श्रीकृष्णपरब्रह्मणे नमः ॥
वेद्यवेदनवेदकत्रिपुटी । ज्याचेनि प्रकाशें नेत्रपुटीं । ज्ञेय ज्ञान ज्ञातृत्व पोटीं । घालूनि उलटी गोचर्या ॥१॥
जें होय जयाचें नेतार । तया साधन म्हणिजे नेत्र । एवं ज्ञानेंद्रियांचा निकर । त्रिपुटीप्रसर विस्तारी ॥२॥
चिदाभासें भ्रमलेपणें । अविद्यावरणीं आंधळें होणें । तया विक्षेपें भेटवणें । वेद्य दृश्य नाथिलें ॥३॥
जें जें बाह्य विषयभान । आब्रह्मभुवनादि विस्तीर्ण । नेत्रपुटीं त्याचें वयुन । साच होऊन प्रतिभासे ॥४॥
एवं नेत्रावच्छिन्न वयुन । अबाह्यें बाह्य प्रकाशून । वेद्य ऐसें त्या अभिधान । ठेवून वदन स्वयें होय ॥५॥
वेत्तृत्व जीवचैतन्या शिरीं । देऊन विषयां वेद्य करी । वेदन होऊनि जे माझारी । त्रिपुटी उभारी भ्रमगर्भीं ॥६॥
तया भ्रमाचे भ्रमणचक्रीं । भ्रमिजे सुरनरखेचरचक्रीं । जैंवी शफरीं मकरीं नक्रीं । टपिजे परस्परीं ग्रासार्थ ॥७॥
द्वैत नसोनि अनेकता । वैर नसोनि अमित्रता । भ्रमें वरपडतां प्राकृता । दुजा उमजवितां न भेटे ॥८॥
तेथ उलटूनि नेत्रचर्या । मिथ्यात्व बोधिसी दृश्या ज्ञेया । ज्ञान ज्ञातृत्वीं नेसी लया । श्रीगुरुराया गोविंदा ॥९॥
ऐसा तुझा कृतोपकार । वर्णूं न शकती विधि हर अमर । तेथ फेडावया सधर । कोण परतर अद्वैती ॥१०॥
यालागिं जोंवरी स्मरणधर्म । तोंवरी सद्गुरूवेगळें ब्रह्म । भावील तो पामर अधर । अंधतम पावेल ॥११॥
पुढें स्मरणधर्मा पाठीं । अभेदबोधें ऐक्यगांठीं । स्मरण असतां ऐक्य प्रकटी । तोही सृष्टी मूढात्मा ॥१२॥
सद्गुरु केवळ परब्रह्म । अवगमल्याही विगतभ्रम । अगाध मर्यादेचा नेम । परमनिःसीम अनुल्लंघ्य ॥१३॥
यावत्कल्पांतक देहो । तावन्मर्यादाप्रवाहो । गुरुभजनात्मक बोलिला पहा हो । पार्वतीनाहो गुरुगीते ॥१४॥
अद्वैतबोधें लोकत्रयीं । वर्तत असतां भेदक्षयीं । तथापि गुरुभजनाच्या ठायीं  द्वैत देहीं उरवावें ॥१५॥
जेथ विराला स्मरणधर्म । तेथ आपण सद्गुरुब्रह्म । ये त्रिपुटीचें मोडलें नाम । अनियम नियम तें भजन ॥१६॥
अमोघ ऐसी भजनरहाटी । मादृश पामरां दुर्लभ सृष्टी । म्हणोनि वोवियेच्या परिपाटीं । हे वाक्पुटीं वाखाणूं ॥१७॥
जैसीं पामरें निदैवें । काय जाणती साम्राज्यविभवें । दळणीं कांडणीं तिहीं गावें । मनाचे हावे पुरवावया ॥१८॥
तेंवि गोविंदा तुझें भजन केंवि लाहे मी हीन दीन । यास्तव ग्रंथार्थमिसें स्तवन । करूनि वाङ्मन विनवितसें ॥१९॥
श्रीआज्ञेचें मंगलसूत्र । लाहूनि मम वाणी पवित्र । कृष्णावतारबाळचरित्र । यथार्थसूत्र वाखाणीं ॥२०॥
तेथ अध्याय सदतिसावा । व्योमा वधूनि संपला आघावा । आतां अक्रूरा आणि केशवा । भेटी होईल सप्रेमें ॥२१॥
केशिवध नारदस्तव । आणि वधिला व्योमदानव । हें ऐकोनि कुरुपार्थिव । प्रश्न स्वमेव करूं इच्छी ॥२२॥
श्रीकृष्णाचें अगाध चरित । ऐसे मारिले अपार दैत्य । अक्रूरभेटी कथावी त्वरित । हें नृपाचें आर्त समजोनी ॥२३॥
भूतभविष्यद्वर्तमान । जाणतां योगींद्र शुक सर्वज्ञ । तेणें भूपति न करितां प्रश्न । अभीष्ट व्याख्यान आदरिलें ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP