दुराराध्यं समाराध्यं विष्णुं सर्वेश्वरेश्वरम् । यो वृणीते मनो ग्राह्यमसत्वात्कुमनीष्यसौ ॥११॥

कांहीं दिवस राहें हरि । मजसीं रमें सुखशेजारीं । दुर्भगा इये याञ्चेवरी । शुकवैखरी वाखाणी ॥१५५॥
येर्‍हवीं कुब्जेचिया अधिकारा । हेवा न करवे मुनिसुरपितरां । विषययाञ्चेची अल्पक गिरा । दुर्भगाकारा तुच्छत्वें ॥५६॥
म्हणाल कुब्जेचें चातुर्य । वदला शृंगारीं मुनिवर्य । विषययाञ्चेचें अधैर्य । तैं हें अनार्य न स्मरलें ॥५७॥
ऐसें न म्हणावें सज्जनीं । भूतभविष्यवर्तमानीं । सर्वद्रष्टा योगाग्रणी । तद्व्याख्यानीं हा भाव ॥५८॥
कुब्जा तों साची राजदासी । गंधार्पणें हृषीकेशी । तोषवूनि रतिकामासी । प्रार्थी सद्मासि न्यावया ॥५९॥
तये काळींच्या वरोत्तीर्णा । पुरवूं गेला कैवल्यराणा । दासीसमान याञ्चावचना । दुर्भगपणा मुनि वदला ॥१६०॥
जैसीं दासींचीं लक्षणें । तत्साहित्या रूपकरणें । येर्‍हवीं कानन वेल्हाळपणें । अनळीं तुळितां अघटित ॥६१॥
दासी याचिती जेंवि जारा । तेंवि याचिलें जगदाधारा । आतां शिकवण साधक नरां । कथी नृपवरा मुनिवर्य ॥६२॥
जन्मसहस्रांचिया कोटी । तपोध्यानें समाधि हठी । साधितां भजनाची हातवटी । लाहे कष्टीं क्कचिन्नर ॥६३॥
ऐसिया सप्रेम भजनभाग्यें । दुराराध्यही आराधना योग्य । जालिया याची विषयसौभाग्य । तोचि दुर्भाग्य कुबुद्धि ॥६४॥
त्रिजगीं श्रेष्ठ जे सुरवर । त्यांहूनि वरिष्ठ बोलिजे शक्र । शक्र विरंचि शंकर । त्यांहूनि श्रीवर वर सर्वां ॥१६५॥
सर्व वरेश्वर तो विष्णु । दुर्घट ज्याचें आराधन । तोही करून सुप्रसन्न । इंद्रियजन्म सुख मागे ॥६६॥
मनोग्राह्य काल्पनिक । मृषा तुच्छ विषयात्मक । स्वप्नाकार भासे क्षणिक । याची मूर्ख कुबुद्धि ॥६७॥
लाहूनि सर्ववरेश्वर । विषय मागे तो पामर । ऐसी शिकवण व्यासकुमर । वदतां भूवर भ्रम निरसी ॥६८॥
इतुकें कुब्जेचें आख्यान । भागवतोद्भव अतिपावन । दयार्नवाचें भाषाकथन । बालभाषण हरिवरदा ॥६९॥
आराधक विरोधक । द्विधा भक्तां तारक एक । अवतरे धर्मसंस्थापक । जो यदुनायक जगदात्मा ॥१७०॥
पूतनेपासूनि कंसवरी । विरोधी केली मोक्षाधिकारी । आराधकांची ही भजनपरी । प्रकट करी तदंगत्वें ॥७१॥
त्यावरी आराधकांची करुणा । अंगीं लेवूनि त्रैलोक्यराणा । क्रमें करितां तदार्तिहरणा । अक्रूरस्मरणा करी हृदयीं ॥७२॥
उद्धवद्वारा व्रजसांत्वन । सैरंध्रीचें वरोत्तीर्ण । अक्रूराचें केलें स्मरण । पांडवगोपन लक्षूनी ॥७३॥
कुब्जाख्यान अळंकारीं । संपूर्ण केलें ज्ञानेश्वरीं । अक्रूरभवना गेला हरि । कवणे परी तें ऐका ॥७४॥

अक्रूरभवनं कृष्ण सहरामोद्धवः प्रभुः । किंचिच्चिकीर्षयन्प्रागादक्रूरप्रियकाम्यया ॥१२॥

श्रीकृष्ण जो जगत्पति । ज्याची अगाध प्रभुत्वशक्ति । चालिला अक्रूरभवनाप्रति । जिवलग हातीं धरूनियां ॥१७५॥
तेचि जिवलग म्हणाल कोण । उद्धव आणि संकर्षण । सहित अनुचार पार्षदगण । मनीं चिंतोनि गुज कांहीं ॥७६॥
अक्रूराचें करावें हित । ऐसी कामना हृदया आंत । कृपेनें द्रवोनि जगन्नाथ । जाता झाला तत्सदना ॥७७॥
म्हणाल चिंतिलें गुज तें कवण । होऊनि अक्रूरावरी प्रसन्न । गजसाह्वया त्या धाडून । कुरुवर्तन शोधावें ॥७८॥
इतुकीं कार्यें धरूनि चित्तीं । अक्रूरसदना कमलापति । राम उद्धव धरूनि हातीं । कृपामूर्ति पातला ॥७९॥

स तान्नरवरश्रेष्ठानाराद्वीक्ष्य स्वबांधवान् । प्रत्युत्थाय प्रमुदितः परिष्वज्याभिवंद्य च ॥१३॥

नरांमाजि वरवरिष्ठ । आपुले बंधु आत्मनिष्ठ । दूर देखोनि त्यांतें स्पष्ट । अक्रूर यथेष्ट हरिखेला ॥१८०॥
उठोनि सामोरा गेला वेगीं । सप्रेमभावें त्या आळंगीं । उल्हासवाक्यांच्या प्रसंगीं । आनंदवूनि सकळांतें ॥८१॥
कृष्णरामांतें लोटांगण । उद्धवाचे नमिले चरण । तिहीं अक्रूरा अभिवंदून । करिती भाषण प्रियवार्ता ॥८२॥

ननाम कृष्णं रामं च स तैरप्यभिवादितः । पूजयामास विधिवत्कृतासनपरिग्रहान् ॥१४॥

सभास्थानीं चित्रासनें । मृदोळिया वोटंगणें । भित्तिप्रदेशीं विचित्र वसनें । ऊर्ध्व वितानें विराजती ॥८३॥
तेथें नेऊनि बैसविले । सर्वोपचार सिद्ध केले । सुस्नात होऊनि पूजिले । विधिविधानपूर्वक ॥८४॥
हरिहर जैसे अमरावती । माजि अर्ची अमरपति । रामकृष्ण तयाचि रीति । अक्रूरें भक्तीं पूजिले ॥१८५॥
अर्घ्य पाद्य आचमन । विध्युक्त चरणक्षालन । दिधलें दिव्य मंगलस्नान । उद्धवासमान बलकृष्णां ॥८६॥
मृदुल सूक्ष्म धौत वस्त्रें । स्वकरीं परिमार्जूनि गात्रें । रक्त नीळ पीतांबरें । अत्यादरें नेसविलीं ॥८७॥
उत्तरीयेंवरी प्रावरणा । सूक्ष्म सुरंग ऊर्णावसना । तिलक रेखूनि अर्पी सुमना । धूप दीप यथोचित ॥८८॥
नैवेद्य पंचामृत षड्रस । संधितें व्यंजनें रुचिर सुरस । क्षीर्रादि घृतान्त गोरस । तक्र विशेष संस्कारीं ॥८९॥
जेंवि चित्रान्त पर्जन्य । तेंवि तक्रान्त भोजन । उष्णोदकें आंचवण । करपद क्षाळूनि पूसिले ॥१९०॥
मलयजमिश्रित कस्तूरी । करोद्वर्तना मर्दिली करीं । दुग्धपाचित भग्न सुपारी । सनागरीं मुखवास ॥९१॥
पुढती आणूनि भद्रपीठा । करवूनि आसनप्रतिष्ठा । उद्धवबळरामवैकुंठा । सप्रेमनिष्ठा बैसविले ॥९१॥

पादावनेजनीरापो धारयञ्शिरसा नृपा । अर्हणेनांबरैर्दिंव्यैर्गंधस्रग्मूषणोत्तमैः ॥१५॥

कुरुनरपाळका परीक्षिति । मग अक्रूर सप्रेमभक्ती । पादावनेजन उभय हस्तीं । धरिलें निगुती निजमौळीं ॥९३॥
सदनीं प्रोक्षूनि सर्वत्र । सर्वां अर्पूनि विभागमात्र । शेष प्राशूनि माजीं नेत्र । धन्य स्वगात्र मानिलें ॥९४॥
मुकुट कुंदलें मेखळा । ग्रैवेयकादि मुक्तामाळा । वलयांगदें दशांगुळा । दिव्य मुद्रिका अर्पिल्या ॥१९५॥
कटिप्रदेशीं दिव्य रशना । प्रकटीं क्षुद्रघंतिकास्वना । चरणीं अर्पूनि पदभूषणा । लोटांगणा घातलें ॥९६॥
मग अर्पूनि दिव्य वसनें । चर्चिलीं सौरभ्य सुचंदनें । माळा घालूनि वाहिलीं सुमनें । सुगंध चूर्णें उधळिलीं ॥९७॥
इत्यादि दिव्यराजोपचारीं । उद्धव बलराम श्रीहरि । अक्रूरें पूजूनि सभागारीं । काय करी तें ऐका ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP