अध्याय ४८ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - अथ विज्ञाय भगवान्सर्वात्मा सर्वदर्शनः ।
सैरंध्र्याः कामतप्तायाः प्रियमिच्छन्गृहं ययौ ॥१॥
गंधार्पणें भगवत्प्रीति । जैं जोडली कुब्जेप्रति तैं कामिली सप्रेम रति । ते वरदोक्ती आठविली ॥२३॥
सैरंध्री जे सकाम तप्ता । जाणोनि हृदयीं तिची आस्था । स्वयें इच्छूनि तिच्या स्वहिता । जाता झाला तत्सदना ॥२४॥
रहस्यवेत्ता अंतरंग । असंगप्राय ज्याचा संग । एकात्मभावें अवंचक चांग । तो उद्धव जिवलग समवेत ॥२५॥
दिढा श्लोकें सदनशोभा । ऐकें वैराटीवल्लभा । जिये मंदिरीं पद्मनाभा । झालें दुर्लभा सुलभत्व ॥२६॥
महार्होपस्कराढ्यं वै कामोपायोपबृहितम् । मुक्तादामपताकाभिर्वितानशयनासनैः ।
धूपैः सुरभिभिर्दीपैः स्रग्गंधैरपि मंडितम् ॥२॥
जेणें स्ववश होय हरि । ते ते वशीकरणसामग्री । जिये मंदिरीं भरिली पुरी । सबाह्यांतरीं स्वच्छत्व ॥२७॥
महार्ह म्हणिजे मोलागळी । विविध गृहोपोकरणावळी । उपचारसंपत्तिसमृद्धि सकळी । यथोक्तकाळीं अनुकूळ ॥२८॥
कनकरत्नीं खचित भुवनें । मणिमंचक विचित्रासनें । मृदोळिया वोटंगणें । दिव्यवितानें रविभाक्तें ॥२९॥
जिहीं परमपुरु वश होय । त्यांतें म्हणिजे कामोपाय । तिहीं मंडित कुब्जानिलय । कैसें काय तें ऐका ॥३०॥
भूतदयेची शीतळ छाया । यालागीं गेलियातया ठाया । भूतमात्रांची निवे काया । ते पहावया आला हरि ॥३१॥
अपरोक्षज्ञानें तेजःपुंज । अवंचक औदार्य कीर्तिध्वज । देखोनि भुलला गरुडध्वज । न धरी लाज अभिरमतां ॥३२॥
अमूल्य सलंब मुक्तामाळा । रत्नतोरणीं फांकती किळा । गगनगर्भीं पताका सरळा । अतिचंचळा पवमानें ॥३३॥
सत्वसंपत्ति सुरभि धूप । अहंता जळतां उठे अमूप । एकनिष्ठेचे अचळ दीप । सर्वां करणीं लखलखिती ॥३४॥
सुमना गुंफूनि भगद्गुणीं । आपादमाळा विविधा सुमनीं । गुच्छअवतंस निर्मूनी । उदित अर्पणीं परपुरुषा ॥३५॥
केशर कर्पूर जवादि रोळा । कस्तूरीमलयजचंदनगोळा । गंधें भरिलीं रत्नकचोळां । श्रीघननीळा अर्पावया ॥३६॥
नलदनिर्मित सजळ व्यजनें । त्रयोदश तांबूलद्रव्यें पूर्णें । चरणक्षालना उदकें उष्णें । स्वादु जीवनें पानार्थ ॥३७॥
शांतिक्षमेची विस्तीर्णता । कामोद्दीपक संग्रह पुरता । विविध द्रव्यें चर्वण करितां । आम्गा म अन्मथा अवतरणें ॥३८॥
परस्परें मन्मथकदनीं । सन्नद्ध कामुकेंसीं कामिनी । लेख्यलेप्यांचिया श्रेणी । पृथगासनीं चौर्यांसीं ॥३९॥
दंतक्षयें नखक्षतें । गात्रचुंबनें अधरामृतें । कामुकचित्तें सुशिक्षितें । होती चित्रें निरखिलिया ॥४०॥
मन्मथकदनीं द्वंद्वयुद्धें । कामशास्त्रप्रपठित बंधें । देखोनि अभ्यास करिती मुग्धें । द्वंद्ववृंदें लेप्यांचीं ॥४१॥
सुगंधतैलें सुगंधचूर्णें । माळा मखरें ध्वज तोरणें । भित्तिप्रदेशीं दर्पणें । हेमरत्नीं खेवणिलीं ॥४२॥
कामोपायोपवृंहित । ऐसें मंदिर समृद्धिमंत्त । तेथ परैवारगण समस्त । सुशिक्षित परिचर्ये ॥४३॥
सत्य हित मित मृदु भाषणें । तनुवाड्मनें श्रमापरणें । अवंचकत्वें परोपकरणें । इयें लक्षणें सर्वांचीं ॥४४॥
म्हणोनि वैकुंठकंठीरव । सर्वज्ञ जाणोनि तत्सद्भाव । कुब्जासदना देवाधिदेव । गेला स्वमेव सुखदानी ॥४५॥
गृहं तमायान्तमवेक्ष्य सासनात्सद्यः समुत्थाय हि जातसंभ्रमा ।
यथोपसंगम्य सखीभिरच्युतं सभाजयामास सदासनादिभिः ॥३॥
स्वसदनातें कैवल्यदानी । आला देखोनि तेचि क्षणीं । उठिली आसनापासूनी । धांवोनि चरणीं लागली ॥४६॥
मुष्टीभरा अन्नासाठीं । रंक रावे धरूनि काठी । जेंवि तो बैसे साम्राज्यपीठीं । त्याहूनि पोटीं सोत्साह ॥४७॥
जातसंभ्रम हर्षोत्कर्ष । तेणें प्रफुल्लित मानस । सखियांसहित उत्तमपुरुष । चित्प्रकाश कवळिला ॥४८॥
कर्मेंद्रियांच्या क्रियावृत्ति । ज्ञानेंद्रियांच्या ज्ञानवृत्ति । प्राणेंद्रियांच्या चेष्टावृत्ति । या सखिया श्रीपती मिनलिया ॥४९॥
जे जे क्रियेसी जे जे उचित । ते ते तैसी यथोचित क्रिया संपादूनि समस्त । कमलाकांत तोषविला ॥५०॥
वत्स देखोनि वोरसें माता । कीं कामिनीकटाक्षें अनिरुद्धजनिता । तेंवि नमनाश्लेषस्वागत पुसतां । स्नेह इंगिता माजि दिसे ॥५१॥
ऐसी कुब्जा सखियांसहित । धांवोनि भजली रमाकांत । जातसंभ्रम तो स्नेहाभिव्यक्त । वक्ता समर्थ लक्षेना ॥५२॥
भक्ताधीन जालिया देवा । तैं तो भजवी निजवैभवा । शुद्धबुद्धा निरवयवा । देहभावा आतुडवी ॥५३॥
देव पारसा सुस्नात । देव क्षुधित नैवेद्यरहित । वसनातीत जागृत सुप्त । हे लावी समस्त तनुभाव ॥५४॥
देव सक्रोध क्षोभला । देव प्रसन्न संतोषला । देव प्रार्थिला विनविला । तैं तो वोळला कारुण्यें ॥५५॥
ऐसें तनुभाव समस्त । देवाआंगीं लावी भक्त । तैसतैसा तोही होत । छंदें नाचत भक्तांच्या ॥५६॥
तयाचिपरी सैरंध्रिया । स्वसदनींच्या संपदा जिया । प्रेमें कृष्ण भजविला तिया । स्निग्ध चातुर्या दावूनी ॥५७॥
भद्रपीठीं मृद्रासनीं । नेऊनि बैसवी चक्रपाणि । सखिया वीजिती विविध व्यजनीं । सभास्थानीं स्वगणेंशीं ॥५८॥
इंद्रगोपवर्णासनें । चित्रविवित्रविस्तीर्णें । मृदोळिया वोटंगणें । सर्वोपकरणें अर्पिलीं ॥५९॥
तथोद्धव्वः साधु तयाभिपूजितो न्यषीददिर्व्यामभिमृश्य चासनम् ।
कृष्णोऽपि तूर्णं शयनं महाधनं विवेश लोकाचरितान्यनुव्रतः ॥४॥
भगवत्प्रेंमें उद्धवासी । जैसजैसिया उपचारांसी । पूजिले साधुसद्भावेंसीं । तेणें तयांसी स्वीकेलें ॥६०॥
उद्धव बृहस्पतीचा शिष्य । भजनीं समर्यादही विशेष । कुब्जा जाणे भक्तिरस । तरी कां व्यत्यास हा घडला ॥६१॥
कुब्जेसि कां हे विषमबुद्धि । जे उद्धवा पूजी कृष्णाआधीं । म्हणाल तो कां तियेतें न निषेधी । तरी हें त्रिशुद्धी अवधारा ॥६२॥
तरी जारदौत्य स्वैराचारा । आधी पूजिजे पार्षदनिकरा । उद्धवें जाणोनि या विचारा । पूजोपचारा स्वीकेलें ॥६३॥
ब्राह्मणांमाजि सुविद्य श्रेष्ठ । क्षत्रिय शौर्यवान वरिष्ठ । धनाढ्य वैश्यवर्णी गरिष्ठ । पूज्य जरठ दासवर्णी ॥६४॥
कुब्जा राजदासी प्रसिद्ध । भगवत्पितृव्य वयोवृद्ध । उद्धव जाणोनि भजतां विरुद्ध । सहसा प्रबुद्ध न मनिती ॥६५॥
कुब्जा स्वाधिकारविधानचतुरी । उद्धवा पूजी तदनुसारीं । उद्धवही नीतिशास्त्रीं । अंगीकारी यथोचित ॥६६॥
मुख्यासनापासौनि अवर । भूमिभागीं आसन अपर । घेऊनि बैसला उद्धव नम्र । जाणोनि आदर तयेचा ॥६७॥
कृष्णही तैसाचि तत्प्रेमभरित । दावी मानवलोकाचरित । उपचार घेऊनि कुब्जादत्त । शयनीं क्रीडार्थ प्रवेशला ॥६८॥
परमसुंदर शय्यासदन । रुक्मललामनिर्मित पूर्ण । दिव्यमंचक ऊर्ध्ववितान । सूची ग्रथनकौशल्यें ॥६९॥
कनकतंतुमुक्ताफळें । गोमेदमाणिक्यपाचप्रवाळें । पुष्कराजवज्रलसनियानिळें । गुच्छ ग्रथिले वितानीं ॥७०॥
हंसतूळिका उपबर्हणें । कशिपु सुखदें मृद्वासनें । अमूल्य सुरंग विचित्र वसनें । पासोडिला पर्यंक ॥७१॥
जाई जुई चंपकयाति । बकुळें मोगरी मालती । मृदुतर कह्लारपंकजपंक्ति । शय्या निगुती निर्मिली ॥७२॥
शयनीं अनर्ह केतकपत्रें । संलग्न होतां भेदिती गात्रें । म्हणोनि अंतरें प्रादेशमात्रें । घ्राणतर्पणा स्थापियलीं ॥७३॥
चरणक्षालन करावया । सुघटित रजतपात्र राया । तांबूलष्ठीवन धरावया । कनकभाजन जडिताचें ॥७४॥
भित्तिप्रदेशीं स्थळोस्थळीं । सौरभ्यद्रव्यशलाका अनळीं । योजूनि स्थापिल्या त्या परिमळीं । सुगंध धूम प्रसरिती ॥७५॥
पद्माकृति रत्नखचितें । विस्तीर्ण कनकपात्रें उचितें । तांबूलद्रव्यें माजि समस्तें । जाजीफळादि परिपूर्ण ॥७६॥
खंडखाद्य साक्रोटबीजें । रसाळ कदळें द्राक्षें सहजें । पक्क खर्जूरें कंकोळद्रुमजें । पक्ककपित्थें मघमघिती ॥७७॥
पक्क पनस जंबुफळें । बीजपुरें नारीकेळें । इक्षुदंड श्वेतकाळे । त्वचे वेगळे कृतशकलें ॥७८॥
क्षौद्र मैरेय पौष्पज मधु । सुदोहदुग्धद्र्व्ये विविध । रत्नकूपिका भरूनि सिद्ध । सपानपात्रीं स्थापिलिया ॥७९॥
अमूल्यवैडुर्यरत्नमणि । देदीप्यमान जैसे तरणि कुड्यस्तंभादि वितानीं । जेंवि रविभुवनीं तम नभसे ॥८०॥
इत्यादि अनेक समृद्धिमंत । महाधन शयन सुशोभित । तेथ निविष्ट कमलाकांत । प्रतीक्षा करीत कुब्जेची ॥८१॥
तंव ते वार्ष्मिक क्रीडोपचार । भगवदर्पणा योग्य शरीर । सज्जिती जाली सालंकार । तो प्रकार अवधारा ॥८२॥
सा मज्जनालेपदुकूलभूषणस्रग्गंधतांबूलसुधासवादिभिः ।
प्रसाधितात्मोपससार माधवं सव्रीडलीलोत्स्मितविभ्रमेक्षितैः ॥५॥
सदना पातला मुरारि । जाणोनि शिक्षिता गृहकिंकरी । सिद्ध सन्नद्ध सर्वोपचारीं । यथाधिकारीं पृथक्त्वें ॥८३॥
अंगकांतिउद्दीपकें । मृदुळें सौरभ्यप्रकाशकें । ऐसीं उद्वर्तनें अनेकें । गात्रीं पृथकें उटणिया ॥८४॥
कुब्जा वेष्टूनि उपदुकूल । सुगंधतैलें चर्चित मौळ । उटणें लावूनि सुतप्तजळ । घालिती केवळ यथेच्छा ॥८५॥
ऐसा अभ्यंग संपल्या वटी । अंग परिमार्जिती किंकरी । तैलविकार गात्रीं शिरीं । दुर्गंधकारी न थरे तो ॥८६॥
करूनि धूतवस्त्रपरिधान । लेइली कंचुकी उटिलें साधारण । तयावरी अनुलेपन । मलयचंदनद्रव्याढ्यें ॥८७॥
शिवसूचक नैश चूर्ण । करीं मर्दूनि उटिलें वदन । कुंकुमरेखा देदीप्यमान । मन्मथमार्गण ज्याबद्ध ॥८८॥
पाचरंग गोंदिले तळीं । तदुपरि केशरटिकली पिवळी । त्यामाजि कस्तूरीपुलिका काळी । नेत्रकमळीं अंजनभा ॥८९॥
गंडस्थळें कुंकुमरंगीं । वेणिका रचिली उत्तमांगीं । सिंदूररेखा सरळ भांगीं । पौष्पजपरागीं कर्णपुटें ॥९०॥
हनुवक्षांतर मलयजसार । कर्पूर कळाविया मणिबंध कर । परिधान कंचुकी मध्यउदर । कृष्णागरविचर्चित ॥९१॥
पदतळ कोमळ सालक्त रंगीं । काश्मीरजाउडें उपरभागीं । दिव्यधूसरविलेपनांगी । एवं शुभांगी शोभतसे ॥९२॥
विलेपनाक्त फेडूनि चीर । परिधान केलें दिव्यांबर । अमूल्य कंचुकी लेइली रुचिर । हंस मयूर भुजभागीं ॥९३॥
माथां मुक्ताफळांची जाळी । अम्लान सुगंध सुमनें ग्रथिलीं । मूद राखडी काकंडोळी । बेल आंवळा बदरादि ॥९४॥
मत्स्य कूर्म हिरडे गुच्छ । रत्नजडित वेणिका स्वच्छ । कांचीबद्ध खोवूनि कच्छ । इच्छी अनिच्छ भोगार्थ ॥९५॥
मौळप्रसून अर्धचंद्र । मध्यें बिजवरा अतिसुंदर । निडळपट्टिका रत्नीं रुचिर । भ्रमरभासुर कुंतळभा ॥९६॥
इंद्रनीळादि भासुरमणि । चंचळअमूल्यमुक्ताश्रेणी । भ्रमरबाळिका बुगड्या श्रवणीं । सुजडित रत्नीं ताटंकें ॥९७॥
तद्भामंदितगंडयुगळें । नवयौवनप्रभेच्या मेळें । झळकती त्यांसि तुळितां न तुळे । अमळकमळा रति रंभा ॥९८॥
नासापुटीं सुमुक्तानथनी । मध्यें मंगळप्रभेचा मणि । मनुराधाचा प्रथम चरणीं । स्वामी सदनीं शोभतसे ॥९९॥
माधवी राकावदनशशी । भ्रूकज्जल मृगांकेंसीं । मिश्रितमंगळभाविशेषीं । प्रकाशी लावन्यचांदणें ॥१००॥
मरकतबिंदु अधरातळीं । अंजनांक सव्य कपोळीं । कंठीं सूक्ष्म गळसरी काळी । मुक्तावळी तदुत्तर ॥१॥
जडित चिताक गैवेयक । सरिया श्रृंखळा अमूल्ल्य पदक । समुक्तमणिमाळा अनेक । कुचकलशांतें शोभविती ॥२॥
बाहुभूषणें दोहींकडे । रत्नकंकणें जडित चुडे । मुद्रिकांवरी जडिले खडे । ते चहूंकडे भा पसरे ॥३॥
खचित काचीचा मध्यमणि । पदकप्रभा तेजै न गणी । त्या दोहींत्तें आपुल्या किरणीं । नथनीललाम लाजवी ॥४॥
त्यावरी शीसफूल अर्धचंद्र । मध्यें बिजवरा भासुर । एवं पंक्ति उत्तरोत्तर । विलसे रुचिर रत्नांची ॥१०५॥
चरणीं अंदु नूपुर वाळे । वांक्या गर्जती विन्यासताळें । विरोद्या जोडवीं दशांगुळें । अनवट पोल्हारे झिणियांसीं ॥६॥
कंठीं आपाद सुमनहार । कर्रूनि एवमादि श्रृंगार । कांहीं घेऊनि अमृतआहार । उद्बोधकर आसवही ॥७॥
सुरंग तांबूल घेतां वदनीं । रुचिर राजती द्वय स्रुक्किणी । अधर जैसा विद्रुममणि । झळके किरणीं दशनांच्या ॥८॥
मौन माधुर्य नम्रता । सौष्ठव सप्रेम सुस्निग्धता । सर्वश्रृंगारांचिये माथां । चातुर्यभरिता पूर्ण कळा ॥९॥
षोडश शृंगार सोळा कळीं । शशांकवदना मन्मथपुतळी । कुब्जाराका माधवमेळीं । दैवागळी माधविका ॥११०॥
इत्यादिश्रृंगारमंडिततर । कृष्णक्रीडे योग्य शरीर । सज्जूनि चालिली सत्वर । सुरंग वस्त्र पांघुरली ॥११॥
मधुकुळसंभव श्रीमाधव । परी तो केवळ रमाधव । त्यातें कुब्जा हावभाव । ललनालाघवरस दावी ॥१२॥
व्यंकटकटाक्षनेत्रवाणीं । विंधे अपांगविमोक्षणीं । सलज्जमंदस्मिताननीं । आल्हादश्रेणी प्रकटितसे ॥१३॥
ऐसी कांता लावण्यभरिता । मन्मथसमरा सन्नद्ध उदिता । देखोनि प्रार्थी मन्मथताता । तें नृपनाथा अवधारीं ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP