अध्याय ८८ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यत्र नारायणः साक्षान्न्यासिनां परमा गतिः । शांतानां न्यस्तदण्डानां यतो नावर्तते गतः ॥२६॥
जेथ साक्षान्नारायण । स्वयें सच्चिदानंद पूर्ण । विरक्तांचें परमकारण । प्राप्तिस्थान वास्तव ॥९८॥
जे सबाह्य त्यागें झाले न्यासी । जिंहीं गृहधनदारस्वजनराशी । उपेक्षूनि अंतरासी । केलें विशेषीं अविकार ॥९९॥
अंतरींच्या विषयवासना । कामक्रोधादि वैरिगणा । उपसंहरूनि निजज्ञाना । उपनिषत्खुणा अवगमिलें ॥५००॥
निःशेशः गेलिया देहाभिमान । कदापि न स्फुरे विषयभान । केवळ झाले चैतन्यघन । बाणली पूर्ण निजशक्ति ॥१॥
सृष्टि अवघी आत्मरूप । जाणोनि झाले निर्विकल्प । पूर्ण बोधीं भेदानुकल्प । बुडाळा अनल्प स्फुरणेंसीं ॥२॥
म्हणोनि झाले न्यस्तदंड । म्हणिजे हिंसारहित रूढ । कायवाड्मानसी कवाड । लाधले प्रौढ अहिंसा ॥३॥
मनें कोणाचें अकल्याण । न चिन्तिती अपघातन । जिह्ने विसर्जिलें दुर्भाषण । छेदन ताडन सांडिलें ॥४॥
ऐसे संन्यासी शान्तरूप । न्यस्तदंड जे निर्विकल्प । तयांची परमगति त्रिजगप । व्भु निष्कंप अद्वय ॥५०५॥
स्वर्गादिब्रह्मलोकान्त गति । सुकृता नुसार विविधा होती । परि पुण्यक्षयीं पुनरावृत्ति । न चुके कल्पान्तीं साधकां ॥६॥
तेंविं नोहे कीं वैकुण्ठ । जेथ जो पावला अंतर्निष्ठ । तो पुन्हा न चलेचि वाट । अनिष्ट पुनरावृत्तीची ॥७॥
केवळ अभेदचि तन्मय । सायुज्य लाहे अद्वय । जन्ममरणातीत होय । बोलिजे यास्तव परमगति ॥८॥
ऐसा परमात्भा नारायण । त्रिकाळज्ञ ऐश्वर्यपूर्ण । देखता झाला तो दुरून । क्लेशायमान त्रिनेत्रा ॥९॥
तं तथा व्यसनं दृष्ट्वा भगवान्वृजिनार्द्दनः । दूरात्प्रत्युदियाद्भूत्वा बटुको योगमायया ॥२७॥
तें त्या प्रकारींचें व्यसन । सदाशिवाचें अत्यंत गहन । कीं दैत्यभयें पलायमान । पातला श्रमून आपणापें ॥५१०॥
देखूनियां वृजिनार्दन । तच्छ्रमाभिज्ञ भगवान । दुःखविनाशक सदय पूर्ण । कळवळून काय करी ॥११॥
एकामांगें एक धांवत । सभय सावेश देव दैत्य । हें दुरूनि देखूनि अच्युत । प्रकटला शिव भीत रक्षावया ॥१२॥
योगमायेकरूनि बटुक । सानु सुवेष सम्यक । होवोनियां श्रीवत्साङ्क । लपवूनि मुख्य निजरूप ॥१३॥
मेखलाजिनदण्डाक्षिअस्तेजसाऽग्निरिव ज्वलन् । अभिवादयामास तं च कुशपाणिर्विनीतवत् ॥२८॥
ब्रह्मचर्यव्रताचा नट । आगीं बाणला चोखट । मेखळाबद्ध कटितट । स्कंधीं निविष्ट मृगाजिन ॥१४॥
दण्डकमंडलु उभय हस्तीं । कौपीन शोभे ऊरू वरती । उत्तरीय वस्त्र पृष्ठीं निगुती । श्रवणीं झळकती कुण्डलें ॥५१५॥
शुद्ध सूज्ज्वळ यज्ञोपवीत । इत्यादिचिह्नीं स्वलंकृत । कमनीय पौगंडवयसा युक्त । सुन्दर शान्त कुशपाणि ॥१६॥
देदीप्यमान अग्निसम । स्वतेजें करूनि पुरुषोत्तम । विलसत होत्साता पूर्णकाम । ऊर्जितधाम कमलाक्ष ॥१७॥
सम्मुख होऊनि विनीतवत । वृकासुरातें प्रोत्साहित । मागें टाकूनि उमाकान्त । अभिवंदिता जाहला ॥१८॥
त्यावरी जिहीं वचनीं मोहित । असुर होय प्रमादयुक्त । तैसीं वाक्यें अतिसुललित । बोले विनीत श्रीहरि ॥१९॥
श्रीभगवानुवाच - शाकुनेय भवान्व्यक्तं श्रान्तः किं दूरमागतः ।
क्षणं विश्रम्यतां पुंस आत्मायं सर्वकामधुक् ॥२९॥
म्हणे भो भो शकुनिपुत्र । तूं अत्यंत सकुमारगात्र । परंतु दिससी श्रमाचें पात्र । ऐसा निर्धार मज वाटे ॥५२०॥
धापां दाटलेंसें पोट । आंगीं वाहती घर्मलोट । मुखश्री उतरली तेजिष्ठ । ऐसें स्पष्ट दिसतसे ॥२१॥
तरी काय दुरूनि आलासि सखया । ऐसें ममे माझिया हृदया । क्षणभरी स्थिर करीं काया । पावें सदया विश्राम ॥२२॥
विश्रान्तिजीवनें वीण । सुकलें सर्वही अवयववन । तरी माझें अमृतरूप भाषण । घे श्रवणपुटें अंतरीं ॥२३॥
सकळ पुरुषार्थांचें कारण । पुरुषासी देह हा कामधेनु । यास्तव न पीडीं अतिशयें करून । पावसी शीण सकुमारा ॥२४॥
जों वरी देह आसे सावध । तों वरीच स्वधर्म घडे शुद्ध । अर्थ ही प्राप्त होती विविध । विषयानंद करणांसी ॥५२५॥
ना तरी देह झालिया विकळ । उन्मळे स्वधर्माचें मूळ । तुटे पदार्थांची मीळ । इन्द्रियीं हळहळ सर्वदा ॥२६॥
किम्बहुना संप्राप्त विषय । जिवलगसुहृदसमुदाय । सर्वही विपरीत होवूनि ठाय । देह अनामय नसतां हा ॥२७॥
संक्लिष्टदेहासि गंधर्वगीत । मंद सुशीतळ व्यंजित वात । उर्वश्यादि लावण्यवंत । न रुचती अमृत सम रसही ॥२८॥
स्त्रीपुत्रादिस्वार्थजीवी । पटुतर देहासी भजती विभवीं । क्षीण अनुद्योगियां भवीं । आप्तीं सर्वीं उपेक्षिजे ॥२९॥
जेंवि वर्षाकाळीं सजळ मेघ । देखोनि केकी नाचती साङ्ग । सम्मुख आळविती सप्रेमाङ्ग । उपेक्षिती मोघ अवकाळीं ॥५३०॥
म्हणोनि देहें पटु तोंचि भोग । सर्वही घडती उत्तम योग । सौख्यदायक आत्मसंग । होती अभंग आपणा ॥३१॥
तरी सकळधर्मा माजि धर्म । देह रक्षणें हाचि परम । देहासी क्लेशकारी कर्म । सहसा विषम नाचरिजे ॥३२॥
म्हणसी क्लेशा वांचूनि स्वार्थ । केंवि साधेल यथार्थ । तरी प्रतिकूळ दुःखद अविहित । स्वार्थानर्थ न इच्छिजे ॥३३॥
जेंवि अश्व विकूनि कीजे जीन । कीं तरुवरशाखा छेदून । कुंप कीजे तया रक्षण । हें शहाणपण विपरीत ॥३४॥
तेंवि जया स्वार्थें देह वेंचे । क्लेशसामग्रीं पुष्कळ सांचे । तयाचें नांवही नाणिजे वाचे । हेंचि सुज्ञाचें लक्षण ॥५३५॥
यास्तव दानवेन्द्रा चतुरा । विवेकें जाणिसी सारासारा । तरी या घेईं वाक्यविचारा । स्वस्थ अंतरा करूनियां ॥३६॥
तुज श्रान्त देखोनि अत्यंत । माझें द्रवलें कोमळ चित्त । तरी काय असे तवाभिप्रेत । श्रमसी किमर्थ येतुला ॥३७॥
यदि नः श्रवणायालं युष्मद्व्यवसितं विभो । भण्यतां प्रायशः पुम्भिर्धृतैः स्वार्थान्समीहते ॥३०॥
अनन्य आणि अवंचक । स्नेहाळ रसाळ शुभचिन्तक । गुह्य तरी ऐसिया निष्टंक । सहसा साशंक न वंचिजे ॥३८॥
जरी आमुच्या श्रवणा कारणें । तुमचें व्यवसित ऐकणें । योग्य असेल तरी बोलणें । निःशंकपणें समर्था ॥३९॥
ना तरी असेल तें असो मनीं । परि माझिया अंतःकरणं । ऐसें गमे गा चातुर्यखाणी । कीं फिरसी साधनीं स्वार्थाच्या ॥५४०॥
सहाय प्रार्थूनियां पुरुष । तिंहींसीं स्वार्थविशेष । साधूं इच्छिसी महत्कार्यास । करूनि क्लेश बहुतेक ॥४१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP