अध्याय ३८ वा - श्लोक २८ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ददर्श कृष्णं रामं च व्रजे गोदोहनं गतौ । पीतनीलांबरधरौ शरदंबुरुहेक्षणौ ॥२८॥
रथौनि होता जो उतरला । तैसाचि पुढतीं रथीं बैसला । हरिपदचिह्नें पाहत गेला । दोहनस्थळा धेनूंच्या ॥६९॥
जेथ धेनूंचें दोहन । करिती त्या नांव दोहनस्थान । तेथें होते विद्यमान । रामकृष्ण एकत्र ॥३७०॥
कृष्ण सांवळा पीतवसन । नीलांबरधर संकर्षण । शरत्सरोजफुल्लारनयन । सुप्रसन्न देखिले ॥७१॥
किशोरौ श्यामलश्वेतौ श्रीनिकेतौ बृहद्भुजौ । सुमुखौ सुंदरवरौ बालद्विरदविक्रमौ ॥२९॥
दोघां किशोरवय समान । श्यामश्वेत तनुभा भिन्न । श्रीवत्स श्रीनिकेतन । बाहु आजानु शुभ वक्र ॥७२॥
त्रैलोक्यींच्या सौंदर्यवंतां । मुकुटीं ज्यांची वर सुंदरता । बालद्विरदापरी तुळितां । विक्रमसमता दोघांची ॥७३॥
ध्वजवज्रांकुशांभोजैश्चिह्नितैरिघ्रिभिर्व्रजम् । शोभयंतौ महात्मानावनुक्रोशस्मितेक्षणौ ॥३०॥
ध्वजवज्रांकुशाब्जचिह्नें । मंडित पाउलें सुलक्षणें । भूमीं उमटती शोभायमानें । शोभित तेणें व्रज करिती ॥७४॥
देहधारी जे वरिष्ठ । त्यांहूनि ज्यांचे देह श्रेष्ठ । महात्मानौ पदें स्पष्ट । हा अर्थ उत्कट शुक वदला ॥३७५॥
अनुकंपान्वित हास्यवदनीं । तद्युक्त अपांग विलसती वदनीं । उदारक्रीडा मिरवती दोन्ही । अमूल्यमणिस्रग्वंत ॥७६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 06, 2017
TOP