अध्याय ४८ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अचिंत्वा शिरसाऽऽनम्य पादावंकगतो मृजन् । प्रश्रयावनतोऽक्रूरः कृष्णरामावभाषत ॥१६॥
सन्निध बैसोनि आपण । अंकीं धरूनि उभय चरण । करी पदतळसंवाहन । लक्ष्मीसमान सद्भावें ॥९९॥
विनयभावें नम्रतर । रामकृष्णेंसीं परम मधुर । बोलता झाला तें उत्तर । उत्तराकुमरा मुनि सांगे ॥२००॥
दिष्ट्या पापो हतः कंसः सानुगो वामिदं कुलम् । भवद्भ्यामुद्धृतं कृच्छ्राद्दुरंताच्च समेधितम् ॥१७॥
उर्जित दैवकल्याणप्रचुर । तेणें क्म्स किल्बिषकर । सानुग निमाला दुष्कर । हें भाग्य थोर त्रिजगाचें ॥१॥
अनुग म्हणिजे यूथपति । बंधु अमात्य खळ दुर्मति । पार्शदसैनिक जे दुष्कृति । जाली उपहति त्यां सर्वां ॥२॥
पूतनेपासूनि सबंधुकंस । सानुगः शब्दें बोलिजे यास । दैवयोगें या अघिष्टा नाश । हा भाग्यविशेष त्रिजगाचा ॥३॥
कंस मरोनि अनुग इतर । एकही उरता कनीयतर । तो या त्रिजगासि दुष्कर । दुःख दुर्धर भोगविता ॥४॥
यालागीं सानुगकंदा मरण । दैवें त्रिजगाचें कल्याण । तुमचें कुळ हें दुःखनिमग्न । तुम्हीं संपूर्ण उद्धरिलें ॥२०५॥
तुमच्या कुळाची अभिवृद्धि । सानुग कंसाची अवधि । पुरली म्हणोनि कार्यसिद्धि । हे त्रिशुद्धि साधली ॥६॥
परम दुरंत दुःखार्णव । तेथे तुमचें यदुकुळ सर्व । बुडतां तारिलें तुम्हीं सर्व । पुसूनि ठाव कंसाचा ॥७॥
इत्यादि प्रस्तावप्रासंगिकें । मानुषधर्मानुसारलौकिकें । प्रथम अक्रूरें बोलौनि वाक्यें । अलौकिकें आदरिलीं ॥८॥
तेम्चि परमार्थरूपस्तवन । श्रोतीं परिसिजे सावधान । देशभाषा कृतव्याख्यान । बालभाषण हरिवरें ॥९॥
युवां प्रधानपुरुषौ जगद्धेतू जगन्मयौ । भवद्भ्यां न विना किंचित्परमस्ति न चापरम् ॥१८॥
तुम्ही अखिल त्रिजगमय । कोठूनि कैसे म्हणाल काय । जगद्वीज कारणकार्य । मृद्घटप्राय अभिन्नत्वें ॥२१०॥
कार्यकारण तें कोठून । तरी हे तुम्हीच दोघेजण । धर्मस्थापक रामकृष्ण । पुरुष प्रधान अवतरलां ॥११॥
संवित्प्रज्ञान प्रधाननामें । मूळप्रकृति जे गुणसाम्यें । सर्वज्ञ सर्वेश्वर पुरुषनियमें । अभिन्नप्रेमें ते तुम्ही ॥१२॥
माया ईश्वर दोन्हीपणा । न भजोनि द्वैताच्या भूषणा । मिरवी जे ते वस्तु जाणा । अगुणा सगुणा माजिवडी ॥१३॥
यास्तव तुम्हांवांचूनि कांहीं । अपर अथवा परही नाहीं । म्हणाल अपर पर तें कांहीं । तरी कारणीं कार्यीं व्यवहित जें ॥१४॥
कार्यशब्दें बोलिजे अपर । कारणशब्दें बोलिजे पर । व्याप्यव्यापक हा प्रकार । ग्रंथकार ज्या म्हणती ॥२१५॥
प्रत्यक्षादिप्रमाणसिद्ध । म्हणाल कैसा नाहीं भेद । तरी यदर्थीं ऐका विशद । ममानुवाद यथामति ॥१६॥
आत्मसृष्टमिदं विश्वमन्वाविश्य स्वशक्तिभिः । ईयते बहुधा ब्रह्मञ्श्रुतप्रत्यक्षगोचरम् ॥१९॥
विश्व म्हणिजे अकार मात्रा । आपण आत्मत्वीं या गात्रा । क्रियाज्ञानादि स्वशक्तितंत्रा । पृथगाकारा समसृष्टि ॥१७॥
ब्रह्मन् ऐसें संबोधन । साक्षात्परब्रह्म तूं म्हणोन । अथवा परमेश्वर भगवान । गुणपरिपूर्ण संबोधी ॥१८॥
रजादि गुणशक्ति करून । तुम्हीं हें सृजिलें आब्रह्मभुवन । तेथ आत्मत्वें उपादान । वास्तव अभिन्न भिन्न गमे ॥१९॥
प्रविष्ट नसोनि प्रविष्ट गमसी । एक असोन बहुधा होसी । तेंचि या विश्वदृष्टांतेंसी । कळे सर्वांसी प्रत्यक्ष ॥२२०॥
रजसत्वादि आत्मशक्ति । तिहीं करूनि विश्वाकृति । तुम्हीच होऊनि आणिली व्यक्ती । ऐसी प्रतीति गोगम्य ॥२१॥
तुम्ही म्हणिजे परब्रह्म । अक्षय अक्षर अविकारधाम । मायावलंबें गुणसंभ्रम । विश्वोद्गम तज्जनित ॥२२॥
वास्तव नसोनि विवर्त लटिका । किरणीं संभव मृगोदका । तारभ्रांति जेंवि शुक्तिका । तेंवि मायिका माजी तुम्हीं ॥२३॥
तुम्ही नहोनि बहुधा विश्व । श्रुतप्रत्यक्षगोचर सर्व । अनेकव्यक्तिरूपनांव । अवघें वास्तव गमतसां ॥२४॥
एकचि वस्तु बहुधाकार । कैसी होय प्रतीतिकर । दृष्टांतद्वारा तो विचार । ऐका साचार मम वदनें ॥२२५॥
यथा हि भूतेषु चराचरेषु मह्यादयो योनिशु भांति नाना ।
एवं भवाअन्केवल आत्मयोनिष्वात्माऽत्मतंत्रो बहुधा बिभाति ॥२०॥
योनि म्हणिजे पृथक कारणें । एका आपणचि अनेकपणें । रूपांतराभिव्यक्तिस्थानें । भौतिकें भूतें चराचरें ॥२६॥
प्रुथ्वी पृथ्वीपणें ननसे । हयगजसेना चित्रीं दिसे । कुंडस्थंडिलव्यक्तिवशें । बहुविध भासे एकचि ॥२७॥
कीं जळ एकचि हृदोदरीं । बुद्बुदतरंगकल्लोललहरी । गोचर होय अनेकाकारीं । तेंवि संसारीं चिदात्मा ॥२८॥
मृगतृश्णिका रज्जुसर्प । नभीं नीळिमा शुक्तिरौप्य । एक तेजाचें बहुधारूप । वास्तव अल्प ननसोनि ॥२९॥
जैसे कथिले भूतदृष्टांत्त । तैसे भौतिकाकार अनंत । नानागंधीं पृथ्वी व्यक्त । तोय समस्त रस होय ॥२३०॥
अनेकरूपीं भासे तेज । शीतोष्णमृदुळ वायु सहज । स्पर्शीं गमनीं चलनीं वोज । प्रकटी काज अनेकता ॥३१॥
तैसेंचि नभ बहुधा ध्वनि । घटमठभेदें अनेकपणीं । गोचर होय भिन्न नहोनी । तेंवि तूं जनीं जनरूप ॥३२॥
एक परमात्मा तूं सत्य । जीव प्रतिबिंबें अनंत । योनिभेदें विकारवंत । प्रत्ययभूत जाणिजसी ॥३३॥
मृगपन्नगशशकमशक । बालतरुनवृद्धादिक । अविद्य सुविद्य चतुर मूर्ख । हे प्रत्यय अनेक प्रकाशिसी ॥३४॥
आत्मा केवळ तूं स्वतंत्र । तो भाससी कर्मतंत्र । एवं अभेद अगोचर । विश्वाकारें गोचर तूं ॥२३५॥
हें ऐकोनि म्हणसी ऐसें । सृष्ट्यादि कर्म मजहई असे । तर्री मी बद्ध तेमाजि गवसें । जीवा ऐसा गुणत्वें ॥३६॥
तरी हें न म्हणें पुरुषोत्तमा । तुझा अगाध अचिंत्य महिमा । वश नहोनि मायाभ्रमा । गुणसंभ्रमा वाढविसी ॥३७॥
तो तूं म्हणसी कवणेपरी । अक्रूर म्हणे ऐकें हरि । रवि न बुडे मृगजळपूरीं । गुणविकारीं तूं तैसा ॥३८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP