अध्याय ३९ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


क्रूरस्त्वमक्रूरसमाख्यया स्म नश्चक्षुर्हि दत्तं हरसे बताज्ञवत् ।
येनैकदेशेऽखिलसर्गसौष्ठवं त्वदीयमद्राक्ष्म वयं मधुद्विषः ॥२१॥

देऊनि पुन्हा हरण करणें । ऐसीं क्रूराचीं लक्षणें । क्रूराविण निर्दयपणें । ऐसें करणें न करवे ॥५४॥
कपटें घेऊनि अक्रूरनामा । आलासि दत्तापहरणकामा । चक्षु हरूनि आंधळें आम्हां । करितां नामा वैयर्थ्य ॥१५५॥
अमंगळासि मंगळ अभिधान । कीं राक्षसा म्हणिजे पुण्यजन । जिच्या उदयीं अकल्याण । ते कल्याणी रवितनया ॥५६॥
वत्सानामींचें नामामृत । वाळुवे शर्करा संकेत । अजाभिधानें बोलिजे बस्त । वृथा तद्वत तव नाम ॥५७॥
जैसा निषिद्ध पुरीषक्षार । तयासि म्हणती नवसागर । दत्तापहारी जो तूं क्रूर । वृथा अक्रूर म्हणविसी ॥५८॥
तुम्हांसि देऊनि काय म्यां हरिलें । जरी तूं पुससी येणें बोलें । अमुचें चक्षुहरण कां मांडिलें । अक्रूररूपें येऊनी ॥५९॥
म्हणसी अक्रूर नेतो कृष्णा । तुमच्या न करीं चक्षुहरणा । तरी कृष्णरूपामाजि त्रिभुवना । देखों नयना माजिवड्या ॥१६०॥
तुझें सुष्ठु सृजनकृत्य । कृष्णरूपीं देखों समस्त । तो नेतांचि चक्षुरहित । झालों निश्चित विधात्या ॥६१॥
तुझें सृष्टीचें कौशल्य सारें । कृष्णरूपींच पाहों नेत्रें । यालागिं त्वां विषदसूत्रें । कपट मैत्रें आदरिलें ॥६२॥
त्रिजगच्चक्षु श्रीकृष्णनाथ । अक्रूररूपें तद्धरणार्थ । द्वेषें पातलासि तूं येथ । चक्षूरहित करावया ॥६३॥
कृष्णरूप जो कां नेत्र । त्यामाजी मम सृष्टि सर्वत्र । गोपींसी कळली म्हणोनि क्रूर । अमित्र बुद्धि त्वां धरिली ॥६४॥
कृष्णवियोगें आमुचे डोळे । होती स्वभावें आंधळे । सहजचि सृष्टिसौष्ठव न कळे । ऐसिये लीले आदरिसी ॥१६५॥
ऐसें तुझें हें दौर्जन्य । अक्रूरत्वीं क्रूरपण । आमुचें करिसी चक्षुहरण । मूर्खासमान तव बुद्धि ॥६६॥
ऐसिया विधातयासि खेदें । गोपी निंदिती बहुधा शब्दें । यानंतरें मिथानुवादें । वदती खेदें तें ऐका ॥६७॥

न नंदसूनुः क्षणभ्म्गसौहृदः समीक्षते नः स्वकृतातुरा बत ।
विहाय गेहान्स्वजनान्सुतान्पतींस्तद्दास्यमद्धोपगता नवप्रियः ॥२२।

खेदें म्हणती अहो बाई । नंदपुत्र हा कैसा काई । क्षणभंगुर स्नेहनवाई । याच्या ठायीं वर्ततसे ॥६८॥
याचें सुहृदत्व क्षणभंगुर । नेणे स्वरतांचें अंतर । कार्यापुरता प्रेमादर । नोहे स्थिर सौजन्यें ॥६९॥
मनीं न विचरी हा कां गे । आमुतें भुलवोनि स्नेहापांगें । वश करूनि लागवेगें । आमुचीं अष्टांगें कवळिलीं ॥१७०॥
मजसाठीं या झाल्या आतुरा । ऐसें नकळे कां या चतुरा । आम्ही सांडूनियां स्वसंसारा । झालों तत्परा दास्यत्वीं ॥७१॥
पति सुत सदनें स्वजन आप्त । शरीरसुखभोग समस्त । त्यागूनि झालों भवविरक्त । चित्तें आसक्त या केलीं ॥७२॥
आम्ही याच्याचि मुरलीगानें । नेत्रकटाक्षें । स्मितभाषणें । गतिगौरवें तनुलावण्यें । तनुमनप्राणें वेधलों ॥७३॥
साक्षात् याच्याचि दास्यासाठीं । आम्हीं केली संसारतुटी । हा कां जाण नव्हे पोटीं । प्रीति उफराटी कां याची ॥७४॥
नव्या नव्यांतें प्रीति धरी । पहिल्या विरहा वरपडें करी । आम्हां दुःखितां सांडूनि दुरी । कैसा मधुपुरीं जाईल ॥१७५॥
यासि राहवूं धरूनि पदरीं । ऐसिया भावें गोपनारी । बोलती ईर्ष्येच्या उत्तरीं । तेंचि चतुरीं परिसावें ॥७६॥

सुखं प्रभाता रजनीयमाशिषः सत्या बभूवुः पुरयोषितां ध्रुवम् ।
याः संप्रविष्टस्य मुखं व्रजस्पतेः पास्यंत्यपांगोत्कलितस्मितासवम् ॥२३॥

ईर्ष्या म्हणिजे सापत्नदुःख । स्मरूनि करिती विरहें शोक । पुरजनवनितांसि होईल हरिख । सपत्नी मुख्य त्यां म्हणती ॥७७॥
मथुरेचिया वनितांप्रति । आजि उत्तम शकुन होती । शुभसूचकें स्वप्नें रातीं । त्या देखती बहुतेक ॥७८॥
त्यांचे लवत असती नयन । भुजा मांडिया करिती स्फुरण । प्रभाते अंगणीं पक्षिगण । लाभ दर्शनें सुचविती ॥७९॥
आजिची रजनी नागरां अबलां । सूचक होईल महाफळा । प्रभाते भोगिती सुखसोहळा । अमृत डोळां प्राशुनी ॥१८०॥
तीर्थें व्रतें तपें दानें । अनेकजन्मार्जितें पुण्यें । आणि भल्यांचीं आशीर्वचनें । सत्य संपूर्ण त्या जालीं ॥८१॥
त्यांचे मनोरथ झाले पूर्ण । त्यांसि अमृतें उगवला दिन । आम्ही झालों अवलक्षण । म्हणोनिकृष्ण अंतरला ॥८२॥
नागरां नारींसि लाभ कोण । ऐसें कल्पील अंतःकरण । तरी कृष्णमुखाचें अमृतपान । त्यांचे नयन करितील ॥८३॥
कृष्ण व्रजप त्रिजगीं श्रेष्ठ । मथुरे होतांचि प्रविष्ट । त्याचें वदनारविंद स्पष्ट । पाहती तन्निष्ठ होऊनी ॥८४॥
जया मुखकमळाच्या ठायीं । परमामृताची सुरसायी । ललितस्मितापांगें हृदयीं । नेती लवलाहे प्राशुनी ॥१८५॥
व्रजपतीचें वदन स्मेर । ललितापांगें आनंदप्रचुर । आसव म्हणिजे मादकरत । नेत्रीं सत्वर्त ज्या पिती ॥८६॥
ऐसी ईर्ष्येची कल्पना । पुढती काय तर्किती मना । तें परियेसीं कुरुनंदना । इरारमणा परीक्शिति ॥८७॥
गोपी म्हणती आम्ही हरि । भाग्यें भोगिला आजिवरी । जरी गेला मथुरापुरीं । तरी परतूनि येईल ॥८८॥
त्याचीं येथें मातापितरें । सुहृद ज्ञाति प्रेमपात्रें । आणि आमुच्या स्नेहसूत्रें । आकर्षूनि आणिजेल ॥८९॥
एक दोनी कीं त्रिरात्र । पुरवनितांचें घडल्या मैत्र । केंवि आमुचें स्नेहसूत्र । भंगूं शके ह न म्हणा गे ॥१९०॥

तासां मुकुन्दो मधुमंजुभाषितैर्गृहीतचित्तः परवान्मनस्व्यपि ।
कथं पुनर्नः प्रतियास्यतेऽबला ग्राम्याः सलज्जस्मिताविभ्रमैर्भ्रमन् ॥२४॥

ऐका सखिया हो रहस्य । नागरी वनितांचा विलास । कटाक्ष विभ्रम सलज्ज हास । कृष्णचित्तास मोहिती ॥९१॥
त्यांच्या मधुरोक्तींचे पाश । गमती माधुर्यें पीयूष । मंजुळपणें कोकिळांस । लाजविती तंतुत्वें ॥९२॥
चातुर्यरचनेचिया परी । क्षीराब्धिसंभवा ज्या अप्सरी । त्यांहूनि चतुरा या नागरी । मोहिती हरी चातुर्यें ॥९३॥
विरक्त योगी तपस्वी हठी । निग्रहें बैसले गिरिकपाटीं । ऐसियांतेंही अप्सरादृष्टि । वेधूनि सृष्टीं नाचविती ॥९४॥
मा हा तो परम कामासक्त । ग्राम्याआभीरवनिताभुक्त । याचें नागरी मोहिती चित्त । मग निवृत्त हों न शके ॥१९५॥
जरी हा नंदादिकाधीन । आणि सखेही येथ बहुत जण । तथापि नागरीं वेधिल्या मन । येथ परतोन न ये हा ॥९६॥
जैसा गोरक्ष जालिया भूप । तो पूर्वस्नेहा करूनि लोप । त्यागी स्वजन मायबाप । रतिलोलुप तैसा हा ॥९७॥
आम्ही पशुपी गे रानटा । अजादिपशुपाळिणी घुरटा । कर्कशकर्में तनु जरबटा । संग वोखटा पैं आमुचा ॥९८॥
जेंवि दुष्काळीं अन्नाविणें । क्षुधार्त मानव सेविती तृणें । त्यांसि जोडलिया दिव्यान्नें । तृणभक्षणें लाजती ॥९९॥
जरी मनस्वी धीर स्वतंत्र । तथापि दुर्गम स्त्रीचरित्र । कटाक्षमात्रें वेधोनि नेत्र । करिती पात्र मोहाचें ॥२००॥
मत्तमानिनी मन्मथबाणें । कामुकां घेती जीवें प्राणें । बांधोनियां रतिसुखगुणें । स्वाधीनपणें वर्तविती ॥१॥
तेथोनि कैसा परतों शके । आमुचीं काय त्या स्मरती सुखें । आम्ही न तुलों त्याचेनि तुके । स्मरकौतुकें अविदग्धा ॥२॥
आजि आमुचा सुखसोहळा । होईल मथुरे माजी सकळां । भाग्योदय त्यांचियां निढळा । आमुच्या कपाळा निष्फळता ॥३॥

अद्य ध्रुवं तत्र दृशो भविष्यते दाशार्हभोजांधकवृष्णिसात्वताम् ।
महोत्सवः श्रीरमणं गुणास्पदं द्रक्ष्यंति ये चाध्वनि देवकीसुतम् ॥२५॥

आजि तेथें मथुरापुरीं । दाशार्हादि समस्तां गोत्रीं । उत्साह भोगिजेल सर्वत्रीं । पाहतां नेत्रीं कृष्णातें ॥४॥
दाशार्हकुळीं उद्धवादिक । भोजीं उग्रसेनप्रमुख । वृष्णिकुळींचे समस्त लोक । पावती सुख हरि पाहतां ॥२०५॥
कंकादिक कुकुरमेळीं । सात्वतश्वफल्क मंडळी । अंधक माधव यादवकुळीं । उत्साह सकळीं भोगिजे ॥६॥
आणि मार्गीं जातां देखती जे जे । तेही नाचती आनंद भोजें । कवण्या लाभें तें ऐकिजे । बरवें वोजें चतुरांहीं ॥७॥
लक्ष्मी शोभा न पवे स्वगुणीं । म्हणोनि ज्याची जाली रमणी । अनंत सद्गुणांची जे खाणी । देखोनि नयनीं त्या हरितें ॥८॥
देवकीसुतातें पाहतीं डोळां । दृष्टीसि होईल सुखसोहळा । धन्य मथुरेचिया अबळा । नयनें घननीळा प्राशिती ॥९॥
असो तेथींचा परमानंद । स्मरतां वृद्धि पावे खेद । अक्रूरा निंदेचे वदती शब्द । तेचि विशद परिसा हो ॥२१०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP