अध्याय ४८ वा - श्लोक ३१ ते ३६
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नह्ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ।
ते पुनंत्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥३१॥
गंगाप्रयागादि जें तोय । कीं पुष्करादि जे जलाशय । सर्वतीर्थें इयें जलप्रय । न होती काय अघहंतीं ॥३८॥
गंडकी गोमती हरिद्वारीं । मांधातृपुरीं नर्मदोदरीं । विष्णु श्रीशिव सिंदुरारि । सूर्यकांत तो रविरूपी ॥३९॥
इत्यादि दैवतें शिळामय । भजतां प्रसन्न होती काय । होती परंतु साधुप्राय । सद्यचि सदय न होती ॥४४०॥
वदरिनारायण केदार । बिंदुमाधव विश्वेस्श्वर । प्रयागक्षेत्रीं गदाधर । पिप्तामहेश्वर पितृरूपी ॥४१॥
जगन्नाथीं पुरुषोत्तम । श्रीशैल्यशिखरीं कैलासधाम । अहोबळी जो सर्वोत्तम । वीरविक्रम नरसिंह ॥४२॥
काळहस्तीमाजी शूळी । श्रीनिवास व्यंकटाचळीं । शिवकंचींत चंद्रमौळी । शैलबाळी कामाक्षी ॥४३॥
विष्णुकंची वरदराज । पक्षतीर्थी पूषाद्विज । अरुणाचळीं तेजःपुंज । तेजोलिंग गिरिरूपी ॥४४॥
त्रिविक्रम त्रिकोलूरीं । आदिवाराह श्रीमुष्टिनगरीं । वृद्धाचळीं मन्मथारि । चिदंबर्रीं गगनात्मा ॥४४५॥
आणि सिंहाळीं वैजनाथ । मध्यार्जुन जगद्विख्यात । गौरी मयूरी एकदंत । गौरीकांत अघहंता ॥४६॥
कुंभकोणीं कुंभेश्वर । शार्ङ्गपाणि कोदंडधर । कावेरीचें अभ्यंतर । वसवी सुंदर श्रीरंग ॥४७॥
जंबिकेश्वव्र आपोमय । रुद्रपादकमलालय । रामचंद्रें स्थापिलें होय । रामेश्वर सेतुबंध ॥४८॥
दर्भशायी दर्भशयनीं । मथुरा मीनाक्षी भवानी । सुंदरेश्वराची ते रमणी । शोभती दोन्ही वधूवरें ॥४९॥
आदिकेशव जनार्दन । त्रिवाद्दित्रिविक्रम वामन । गजेंद्रमोक्ष इंद्रद्युम्न । त्रिकूटाचळ तोताद्रि ॥४५०॥
कन्याकुमारी सिंधुतीरीं । तैसाचि व्यंकटेश अळगिरि । सुब्रह्मण्य कुमारक्षेत्रीं । कुमार धारातटाकीं ॥५१॥
सुरासुरांतें मोहनकारी । ते मोहनी उडपक्षेत्रीं । शंकर नारायण हर हरि । कोटेश्वरीं कोटिलिंग ॥५२॥
मूकांबिका सदय पूर्ण । श्रीमहाबळेश्वर गोकर्ण । हंपी विरूपाक्ष पावन । पंपासरोवर ज्या नांव ॥५३॥
कृत्तिकायोगीं कार्तिकमासीं । स्वामिदर्शन घडे ज्यासी । सप्त जन्म दे द्विजत्वासी । तपोराशि षण्मुख तो ॥५४॥
श्रीकरहाटक कृष्णातीरीं । कोपारूढीं श्रीनरहरि । महालक्ष्मी कोल्हापुरीं । भीमातीरीं पांडुरंग ॥४५५॥
तुकाई तुरीया तुळजापुरीं । वैजनातह पर्यली क्षेत्रीं । अवढानागनाथत्रिपुरारि । ज्योतिर्लिंग अमर्दकीं ॥५६॥
अत्रि अनसूया रेणुका दत्त । सिंहाद्रिपर्वतीं जगद्विख्यात । लवणासुराचा केला घात । तेही अद्भुत विष्णुगया ॥५७॥
शार्ङ्गपाणि मेहकरीं । सिद्ध अमरेश्वर ॐकारीं । महाकाळेश्वव्र अवंतिपुरीं । आणि येळूरीं घृष्णेश ॥५८॥
त्रिसंध्याक्षेत्रीं त्र्यंबकेश्ववर । भीमाउगमीं भीमाशंकर । रेवातीरीं भृगुक्षेत्र । सप्तश्रृंगीं चंडिका ॥५९॥
प्रभास सोरठीसोमनाथ । त्रिविक्रम नांदे द्वारके आंत्त । अर्बुदाचळीं उमाकांत । अर्बुदाचळेश्वर अभिधानें ॥४६०॥
यमुनातीरीं मथुरपुरीं । भवाब्धिलंघना नौका दुसरी । जेथें सन्निहित श्रीहरि । अमरीं भूसुरीं सुपूजित ॥६१॥
इत्यादि देवता शिळामय । सेवनें प्रसन्न नव्हती काय । होती परंतु पाहिजे धैर्य । बहुकाळवरी भजकांसी ॥६२॥
मृद्गोकुळें मृण्मय गौरी । पार्थिवलिंगें कीं विघ्नारि । वेदिकास्थंडिलीं शर्वरारि । अर्चिजे नन्रीं श्रुतिआज्ञा ॥६३॥
इयें मृच्छिळामय दैवतें । ब्रह्माद्यमरीं संस्थापितें । प्रसन्न होऊनि पूजकातें । पावन करिती चिरकाळें ॥६४॥
तैसे नव्हती सज्जन साधु । जे दर्शनमात्रें निरसिती खेदु । पाप ताप दैन्य त्रिविध । छेदूनि आनंदमय करिती ॥४६५॥
तपीं तीर्थीं पुरश्चरणीं । नानाक्षेत्रीं अनुष्ठानीं । बहुकाळ श्रमतां प्राणिगणीं । विरळा कोण्ही फळ लाहे ॥६६॥
एकरूप निश्चळवृत्ति । बहुकाळ न राहे सन्मति । मध्यें षड्रिपु विघ्नें करिती । मग अंतरती फळलाभा ॥६७॥
कित्तेक कामेंचि नाडिले । कित्तेक क्रोधें लिथाडिले । कित्तेक मत्सरें झोडिले । दंभें पाडिले उलथोनी ॥६८॥
कित्तेक लोभें घातले बंदीं । एकां मदाष्टकाची मांदी । बळेंचि वलघोनियां खांदीं । केले दंदी त्रिजगाचे ॥६९॥
एक ममतेअधीन झाले । शोकावर्ती ते बुजाले । तीर्थीं क्षेत्रीं देवतां भजले । कोण्ही लाभले फळ काळें ॥४७०॥
तैसे नव्हती सज्जनोत्तम । सहसा न घेती बहुकाळ श्रम । अभीष्टदानीं कल्पद्रुम । निरसिती भ्रम दर्शनें ॥७१॥
पापतापदैन्यहर । साधुसमान नव्हती अपर । काळें फळती तीर्थें अमर । साधु सत्वर फळदाते ॥७२॥
त्रिपुरुषीं सगरासाठीं । तपश्चर्येंच्या संकटीं । श्रमतां तुष्टला धूर्जटि । तैं गंगा मुकुटींहूनि दिधली ॥७३॥
तैसे सज्जन न फळती कष्टें । दर्शनमात्रेंचि त्या कुक्कटें । पुंडरीकाचें कर्म खोटें । सत्कर्मवाटे परतविलें ॥७४॥
भागीरथीसन्निध आला । कुक्कटदर्शनें विरमला । पितृभजनीं सज्ज झाला । तेणें विठ्ठला उभें केलें ॥४७५॥
राया ऐसा अक्रूरासी । मृदुभाषणें हृषीकेशी । मनीं धरूनि ज्या कार्यासि । आला त्यासी तें सांगे ॥७६॥
कांहीं एक कार्य मनीं । धरूनि आला अक्रूरासदनीं । त्यासि दर्शनें तोषवूनि । सांगे श्रवणीं तें ऐका ॥७७॥
स भवान्सुहृदां वै नः श्रेयाञ्श्रेयश्चिकीर्षया ।
जिज्ञासार्थं पांडवानां गच्छस्व त्वं गजाह्वयम् ॥३२॥
श्रीकृष्ण म्हणे अक्रूरासी । बोलिलों साधुलक्षणांसी । प्रस्तुत तितुकींही तुजपासीं । तो तूं आम्हांसि क्षेमकर ॥७८॥
निश्चयें आमुच्या सुहृदांमाजी । श्रेष्ठ स्नेहाळ बुद्धि तुझी । अवंचकभावें सुहृत्काजीं । प्रवर्त्तस्सी हें मी जाणे ॥७९॥
पांदवांचिया कल्याणकार्या । तुवां जावें गजसाह्वया । कौरवांची विषमचर्या । जाणावया साकल्यें ॥४८०॥
स्व म्हणोनि संबोधन । सुहृद आप्त तूं आत्मीय पूर्ण । म्हणोनि तुज हें गुह्यकथन । केलें जाणोन विश्वासें ॥८१॥
प्रकटूं नये जें इतरांसी । आत्मीयभावें वदतों तुजसीं । त्या ऐकोनि वृत्तांतासी । साधीं कार्यासि सर्वज्ञा ॥८२॥
पितर्युपरते बालाः सह मात्राः सुदुःखिताः । आनीताः स्वपुरं राज्ञा वसंत इति शुश्रुम ॥३३॥
सावध ऐकें दानपति । चित्र विचित्र मेलिया अंतीं । खंडली देखोनि कुरुसंतति । तेणें सत्यवती सचिंत ॥८३॥
तिनें प्रार्थूनि बादरायणा । भुजिष्ये सहित दोघी सुना । धाडूनि तपोधनाच्या शयना । वंशवर्धना आदरिलें ॥८४॥
चित्रक्षेत्रीं पाण्डुराजा । विचित्रक्षेत्रीं धृतराष्ट्र दुजा । भुजिष्ये जठरीं जन्मला वोजा । तृतीया प्रजा तो विदुर ॥४८५॥
पांडु विरूप पांडुरवर्ण । धृतराष्ट्र तो चक्षुहींन । विद्रु क्षता त्रिकाळज्ञ । परि राज्यासन अयोग्य त्या ॥८६॥
पांडु स्थापूनि भद्रासनीं । राजा केला प्रजाजनीं । त्यासि मृगया करितां वनीं । पडिला व्यसनीं द्विजशापें ॥८७॥
कर्दमऋषि पत्नीसहित । मृगमैथुना देखोनि तप्त । दंपती मृगत्वें रमतां तेथ । विंधी अवचित पांडु त्या ॥८८॥
हृदयीं भेदतां मार्गण । कर्दम बोलिला शापवचन । तूंही रमतां पावसी मरण । पांडु ऐकोन दुखवला ॥८९॥
तेणें विरक्त झाला मनीं । राज्य सांडूनि तीर्थाटनीं । जातां कांता दोघी जणी । गेल्या विरहिणी दुःखार्ता ॥४९०॥
करूनि समस्त तीर्थाटनीं । सिद्धाश्रमीं प्रावृट्काळीं । तापसवेशें सिद्धांजवळी । वसती केली पांडूनें ॥९१॥
पुत्ररहिता अनूर्ध्वगति । ऐकोनि पांडु पोळला चित्तीं । तेव्हां ज्येष्ठभार्या जे कुंती । कथी त्याप्रति निजगुह्य ॥९२॥
राया पूर्वीं जनकाघरीं । दुर्वासऋषीनें वरदोत्तरीं । हात ठेवूनि माझिये शिरीं । असतां कुमारी मनु कथिले ॥९३॥
मंत्रपंचक सांगोनि कानीं । मग बोधिली विनियोगकरणी । देव प्रार्थिसी मंत्र जपोनी । तो सुतदानी होईल ॥९४॥
प्रतीति यावी अंतःकरणा । म्हणोनि प्रार्थिलें चंडकिरणा । तेणें करितां सन्निधाना । मग मी कर्णा प्रसवलें ॥४९५॥
त्यानंतरें उद्वाहकाळा । राया तुज म्यां घातली माळा । अनन्यभावें तव पदकमळा । वांचून डोळां नर न घलीं ॥९६॥
सचिंत देखोनि तुज संकटीं । आजि सेवेसि कथिली गोठी । चारी मंत्र असती गांठीं । ऐकोनि पोटीं नृप हर्षे ॥९७॥
राजा म्हणे को धर्मांगने । प्राणवल्लभे मृगलोचने । मंत्रसामर्थ्यें मुनिवरदानें । पुत्र ममाज्ञे उत्पादीं ॥९८॥
ऐसी आज्ञा लाहूनि सती । मंत्रें प्रार्थिला धर्ममूर्ति । त्यापासूनि तत्संतति । लाधली कुंती युधिष्ठिर ॥९९॥
पुत्र गुणाढ्य देखोनि पांडु । प्रतापतेजस्वी मार्तंड । कुंती कवळूनि चुंबी तोंड । म्हणे त्वां गोड भव केला ॥५००॥
पुन्हा आज्ञापी पांडुराजा । शेषमंत्रांच्या प्रसवें प्रजा । मग ते जपोनि मंत्रबीजा । प्रार्थी वोजा समीरणा ॥१॥
तो मारुतसंतति वृकोदर । कुंती प्रसवली दुसरा कुमर । तृतीयमंत्रें प्रार्थूनि इंद्र । अर्जुनवीर प्रसवली ॥२॥
मग पांडूनें बोधूनि कुंती । चतुर्थमंत्र माद्रीप्रति । देऊनि तद्द्वारा संतति । केली विश्रांति तयेसी ॥३॥
मनीं माद्रीचे कातर । म्हणे कुंतीसि तिघे कुमर । एक्या मंत्रें दोघे सुर । अश्विनीकुमार ते प्रार्थीम ॥४॥
यमल नकुळसहदेव । ऐसे जन्मले पांडव । पुढें कर्माचें तांडव । ऐकें अपूर्व दानपति ॥५०५॥
कोणे एके विचित्र दिवसीं । कुंती गेलिया स्नानासी । कामें जाकळिलें पांडूसी । तो माद्रीसी रति मागे ॥६॥
निषेधितां ते बहुतांपरी । पांडु रमतां बलात्कारीं । जाली प्राणांची बोहरी । मन्मथसमर्रीं तनु त्यजिली ॥७॥
कुंती देखोनि ते अवस्था । माद्रीवरी कोपों जातां । तिणें कथिलें त्या वृत्तांता । समान आर्त्ता वरमरणें ॥८॥
कुंतीसि निरवूनि बाळें दोन्ही । माद्री पांडुसहगामिनी । बाळांसहित कुंती वनीं । शोक करूनि आक्रंदे ॥९॥
पिता पंचत्व पावला असतां । मातेसहित बाळां आर्त्ता । वरपडलिया दुःखावर्त्ता । सिद्धसंकेता जाणोनी ॥५१०॥
मग धृतराष्ट्रें खिन्नमनें । स्वपुरा आणिलें कारुण्यें । तेथें वसताति ऐसी श्रवणें । वार्ता आम्ही ऐकतों ॥११॥
कुंती आमुची पितृभगिनी । बाळकेंसहित करी ग्लानि । जरी तूं पुससी काय म्हणोनी । तरी तें श्रवणीं अवधारा ॥१२॥
तेषु राजांऽबिकापुत्रो भ्रात्तृपुत्रेषु दीनधीः । समो न वर्तते नूनं दुष्पुत्रवशगोंऽधदृक् ॥३४॥
धृतराष्ट्र जो अंबिकापुत्र । दुष्टपुत्रांचा ऐकोनि मंत्र । स्वयें झाला पुत्रतंत्र । अम्ध निर्नेत्र सबाह्य ॥१३॥
तया भ्रातृपुत्रांच्या ठायीं । दीन दुर्बुद्धि धरिली पाहीं । समानभावें वर्तत नाहीं । हें निश्चयीं जाणवया ॥१४॥
सूक्ष्म अभिप्राय जो म्यां कथिला । तो तूं ऐकोनि उठीं वहिला । इतुकें कथूनि अक्रूराला । काय बोलिला पुन्हा हरि ॥५१५॥
गच्छ जानीहि तद्वृत्तमधुना साध्वसाधु वा ।
विज्ञाय तद्विधास्यामो यथा शं सुहृदां भवेत ॥३५॥
आतां अक्रूरा स्वार होईं । सवेग हस्तिनापुरा जाईं । धृतराष्ट्राचें वर्तन पाहीं । दिवस कांहीं राहोनी ॥१६॥
तीव्रदंडें शासन करितां । सहसा निवाड नोहे वृत्ता । तेंचि सहवासें वर्ततां । सुष्टु दुष्टता प्रकाशे ॥१७॥
यालागिं राहोनि कांहीं दिवस । पाहें तयाच्या वर्तनास । साधुअसाधुत्वाचा दोष । लागे कवणास हें विवरीं ॥१८॥
पांडुमरणें दुःख पृथें । बाळें जनकेंविण अनाथें । अंध आपंगी कीं दे व्यथे । हें तां चित्तें अवगमिजे ॥१९॥
न्यायनैष्ठुर्य अंबिकासुता । गौतमा गांगेया देखतां । विषमाचरण प्रकाशितां । शंका चित्ता न धरावी ॥५२०॥
इतुका साधूनि कार्यार्थ । सत्वर परतोनि येईं येथ । ऐकोनि तव मुखें वृत्तांत । सुहृदां सनाथ करूं आम्ही ॥२१॥
जेणें सुहृदां वाढे सुख । तेंचि आम्हां करणें देख । ऐसा वृत्तांत आदिपुरुख । वदला सम्यक ते काळीं ॥२२॥
इत्यक्रूरं समादिश्य भगवान्हरिरीश्वरः । संकर्षणोद्धवाभ्यां वै ततः स्वभवनं ययौ ॥३६॥
इतुका आदेश निरोपूनी । अचिंत्यैश्वर्याची खाणी । तो अक्रूरा चक्रपाणि । आज्ञा देऊनि ऊठिला ॥२३॥
प्रणतक्लेशांतें संहरी । यालागिं नामें बोलिजे हरि । स्वगतमाया अंगीकारीं । ईश्वरोच्चारीं श्रुति गाती ॥२४॥
सहित उद्धव संकर्षण । अभिवेष्टित पार्पदगण । निघाले अक्रूरसदनींहून । निजात्मसदन प्रवेशले ॥५२५॥
इतुकी कथा व्यासतनय । सांगोनि संपविला अध्याय्य । पुढिले कथेचा अभिप्राय । बीजप्राय प्रदर्शी ॥२६॥
पुढिले अध्यायीं अक्रूर । प्रवेशोनि हस्तिनापुर । धृतराष्ट्राचें विषमांतर । लक्षूनि सत्वर येईल ॥२७॥
तें सविस्तर परिसिजे श्रोतीं । ज्यामाजि पूर्वार्धा समाप्ति । वर्णील श्रीशुकभारती । भाषाव्युत्पत्ति हरिवरद ॥२८॥
आधारभूत प्रतिष्ठानीं । आधेय अनंतब्रह्माण्डश्रेणी । एकनाथ ऐश्वर्यदानी । सिंहासनीं सर्वात्मा ॥२९॥
प्रतिब्रह्माण्डीं ईश्वर पृथक । स्थापिले स्वपादप्रणत रंक । शासन चिदानंदात्मक । स्वानंद सम्यक सन्मयता ॥५३०॥
गोविंद प्रबोधामृतघन । वर्षतां ब्रह्माद्वयजीवन । तेणें दयार्णव केला पूर्ण । तें हें व्याख्यानहरिवद ॥३१॥
श्रीमद्भागवत या नाम । स्कंध त्यांतील हा दशम । श्रीकृष्णाचें जन्मकर्म । अध्याय परम अठ्ठेचाळिसावा ॥५३२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमह्म्स्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवारदाटिकायां दयार्नवानुचरविरचितायां सैरंध्रीसनाथीकरणाक्रूरसदनाभिगमनहस्तिनापुरप्रवेशनं नामाष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ॥५३२॥ श्लोक ॥३६॥ एवं संख्या ॥५६८॥ ( अठ्ठेचाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या २२२८८ )
अठ्ठेचाळिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP