अध्याय ३९ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
मैतद्विधस्याकरुणस्य नाम भूदक्रूर इत्येतदतीव दारुणः ।
योऽसावनाश्वास्य सुदुःखितं जनं प्रियात्प्रियं नेष्यति पारमध्वनः ॥२६॥
ऐसें याचें क्रूर कर्म । आणि या शोभन अक्रूर नाम । कोण ठेवित होता अधम । तो मूर्ख परम अविवेकी ॥११॥
नाम न शोभे या सर्वथा । किमर्थ ते ऐका कथा । निर्दय निष्ठुर क्रूर पुरता । याहूनि कोणी असेना ॥१२॥
अत्यंत दारुण हा घातक । अक्रूर नामा मिरवी ठक । क्रिया पाहतां जैसें विख । पक्कान्नपणें जीव घेणें ॥१३॥
प्राणांहुनी प्रियतम श्रीकृष्ण । विघडूनि नेतो हा निर्घृण । दृष्टिगोचर मार्गाहून । पार लंघून दुरंत ॥१४॥
कृष्णा नेतां दूरतर । प्राण सोडिती शरीर । ऐसा आम्हांसि दुःखभर । परि त्याचें अंतर द्रवेना ॥२१५॥
कृष्णवियोगें दुःखित जन । काढूनि नेतो त्यांचा प्राण । कांहीं न करी समाधान । क्रूर दारुण यमाहूनी ॥१६॥
ऐसिया क्रूरा अक्रूरनाम । कोण ठेवित होता अधम । द्रवों शके अंतक यम । परि हा विषम क्रूरत्वें ॥१७॥
पुन्हा म्हणती या काय बोल । आमुचेंचि प्रारब्ध झालें विफळ । म्हणोनि उदेला हा काळ । कृष्णही केवळ द्रवेना ॥१८॥
धिक्कार आमुच्या जीवितासी । म्हणोनि रुदती उकसाबुकसी । दुःखें करिती वितर्कासी । तें रायासि शुक सांगे ॥१९॥
अनार्दधीरेष समास्थितो रथं तमन्वमी च त्वरयंति दुर्मदाः ।
गोपा अनोभिः स्थविरैरुपेक्षितं दैवं च नोऽद्य प्रतिकूलमीहते ॥२७॥
अगे हा कृष्णचि निष्ठुर । हृदयीं न द्रवेचि अणुमात्र । देखोनि याची बुद्धि कठोर । उपेक्षापर वृद्धहि या ॥२२०॥
न धरी ओलावा अंतरीं । उद्धव चढतां रथावरी । वृद्धें दुखविल्या अनादरीं । मग किमर्थ वारी कोण या ॥२१॥
भंगल्या वृद्धांचें अंतर । मग ते सहजचि उपेक्षापर । येर गोप ते दुर्मदतर । जाती सत्वर शकटेंशीं ॥२२॥
दैव हो कां सानुकूळ । कृष्णसंगें हा दुर्मदमेळ । जातो यावरी वीजकल्लोळ । पडोनि मरो पैं एखादा ॥२३॥
महाविघ्नांचा संघात । यांवरी पडो गे अकस्मात । किंवा घडो शकटघात । कीं डंखोनि निश्चित महासर्प ॥२४॥
महाविघ्नें या दुर्मदांत । एखादा जरी पावे मृत्य । त्या तरी अपशकुनें कृष्णनाथ । राहता येथ निश्चयें ॥२२५॥
परी आमुचें दैव कुडें । तरी या कांहींच वो न घडे । म्हणती मृत्यु आले रोकडे । बोटें कडाडें मोडिती ॥२६॥
मग परस्परें धिवसा धरिती । कृष्णा वृद्ध न राहविती । तरी लज्जा सांडोनि द्या गे परती । चाला निश्चितीं राहवूं या ॥२७॥
निवारयामः समुपेत्य माधवं किन्नोऽकरिष्यत्कुलवृद्धबान्धवाः ।
मुकुंदसंगान्निमिषार्धदुस्त्यजाद्दैवेन विध्वंसितदीनचेतसाम् ॥२८॥
निषेधू जातां सर्वांपुढें । जारसौहार्द पडेल उघडें । हें भय ठेवूनि ऐलीकडे । चाला निवाडें या वर्जूं ॥२८॥
लज्जा सांडूनि दीर्घप्रयत्ना । चढोनि म्हणती सुहृदा जना । शंकोनि मुकिजे किमर्थ प्राणा । न येचि करुणा कोणासी ॥२९॥
बंधुवर्गसुहृदाभेणें । लज्जेसाठीं प्राण देणें । तरीं तें कृष्णवियोगें मरणें । आम्हां कारणें आलींच कीं ॥२३०॥
बंधुवर्ग काय करिती । कायसी त्यांच्या भयाची खंती । मथुरे गेलिया श्रीपति । विरहावर्तीं पडिलों गे ॥३१॥
मुकुंद केवळ सुखनिधान । तत्संग दुस्त्यज प्राणांहून । आम्हां विघडणी त्यापासून । अर्धक्षण न सोसवे ॥३२॥
मुकुंदसंगा जेव्हां विघडी । तेव्हांचि चित्तें होतीं वेडीं । दीनें अनाथें बापुडीं । भणगें वराडी भासती ॥३३॥
जैं अंतरला मुरलीधर । तैं हें शरीर भूमिभार । आम्हां न डंखी विखार । मृत्यु समोर न ये गे ॥३४॥
मागतांही मरण न ये । बंधुवर्गाचें केतुलें भय । आमुचें जिणें वांचूनि काय । यशोदातनय विघडलिया ॥२३५॥
या लागीं अवघ्या होऊनि धीटा । कृष्ण लागतां मथुरे वाटा । वोढा धरूनि बाहुवटा । दवडा खोटा अक्रूर हा ॥३६॥
बंधुवर्गीं निर्लज्ज उद्धटे । सोसूं जारपैशुन्यबोट । परी कृष्णवियोगाचे कष्ट । याहूनि दुर्घट न सोसती ॥३७॥
यालागीं आतांचि निःशंक होणे । आणिक कृष्णातें निवारणें । ना तरी तत्कृतक्रीडास्मरणें । आलीं मरणें न मरतां ॥३८॥
मरण बरवें एके घायीं । परि तें दुःख न सोसे देहीं । हृदय फुटोनि होते लाही । तें लवलाही परिसा गे ॥३९॥
यस्यानुरागललितस्मितवल्गुमंत्रलीलावलोकपरिरंभणरासगोष्ठ्याम् ।
नीताः स्म नः क्षणमिव क्षणदा विना तं गोप्यः कथं न्वतितरेम तमो दुरंतम् ॥२९॥
ज्याचे सप्रेमसुललितपणें । भ्रूविभ्रमें हास्य करणें । त्याच्या स्मरणमात्रें मरणें । कीं जीवें प्राणें तळमळिजे ॥२४०॥
रासक्रीडासभास्थानीं । हास्यवदनें चक्रपाणि । रतिरहस्यगोष्ठी वाणी । बोलिला त्या आठवती ॥४१॥
त्या शब्दांची चातुर्यता । नेत्रकटाक्ष तनुइंगिता । क्षेमालिंगन चुंबन स्मरतां । केंवि जीविता सांवरवे ॥४२॥
ज्याचे सुस्निग्ध अपांगपात । रासविलासीं सभे आंत । कृष्ण केला जो एकांत । तो कें चित्त विसरेल ॥४३॥
क्षणा समान क्षणदा तेथें । आम्हीं क्रमिल्या ज्याच्या सुरतें । त्याच्या वियोगें कैशा येथें । धरूं प्राणांतें सखिया हो ॥४४॥
प्रियतमाचा विरह घोर । केवळ दुःखाचा सागर । कीं तें अंधतम अपार । केंवि परपार पावों गे ॥२४५॥
असो अंधतम निस्तरणें । रोकडेंचि वियोगमात्रें मरणें । गोचारणें गेलिया कृष्णें । म्हणाल विघडणें साहतसों ॥४६॥
आमुचा वियोगें जाईल प्राण । म्हणोनि अंतरीं कळवळोन । कैसें करी प्राणतर्पण । तें संपूर्ण परिसा गे ॥४७॥
योऽह्नः क्षये व्रजमनंतसखः परीतो गौपैर्विशन्खुररजश्छुरितालकस्रक् ।
वेणुं क्कणन्स्मितकटाक्षनिरीक्षणेन चित्तं क्षिणोत्यमुमृते नु कथं भवेम ॥३०॥
आमुचे ग्लानी उताविळा । परते लक्षूनि सायंकाळा । विष्णुसंगें सुरमुनिपाळा । तेंवि गोपाळ वत्सेसीं ॥४८॥
गोवत्सांचे जे खुररज । पुढें हाकितां उधळती सहज । तेणें धूसर कुंतळपुंज । सबर्हस्रज मुखकांति ॥४९॥
आधींच लावण्यतनु सुनीळ । धूसर जैसें अंबर अमळ । धूळी माजी धांवे चपळ । पोटीं कळवळ करुणेची ॥२५०॥
धूळी निघोनि धेनुमागें । हळूच येतां मंदवेगें । तरी कां माखती अष्टांगें । प्रेमळ प्रसंगें रज सोसी ॥५१॥
ऐसा व्रजा माजीं सांजे । अनुदिनीं प्रवेशे डवरला तेजें । तैं गोपीनयनचकोरें बिजे । चंद्रदर्शनें जीव धरिती ॥५२॥
व्रजीं प्रवेशलियावरी । ललितस्मितवक्त्रें श्रीहरि । ईक्षणमात्रें मानस हरी । तें अमृतलहरीं सम वाटे ॥५३॥
आणि अमृतातेंही लाजवी । कैवल्यसुखासी आणी उणिवी । तेणें वेणुक्कणनें निववी । मृता जीववी विरहिणी जो ॥५४॥
तो मथुरे गेलिया तैसा पुढती । न येतां आमुची कवण गति । त्याविण जीवितें केंवि राहती । हें निश्चिती सांगा गे ॥२५५॥
कृष्णावांचूनि आमुचें जिणें । क्षणमात्रही राहों नेणे । कृष्णवियोगें आलीं मरणें । म्हणोनि करुणें विलपती ॥५६॥
शुक म्हणे गा परीक्षिति । अलौकिक गोपींची सप्रेम भक्ति । अव्यभिचारें कमलापति । व्यभिचारमति भजिन्नल्या ॥५७॥
म्हणोनि दुर्लभ आम्हां तुम्हां । गोपिकांचा भाग्यमहिमा । ज्या अनुसरल्या मेघश्यामा । पतिसुतधामा विसरोनी ॥५८॥
कृष्ण जातो हें ऐकूनि रातीं । ऐशा अनेक कल्पना करिती । लज्जा सांडूनि दीर्घ रुदती । परिसें नृपति तें आतां ॥५९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 06, 2017
TOP