अध्याय ८८ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


निवृत्तेष्वश्वमेधेषु राजा युष्मत्पितामहः । शृण्वन्भगवतो धर्मानपृच्छदिदमच्युतम् ॥६॥

तो कैं केला म्हणसी प्रश्न । तरी तें ऐकें सावधान । अश्वमेधसंपादन । यथाविधान जें केलें ॥२७५॥
गोत्रजहननादि महादोष । तन्निवृत्त्यर्थ अश्वमेधास । त्रिवार संपादिलें सावकाश । पुण्यविशेष इच्छूनी ॥७६॥
ते अश्वमेध झाले असतां । तव पितामह कुरुभूभर्ता । राजा युधिष्ठिर तत्वता । अवघी चिन्ता निरसूनी ॥७७॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । भगवान्देवकीनंदन । भक्तानुकंपी सर्वज्ञ । जो श्रीकृष्ण परमात्मा ॥७८॥
तया पासूनियां निजधर्म । श्रेयस्कर जो मोक्षद परम । ऐकत होत्साता सप्रेम । पूर्णकाम स्वस्थमनें ॥७९॥
सहजीं सहज प्रंसंगोपात्त । त्या अच्युताप्रति निश्चित । पुसता झाला आर्तभूत । हेंचि निश्चित कळावया ॥२८०॥
ज्याचें त्यास जें रहस्य कळे । तें सहवासिया अर्ध विवळे । इतरां संदिग्ध कळे न कळें । तर्कबळें कांहींसें ॥८१॥
तो स्वयेंचि विद्यमान । असतां पुसतां त्यालागून । स्पष्ट तन्मुखें वर्तमान । कळे संपूर्ण निःसंशय ॥८२॥
यास्तव भगवन्ताचें शीळ । कीं भक्तां वैभव नेदी केवळ । हें त्याचें त्यासीच निर्मळ । पुसिलें प्रेमळ धर्मराजें ॥८३॥
मग तो परिसोनियां प्रश्न । प्रभु समर्थ श्रीभगवान । त्या श्रवणेच्छु कारणें आपण । बोलता सकरुण जाहला ॥८४॥

स आह भगवांस्तस्मै प्रीतः शुश्रूषवे प्रभुः । नृणां निःश्रेयसार्थाय योऽवतीर्णो यदोः कुले ॥७॥

तो तूं कैसा म्हणसी हरि । जे तापत्रयें संतप्त भारी । मनुष्यदेही मोक्षाधिकारी । प्रपंचदोरीं अतिबद्ध ॥२८५॥
तयां नरांसी निःष्रेयसार्थ । द्यावया कारणें विभु समर्थ । यदूच्या कुळीं कृपावंत । कमलाकान्त अवतरला ॥८६॥
निःश्रेयस म्हणिजे कल्याण । कल्याणार्थ तो मोक्ष जाण । मर्त्य जनांसी व्हावा पूर्ण । यास्तव अवतीर्ण भक्तपति ॥८७॥
ऐसा करुणानिधि श्रीकृष्ण । ऐकूनि पाण्डुपुत्राचा प्रश्न । परम प्रीतिवंत होवून । बोलिला वचन कृपेनें ॥८८॥
आधींच आवडता निजसखा । आणि आवडती गोष्टी पुसे कां । तेथें स्नेहभरें वक्तृत्वसुखा । कवण लेखा पूर्ण करी ॥८९॥
धर्म केवळ प्रेममूर्ति । सत्यवादी पवित्रकीर्ति । वास्तव गोष्टी तया प्रति । कथी श्रीपति तें ऐक ॥२९०॥

श्रीभगवानुवाच - यस्याहमनुह्णागृमि हरिष्ये तद्धनं शनैः । ततोऽधनं त्यजन्त्यस्य स्वजना दुःखदुःखितम् ॥८॥

म्हणे जया मी शेषशायी । पूर्णकृपेनें अनुग्रहीं । तया सुख द्यावया अक्षयी । उपाधि सर्व ही तोडीतसें ॥९१॥
सर्व उपाधींचें मूळ । राया धनचि असे केवळ । जेणें विषयभोग पुष्कळ । संग बाष्कळ जोडे पैं ॥९२॥
तया विषयसेवनासाठीं । पडे परमार्थाची तुटी । मग जन्ममरणें वोखटीं । कल्पकोटी होताती ॥९३॥
यास्तव तयांचें संपूर्ण धन । हळु हळु करितसें हरण । केवळ निर्धन झालिया जाण । विषयसेवन घडेना ॥९४॥
धान्यचि नसतां पक्कान्न । कीं वृक्ष नसतां फळपुष्पग्रहण । कीं सुवर्ण नसतां अळंकरण । होय कोठून संप्राप्त ॥२९५॥
तेंवि धनचि नाहीं हातीं । तरी काय विषय सेवील माती । म्हणोनि धनाची अहहृती । करितां खंती बहु करी ॥९६॥
देहादिइन्द्रियां अहंपणें । केवळ आत्मत्वें कवळिलें तेणें । त्यातें सौख्य विषयसेवनें । तें न घडतां प्राणें तळमळी ॥९७॥
जैसा जीवनेंवीण मासा । कीं प्राणरोधें जीवदशा । तैसा तळमळी आपैसा । दरिद्रें क्लेशा बहु पावे ॥९८॥
जनीं अभिमानें संसार । महत्त्वें केला निरंतर । तैसा न घडतां चिन्तातुर । धरूनि फार जनलज्जा ॥९९॥
एवं दुःखें करूनि दुःखित । धनरहित शोकाभिभूत । ऐसी दशा झालिया प्राप्त । तैं कैंचा स्वार्थ सुहृदांचा ॥३००॥
स्वार्था निमित्त झाले वल्लभ । ते स्वार्थ न घेतां पावती क्षोभ । मग मोडूनियां स्नेहकोंभ । स्वजन निर्लोभ त्या त्यजिती ॥१॥
जेंवि सरोवरीं असे जळ । तों वरी जळाशयीं केवळ । सारसादि सेवनशीळ । त्यजिती सकळ जळ नसतां ॥२॥
कीं फळपुष्पादिपर्णयुक्त । जों वरी असे द्रुम निश्चित । पक्षी राहती तों पर्यंत । टाकिती निभ्रान्त खांकरां ॥३॥
कीं कमळीं असे सुगंध । तों वरीच स्नेहें विविध । गुंजारवती ते षट्पद । त्यजिती आमोद गेलिया ॥४॥
तेंवि स्वार्था साठीं सेविती । ते स्वजन अवघे त्यागिती । ऐसी निर्धन झालिया गति । होय निश्चिती तयांची ॥३०५॥
येथ श्रोते म्हणती जरी । भगवत्प्रसादाधिकारी । त्यांसी भगवान् निर्धन करी । कें सभाग्य तरी ध्रुवादिक ॥६॥
याचें ऐसें असे प्रत्युत्तर । कीं हरिभक्तीचे दोन्ही प्रकार । एक बहुतां जन्मीं भक्तिपर । कृपापात्र हरीचें ॥७॥
दुसरें विद्यमानजन्मीं । विषयसेवन परमकामी । परी कांहीं पूर्वसुकृतोद्गमीं । कमलास्वामी अनुग्रही त्यां ॥८॥
यां माजी पूर्वानुग्रहीत हरीचे । प्रारब्धानुवशें जन्मती साचे । उत्कृष्ट भजनचि त्यांतें रुचे । कोड विषयांचें न करिती ॥९॥
त्यांसी जन्मानुजन्मीं सद्विवेक । भगवत्कृपेनें अधिकाधिक । तैसेंचि पुण्य ही निष्कळंक । होय अनेक सहजस्थिति ॥३१०॥
तया सुकृताचें ऊर्जित फळ । पूर्ववासनाबीज समळ । जाणूनियां लक्ष्मीलील । देत पुष्कळ संपत्ति ॥११॥
संपत्तियोगें नाना विलास । न इच्छितां पावती विशेष । परि स्वसुखीं निमग्न बहुवस । म्हणूनि निःशेष अनासक्त ॥१२॥
संप्राप्तविषयीं न रमती । निरंतर भवत्स्वरूप चिन्तिती । ऐसियां बाधक न होय संपत्ती । जेंवि सूर्याप्रती मृगजळ ॥१३॥
मग प्रारब्धक्षयान्तीं निजधाम । पुनरावृत्तिवर्जित परम । अभेदबोधें ते निस्सीम । पावती निष्काम पूर्णत्वें ॥१४॥
यासी संमत भगवद्गीते - । माजी किम्बहुना जन्मनामंते । ज्ञानवान्मांप्रपद्यते । जाणोनि सर्व हें वासुदेव ॥३१५॥
ऐसे चरमदशेचे भक्त । पूर्वसाधनसिद्ध निश्चित । दुर्लभची विरळा गत । विकाररहित सत्पुरुषा ॥१६॥
ते श्रीमंत अथवा अकीञ्चन । त्यां न होय कधीं विषयभान । वृष्टि अनावृष्टि समान । समुद्रा पूर्ण स्वतोयें ॥१७॥
ऐसिया भक्तकोटी माजी । प्रह्लादध्रुवादिकांची राजी । संपत्ती वेंचूनि धर्मकाजीं । सप्रेम आजि एकनिष्ठ ॥१८॥
आतां द्वितीय जे कां पूर्वसुकृति । किंचित भगवंतीं अनुसरतीं । स्वरूपसमाधानेंवीण चित्तीं । न सुटे आसक्ति विषयांची ॥१९॥
विद्यमान जे जे विषय । भोगितां मानसतृप्ति न होय । म्हणूनि करिती बहु व्यवसाय । क्लेशमय मग होती ॥३२०॥
परंतु कांहीं भक्तिक्लेश । पूर्वाजित अंतरास । म्हणोनि अधिकारी कृपेस । करी परेशानुग्रह त्यां ॥२१॥
ज्या विषयांसाठीं भोगिती कष्ट । ज्यांस्तव विषयवासना बळिष्ठ । ते विषयासहित संग दुष्ट । तोडी परमेष्ट श्रीहरि ॥२२॥
जैसा रोगें झाला क्षीण । तो स्वेच्छा भक्षितां अन्न । अधिकचि क्लेश पावोन । पुष्ट अरुग्ण नव्हे कदा ॥२३॥
तयाप्रति सद्वैद्य दैवें । दिव्य मात्रा देऊं पावे । तैं पथ्योपचार आघवे । तोडी स्वभावें तयाचे ॥२४॥
तेंवि उपतिष्ठावया स्वबोध । श्रीपरमात्मा परम बुध । विषयसंग तोडी विविध । हें वर्म शुद्ध येथींचें ॥३२५॥
असो शंकानिवृत्तीसाठीं । हें कथिलें विस्तार परिपाटीं । यावरी श्रीकृष्ण पाण्डवा गोठी । कथी वाक्पुटीं तें ऐका ॥२६॥
म्हणे अगा हे पाण्डुनंदना । जया करूं इच्छीं अनुग्रहणा । तयाच्या करीं धनापहरणा । विषयवासना तुटावया ॥२७॥
तो हळु हळु झालिया निर्धन । तया सांडूं पाहती स्वजन । तेणें दुःखित होत्साता विषयाचरण । इच्छूनी प्रयत्न पुनः करी ॥२८॥
ते प्रयत्न झालिया व्यर्थ । त्रासूनि राहतां श्रमित । तंव स्वजन अवदेती बहुत । करूनि लज्जित निखंदिती ॥२९॥
म्हणती वडील कैसे नांदले । तिहीं जें नांव रूप केलें । तें अभिमानें राखिलें । पाहिजे वहिलें आपण ॥३३०॥
पुरुषें न टाकावा उद्योग । उद्यां देव फेडील पांग । डोहाचे ठायीं डोह सांग । पडे अव्यंग मागुता ॥३१॥
इत्यादि भ्रामकां वचनीं । सज्ज होय तो धनार्जनीं । परि ममानुग्रहास्तव निदानीं । उद्योगकरणी मोघ घडे ॥३२॥
एवं स्वजनेच्छा करी यत्न । ते निष्फळ झालिया संपूर्ण । त्या टाकिती स्वार्थी स्वजन । मग तो निर्धन होय दुःखी ॥३३॥
ऐशियावरी अनुकरण । कैसें करीं मी कृपाघन । तें अवधारीं सावधान । कुरुकुळमंडनधुरंधरा ॥३४॥

स यदा वितथोद्योगो निर्विण्णः स्याद्धनेहथाः । मत्परैः कृतमैत्रस्य करिष्ये मदनुग्रहम् ॥९॥

तो त्या प्रकारींचा निर्द्धन । स्वजनत्यक्त दुःखितमन । उद्योग केले धनेच्छेकरून । झाले फळहीन ते ज्याचे ॥३३५॥
जेव्हां निःशेष होय उदासीन । संसारीं विश्रान्ति न पवून । प्रापंचिकासीं संभाषण । न करी लाजून तत्संगा ॥३६॥
प्रपंचीं धनवंतांसीं प्रीती । धरूनियां बहुमान करिती । हिणाविती कुशब्दीं ॥३७॥
सुरंग सुगंधित सुमन । लालस सेविती तोषून । सुगंधरहिता उपेक्षून । टाकिती ते जन जया परी ॥३८॥
ऐसें जाळोनिया मानसी । सहसा न इच्छी तत्संगासी । मग निरभिमानी विवेकराशी । जे सर्वांसीं समान ॥३९॥
जयांसी राव अथवा रंक । शत्रु मित्र निन्दक स्तवक । आप्त कीं परकीय अनेक । सम सम्यक् मद्रूप ॥३४०॥
जे आशे पासूनि सुटले । जे संसारसुखासी विटले । जे स्वरूपसुखा विनटले । जयासि आटलें भववारि ॥४१॥
जे क्षमाजळ अकूपार । कीं ज्ञानतेजें सहस्रकर । संतापहारक सुधाकर । प्रबोधामृतसिञ्जनें ॥४२॥
जे करिती सप्रेम भजन । सर्वदा स्वधर्मपरायण । विवेकवैराग्यसंपन्न । सगुणनिर्गुणाभिवेत्ते ॥४३॥
ऐसे जे मत्पर केवळ । साधुजन दीनदयाळ । त्रितापतप्तां सुशीतल । करिती प्राञ्जळ कृपेनें ॥४४॥
मग तिहींसी करी मैत्री । निरंतर तत्संग भावें धरी । त्यां हितकर मानी निर्धारीं । प्राण ज्या परी देहातें ॥३४५॥
आधींच संसारीं हा त्रस्त । आणि संत स्वभावें विरक्त । बोधिती प्रपंच नाशवंत । नित्यानित्यविवेकें ॥४६॥
साधु सर्वदा स्वयें तृप्त । भक्तिज्ञानवैराग्ययुक्त । प्रतिपादिती शुद्ध वेदान्त । निरसूनि द्वैत मायिक ॥४७॥
ज्म्व जंव साधुमुखें श्रवण । करी तंव तंव सुखावे पूर्ण । केवळ अनन्यभावें शरण । होऊनी तनुमन समपीं ॥४८॥
मग जीवें भावें आवडी । मद्भक्तांची धरी निरवडी । श्रवणमननाची निज गोडी । लागली प्रौढी म्हणोनियां ॥४९॥
ऐसा मद्भक्तांसी कृतमैत्र । विरक्त शुद्धात्मा पवित्र । ममानुग्रहासी सत्पात्र । करीं मदनुग्रह मी त्यासी ॥३५०॥
तोचि अनुग्रह कैसा । म्हणसी जरी तूं नरेशा । तरी वसवूनि श्रवणदेशा । ऐकें रहस्या एकाग्र ॥५१॥

तद्ब्रह्म परमं सूक्ष्मं चिन्मात्रं सदनन्तकम् । अतो मां सुदुराराध्यं हित्वान्यान्भजते जनः ॥१०॥

जें सर्वीं असोनि नाढळे । गगनोपमेसी नाकळे । जेथ मनाचें लक्ष पांगुळे । निगम बरले जें कथितां ॥५२॥
ऐसें परमसूक्ष्म सनातन । ज्ञानाज्ञानातीत ज्ञान । तेंचि ज्याचें स्वरूप पूर्ण । वदिजे चिन्मात्र म्हणोन ॥५३॥
सत्तामात्रें प्रकृति जड । चेष्टक साक्षित्वें अखंड । प्रकृतिविलयीं सुरवाड । न मोडे वाड जयाचा ॥५४॥
कालत्रयीं अबाधित । विकाररहित शाश्वत । पुर्णत्वें ज्या नाहीं अंत । अतयव निश्चित अनंत ॥३५५॥
एवं परमसूक्ष्म चिन्मात्र । सदनंतक जें स्वतंत्र । तें ब्रह्म नित्य निर्विकार । करी मी पवित्र तयासी ॥५६॥
या प्रकारें गा कुरुभूषति । ममनुग्रहाची ख्याती । आधि उपाधि तोडूनि पुरती । मद्भक्तसंगती तदनंतर ॥५७॥
सत्संग झालिया नंतर । मी अंतरात्मा परात्पर । अभेद आत्मावबोधसार । करूनि निरंतर चित्सुख दे ॥५८॥
असज्जडदुःखी देहात्मभाव । निरसूनि सच्चिदानंद वास्तव । तयासी करीं मी वासुदेव । जयासी स्वयमेव अनुग्रहीं ॥५९॥
ऐसें ममानुग्रहफळ । प्रारंभीं क्लेशमय केवळ । परिणामीं सुखाचेंचि निखळ । आनंद बहळ अक्षय ॥३६०॥
जैसें दिव्यौषध सेवितां । आरंभीं त्रासद तत्वता । निदानीं करी निरामयता । तैं वोहत समस्तां क्लेशांसी ॥६१॥
हें नेणती मूर्ख मतिमंद । म्हणोनि मातें टाकूनि प्रसिद्ध । अन्य देवांतें भजती विशद । कीं मी दुराराध्य यापरी ॥६२॥
अतितरदुःखें करूनि जाण । होय माझें आराधन । चिरकाळ साहतां क्लेश गहन । मत्प्राप्ति पूर्ण तैं जोडे ॥६३॥
ऐसा मी चिरकाळें सुप्रसन्न । होवोनि निर्विपयसुख दे पूर्ण । यास्तव सुदुराराध्य जाणोन । मज टाकून अनंजन भजती ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP