अध्याय ३८ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अप्यंध्रिमूले पतितस्य मे विभुः शिरस्यधास्यन्निजहस्तपंकजम् ।
दत्ताभयं कालभुजंगरंहसा प्रोद्वेजितानां शरणैषिणां नृणाम् ॥१६॥

चरणीं ठेवितांचि मस्तक । विभु समर्थ उत्तमश्लोक । माझे शिरीं हस्ताब्जक । कृपापूर्वक ठेवील ॥२१॥
तें हस्ताब्ज म्हणाल कैसें । दिढा श्लोकें विस्तारवशें । निरूपिजेल तें मानसें । श्रोतीं संतोषें परिसावें ॥२२॥
कालभुजंगाचिया वेगें । प्राणी तळमळिती आवघे । त्यांमाजि शरण भयप्रसंगें । जाले निजांगें श्रीचरणीं ॥२३॥
तयां मानवां अभयदान । जया हस्ताब्जें करून । आणिक सभाग्य कोण कोण । तें हस्ताब्जनिधान लाधलें ॥२४॥

समर्हणं यत्र विधाय कौशिकस्तथा बलिश्चाप जगत्त्रयेन्द्रताम् ।
यद्वा विहारे व्रजयोषितां श्रमं स्पर्शेन सौगन्धिकगंध्यपानुदत् ॥१७॥

सम्यक म्हणिजे वरव्यापरी । शतक्रतूच्या पुण्यावसरीं । सप्रेम सपर्या षोडशोपचारीं । पुरन्दर करी ज्या हस्तीं ॥२२५॥
कौशिकनामें पुरन्दर । जो लाहोनि वरद कर । जंभनमुचिवृत्रासुर । जाला पटुतर मर्दावया ॥२६॥
आणि रावण मर्दूनि अयोध्यापुरीं । श्रीराम प्रवेशला सुरवरभारीं । भद्रीं अमरेन्द्र नमस्कारी । तैं लाहे शिरीं वरद हस्त ॥२७॥
कीं इंद्राच्या कैपक्षें । बळीतें छळीलें वामनवेषें । तेव्हां तेणें प्रेमोल्हासें । दानविशेषें कर पूजिला ॥२८॥
त्रिपादपरिमितभूमिदान । करीं अर्पिलें संकल्पजीवन । यास्तव अद्यापि द्वाररक्षण । करी आपण तयाचें ॥२९॥
आणि त्रिजगाची अमरेंद्रता । बळी लाधला प्रसाद उचिता । तोचि हस्त मी आजि माथां । हरिपद नमितां लाहेन ॥२३०॥
दैत्यभयाची निवृत्ति । निर्भय इंद्रपदाची प्राप्ति । ऐसी इंद्राची सकामभक्ति । ते अभीष्टावाप्ति त्यां जाली ॥३१॥
निष्काम बळीनें त्रिपाददान । छळितां केलें आत्मार्पण । इंद्रत्वेंसीं कैवल्यसदन । द्यावया भगवान द्वार रक्षी ॥३२॥
ऐसें सकामादि मुमुक्षुनिकर । त्यांसि अभीष्टप्रद जो कर । आणि अनुरक्तांसही सुखकर । तो प्रकार अवधारा ॥३३॥
गोपी अनन्य सप्रेमळा । नेणती कर्मादि कर्मफळा । अवंचकभावें श्रीगोपाळा । हृदयकमळामाजि धरिती ॥३४॥
तद्विरहादि त्रितापशमनीं । रासक्रीडा रसनर्तनीं । कोमलहस्तपद्म संस्पर्शोनी । पंकजपाणि निववी त्यां ॥२३५॥
चंदनीं सौरभ्य नैसर्गिक । कीं वेधवती सौगंधिक । इत्यादि गंधा जो द्योतक । भोगिती हस्तक तो गोपी ॥३६॥
ऐसा परमानुग्रहकर । श्रीकृष्णाचा पद्मकर । तेणें स्पर्शेल माझें शिर । आजि नमस्कारप्रसंगीं ॥३७॥
आणि शत्रुदूत मी म्हणोनि कांहीं । कृष्ण शत्रुत्वें पाहणार नाहीं । ऐसें वाटतें माझ्या ठायीं । तें श्लोकान्वयीं प्रकाशी ॥३८॥

न मय्युपैप्यत्यरिबुद्धिमच्युतः कंसस्य दूतः प्रहितोऽपि विश्वदृक् ।
योंऽतर्बहिश्चेतस एतदीहितं क्षेत्रज्ञ ईक्षत्यमलेन चक्षुषा ॥१८॥

कंसें प्रेरिलों सांगूनि काज । तेणें कंसदूतत्वही यथार्थ मज । तथापि सर्वज्ञ अधोक्षज । जाणे गुज हृदयींचें ॥३९॥
सबाह्य श्रीकृष्ण विश्वद्रष्टा । जाणे कायवाड्मानसचेष्टा । यास्तव माझिया अंतर्निष्ठा । दिसती स्पष्टा क्षेत्रज्ञा ॥२४०॥
मी सबाह्य कृष्णीं निरत । बाह्यविडम्बीं कंसदूत । हें नित्यावबोधें समस्त । जाणे सर्वगत सर्वात्मा ॥४१॥
सबाह्य जाणोनियां निष्कपट । मजवरी होईल पूर्ण संतुष्ट । तेव्हां अवघे हरती कष्ट । तेंचि स्पष्ट बोलतसे ॥४२॥

अप्यंघ्रिमूलेऽवहितं कृतांजलिं मामीक्षिता सस्मितनार्दया दृशा ।
सपद्यपध्वस्तसमास्तकिल्बिषो वोढा मुदं वीतविशंक ऊर्जिताम् ॥१९॥

सम्यक् श्रीकृष्णाचे चरणीं । दंडप्राय तनु लोटुनी । अष्टभावें उचंबळोनी । उभा राहीन नम्रत्वें ॥४३॥
आवरूनियां सर्व करणां । एकाग्र करूनि नयना मना । उभा राहीन सन्निध चरणां । देखोनि करुणा हरि करील ॥४४॥
नम्रमूर्ध्नीं बद्धांजलि । मातें देखोनियां वनमाळी । अमृतदृष्टी जैं निहाळी । तैं किल्बिष समूळीं क्षाळेल ॥२४५॥
हास्यवदनें सुधापांगें । अवलोकितां कमलारंगें । परमानंदें निवती आंगें । ऊर्जित सवेगें लाहेन ॥४६॥
आणि आत्मीय यादवगणीं । मातें गणील चक्रपाणि । ऐसें भावूनि अंतःकरणीं । बोले वाणी तें ऐका ॥४७॥

सुहृत्तमं ज्ञातिमनन्यदैवतं दोर्भ्यां बृहद्भ्यां परिरप्स्यतेऽथ माम् ।
आत्मा हि तीर्थीक्रियते तदैव मे बन्धश्च कर्मात्मक उच्छ्वसित्यतः ॥२०॥

जाणोनि परमात्मा श्रीकृष्ण । अनन्यभावें होईन शरण । ऐसें अक्रूरें निरूपण । केलें संपूर्ण येथवरी ॥४८॥
आतां कृष्ण कैसा आपणा । सम्मानील ते संभावना । अक्रूर करी अंतःकरणा । माजि त्या कथना अवधारा ॥४९॥
कृष्ण देखोनि ऐसिया मातें । परमसुहृत्तम मानील चित्तें । अनन्य दैवत मज वृद्धातें । स्नेहभरितें भावील ॥२५०॥
आपुले ज्ञातीमाजि आप्त । मम कल्याणीं परम निरत । पूज्य अनन्य दैवत । भावील भगवन्त मजलागीं ॥५१॥
सस्निग्ध विशाळ उदार बाहीं । आदरें आळंगील हृदयीं । त्यानंतरें माझें कांहीं । ऊर्जित कल्याण कीं काय ॥५२॥
केवळ श्रीकृष्ण परमात्मा । तो जैं पूज्यत्वें भजेल आम्हां । तैं आमुच्या कल्याणकामा । विपर्यास तो न घडेल कीं ॥५३॥
ऐसें विवरूनि पुढती म्हणे । श्रीकृष्णाच्या आलिंगनें । माझा देह पवित्रपणें । तीर्था तीर्थ होईल ॥५४॥
स्पर्शमणीच्या सन्निधानें । लोह पालटे सुवर्णपणें । कीं गंगोदकाच्या संस्पर्शनें । निष्पाप होणें त्रैलोक्यें ॥२५५॥
ते गंगा ज्याचे चरणकमळीं । तो जैं आलिंगी वनमाळी । तेव्हां तीर्थाची मंडळी । करील सगळी तनु माझी ॥५६॥
आणि अग्नीच्या आलिंगनें । बीजतापासूनि मुकती धान्यें । तैसीं कर्माचीं बंधनें । मुक्त होती तत्काळ ॥५७॥
पुनः पुनः उपजणें मरणें । पुनः पुनः देह धरणें । कर्मबन्धें ज्या ऐसें करणें । कृष्णालिंगनें तो निरसे ॥५८॥
देह अळंगितां श्रीकृष्ण । कर्मबन्ध देहापासून । मुक्त होतां न घडे जाण । पुन्हा धारण देहाचें ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP