अध्याय ३९ वा - श्लोक ५१ ते ५७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
सुमहार्हमणिव्रातकिरीटकटकांगदैः । कटिसूत्रब्रह्मसूत्रहारनूपुरकुंडलैः ॥५१॥
अनंतकोटि दिव्य तरणि । लोपती ज्याच्या प्रभाकिरणीं । ऐसे महार्ह मुकुटीं मणि । आणि किंकिणी बाह्यवंटा ॥१॥
कुंडलमंडित गंडदेश । तत्प्रभाढ्य कुटिल केश । नांवें कुन्तळ म्हणती ज्यांस । शोभाविशेष तद्योगें ॥२॥
त्रिजगच्चित्राकृति खेवणी । कांची मिरवे मध्यस्थानीं । धाता निर्मी जयावरूनी । प्रळयावसानीं यथापूर्व ॥३॥
ब्रह्मसूत्र सूचनाकार । ज्याचेनि सचेतन चराचर । तें शोभवी ब्रह्मसूत्र । सर्वेश्वर सर्वात्मा ॥४॥
कंठीं अनर्घ्य रत्नहार । सुमनमाळा मनोहर । चरणीं बिरुदांचा तोडर । अंदु नूपुर रुणझुणती ॥४०५॥
आतां आयुधांची सामग्री । तेही ऐका बरवे परी । चहूं हस्तकीं मिरवी चारी । स्वयें श्रीहरि जगदात्मा ॥६॥
भ्राजमानं पद्मकरं शंखचक्रगदाधरम् । श्रीवत्सवक्षसं भ्राजत्कौस्तुभं वनमालिनम् ॥५२॥
दक्षिण ऊर्ध्वकरीं पद्म । वामभागीं शंखोत्तम । चक्र गदा तदनुक्रम । अधोहस्तीं शोभतीं ॥७॥
वक्षःस्थळीं देदीप्यमान । दक्षिणभागीं श्रीवत्सचिह्न । मध्यें मिरवे कौस्तुभरत्न । आपाद पूर्ण वनमाळा ॥८॥
स्तवनीं तत्पर पार्षदगण । तेही ऐका सावधान । यथामति गुणकीर्तन । नम्र होऊनि करिताती ॥९॥
सुनंदनंदप्रमुखैः पार्शदैः सनकादिभिः । सुरेशैर्बह्मरुद्राद्यैर्नवभिश्च द्विजोत्तमैः ॥५३॥
प्रह्रादनारदवसुप्रमुखैर्भागवतोत्तमैः । स्तूयमानं पृथग्भावैर्वचोभिरमलात्मभिः ॥५४॥
जय विजय सुनंद । कुमुदकुमुदाक्ष मुख्य पार्षद । अष्टौ हरीचे द्वास्थ विशद । पुण्यशील सुशील ॥४१०॥
सनकसनंदनसनातन - । सनत्कुमारप्रमुख जाण । ऊर्ध्वरेते हे चौघे जण । कुमारगण यां नांव ॥११॥
रुद्रेंद्रादि कमलासन । तदनुयायी मरुद्गण । वेदवेत्ते नव ब्राह्मण । मरीचिप्रमुख जाणावे ॥१२॥
प्रह्रादप्रमुख भागवत । पावकप्रमुख समस्त । विष्णुपुरोगम अदितिसुत । पृथग्भावें स्तविताती ॥१३॥
पार्षद स्वामिसेवकभावें । स्तविती विभूचीं अनंत विभवें । ऊर्ध्वरेते तपोगौरवें । ब्रह्मनिर्वाण विवरिती ॥१४॥
पूर्णचैतन्य परमेश्वर । भावें स्तविती ब्रह्मादिहर । मरिच्यादि जे द्विजवर । म्हनती परतर प्रजापति ॥४१५॥
प्रह्राद नारद सप्रेमभरित । भगवत्प्रियतम भागवत । स्तविती सर्वात्मा सर्वगत । भजनाभिमत सद्भावें ॥१६॥
यज्ञभोक्ता भाविती वसु । आदित्य भाविती हा चंडांशु । अमलात्मे जे श्रेष्ठ पुरुषु । परदैवत भाविती ॥१७॥
ऐसा बहुधा पृथग्भावीं । स्तूयमान सर्वत्र सर्वी । अमलसूक्तीं गणगंधर्वीं । देवीं मानवीं स्तविजेत ॥१८॥
तैसाचि परम अमळभक्ति । भावें सेविती सर्वशक्ति । अल्प सांगों त्या संकेतीं । सावध श्रोतीं परिसिजे ॥१९॥
श्रिया पुष्ट्या गिरा कांत्या कीर्त्या तुष्ट्येलयोर्जया । विद्ययाऽविद्यया शक्त्या मायया च निषेवितम् ॥५५॥
सौभाग्यश्री जे ऐश्वर्यजननी । विश्वात्मका विश्वकुटुंबिनी । विश्वगोप्त्री तत्पर चरणीं । सेवेलागूनि देखिली ॥४२०॥
तदनु ऐश्वर्यबृंहणा । जे कां पटुतर पुष्टिकरणा । लक्षूनि प्रभूच्या अवलोकना । पोषी त्रिभुवना ते पुष्टि ॥२१॥
कल्याणरूपिणी सुमंगळ गिरा । वैखरी मध्यमा पश्यंती परा । प्रसवे श्रुत्यात्मकविचारा । यथाधिकारा द्योतक जे ॥२२॥
तैसीच कांति लावण्यखाणी । सर्वीं सर्वत्र शोभा आणी । जीच्या प्रकाशें चातुर्यश्रेणी । सौंदर्य भूषणीं मिरवती ॥२३॥
तदनुलक्षें सुसंतुष्टि । तुष्टे प्रभूचिये कृपादृष्टी । जीच्या लोभें सुरेंद्रकोटी । भवाब्धिपोटीं निमज्जती ॥२४॥
आत्मतुष्टीवीण जें विभव । भवाब्धि हें त्याचेंचि नांव । तुष्टिलोभें वाढतां हाव । प्रभव पराभव पावती ॥४२५॥
ते संतुष्टि प्रभूचिया ठायीं । तिष्ठे साकल्यें अक्षयी । जेंवि आकाशाचिये भुई । चांचल्य कहीं स्पर्शेना ॥२६॥
इला म्हणिजे धरादेवी । अखिल ब्रह्मांडें वागवी । जीच्या ठायीं आधेयभावीं । वर्ते पदवी त्रिगुणाची ॥२७॥
क्षांति दाति क्षमा नामें । जीच्या रूपाचीं माहात्म्यें । जयाच्या योगें महत्त्वगरिमे । पावती नियमें तपोधन ॥२८॥
ऊर्जा म्हणिजे अभ्युदयकारिणी । ऊर्जितैश्वर्यप्रवर्धिनी । बिजेपासूनियां प्रतिदिनीं । सुधाकिरणीं जेंवि सुधा ॥२९॥
विद्या म्हणिजे ज्ञानशक्ति । जीच्या उदयें भवविरक्ति । प्रकट होय आत्मरति । चित्संवित्ति जी नाम ॥४३०॥
अविद्या भवभ्रमाची जननी । विषयसुखाची उभारणी । मृषा दृश्याचें पाजी पाणी । जीवांलागोनि प्रलोभें ॥३१॥
सपल्लवें गंडूनि जीव । इहामुष्मिका आणी बरव । प्रवृत्तिप्रवाहाची धांव । जे सावेव विक्षिप्ता ॥३२॥
विद्या केवळ मुक्तिदानी । अविद्या संसारप्रवर्धिनी । दोहींची जे मुख्य जननी । ते मायाभिधानीं बोलिजे ॥३३॥
इत्यादि शक्ति ज्या अशेष । सादर तिष्ठती सेवेस । अक्रूर पाहोनि तो हृषीकेश । पावला तोष तें ऐका ॥३४॥
विलोक्य सुभृशं प्रीतो भक्त्या परमया युतः । हृप्यत्तनूरुहो भावपरिक्लिन्नात्मलोचनः ॥५६॥
ऐसा संकर्षणोत्संगीं । सगुण सलंकृतं शार्ङ्गी । अक्रूरें अवलोकुनी दिव्यदृगीं । झाला सर्वांगीं द्रवीभूत ॥४३५॥
आमुचा वृष्णिकुलावतंस । तो हा श्रीकृष्ण पूर्णपरेश । सुरगण ब्रह्मादिप्रमुख दास । होऊनि ज्यास सेविती ॥३६॥
अखिलशक्त्यात्मक जे माया । सर्वशक्तीसीं वोळगे पायां । हें परमैश्वर्य देखोनियां । उमसावया असमर्थ ॥३७॥
हर्ष उचंबळला देहीं । स्तिमित झाल्या वृत्ति सर्वही । रोमांच उठिले लवलाहीं । नेत्र ठायीं पुंजाळले ॥३८॥
स्वेदें बोलावलें गात्र । आनंदाश्रु ढाळिती नेत्र । सद्गद कंठ भंगला स्वर । झाला पात्र सत्त्वाष्टका ॥३९॥
पादांगुष्ठादिमौळवरी । कंप दाटला सर्व शरीरीं । ऐसी सात्त्विकाष्टकसामग्री । तेव्हां अक्रूरीं प्रकटली ॥४४०॥
स्तिमित वृत्ति झाल्या सर्व । त्यां नांव परिक्लिन्नभाव । हे सत्त्वावस्थासुखगौरव । महानुभाव जाणती ॥४१॥
ऐसी दशा जे स्तिमितकरा । झाली ते ठायीं अक्रूरा । तीतें सांवरूनि पुढारां । कैसा स्तोत्रा प्रर्वतला ॥४२॥
गिरा गद्गदयाऽस्तौषीत्सत्त्वमालंब्य सात्वतः । प्रणम्य मूर्ध्नाऽवहितः कृतांजलिपुटः शनैः ॥५७॥
सप्रेमळ जे भगवद्भक्त । त्यांतें म्हणावे सात्वत । त्यांशींच ऐसी दशा प्राप्त । येर प्राकृत नेणती ॥४३॥
यालागीं तो सात्वतप्रवर । नवां माजील षष्ठ अक्रूर । अवस्था जिरवूनि झाला सधर । प्राणप्रचार प्रवर्तला ॥४४॥
मग हळूचि उघडूनि दृष्टि । सुखोत्कर्षा जिरवोनि पोटीं । सद्गदगिरा सकंपयष्टि । स्तोत्रपाठीं वेंठला ॥४४५॥
करूनि बद्धांजलिपुट । नम्रमूर्धारहित मुकुट । नमस्कारूनि वैकुंठपीठ । स्तोत्रपाठ आदरिला ॥४६॥
तया स्तवनाचिया श्रवणा । सावध करूनि कुरुभूषणा । शुक आदरी निरूपणा । त्या व्याख्याना अवधारा ॥४७॥
ते चाळिसाव्यामाजीं कथा । श्रवणें निरसे दुस्तर व्यथा । बैसवी सच्चित्सुखाचे माथां । ते परमार्था सौभाग्य ॥४८॥
तें हें श्रीमद्भागवत । परमहंस रमती येथ । भाषाव्याख्यान दयार्णवोक्त । टीका विख्यात हरिवरदा ॥४९॥
एकाजनार्दनवरेंशीं । विरोधकृतीं फाल्गुनमासीं । कृष्णषष्ठी उत्सवदिवसीं । समाप्ति कथेसि प्रतिष्ठानीं ॥४५०॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां रामकृष्णाक्रूरमथुराभिगमनगोपीविरहाक्रूरयमुनास्नानविश्वरूपदर्शनयोगो नामोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥
श्लोक ॥५७॥ टीका ओव्या ॥४५०॥ एवं संख्या ॥५०७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ( एकोणचाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १८२६५ )
एकोणचाळिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 06, 2017
TOP