अध्याय ३९ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अहो अस्मदभूद्भूरि पित्रोर्वृजिनमार्ययोः । यद्धेतोः पुत्रमरणं यद्धेतोर्बंधनं तयोः ॥६॥

अपराधरहित साधुप्राय । इहीं त्याचें केलें काय । जाणोनि माझीं बापमाय । परमान्यायें जाचितसे ॥५८॥
भूरि वृजिन जें परम दुःख । माझ्या वैरास्तव हा देख । देतसे करूनियां अविवेक । कारण सम्यक् मी याचें ॥५९॥
मजचि कारणें यांचे पुत्र । मारिले होऊनियां अमित्र । निगडबंधादि दुःखपात्र । यातना सर्वत्र मज साठीं ॥६०॥
मजचि साठीं सर्व ज्ञाति । कंसें लाविलिया दिगंतीं । प्रजा सेवक अनुचरवृत्ति । तुम्ही त्या प्रति सेवितसां ॥६१॥
हें सर्वही मजचिकडे । दिसोनि येतसे पैं उघडें । यावरी पुसेन जें मी पुढें । तेंचि निवाडें निरूपिजे ॥६२॥

दिष्ट्याऽद्य दर्शनं स्वानां मह्यं वः सौम्य कांक्षितम् । संजातं वर्ण्यतां तात तवागमनकारणम् ॥७॥

आश्रयूनियां कंसा खळा । अक्रूरा क्रमिसी विपत्तिवेळा । सौम्य म्हणिजे सहनशीला । बुद्धिकुशळा दानपति ॥६३॥
तुम्हां स्वकीयांचें दर्शन । सर्वकाळ वांछी मन । तें आजि बरव्या प्रकारें करून । जालें म्हणोनि उत्साह ॥६४॥
दैवास्तव हा परमोत्साह । येथोनि जाणिजे कल्याणोदय । आतां सांगिजे कारण काय । आगमनाचें सविस्तर ॥६५॥
शुक म्हणे गा अर्जुनपौत्रा । कुरुभूमंदलमंगलसूत्रा । कृष्णें पुसिलें श्वफल्कपुत्रा । तो तच्छ्रोत्रा परिसवी ॥६६॥

श्रीशुक उवाच - पृष्टो भगवता सर्वं वर्णयामास माधवः । वैरानुबंधं यदुषु वसुदेववधोद्यमम् ॥८॥
यत्संदेशो यदर्थं वा दूतः संप्रेषितः स्वयम् । यदुक्तं नारदेनास्य स्वजन्मानकदुंदुभेः ॥९॥

कृष्णें पुसिलें मधुवंशजा । त्यामाधवें अक्रूरें अधोक्षजा । सर्व निवेदिलें बरवे वोजा । तें कुरुराजा अवधारीं ॥६७॥
देवकीविवाहोत्तर प्रयाणीं । भविष्य वदली गगनवाणी । कंसा वधील तुजलागोनी । अष्टम गर्भ देवकीचा ॥६८॥
तें ऐकोनी देवकीहनन । करितां वसुदेवें बोधून । कंस वारिला पुत्रार्पण । करीन म्हणोनि शपथेंसीं ॥६९॥
तद्विश्वासें देवकीमोक्ष । प्रथमपुत्रार्पणें तो पक्ष । रक्षिता जाला वसुदेव दक्ष । तंव नारदें प्रत्यक्ष गुज कथिलें ॥७०॥
यादव तितुके देवावतार । विष्णु तव रिपु देवकीकुमर । अचुक आठवा हा जाणोनि मंत्र । होईं सत्वर सावध तूं ॥७१॥
तेथूनि यदुकुळासी वैर । चाळिता जाला कंसासुर । देवकीवसुदेव सह निज पितर । कारागार त्यां केलें ॥७२॥
अष्टम गर्भाचिये काळीं । देवकीकन्या मारितां गेली । पुढें कंसाची मति खुंटली । मग सोडिलीं तीं दोघें ॥७३॥
त्यावरी कंस आजिपर्यंत । विचार न सुचोनि होता भ्रांत । तंव नारद पातला अकस्मात । तेणें वृत्तांत पुन्हा कथिला ॥७४॥
आनकदुंदुभीपासून । देवकीजठरीं कृष्णजनन । तेणें नंदग्रुहीं लपवून । कन्या आणूनि तुज दिधली ॥७५॥
ऐसी ऐकोनि नारदोक्ति । कंस प्रवर्तला वसुदेवघातीं । मग त्या नारदें धरूनि हातीं । कथिली मुक्ति नृपवर्या ॥७६॥
नीति कथूनि नारद गेला । कंसें उपाय आरंभिला । मानें पाचारूनियां मजला । व्रजपुराला पाठविलें ॥७७॥
धनुर्मखाचें करूनि छद्म । आणवी सगोप कृष्णराम । किमर्थ तरी तो हननकाम । कृतसंभ्रम अवधारीं ॥७८॥
द्वारीं लोटूनि महागज । वधावे बळराम अधोक्षज । दैवें वांचल्या महाभुज । रंगीं काज साधीन ॥७९॥
चाणूर मुष्टिक शल तोशल । अतुलबळि हे प्रचंड मल्ल । धडकूनि विद्युल्लते तुल्य । मज निःशल्य करितील ॥८०॥
ऐसे मारीन रामकृष्ण । नंदव्रजाचें सर्वस्वहरण । देवकी वसुदेव उग्रसेन । शस्त्रें वधीन स्वहस्तें ॥८१॥
यदुकुळाचें खणोनि खात । मृत्युभयाचें फाडीन खत । ऐसा कथूनि मज वृत्तांत । दूतकर्मार्थ आलों मी ॥८२॥
ऐसें अक्रूरें अवंचकभावें । गुह्य कृष्णासि केलें ठावें । परिसोनि साग्रज वासुदेवें । श्रुतकैतवें हांसिला ॥८३॥

श्रुत्वाऽक्रूरवचः कृष्णो बलश्च परवीरहा । प्रहस्य नंद पितरं राज्ञादिष्टं विजज्ञतुः ॥१०॥

अक्रूरवृत्तांत परिसोनि हरि । आणि बलराम प्रलंबारि । हांसते झाले परस्परी । टाळी करीं देवोनी ॥८४॥
पाचारूनियां पिता नंद । कथिला कंसाज्ञेचा निगद । तेणें समस्त गोपवृंद । केला सावध तें ऐका ॥८५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP