अध्याय ५४ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततो रथादवप्लुत्य खङ्गपाणिर्जिघांसया ।
कृष्णमभ्यद्रवत्क्रुद्धः पतंग इव पावकम् ॥३१॥

कृष्ण मारीन मी निर्धारीं । वोडण खांड घेतलें करीं । पतंग जैसा दीपावरी । तैशापरी धांविन्नला ॥४९॥
रुक्मिया महावीर नेटक । वोडणखर्गांचा साधक । सरक थरक दावी चवक । अतिनिःशंक निजगड ॥४५०॥
वोडण धडकूनि आदळित । खर्ग तुळोनि तळपत । उल्लाळे देऊनि उसळत । हात मिरवित खर्गाचा ॥५१॥
कृष्ण जे जे बाण सोडी । खर्गधारें तितुके तोडी । चार्‍ही मारावया घोडीं । रथाबुडीं रिघाला ॥५२॥
दारुक सारथि निजगडा । रथें करूं पाहे रगडा । कृष्णें लाविला कुर्‍हाडा । रथापुढें येवों नेदी ॥५३॥
बाण आदळला सत्राणें । आडवें वोडण धरिलें तेणें । वोडण भेदूनियां बाणें । शिरींचा मुकुट पाडिला ॥५४॥
कोप आला रुक्मियासी । वेगें धाविन्नला मोकळा केशीं । हात घांसोनि भूमीसी । हातवशी खर्गातें ॥४५५॥

तस्य चापततः खङ्गं तिलशश्चर्मवेषुभिः ।
छित्वासिमाददे तिग्मं रुक्मिणं हन्तुमुद्यतः ॥३२॥

कृष्णासि म्हणे देख देख । घायें छेदीन मस्तक । विकट देवोनियां हाक । वेगें सम्मुख लोटला ॥५६॥
कृष्णें विंधिला तिखट बाण । तिलप्राय केलें वोडण । खङ्ग छेदूनियां जाण । अणुप्रमाण तें केलें ॥५७॥
बाण वर्षला घनदाट । रुक्मिया भुलविला आलीवाट । रथ लोटूनि घडघडाट । मौर्व्या कंठ बांधिला ॥५८॥

दृष्ट्वा भ्रातृवधोद्योगं रुक्मिणी भयविह्वला ।
पतित्वा पादयोर्भर्तुरुवाच करुणं सती ॥३३॥

धनुष्य घालूनियां गळां । वोढूनि आणिला घायातळां । कांपिन्नली भीमकबाळा । घनसावळा देखतसे ॥५९॥
दाटूनि आणिलें जी क्रोधा । झळफळित काढिली गदा । त्याच्या करीन मी शिरश्र्छेदा । येरी गदगदां कांपत ॥४६०॥
कांहीं न बोलवे सर्वथा । चरणांवरी ठेविला माथा । कृपाळुवा श्रीकृष्णनाथा । यासि सर्वथा न मारावें ॥६१॥
कृष्ण म्हणे परती सर । येणें निंदा केली थोर । याचें छेदीन मी वक्त्र । म्हणोनि शस्त्र उचलिलें ॥६२॥
तिखट देखोनि शस्त्रधार । चरण न सोडि सुंदर । बोलोनि मृदु मंजुळ उत्तर । गदाधर विनविला ॥६३॥

योगेश्वराप्रमेयात्मन्देवदेव जगत्पते ।
हन्तुं नार्हसि कल्याण भ्रातरं मे महाभुज ॥३४॥

सुरासुरां तूं दुर्धर । योगियांमाजि योगेश्वर । विश्वनियंता ईश्वर । वेदा पार न कळेचि ॥६४॥
ऐसियासि तुज युद्धीं । आकळूं पाहे हा अहंबुद्धि । पिता अवगणूनि तूंतें निंदी । होय अपराधी सर्वथा ॥४६५॥
हा अभिमानिया मारिसी रणीं । माया प्राण सांडील तत्क्षणीं । होईल लौकिक टेहणी । माहेर येथूनि तुटेल ॥६६॥
जेथूनि उठी निंदा क्रोध । त्या लिंगदेहाचा करीं छेद । मारूं नको ज्येष्ठ बंधु । लोकविरुद्ध न करावें ॥६७॥
धरिलिया कृष्णकांस । द्यावा दोंपक्षीं उह्लास । नांदवावें सावकाश । येथें तेथें समत्वें ॥६८॥

श्रीशुक उवाच - तया परित्रासविकंपितांगया शुचावशुप्यन्मुखरुद्धकंठया ।
कातर्यविस्रंसितहैममालया गृहीतपादः करुणो न्यवर्तत ॥३५॥

नधरत चालिलें स्फुंदन । नेत्रीं लोटलें जीवन । झालें कृष्णचरणक्षालन । जगज्जीवन हांसिन्नला ॥६९॥
देखोनि बोलाची चातुरी । उचलिले दोहीं करीं । आलिंगिली प्रीति थोरी । बंधु न मारीं सर्वथा ॥४७०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP