अध्याय ५४ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


इति श्रीमद्गुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां यादवविजयो नामैकादशप्रसंगः ॥११॥
वक्ष्यमाणश्लोकोत्तरार्धमासच्छायाव्याख्यानेन संबंध उच्यते ॥

निजमंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊनि गेला गोपाळ । ऐकोनि विकळ पडियेला ॥३१५॥
पांडुरवर्ण झाले डोळे । मुखांहूनि लाळ गळे । सेवक धरिती आंगबळें । गात्रें विकळ पडियेलीं ॥१६॥
भीमकी अप्राप्तीचे बाण । हृदयीं लागले दारुण । घायेंविण घेतला प्रान । अकाळमरण वोढवलें ॥१७॥
वोखतवाणें दिसे मुख । नाडी तुटल्या निःशेख । कृष्णधाकाची धुकधुक । हृदयामाजी उरलीसे ॥१८॥
महाशब्द उठिला मंडपद्वारीं । मिळालिया नगरनारी । शिशुपाळमाता रुदन करी । कपाळ करीं पीटित ॥१९॥
सिद्धि न पवेचि गे शोभन । वायां गेलें वरमायपण । अंबिका क्षोभली जाण । वराचे प्राण वांचोत कां ॥३२०॥
थोर वोढवलें दुःख । न देखोंचि सुनमुख । बुडालें सोहळियाचें सुख । हरिखीं विख कालवलें ॥२१॥
अगे हा रुक्मिया दुर्बुद्धि । न पाहेचि लग्नशुद्धि । मृत्युपंचकाचे संधीं । लग्नसिद्धि मांडिली ॥२२॥
कृष्ण ज्योतिषी गे निका । वश्य नव्हे पांचां पंचकां । काळ साधिला नेटका । समय देखा तो जाणे ॥२३॥
तेणेंचि साधिली गे वेळ । साधूनि नेली भीमकबाळ । आमुचेंचि करंटें कपाळ । आतां शिशुपाळ वांची कां ॥२४॥
विलाप करूनि अनेक । सिंपिलें शिशुपाळाचें मुख । वारा घालिती एक । झाला नावेक सावध ॥३२५॥
उठोनि बैसला एकसरें । श्वास घातला पैंसें थोरें । दुःख हृदयींचें नावरे । नेत्रद्वारें जळ वाहे ॥२६॥
शिशुपाळासि आलें रुदन । नधरत चाललें स्फुंदन । धीरें आवरोनिया जाण । शहाणपण मांडिलें ॥२७॥
नोवरी नेली रे सुंदर । पडिलें समर्थासि वैर । कृष्ण नेटका जुंझार । आणि बलभद्र महाबळी ॥२८॥
हेचि दोघे नावरती । येर यादव ते किती । ऐसें विचारूनि चित्तीं । काय विरांप्रति बोलिला ॥२९॥
सैन्यपाळणा पाळणा । घावो घातला निशाणा । रथ संजोगोनि आणा । रणाङ्गणा जावों वेगीं ॥३३०॥
सन्नद्ध करूनियां दळ । रथीं चढला शिशुपाळ । नगरद्वारा आला भूपाळ । पुढें घायाळ भेटले ॥३१॥
घायीं तुटले सबळ । रुधिरें झाले बंबाळ । बाण भेदले कपाल । वीर विकळ पडताती ॥३२॥
वीरीं घेतले घायावारें । म्हणती पळा रे पळा रे । मारिले जाल भलभद्रवीरें । साह्य दुसरें कोण्ही नाहीं ॥३३॥
एकीं घेतला भेदरा । कांपताती थरथरा । मारूं नको गा बलभद्रवीरा । दास डिंगरा आम्ही तुझे ॥३४॥
एकाचें तुटले पैं हात । एकीं विचकिले पैं दांत । एक कण्हत कुंथत । तवा देत पैं एक ॥२३५॥
एक घायीं जर्जर बहुतें । एकाचे मोडिले जी हाते । एकाचीं लोंबताती आंतें । घाईं कोंतें अडकलीं ॥३६॥
एक रडत पडत । एक अत्यंत चरफडीत । एक पाणी जी मागत । खुणा हातें दाऊनी ॥३७॥
मस्तक फुटोनि वाहे रुधिर । एकाचें अर्ध तुटलें शिर । एकाचे घाईं बुडाले तीर । तेणें वीर तळमळती ॥३८॥
भले गौरविले वर्‍हाडी । थितीं गेलीं लेणीं लुगडीं । एके नांगवीं उघडीं । मेलीं मढीं वोढिती ॥३९॥
घायाळ घालूनि वोढणी । धनुष्यदंडाच्या आडणी । उचलोनि दोघीं जणीं । वीरश्रेणी आणिल्या ॥३४०॥
एक मार्गीं झाले पुरे । एकाचे आनिले खटारे । वीर आटिलेजी वीरें । बलभद्रें मारिलें ॥४१॥
राजे खोंचले मुकुटाचे । अत्यंत प्राण विकळ त्यांचे । सेवक उचलिती पायांचे । ढाले मोरकुंचे वीजिती ॥४२॥
देखोनि दचकला शिशुपाळ । धाकिन्नलें त्याचें दळ । राजे मारिले सबळ । प्रबळ बळ यादवांचें ॥४३॥
युद्धीं झाले पराड्मुख । राजे भंगले अनेक । आले जरासंधादिक । मोडले कटक घेवोनी ॥४४॥
दुःखें मुख काळवंडलें । दोन्ही ओंठ जी वाळले । लाजा न बोलवे बोलें । तें देखिलें जरासंधें ॥३४५॥
भेटला शिशुपाळ सम्मुख । अत्यंत कोमाइलें मुख । बुडालें सोहळियाचें सुख । हृदयीं दुःख भीमकीचें ॥४६॥

शिशुपालं समभ्येत्य हृतदारमिवा‌ऽऽतुरम् ।
नष्टत्विषं गतोत्साहं सुष्यद्ग्वदनमब्रुवन् ॥११॥
भो भोः पुरुषशार्दूल दौर्मनस्यमिदं त्यज ।
न प्रियाप्रिययो राजन्निष्ठा देहिषु दॄश्यते ॥१२॥
यथा दारुमयी योषिन्नृत्यते कुहकेच्छया ।
एवमीश्वरतंत्रोऽयमीहते सुखदुःखयोः ॥१३॥

मग म्हणे पुरुषपंचानना । व्यर्थ खेद कां करिसी मना । प्राप्ताप्राप्तांची गणना । अधीन कोण्हा पैं नाहीं ॥४७॥
संसार म्हणिजे खांबसूत्र । चौर्‍यांसीं लक्ष पुतळ्या विचित्र । त्यांचा सूत्रधारी ईश्वर । त्याचे इच्छे नाचती ॥४८॥
आपण राहोनियां दुरी । हालवी प्राचीनाची दोरी । भूतें तंव तदनुसारी । निजव्यापारीं वर्तती ॥४९॥
तेथ सुख दुःख निजतंत्र । मांडोनि ठेविलें स्वतंत्र । ते ते तिये गती पात्र । अहोरात्र होताती ॥३५०॥
येथ यश आलियाचें सुख । अथवा अपयशाचें दुःख । अहंपणें मानिती मूर्ख । कर्ता देख तो नव्हे ॥५१॥
येथें कर्ता जो मी म्हणे । तो पडे सुखदुःखांचे नागवणे । जन्ममरणांसि आवंतणें । दिधलें तेणें सर्वथा ॥५२॥
अहंकर्तेपणाचा भावो । तोचि सुखदुःखासि ठावो । जन्ममरणांचा निर्वाहो । येणेंचि पाहो होतसे ॥५३॥
यालागिं अहंकर्तव्यता । तुवां न धरावी सर्वथा । भीमकीअप्राप्तीची व्यथा । दुर्गमता येवों नेदीं ॥५४॥

शौरेः सप्तदशाहं वै संयुगानि पराजिथ ।
त्रयोविंशतिभिः सैन्यैर्जिग्य एकमहं परम ॥१४॥

म्यांचि पाहें पां केवळ । तेवीस अक्षौहिणी दळ । युध केलें सत्रा वेळ । एक वेळ जय आला ॥३५५॥

तथाऽप्यहं न शोचामि न प्रहृष्यामि कर्हिचित् ।
कालेन दैवयुक्तेन जानन्विद्रावितं जगत् ॥१५॥

भंग झालियाचें दुःख । अथवा यश आलियाचें सुख । न मनूनियां मी देख । यथासुख वर्त्ततसें ॥५६॥
एवं सुख दुःख जें आहे । तें तंव काळाधीन पाहें । तो काळ ज्यासि साह्य होय । तोचि लाहे यशातें ॥५७॥
काळ होऊनि दैवयुक्त । सकळ जगातें विद्रावित । लाभ विषय हानि मृत्य । त्रिजगीं प्रपत तद्योगें ॥५८॥
आजि तुज युद्धासि जातां । यश नये गा सर्वथा । काळ साह्य कृष्णनाथा । झाला तत्वता निजबळें ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP