श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
स्वपादप्रणता अभयदपाणी । अक्षयविभवद मंगळवाणी । कृपापार्ङ्गीं कल्यणखाणी । तीर्थश्रेणी चरणाब्जीं ॥१॥
ऐसिया स्वामी श्रीगोविन्दा । अनन्यभावें सेवितां वरदा । लाधलिया वरी दशमस्कंधा । शाल्ववधान्त वाखाणिलें ॥२॥
अध्याय विवरिले सप्तसप्तति । सप्तम एकादशिनी पुरती । येथें संपली यावरी श्रोतीं । श्रवणीं आस्था वाढविली ॥३॥
परंतु ये व्याख्यानीं घिंवसा । प्रज्ञा नावलंबी च सहसा । जे येथ विपश्चितां विद्वांसां । चंचुप्रवेशा अनवसर ॥४॥
पृथुकाख्यानीं द्विजाचें प्रेम । कीं कुरुक्षत्रयात्रा प्रियसंगम । वसुदेवाचा मख उत्तम । कथितां दुर्गम मति मानी ॥५॥
विदेहा श्रुतदेवाचिया भावें । द्विधा होऊनि वासुदेवें । मिथिले माजि वसतां ठावें । न कीजे लाघवें प्रेमाच्या ॥६॥
असो सर्व दुर्गमा मुकुटीं । वेदस्तुति केंवि मर्‍हाठीं । वदवेल ऐसी शंका पोटीं । वाटे गोठी अघटित हे ॥७॥
यास्तव हांव ये व्याख्यानीं । प्रवर्तावया नुपजे मनीं । देशिकेन्द्राचे पदचिन्तनीं । सज्जनां ग्लानि निवेदिली ॥८॥
हें ऐकूनि सज्जनवृंद । म्हणती वारंवार काय हा छंद । यथार्थ वरद श्रीगोविन्द । तरी तो विशद वदवील ॥९॥
वरद असतां सद्गुरुवर्य । मंद ही वंद्य मानिती आर्य । तेथ संदेहाचें कार्य । नसतां अधैर्य कां कथिजे ॥१०॥
परिसाचिया वरकलावरी । हेम लोह एकाचि परी । तेंवि गुरुवरदें मंदवैखरी । समता करी सुरगुरुसीं ॥११॥
किंवा गंगेचिये मिळणीं । यमुना अथवा वोहळवणी । न्यून पूर्ण पवित्र पाणी । निवडून कोण्ही दावूं शके ॥१२॥
एवं तुझिया वदनें वक्ता । समर्थ जाणोनि त्रैलोक्यभर्ता । शंका सांडूनि भगवच्चरिता । पदपदार्था वाखाणीं ॥१३॥
न्यून पूर्ण तोचि जाणे । आपण पायिकी मात्र करणें । समर्थाचीं पादत्राणें । जाणोनि नमनें जन करिती ॥१४॥
श्रीप्रभूनें अंगीकारिलें । तें त्रैलोकीं सरतें जालें । भाषाव्याख्यान न वचे केलें । हें कें बोलें वदों शकिजे ॥१५॥
ऐसा सज्जनीं निष्ठुरां वचनीं । गुरुकृपेचा महिमा कथुनी । दुर्बोंध अष्टम एकादशिनी । तद्व्याख्यानीं प्रवर्तविलें ॥१६॥
ऐसा सज्जनीं नाभीकार । देतां दयार्णव जाला सधर । म्हणतो तुम्हांसि भारअभार । परिसा सादर या उपरी ॥१७॥
येथूनि अष्टम एकादशिनी । ऐका तियेची अनुक्रमणी । विदूरथ वक्रदंत हे दोन्ही । अष्टसप्ततिमाजि वधिले ॥१८॥
नवसप्ततितमामाजि हळी । बल्वलवधें मुनिमंडळी । तोषोनि सूतहत्या क्षाळी । तीर्थें सकळीं करूनियां ॥१९॥
पुढें अध्यायीं अशीतितमीं । श्रीदामगुरुबंधुसंगमें । गुरुगृहनिवासकथासंभ्रमीं । परमानंदीं हरि तुष्टे ॥२०॥
एकाशीतितमीं त्याचे । आदरें पोहे भक्षूनि साचे । नगर निर्मूनि सुवर्णाचें । अर्पीं देवा दुर्लभ जें ॥२१॥
कुरुक्षेत्रीं द्व्यषीतितमीं । सूर्यग्रहणयात्रोद्यमीं । वृष्णि देखोनि नृपसत्तमीं । कृष्णमहिमा वर्णियला ॥२२॥
त्र्यशीतितमीं कृष्णवनिता । आपुलाल्या स्वयंवरकथा । द्रौपदीनें प्रश्न करितां । वदत्या झाल्या सविस्तर ॥२३॥
चतुरुत्तराशीतितमीं । मुनीश्वराच्या संगमीं । वसुदेवाच्या मुखोद्यमीं । बंधुवर्गा प्रस्थापी ॥२४॥
पंचोत्तराशीतितमामाजी । मातृप्रार्थना ऐकूनि सहजीं । संकर्षणाधोक्षजीं । मृतात्मजासि आणियलें ॥२५॥
षडशीतितमीं सुभद्राहरण । अर्जुन केलें तें कथी पूर्ण । कृष्णें मिथिले प्रति जाऊन । विदेह ब्राह्मण तोषविले ॥२६॥
नारदनारायणसंवाद । सप्ताशीतितमीं कैवल्यप्रद । वेदस्तुतीचा अर्थ विशद । विद्वद्वृंदप्रिय कथिला ॥२७॥
अष्टाशीतितमाध्यायीं । विष्णुभक्ति कैवल्यदायी । अपरदेवताभजनें पाहीं । विभवनवायी लाहिजती ॥२८॥
एवंमा दिअध्यायवरी । अष्टम एकादशिनी पुरी । वाखाणिजेल सविस्तरी । सज्जननिकरीं श्रवण कीजे ॥२९॥
पूर्णकथानुसंधान । शाल्व मारूनि विजयी कृष्ण । नगरीं प्रवेशतां द्रुर्जन । वक्रदंत उठावला ॥३०॥
शुक म्हणे गा परीक्षिती । पूर्वाध्यायाच्या समाप्तीं । वक्रदंत महादुर्मती । आला पुढती तें ऐका ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP