अध्याय ८८ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एवं भगवता पृष्टो वचसाऽमृतवर्षिणा । गतक्लमोऽब्रवीत्तस्मै यथा पूर्वमनुष्ठितम् ॥३१॥

शुक म्हणे गा राजेन्द्रा । कुरुकुळगगनचंद्रा । एवं भगवंतें सुधाधारा । वर्षक गिरा उदार ॥४२॥
तये मृदुळवाचे करून । दैत्यासि पुसिलें संपूर्ण । तेणें पावला समाधान । झाला निस्सीम सुखमय ॥४३॥
धांवतां धांवतां परम क्लेश । पावूनि गळाला जो निःशेष । होती कोरड पडली मुखास । अतिशयें चित्तास विक्षेप ॥४४॥
तो अवघाचि दुस्तर श्रम । हरला झाला गतक्लम । कीं वर्षलें अमृतवृष्टिसम । हरिमुखव्योम वाड्मेघें ॥५४५॥
जैसा मुमुर्षु सुधापानें । विश्रान्ति पावे साधवपणें । तेंवि सुखावला भगवद्वचनें । स्नेहाळगुणें आथिला ॥४६॥
सग त्या भगवन्ता कारणें वहिलें । जैसें पूर्वानुष्ठित आपुलें । सविस्तर साद्यंत वीतलें । दैत्यें कथिलें निष्कपट ॥४७॥
कीं नारदोपदेशें करून । केदारीं घोर अनुष्ठान । केलिया प्रसन पंचवदन । होतां वरदान पावलों ॥४८॥
तया वराच्या परीक्षार्थ । तन्मस्तकीं ठेवितां हस्त । पलयमान शिव निश्चित । म्हणूनि अनुगत मी झालों ॥४९॥
ऐसें वृकासुराचें वृत्त । सर्वज्ञ असतांही भगवन्त । तन्मुखें पुसूनियां समस्त । प्रतारणार्थ पसूनियां समस्त । प्रतारणार्थ परिसिलें ॥५५०॥
मग करावया बुद्धिभ्रंश । मोहक धारक बटुवरवेश । तयासि बोले जें रमेश । तेंही अशेष ऐका हो ॥५१॥

श्रीभगवानुवाच - एवं चेत्तर्हि तद्वाक्यं न वयं श्रद्धधीमहि । यो दक्षशापात्पैशाच्यं प्राप्तः प्रेतपिशाचराट् ॥३२॥

म्हणे अगा ये मित्रा जाण । जरी ऐसें आहे वर्तमान । तरी तयाच्या वाक्यातें अभिज्ञ । आम्ही पूर्ण न विश्वासूं ॥५२॥
तुज शंभूनें दिधला वर । तें तयाचें वाक्य समग्र । मज सत्य न मने कृतनिर्धार । न धईं अणुमात्र विश्वास ॥५३॥
तूं म्हणसी काय म्हणोन । वाक्य शिवाचें सत्यत्वहीन । यदर्थीं काय असें प्रमाण । तरी तें कारण परियेसीं ॥५४॥
पूर्वीं विधीचे सभेमाजी । संपूर्ण मुनि सुर यज्ञकाजीं । असतां दक्षही तये माजी । येतां सहजीं संप्रार्थित ॥५५५॥
तैं त्या येणें अभ्युत्थान । न करूनि केला असन्मान । तेव्हां तेणें प्रक्षोभून । दीधला जाण दुःशाप ॥५६॥
तया शापें हा पिशाचत्व । पावला प्रेतपिशाचराव । तीं ही लक्षणें प्रसिद्ध सर्व । ऐक स्वयमेव विस्तारें ॥५७॥
प्रेतपिशाचें स्थळ । श्मशान कुश्चळ अमंगळ । तेथें राहे हा केवळ । प्राशिलें हळाहळ उल्बण ॥५८॥
मदनासारिखा सुन्दर पुरुष । रतिसुखदायक जो सर्वांस । तो येणें जाळिला निःशेष । विवेकलेश या नाहीं ॥५९॥
प्रेतदाहित भस्म आंगीं । चर्चीं भूषी महाभोगी । गजचर्म वेढी तेंही त्यागीं । म्हणवी योगी नग्नपणें ॥५६०॥
सकळदेवीं महादेव । आणि नरकपालें स्वयमेव । भिक्षा करणें कोण गौरव । कीं असे अर्ह ईशत्व ॥६१॥
श्वाना पिशाचांसीं क्रीडा । करितां न धरी किंचित व्रीडा । इत्यादि लक्षणीं जाण सुघडा । प्रसिद्ध मृडा पैशाच्य ॥६२॥
तुज सारिखा विचक्षण । विचारज्ञ बुद्धिनिपुर्ण । विश्वासलासी काय म्हणोन । व्यर्थ भुलून श्रमलासी ॥६३॥
हा प्रेतां - पिशाचांचा राजा । राजधानी या स्मशान वोजा । प्रेतानुगांचे विलाप बुझा । वाद्य वोजा यया पुढें ॥६४॥
चिता तेंचि सिंहासन । अग्रीं तिष्ठे ढोर वहन । अनुचर भूतप्रेतगण । प्रजाजन श्वानादि ॥५६५॥
म्हणूनि ऐसिया पिशाचें वचन । सत्य कें मानिजे आपण । आम्हासी विश्वास पूर्ण । न वटे लक्षण जाणोनी ॥६६॥
जैसें विकसित गमनपुष्प । किंवा वंध्यातनुज कुलदीपक । हे श्रवणेंचि ऐकावे वाग्जल्प । परी विश्वास अल्प न धरावा ॥६७॥

यदि वस्तत्र विश्रम्भो दानवेन्द्र जगद्गुरौ । तर्ह्यङ्गाशु स्वशिरसि हस्तं न्यस्य प्रतीयताम् ॥३३॥

ऐसें असतां दानवेन्द्रा । जरी तुम्हांसी विश्वास खरा । याच्या ठायीं वाटेल पुरा । कीं हा म्हातारा जगद्गुरु ॥६८॥
देव तिर्यक् आणि मानव । या त्रिजगामाजि श्रेष्ठ भव । यास्तव जगद्गुरु अर्हार्ह । महादेव यथार्थ ॥६९॥
परंतु पैशाच्ययोगें झाला चळ । तेणें सावध नसे हा केवळ । यास्तव बोले तितुकें वोफळ । ऐसें प्राञ्जळ मज विदित ॥५७०॥
तथापि तयाच्या ठायीं तुज । श्रेष्ठ म्हणूनि विश्वास सहज । तरी इतुक्या श्रमाचें काय काज । मज वाटे चोज धीमंता ॥७१॥
तूं आपुलिया शिरावरी । हस्त ठेवूनि प्रतीति बरी । सत्वर पाहें बा निर्जरारी । होसील अंतरीं निःसंशय ॥७२॥

यद्यसत्यं वचः शंभोः कथंचिद्दानवर्षभ । तर्दनं जह्यसद्वाचं न यद्वक्तानृतं पुनः ॥३४॥

जरी कथचित् दानवश्रेष्ठा । असत्य शंभूचें वाक्य सुभटा । कळलिया मग सांडूनि निष्ठा । न ठेवीं प्रतिष्ठा ययाची ॥७३॥
तेव्हां भीड टाकूनि स्पष्ट । यातें मारीं तूं यथेष्ठ । बरें काढीं गा उपष्ट । कीं टाकेल खोड या वरी हा ॥७४॥
ज्यास्तव हा लटिका पूर्ण । पुन्हा न करील अनृत भाषण । तरी हितकारण मद्वाक्याचरण । करीं सद्गुणविभूषणा ॥५७५॥
शुक म्हणे गा परीक्षितिराया । दुर्घट भगवंताची माया । तेही येईल तव प्रत्यया । पुढील अन्वय परिसूनी ॥७६॥

इत्थं भगवतश्चित्रैर्वचोभिः स सुपेशलैः । भिन्नधीर्विस्मृतः शीर्ष्णि स्वहस्तं कुमतिर्व्याधात् ॥३५॥

ऐशीं मोहक विभ्रमाकारें । भगवंताचीं वचनें चित्रें । भ्रमकारकें तीं मृदुतरें । ऐकिलीं असुरें सुपेशलें ॥७७॥
सुपेशलें म्हणिजे रमणीयें । परमरसाळें अमृतमयें । तिहीं करूनि दैत्यहृदयें । झालीं विशेष मोहित ॥७८॥
मी हस्त ठेविल्या स्वमस्तकीं । मृत्यु पावेन नेमस्त कीं । हे विसरला स्मृति नेटकी । झाला शेखीं भ्रंशितधी ॥७९॥
तया बुद्धिभ्रंशें कुमति । स्वामिद्रोही भ्रमितस्मृति । स्वशिरीं स्वहस्तातें त्वरितीं । झाला निश्चिती ठेविता ॥५८०॥
तंव स्वार्जितवराचें फळ । वृकासुर पावला तत्काळ । तेंचि श्रोते परिसोत विवळ । अवधान पुष्कळ देऊने ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP