींचें स्तवन । नृपा कथी व्यासनंदन । श्रोतीं होऊनि सावधान । कीजे श्रवण सद्भावें ॥२६॥
सुरभिरुवाच - कृष्ण कृष्ण महायोंगिन् विश्वात्मन् विश्वसंभव । भवता लोकनाथेन सनाथा वयमच्युत ॥१९॥
प्रस्तुत स्मरोनि कृतोपकार । पुढें लक्षूनि भय दुस्तर । तेथ तुझाचि परमाधार । सूचनापर संबोधी ॥२७॥
सुरभि म्हणे अगा श्रीकृष्णा । आमुच्या नुवगसी संरक्षणा । तुझ्या जाणोनि नाथपणा । न धरूं गणना भयाची ॥२८॥
कृतयुगीं तूं शुक्लवर्ण । होऊनि नरनारायण । कुढाविलें तपोवन । कामादिविघ्न शमवूनी ॥२९॥
निर्विघ्न तपाचा प्रताप । ब्रह्मांड करूनि निष्पाप । चराचर आनंदरूप । जिंकूनि कंदर्प नादविलें ॥२३०॥
धर्म संस्थापूनि पूर्ण । शांत दांत निरभिमान । तपश्चर्या विस्तारून । केलें पालन त्रिजगाचें ॥३१॥
त्रेतायुगीं त्रिपाद धर्म । त्रितीयभागें मलिन कर्म । रक्तवर्ण परशुराम । होऊनि संग्राम स्वीकेला ॥३२॥
ब्रह्मचर्य वेदाध्ययन । तपश्चर्यापरायण । परंतु धर्मार्थ असहिष्ण । महानिर्घृण समरंगीं ॥३३॥
इषुधिकार्मुकपरशुपाणि । होऊनि मारिल्या क्षत्रियश्रेणी । त्यांच्या रक्ताचे तर्पणीं । आब्रह्मभुवनीं सुख केलें ॥३४॥
तो तूं द्वापरीं पीतवर्ण । होऊनि शंसिलें हरिपूजन । धर्माधर्म समसमान । शकलें जाणोनि पृथुरूपें ॥२३५॥
आतां कळिकाळाचा उदय । यवन करिती धेनुक्षय । तेथ तुझेनि आम्ही निर्भय । हा अभिप्राय सूचिला ॥३६॥
भंगले धर्माचे तीन चरण । शेष उत्तरोत्तर होय क्षीण । ऐसें जाणोनि झालासि कृष्ण । धर्मपाळन करावया ॥३७॥
कृष्ण ऐशा संबोधनें । इत्यादि अभिप्रायसूचनें । केलें म्हणोनियां व्याख्यानें । नृपाकारणें शुक बोधी ॥३८॥
शिलंगणींचें सोनें म्हणती । परी ते कोरडीच वदंती । तेथ देखोन प्रतीति । यथार्थोक्ति स्तवितसे ॥३९॥
प्रबळ कोपला अमरपति । नाशावया गोसंतति । प्रळयवॄष्टिविद्युत्पातीं । सप्तराती जाचिलें ॥२४०॥
परी तां इंद्राचा अपमान । केला धरूनि गोवर्धन । गोगोपाळ गोकुळ पूर्ण । अभय देऊन रक्षिलें ॥४१॥
आमुचे शिरीं तूं असतां नाथ । आम्ही कळिकाळीं सनाथ । यवनभयाचा अनर्थ । तैं रक्षिता तेथ तूं आम्हां ॥४२॥
इंद्रवर्षणीं संरक्षिलें । आतां अंतर निर्भय झालें । यवनापासूनि भय बोलिलें । तें सूचविलें ये काळीं ॥४३॥
म्हणसी गौळी मी गोपाळ । भाविभूतादि त्रिकाळ । रक्षवया मज कैंचें बळ । तरी तूं केवळ महायोगी ॥४४॥
योगमायाअंगीकारें । गोवर्धन हा धरिला करें । फेडिलें इंदमदाचें वारें । लीलावतारें योगीशा ॥२४५॥
वनीं प्रबळ दावानळ । उदेला धेनूसि प्रळयकाळ । तै झांकवूनि अक्षिगोळ । प्रकटिली केवळ योगमाया ॥४६॥
नेत्र झांकूनि जंव उघडिती । मायालाघवें तां श्रीपति । नेलें भांडीरवनाप्रति । सुखविश्रांति गोगोपां ॥४७॥
योगमायेच्या अवलंबनीं । दावानळ तो प्राशिला वदनीं । हा तव महिमा स्मरोनि मनीं । योगी म्हणोनि संबोधूं ॥४८॥
पूर्वीं केलें गोरक्षिता । पुढील कासया वाहूं चिंता । ऐसें न म्हणे जगन्नाथा । तूं तत्त्वता विश्वात्मा ॥४९॥
अविधि देखूनि दुष्टाचरण । द्खवसी विश्वात्मा म्हणऊन । विश्वरूपी तूं भगवान । तव कल्याण त्रिजगेंशीं ॥२५०॥
एक आंगींचा उपडे केश । देहवंता तो जाणवे क्लेश । तेंवि तूं जगदात्मा जगदीश । भोगिसी क्लेश जगद्रूपें ॥५१॥
स्वसंताना म्हणती आत्मा । तरी तूं जनज्जनक जगदात्मा । विश्वसंभव ऐशिया नामा । उचित आम्हां संबोधणें ॥५२॥
पशुपक्ष्यादि जंतु सकळ । संततिरक्षणीं प्रयत्नशील । विश्वसंभव तूं गोपाळ । पाळनशील त्रिकाळीं ॥५३॥
विश्वसंभव त्रिजगज्जनक । म्हणसी ब्रह्मा रजात्मक । तरी तूं अमायिक मायिक । ब्रह्म सम्यक श्रीकृष्ण ॥५४॥
कृष्ण हें दुसरें संबोधन । हेतुगर्भ विशेषण । आम्रेडितार्थीं व्याख्यान । येथ सज्ञान न करिती ॥२५५॥
भूवाचक शब्द कृषि । णकार निवृत्ति प्रकाशी । एवं अन्वयव्यतिरेकेंशीं । ब्रह्म कृष्णासि श्रुति म्हणती ॥५६॥
कृषि म्हणिजे भूसत्तावाची । जेणें सन्मात्रता प्रपंचीं । णकारें निवृत्ति विवर्ताची । ऐक्यवस्तूचि प्रकाशी ॥५७॥
एवं कृष्ण ऐसें स्मरण । प्रकाशी आपुलें ब्रह्मपण । ऐक्यें असिपदव्याख्यान । करी संपूर्ण सन्मात्र ॥५८॥
तो तूं परब्रह्म सर्वोत्तमा । न होसी विश्वाभिमानी ब्रह्मा । जननावनाप्ययादिकर्मा । अखिल गरिमा तुज योग्य ॥५९॥
तूं या लोकत्रयाचा नाथ । अक्षय अव्याहत अच्युत । तुझेनि प्रभुत्वें सनाथ । आम्ही समस्त सुरवर्या ॥२६०॥
पूर्वापर इत्यादि वचनीं । अभयाश्रय सुचवूनी । संबोधूनि चक्रपाणि । पुढें विनवणी आदरिली ॥६१॥
त्वं नः परमकं दैवं त्वं न इंद्रो जगत्पते । भवाय भव गोविप्रदेवानां ये च साधवः ॥२०॥
सुरभि म्हणे जी जगत्पति । कृपेनें आइकें आमुची विनति । तूं आमुची उपास्यमूर्ति । ब्रह्मांडवर्तिदेवता ॥६२॥
यालागीं आमुचें संप्रार्थन । सफल करीं कृपेंकरून । आमुचें करावया रक्षण । सामर्थ्य पूर्ण तुजआंगीं ॥६३॥
रंकासि दिधल्या राज्यपदवी । तो प्रजांतें भिक्षा लावी । यालागीं प्रतापी गोसांवी । प्रजा वोजावी निजतेजें ॥६४॥
तुवां इंद्राचा भंगिला गर्व । आमुची संतति रक्षिली सर्व । लीला प्रकटूनि हे अपूर्व । विरिंचि शर्व तोषविले ॥२६५॥
इंद्रादि समस्त सुरवरगण । तुझिया चरणा झालों शरण । आमुचें करावया कल्याण । इंद्रत्व पूर्ण स्वीकारीं ॥६६॥
साधु सुरवर ब्राह्मण धेनु । यांचा इंद्र तूं एथून । अभीष्टाभ्युदयकारक । तुझेनि जाण प्रभुत्वें ॥६७॥
सत्ता इंद्रत्व अर्पावयासी । तुझे आंगीं कोठूनि म्हणसी । तरी ऐकावें इयेविशीं । हृषीकेशी सर्वज्ञा ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP