अध्याय ५४ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अधुनाऽपि वयं सर्वे वीर यूथपयूथपाः ।
पराजिताः फल्गुतंत्रैर्यदुभिः कृष्णपालितैः ॥१६॥
आतांचि पाहें पां प्रत्यक्ष । आम्ही सर्वही यूथप मुख्य । कृष्णाश्रयें यादवीं देख । पराभविलों अल्पबळें ॥३६०॥
काळ साह्य झालेपणीं । प्राप्त झाली त्या रुक्मिणी । मजसगट राजे रणीं । तृणप्राय जिंकिले ॥६१॥
तो जंव काळ साह्य नाहीं । तंववरी युद्ध करिसील काई । वीर सोडिजतील घायीं । योद्धे ठायीं पडतील ॥६२॥
जंववरी अनुकूळ नाहीं काळ । तंववरी काय करिसील बळ । सिद्धि न पवेचि सळ । श्रम केवळ पावसी ॥६३॥
रिपवो जिग्युरधुना काल आत्मानुसारिणि ।
तदा वयं विजेप्यामो यदा दैवं प्रदक्षिणम् ॥१७॥
यालागीं धरीं धीर शहाणपणीं । जंव होय काळसाह्याची मांडणी । मग यादव जिंतूं अर्धक्षणीं । केंवि रणीं राहतील ॥६४॥
एवं प्रबोधितो मित्रैश्चैद्योऽगात्सानुगः पुरम् ।
हतशेषाः पुनस्तेऽपि ययुः स्वं स्वं पुरं नृपाः ॥१८॥
यापरी राजमित्र जरासंध । करीत शिशुपाळासि प्रबोध । मग सांडूनियां युद्धक्रोध । निजनगरासि निघाला ॥३६५॥
शिशुपालासि युद्धाआंत । जिवेंचि घेता कृष्णनाथ । आजिचा चुकविला अनर्थ । हित मानित दमघोष ॥६६॥
तो म्हणे जरासंधासी । उतराई न हों उपकारासी । तुवां वांचविलें शिशुपालासी । पुत्रदानासि तूं दाता ॥६७॥
ऐसें मानूनियां सुख । मग परतला दमघोष । घेऊनि सोयरे सेवक । एकेंएक परतले ॥६८॥
युद्धीं यादवीं मारितां । राजे उरले जे जुंझतां । तिहीं मानूनियां हिता । मग सर्वथा निघाले ॥६९॥
घायीं जर्जर नेणों किती । नागवले सैन्यसंपत्ती । आपुलालिया नगराप्रति । वेगें भूपति निघाले ॥३७०॥
रुक्मी तु राक्षसोद्वाहं कृष्णद्विडसहन्स्वसुः ।
पृष्ठतोऽन्वगमत्कृष्णमक्षौहिण्या वृतो बली ॥१९॥
मग परतला शिशुपाळ । विमुख राजे चालिले सकळ । रुक्मिया कोपला प्रबळ । सन्नद्ध दळ तेणें केलें ॥७१॥
तो रुक्मिया नृपनंदन । कृष्णद्वेष्टा स्वसाहरण । राक्षसविधि न साहोन । धांवे क्षोभोन पाठीसीं ॥७२॥
एक अक्षौहिणी दळ । योद्धे वीर महाप्रबळ । सक्रोध जैसा प्रलयकाळ । बोले शिशुपाळप्रमुखांतें ॥७३॥
धूर रणीं होय विमुख । तेव्हांचि त्याचें काळें मुख । कवण वांचलियाचें सुख । घेवोनि विख मरावें ॥७४॥
रुक्म्यमर्षीं सुसंरब्धः श्रृण्वतां सर्वभूभुजाम् ।
प्रतिजज्ञे महाबाहुर्दंशितः सशरासनः ॥२०॥
जरासंधा शिशुपाला देखतां । सकळ राजेहि ऐकतां । उभा करूनि भीमकीपिता । थोर गर्जता तो झाला ॥३७५॥
तुम्हीं सांडिलें रे पुरुषार्था । मी तों नेवों नेदीं राजदुहिता । रणीं जिंकोनि कृष्णनाथा । भीमकी तत्वता आणीन ॥७६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP