अध्याय ५४ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


क्षत्रियाणामयं धर्मः प्रजापतिविनिर्मितः ।
भ्राताऽपि भ्रातरं हन्याद्येन घोरतरस्ततः ॥४१॥

सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । कठिन कर्म क्षत्रियासी । उल्लंघन न करवें आम्हांसी । निजधर्मासि सर्वथा ॥९८॥
विधात्यानें नेमिला नेम । क्षत्रियांचा घोर धर्म । दारुण मांडल्या संग्राम । आप पर न म्हणावा ॥९९॥
समराङ्गणीं सन्नद्ध बंधु । सम्मुख आलिया पिता बंधु । रणाङ्गणीं करितां वधु । नाहीं बाधु क्षत्रियां ॥५००॥
ऐसें जाण वो रुक्मिणी । खेद न धरावा वो मनीं । सवेंचि म्हणे शार्ङ्गपाणि । विरुद्ध करणी त्वां केली ॥१॥

राज्यस्य मूमेर्वित्तस्य स्त्रियो मानस्य तेजसः ।
मानिनोऽन्यस्य वा हेतोः श्रीमदांधाः क्षिपंति हि ॥४२॥

राज्यलोभें श्रीमदान्ध । त्यासि उपजे काम क्रोध । तेणें लोभें होऊनि मंद । थोर विरुद्ध आचरती ॥२॥
आपुलें राज्य जातां । कां पुढिलांचें राज्य येतां । तेणें स्वार्थ क्रोध चित्ता । उठी सर्वथा अनिवार ॥३॥
ना तरी वृत्तिभूमिउच्छेद । होतां सज्ञान होय मंद । तोहि करूं लागे विरोध । निंदा द्वेष निकुराचा ॥४॥
अथवा धनागमनागमनीं । प्रबळ लोभ उपजे मनीं । वेदविक्रय कीजे ब्राह्मणीं । धनालागूनि कलियुगीं ॥५०५॥
धनालागीं वेदाध्ययन । धनालागीं पुरानपठण । धनालागीं जी व्याकरण । शास्त्रपठण वेदान्त ॥६॥
धनालागीं घेती दन । धनालागीं होती सज्ञान । धनालागीं नीचसेवन । उपसर्पण हीनाचें ॥७॥
धनालागीं देह विकिती । धनालागीं दाम्भिक भक्ति । धनकामना कर्में करिती । नानावृत्ति धनेच्छा ॥८॥
त्या धनासि होता अवरोध । तेव्हां सज्ञानासि उपजे क्रोध । विवेकियाही होय मंद । प्रबळ विरोध धनवंता ॥९॥
आणिक एक थोर कारण । जेव्हां होय दारहरण । न विचारिती आत्ममरण । वेंचिती प्राण स्त्रीलोभें ॥५१०॥
अथवा होतां मानहानि । विवेकी होय अभिमानी । निंदा द्वेष उपजे मनीं । मानालागोनि सर्वथा ॥११॥
कां आंगींचेनि शौर्यतेजें । येरयेरां द्वेषिती राजे । वीर्यशौर्याचेनि माजें । अतिउन्मत्त होऊनि ॥१२॥
अणुमात्र स्वार्थाचा अवरोध । होतां समस्तांसि उपजे क्रोध । स्वार्थालागोनि विरोध । पडे संबंध द्वेषाचा ॥१३॥
इतुकीं कारणें सर्वथा । तुज तंव नाहींत कृष्णनाथा । रुक्मियाची विरूपता । कवण्या अर्था त्वां केली ॥१४॥
तूं परिपूर्ण आत्माराम । तुज सर्वथा नाहीं काम । तरी कां केलें निंद्यकर्म । क्षात्रधर्म हा नोहे ॥५१५॥

तवेयं विषमा बुद्धिः सर्वभूतेषु दुर्हृदाम् ।
यन्मन्यसे सदाऽभद्रं सुहृदां भद्रमज्ञवत् ॥४३॥

सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । पावोनियां कृष्णचरणांसी । विषमबुद्धि ते तुवां ऐसी । निजमानसीं न धरावी ॥१६॥
सुह्रुद दुर्हृद उदासीन । ऐसें त्रिविध न करीं मन । सर्वभूतीं सदा संपूर्ण । पाहें श्रीकृष्ण सर्वथा ॥१७॥
अभद्र व्हावें शिशुपाळासी । कल्याण रिक्मिया वांछिसी । हेच विषमता तुजपासीं । कृष्णसुखासि प्रतिबद्ध ॥१८॥
म्हणसी शिशुपाळ कृष्णद्वेषी । सर्वथा अभद्र पाहिजे त्यासी । मा तेचि दशा रुक्मियासे । तोही द्वेषी कृष्णातें ॥१९॥
हा सर्वभूतात्मा हृषीकेषी । ऐसिया द्वेषिती श्रीकृष्णासी । तैसिया दुष्टा सोयरियासी । भद्र वांछिसी तें अभद्र ॥५२०॥
ऐसिया दुष्टा सर्वभूतद्वेषियासी । दण्ड मुण्डन तें कल्याण त्यासी । तें तूं अकल्याण मानिसी । चतुर न होसी निजबोधें ॥२१॥
कृष्ण ज्ञाननिधि चतुर । विनोदरूपें केला उपकार । रुक्मियाचा नरक घोर । यमप्रहार चुकविला ॥२२॥
कृष्णयुद्धीं रुक्मियासी । दण्ड न करितां खाण्डमिशी । तरी तो पावता रौरवासी । अधःपातासि पैं जातां ॥२३॥
कृष्ण सोयरिया स्नेहाळ । वपनरूपें अतिकृपाळ । केला निजकरें निर्मळ । फेडिला विटाळ द्वेषाचा ॥२४॥
यालागीं कृष्णें केलें भद्र । तें तूं कां मानितेसी अभद्र । कृष्ण ज्ञानियांचा नरेंद्र । वेदा पार न कळेचि ॥५२५॥

आत्ममोहो नृणामेष कल्प्यते देवमायया ।
सुहृद्दुर्हृदुदासीन इति देहात्ममानिनाम् ॥४४॥

दुर्घट मोह पैं प्राणियां । केला असे कृष्णमाया । ब्रह्मादिकां न येचि आया । देवमाया देहबुद्धि ॥२६॥
तें देहबुद्धीचें लक्षण । सुहृद दुहृद उदासीन । त्रिविध त्रिगुणी करी मन । देहाभिमान उपजवी ॥२७॥
नश्वर देह तंव जाणती । देह निमाल्या मृत्यु मानिती । देहसंबंधिया अतिप्रीति । येरां द्वेषिती कां उपेक्षा ॥२८॥

एक एव परो ह्यात्मा सर्वेषामपि देहिनाम् ।
नानेव गृह्यते मूढैर्यथा ज्योतिर्यथा नभः ॥४५॥

नाना अळंकारीं कनक । तैसा सर्वभूतीं आत्मा एक । हेंचि नेणोनियां मूर्ख । एकासी अनेक म्हणताती ॥२९॥
अनेक घटीं अनेक । प्रतिबिंबीं भासे अर्क । तैसा विश्वात्मा विश्वव्यापक । दिसे अनेक देहयोगें ॥५३०॥
आकाश एकलें एक निर्मळ । मठीं चौकोनी घटीं वर्तुळ । विकारयोगें भासे प्रबळ । नव्हे केवळ निजवाच्य ॥३१॥
तैसा परमात्मा श्रीहरी । नानाआकारविकारीं । एक अनेकत्वातें धरी । देहसंचारी देहयोगें ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP