अध्याय ३८ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
उदाररुचिरक्रीडौ स्रग्विणौ वनमालिनौ । पुण्यगंधानुलिप्तांगौ स्नातौ विरजवाससौ ॥३१॥
विरज म्हणिजे विशुद्ध वसनें । धरिलीं करूनि मंगळ स्नानें । त्यांवरी सुमनें विलेपनें । दिव्याभरणें शोभती ॥७७॥
वैडूर्यमणींचे हार कंठीं । त्यांवरी वनमाळांची दाटी । मलयागर श्रीखंडउटी । सुमनें मुकुटीं तुरंबिलीं ॥७८॥
जवादीकस्तुरीसुगंधरोळा । सुगंध पुण्यात्मक आगळा । तरीच प्रियतम बळघननीळा । सौरभ्यउधळा सर्वांगीं ॥७९॥
प्रधानपुरुषावाद्यौ जगद्धेतू जगत्पती । अवतीर्णौ जगत्यर्थे स्वांशेन बलकेशवौ ॥३२॥
प्रधान म्हणिजे मूळप्रकृय्ति । तदवलंबें पौरुषावाप्ति । प्रधानपुरुष या संकेतीं । वाखाणिजती श्रेष्ठत्वें ॥३८०॥
तस्मात्प्रकृतिपुरुषात्मक । स्वांशें मूर्ति धरूनि पृथक् । जगद्योनि अद्वय एक । द्विधा देख अवगले ॥८१॥
आदिपुरुष जगत्कारण । म्हणोनि जगत्पति हें अभिधान । जगतीभारहरणा पूर्ण । मूर्त होऊन अवतरले ॥८२॥
स्वांशें म्हणिजे स्वमूर्तींसीं । स्व्हेतनीलतनुभावेंशीं । बल केशव या अभिधानांसी । धरिती मानुषी क्रीडेंत ॥८३॥
दिशो वितिमिरा राजन्कुर्वाणौ प्रभया स्वया । यथा मारकतः शैलो रौप्यश्च कनकाचितौ ॥३३॥
दशदिग्भाग स्वप्रभे करून । वितिमिर करिती दोघे जण । कृष्ण मरकतगिरिसमान । संकर्षण तो ताराद्रि ॥८४॥
कनकाभरणीं सालंकृत । विशेष अनर्घ रत्नजडित । जेंवि चंद्रार्क प्रभावंत । दशदिग्ध्वांत परिहरिती ॥३८५॥
ऐशा देखोनि उभय मूर्ति । सप्रेम विह्वळ अक्रूरस्मृति । रथौनि उडी घातली क्षितीं । करी प्रणति तें ऐका ॥८६॥
रथात्तूर्णमवप्लुत्य सोऽक्रूरः स्नेहविह्वलः । पपात चरणोपांते दंडवद्रामकृष्णयोः ॥३४॥
रामकृष्णांच्या चरणांनिकटीं । स्नेहपूर्वक । अंगयष्टि । लोटूनि पडता जाला सृष्टीं । दंडप्राय अक्रूर ॥८७॥
भगवद्दर्शनाह्लादबाष्पपर्याकुलेक्षणः । पुलकाचितांग औत्कंठ्यास्त्वाख्याने नाशकन्न्रुप ॥३५॥
कंससंदेशापासुनी । जैसे मनोरथ केले मनीं । त्या या प्रत्यक्ष मूर्ति दोन्ही । देखिल्या म्हणोनि आल्हाद ॥८८॥
सत्ताविसाव्या श्लोकांत । दर्शनश्रवणादिकें जो प्राप्त । तो भाव जाणावा साद्यन्त । परमपुरुषार्थ देहवंतां ॥८९॥
तस्मात् या परमाल्हादें । बाष्पामृतें नेत्रकुमुदें । उचंबळलीं आणि सद्गदें । श्वासरोधें स्फुंदतसे ॥३९०॥
तनु पाझरे स्वेदजळीं । हर्षें थरकली रोमावळी । पुलक सर्वत्र रोममूळीं । कांपे चळाळी विवशत्वें ॥९१॥
ऐसे भाव सात्त्विक अष्ट । अक्रूराआंगीं जाले प्रकट । सतनुस्मृतीची वळली मोट । न शके प्रकट वक्त्र वदों ॥९२॥
मी अक्रूर नमितों चरण । ऐसें करूं न शके कथन । तेथ साकल्य वर्त्तमान । समर्थ कोठून कथावया ॥९३॥
सात्त्विकाष्टकें थकली स्मृति । स्तिमित सर्वही करणवृत्ति । अन्तर्वेत्ता जाणोनि चित्तीं । काय श्रीपति करितसे ॥९४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 06, 2017
TOP