अध्याय ७८ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तर्ह्यानृण्यमुपैम्यज्ञ मित्राणां मित्रवत्सलः । बन्धुरूपमरिं हत्वा व्याधिं देहचरं यथा ॥६॥
नाहीं ज्ञानी जयाहून । त्यासि संबोधन हें अज्ञ । तस्मात संबोधी हे सर्वज्ञ । ऐसें सुज्ञ समजती ॥७७॥
भो सर्वज्ञा स्वामी तूतें । देहसंबंधें बंधुत्वनातें । ब्रह्मशापें शत्रुत्व तेथें । गोचर होतें तनुभावी ॥७८॥
एवं शापानुबंध शत्रुता । तूतें मानूनि कृत्रिमता । आजि तयेच्या करूनि घाता । उत्तीर्णता लाहीन ॥७९॥
माझे मित्र शाल्व शिशुपाळ । मी तद्विषयीं परम स्नेहाळ । मज मानीं तूं मित्रवत्सल । होईन केवळ उत्तीर्ण त्यां ॥८०॥
बंधसंबंधरूप तूं अरि । क्षात्रधर्में तुज मारूनि समरीम । मित्रऋणाचिये प्रतिकारीं । वरीन यापरी आनृण्य ॥८१॥
विशेषें करूनि आधीयमान । म्हणिजे मानसीं अतिचिन्तन । व्याधि ऐसें त्या अभिधान । शब्दशास्त्रज्ञप्रतिपाद्य ॥८२॥
आणि जो देही अन्तर्यामी । देहचाळक चर्याधर्मीं । तो तूं ईश्वर चित्सुखधामीं । सर्वीं सर्वग पूर्णत्वें ॥८३॥
ऐसिया सर्वगा तुजलागून । क्षात्रधर्में तुज आराधून । हत्वापर्याय ज्ञात्वा जाण । होईन उत्तीर्ण मित्रपणा ॥८४॥
एवं हृदयस्था जाणोनि तूतें । उत्तीर्ण होईन मित्रपणातें । जैसा पुत्र पितृऋणातें । ब्रह्मनिष्ठत्वें परिहारी ॥८५॥
क्षात्रधर्में वरी कठोर । वास्तवबोधें तारतम्यपर । वाक्यें बोलिला दंतवक्र । तिहीं श्रीधर मानवला ॥८६॥
एवं रुक्षैस्तुदन्वाक्यैः कृष्णं तोत्रैरिव द्विपम् । गदयाताडयन्मूर्ध्नि सिंहवद्व्यनदच्च सः ॥७॥
अहंता त्वंता द्वैतभेद । एवंरूपा तुझा वध । करूनि ऐक्यें आनृण्यबोध । लाहीन स्वतःसिद्ध समरसता ॥८७॥
ऐसीं रुक्षें कठोर वचनें । ताडिलीं वक्रदंतें दारुणें । चाबुकें कुञ्जरा जेंवि ताडणें । तेणें मानें कृष्णातें ॥८८॥
वक्रदंत इत्यादिवचनीं । कृष्णाप्रति समराङ्गणीं । बोलिला गदा ताडूनि मूर्ध्निं । गर्जे वदनीं सिंहरवें ॥८९॥
प्रार्थनागर्भित क्रूरोत्तरा । क्षमूनि त्याचिया गदाप्रहारा । न निवारूनि वोडवी शिरा । तें कुरुवरा अवधारीं ॥९०॥
गदयाऽभिहतोऽप्याजौ न चचाल यदूद्वहः । कृष्णोऽपि तमहन्गुर्व्या कोमोदक्या स्तनांतरे ॥८॥
गदाघातें समराङ्गणीं । वक्रदंतें ताडितां मूर्ध्नि । अणुमात्र चंचळ चक्रपाणी । यादवाग्रणी न जाला ॥९१॥
पुष्प पडतां मेरुशिखरीं । नोहे चंचळ तो ज्या परी । तैसा कृष्ण गदाप्रहारीं । नादरी समरीं चाञ्चल्य ॥९२॥
कारुषाचा गदाप्रहार । साहूनि पुष्पासम श्रीधर । स्वगदा कौमोदकी कठोर । करी तत्प्रहार रिपुहृदयीं ॥९३॥
दोहीं स्तनांचा मध्यभाग । केवळ हृदय जें मर्माङ्ग । तिये ठायीं अतिसवेग । करीं श्रीरंग गदाप्रहार ॥९४॥
श्रीकृष्णाच्या गदाप्रहारीं । वक्रदंताची कैसी परी । जाली ते तूं सविस्तरीं । श्रवण करीं कुरुवर्या ॥९५॥
गदानिर्भिन्नहृदय उद्वमन्रुधिरं मुखात् । प्रसार्य केशबाह्वङ्घ्रीन्धरण्यां न्यपतद्व्यसुः ॥९॥
गदाप्रहारें हृदय चूर्ण । तेणें भडभडां मुखांतून । रुधिर वभी आणि नयन । फिरवी विवर्ण भयंकर ॥९६॥
पसरला भूतळीं उताणा । केश मोकळे विखुरले जाणा । कर पद खोडी सोडितां प्राणा । चाळी दशना विवशत्वें ॥९७॥
घुरघुरघोषें कंठ वाजे । प्राण सांडिले ऐसिये ओजे । प्रेत पहुडलें समरशेजे । गगन गाजे हरिविजयें ॥९८॥
ततः सूक्ष्मतरः ज्योतिः कृष्णमाविशद्द्भुतम् । पश्यतां सर्वभूतानां यथा चैद्यवधे नृप ॥१०॥
कारुष ऐसा समराङ्गणीं । प्राण सोडूनि पडिला धरणी । त्रितीयजन्मीं विरोधभजनीं । वैकुण्ठभुवनीं वसावया ॥९९॥
त्या नंतरें तयाची ज्योती । सूक्ष्म चिन्मात्रें देहीं होती । ते ते समयीं व्योमपथीं । जाली रिघती देदीप्य ॥१००॥
भूतभौतिकां पाहत असतां । कृष्णीं पावली समरसता । शिशुपालवधीं कृष्णनाथा । जैशी चित्प्रभा समरसली ॥१॥
शिशुपाल वक्रदंत दोघे जण । वैकुण्ठवासी पार्षदगण । विरोधभजनें शापमोक्षण । जन्मत्रयान्तीं पावले ॥२॥
यावरी वक्रदंताचा अनुज । विदूरथनामा कारुषराज । भ्रातृमरणाची मानूनि लाज । प्रतापपुञ्च उठावला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP