श्रीशुक उवाच - शिशुपालस्य शाल्वस्य पौण्ड्रकस्यापि दुर्मतिः । परलोकगतानां च कुर्वन्पारोक्ष्यसौहृदम् ॥१॥

व्हावया स्वसख्यांचें उत्तीर्ण । वक्रदंत कोधें करून । जैसा धांवें प्रळयपवन । तैसा जवीन पातला ॥३२॥
पौण्ड्रक शिशुपाळ शाल्व नृपति । त्यांचिया कैपक्षें दुर्मति । ते पावलिया कर्मगति । उत्तीर्णार्थी स्वयें आला ॥३३॥
जितां सुत्दृद्भाव आचरती । मेलिया वार्ताही न करिती । तैसी वक्रदंताची प्रीती । नोहे निश्चितीं कुरुवर्या ॥३४॥
मेलिया मागें सख्याचें उशिणें । घ्यावें किंवा जावें प्राणें । ऐसा निश्चय करूनि मनें । केलें धांवणें कृष्णावरी ॥३५॥
मित्रा माघारिया उत्तीर्ण । व्हावया लागीं प्रज्वळून । शाल्व वधूनि जनार्दन । जातां येऊन पडखळिला ॥३६॥
कैसा आला कोणे रीती । ऐसें पुससी जरी भूपती । ऐक ते ही तुज प्रती । समरस्थिती निरूपितों ॥३७॥

एकः पदातिः संक्रुद्धो गदापाणिः प्रकंपयन् । पद्भ्यामिमां महाराज महासत्त्वो व्यदृश्यत ॥२॥

पदाति एकाकी एकट । सक्रोधें धांवे महाधीट । गदा पडताळूनि सुभट । बळें उद्भट उठावला ॥३८॥
राहो जैसा खवळे ग्रहणीं । निर्भय तैसा गदापाणी । रथीं लक्षूनि कृष्ण तरणी । समराङ्गणीं संघटला ॥३९॥
पादप्रहारें कांपवी धरा । निकट संघटला अवचित समरा । कृष्ण पाहतां झाला पुरा । पिशाच दुसरा अवगमिला ॥४०॥
कृष्णें तयातें देखोनियां । क्षात्रधर्मानुसार राया । प्रवर्तला युद्धकार्या । तें कुरुवर्या अवधारीं ॥४१॥

तं तथायांतमालोक्य गदामादाय सत्वरः । अवप्लुत्य रथात्कृष्णः सिन्धुं वेलेन प्रत्यधात् ॥३॥

प्रळयसिन्धूचा जैसा लोट । तैसा वक्रदंत सुभट । आला त्यातें श्रीवैकुण्ठ । देखूनि नीट उठावला ॥४२॥
कौमोदकी गदा घेऊन । उडी टाकिली रथावरून । वेळा सांवरी सिन्धुजीवन । तेंवि धांवून पदखळिला ॥४३॥
पादचारी वक्रदंत । रथीं असतां कमलाकान्त । क्षात्रघर्मास हें अनुचित । म्हणोनि पदाति स्वयें जाला ॥४४॥
किंवा आपुला द्वारपाळ । विघडला होता बहुकाळ । त्यासि देखूनि उतावीळ । जाला गोपाळ किम्बहुना ॥४५॥
वीरश्रीरसाची सपर्या । विरोधभजनें करावया । भक्त सादर झाला तया । प्रसन्न व्हावया प्रवर्तला ॥४६॥
असो ऐसा गदाधर । सवेग सांडूनियां रहंवर । वक्रदंता समरीं स्थिर । झाला सत्वर जगज्जनिता ॥४७॥
वक्रदंतें तिये काळीं । देखोनि सावेश वनमाळी । पतंग जैसा दीपा कवळी । तैसा जवळी संघटला ॥४८॥

गदामुद्यम्य कारूषो मुकुन्दं प्राह दुर्मदः । दिष्ट्या दिष्ट्या भवानद्य मम दृष्टिपथं गतः ॥४॥

वृद्धशर्मा करुषनाथ । या लागीं कारुष नामसंकेत । तयाचा पुत्र वक्रदंत । असे विख्यात नृपचक्रीं ॥४९॥
मुकुन्दातें तो देखोनि । दृष्टीं प्रतापें गदा कवळूनि मुष्टीं । परम दुर्मद वीर जेठी । म्हणे रे भेटी आजि तुझी ॥५०॥
बहुत दिवस शोधितां सृष्टी । तूं आजि दैवें माझिया दृष्टी । गोचर झालासि येथूनि कष्टी । पडल्या मिठी न सुटसी ॥५१॥
ऐसा वक्रदंत विषादें । वचनें बोलिला जियें विरुद्धें । वाग्देवी तीं परमार्थबोधें । सुस्निग्धवादें प्रतिपादी ॥५२॥
दूर केला जाणें मद । या लागीं वक्रदंत दुर्मद । गदा उचलोनि बोले शब्द । तोही विशद अवधारा ॥५३॥
मुकुन्दातें म्हणे वेगें । दृष्टिगोचर जालासि भाग्यें । आजि कल्याण भद्र अवघें । दैवयोगें मज घडलें ॥५४॥
मुकुम् म्हणिजे मोक्षानंद । तद्दायक तूं श्रीमुकुन्द । जन्मत्रयादि आजि विशद । भाग्यें उपलब्ध झालासी ॥५५॥
जन्मत्रयीं अन्वेषण । करितां आजि हें तव दर्शन । झालें कल्याण कल्याण । परमादरें मी मानीं ॥५६॥
माझा स्वामी तूं श्रीधर । मज आजि झालासि दृग्गोचर । दिष्ट्या म्हणिजे भद्र भद्र । वीप्सोद्गार हर्षोक्ति ॥५७॥
ब्रह्मशापाच्या विमोक्षणा । आलों पात्र मी मुक्तिदाना । ऐसें जाणोनि करुणापूर्णा । मम कामना सफळ करीं ॥५८॥
ये श्लोकीं हा परमार्थ कथिला । वाग्देवीनें वाखाणिला । या वरी कारुष श्लोक पुढिला । बोलता झाला तो ऐका ॥५९॥

त्व मातुलेयो नः कृष्ण मित्रध्रुड्मां जिघांससि । अतस्त्वां गदया मन्द हनिष्ये वज्रकल्पया ॥५॥

भो भो कृष्ण तूं आमुचा । सुहृद्बंधु होसी साचा । जिवलगमित्र जवळिकेचा । कथितों वाचा ते ऐका ॥६०॥
तव जनकाची जे भगिनी । श्रुतदेवी ते माजी जननी । मातुलेय तूं मज लागूनी । सोयरेपणीं अतिनिकट ॥६१॥
परंतु केवळ तूं मित्रघ्न । न मना हें मम निष्ठुर वचन । याचें पूर्वापर व्याख्यान । हृदयीं जाणून क्षमा करीं ॥६२॥
श्रुतश्रवा वसुदेवस्वसा । पूर्वीं दीधली जे दमघोषा । तत्सुत शिशुपाळ मजचि ऐसा । सुहृद्बंधु मित्रत्वें ॥६३॥
त्याचें तुंवा केलें हनन । या लागीं केवळ तूं मित्रघ्न । आतां मज ही वधिसी पूर्ण । तें हें कारण अवधारीं ॥६४॥
मी आणि शिशुपाळ दोघे जण । प्रभूचे द्वास्थ पार्षदगण । सनकादिकांच्या शापें करून । दैत्य होऊन जन्मलों ॥६५॥
पुढती तयांच्या उच्छापवचनीं । तुझेनि हस्तें चक्रपाणी । मृत्यु लाहूनि वैकुण्ठभुवनीं । द्वास्थ होऊनि तुज सेवूं ॥६६॥
यास्तव आमुचा तुझेनि हस्तें । मृत्यु दुर्निवार हें जाणोनि निरुतें । या लागिं मी प्रार्थितों तूतें । हें भगवंतें मज द्यावें ॥६७॥
हें अमंदसंबोधन । जें तूं सर्वत्र आनंदघन । यास्तव करिसी सर्व सहन । न स्पर्शोन विषमता ॥६८॥
तव सोढव्यें सोढव्यशक्ती । धरित्री अंगीं विराजे पुरती । तो तूं केवळ सोढव्यमूर्ती । माझी विनती अवधारीं ॥६९॥
तुझेनि हस्तें मृत्यु माझा । अचुक विहिला गरुडध्वजा । तथापि क्षात्रधर्म वोजा । आधीं घे पूजा हे माझी ॥७०॥
वज्रप्राय परम कठोर । साहें माझा गदाप्रहार । गदाप्रहारें तव संहार । आजि साचार करीन मी ॥७१॥
अरे मंदा न विचारितां । तुंवा केलें मित्रघाता । गदाप्रहार वोपूनि माथां । तुज मी आतां संहरितों ॥७२॥
ऐसीं क्षात्रधर्माचीं वचनें । परमार्थबोधें वाग्देवीनें । वाखाणिलीं तीं श्रोतीं श्रवणें । शब्दशास्त्रज्ञीं परिसावीं ॥७३॥
क्षात्रधर्मास्तव शब्द कठोर । तैसाचि माझा गदाप्रहार । क्षमा करूनि एकवार । साहें साचार निजमाथां ॥७४॥
म्हणसी वज्रतुल्य तुझी गदा । घायें मस्तक करील चेंदा । तरी अवज्रकल्पा श्रीगोविन्दा । समान कुमुदा अर्पीन ॥७५॥
म्हणसी पंकजप्राय प्रहार । केलिया तुझा पुरुषार्थ थोर । केंवि होईल तरी साचार । ऐक उत्तर जगदीशा ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP