चतुःश्लोकी भागवत - श्लोक १५

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
सुनंदनंदप्रबलार्हणादिभिःस्वपाषदमुख्यैः परिसेवितं विभुम् ॥ भृत्यप्रसादाभिमुखं दृगासवं प्रसन्नहासारुणलोचनाननम् ॥१५॥

N/A॥ टीका ॥
वैकुंठीं हरिभक्त पूर्ण ॥ ब्रह्मा देखताहे आपण ॥ त्यांचीं नांवें सांगूं शके कोण ॥ मुख्य पार्षदगण ते ऐका ॥३३॥
नंद सुनंद मुख्यत्वें पूर्ण ॥ बल आणि प्रबलार्हण ॥ धाता विधाता निकटघन ॥ जय विजय जाण द्वारपाळ ॥३४॥
चंद प्रचंड सुशीळ ॥ भद्र सुभद्र पुण्यशीळ ॥ कुमुद कुमुदाक्ष सकळ ॥ हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥२३५॥
इहीं पार्षदगणांसमवेत ॥ ब्रह्मा देखे श्रीभगवंत ॥ त्यातें भजतां निजभक्त ॥ स्वानंदयुक्त सर्वदा तो ॥३६॥
सप्रेम सद्भावी सात्विक ॥ त्यांसी सदा हरी सन्मुख ॥ तुष्टला होय प्राड्मुख ॥ निजानंदें सुख सर्वदा देत ॥३७॥
ज्याचें दर्शन स्वयें गोड ॥ विसरवी अमृताची चाड ॥ पहातयाचें पुरे कोड ॥ दृष्टि होय गोड देखणेपणें ॥३८॥
त्या निजभक्तांचे ठायीं ॥ नाममात्र स्मरतां देहीं ॥ मृत्यु रिघों नशके काहीं ॥ अमृतरूप पाही यापरी भक्त ॥३९॥
ज्याचें नाम निवारी जन्ममरण ॥ त्याचें भाग्यें झालिया दर्शन ॥ भक्तांसी तो सुप्रसन्न ॥ प्रसन्नवदन गोविंद पैं ॥२४०॥
आकर्णविशाळनयन ॥ दोहीं प्रांतीं आरक्त पूर्ण ॥ यालागीं तो अरुणलोचन ॥ स्वयें चतुरानन हरि देखे ॥४१॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP