चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३०

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


यावत्सखा सख्युरिवेश ते कृतः प्रसाविसर्गे विभजामि भोजनम् ॥ अविक्लवस्ते परिकर्मणि स्थितो मा मे समुन्नद्धमदोऽजमानिनः ॥३० ॥

॥ टीका ॥
अहं मद कां होईल ह्मणसी ॥ तुवां मज अहंकारियासी ॥ सखा मानोनि सख्यासी ॥ ऐसिये स्थितीसी आणिलें त्वां ॥५६॥
म्यां प्रजासृष्टि करावी ॥ तेथें माझी श्रद्धा रिघावी ॥ यालागीं केली स्वभावीं ॥ निजगौरवीं मानेल पैं ॥५७॥
ऐसियावरी सृष्टि करितां ॥ अहं स्वतंत्र प्रजाकरितां ॥ ऐसी माझे उत्कट अहंता ॥ अंगीं तत्त्वतां वाढेल कीं ॥५८॥
श्रेष्ठापासूनी सन्मान ॥ तोचि इतरांसी हृदयाभिमान ॥ तेणें धाकें कांपलें मन ॥ तुज गुह्यज्ञान यालागीं पुसें ॥५९॥
तुझे आज्ञे उल्लंघ न घडावा ॥ यालागीं सृष्टिक्रम म्यां सृजावा ॥ तोचि मानितां तुझी सेवा ॥ अभिमान नीच नवा मजमाजीं उठी ॥३६०॥
अभिमान यावयाचें काय कारण ॥ सृजितां अधमोत्तमयोनीजन ॥ मी सृष्टिकरितां तुजसमान ॥ अवश्य अभिमान येईल स्वामी ॥६१॥
वृत्ति करूनियां अविकळ ॥ सृजितां भूतजात सकळ ॥ तोचि अभिमानाचा जन्मकाळ ॥ हें मज समूळ कळे देवा ॥६२॥
तो अभिमान मज न यावा ॥ यालाईं प्रार्थितसें तुज द्वा ॥ आश्वासी पां ज्ञानगौरवा ॥ श्रीवासुदेवा निजजनका ॥६३॥
ऐकोनी ब्रह्म्याची विनवण ॥ परम संतोषला नारायण ॥ त्यासी द्यावया निजज्ञान ॥ स्वानंदपूर्ण तुष्टला असे ॥६४॥
कोण्हाचें न लागतां मन ॥ अनिष्ठित गुह्यज्ञान ॥ तें द्यावया श्रीनारायण ॥ स्वानंदें पूर्ण संतुष्टला ॥३६५॥
करितां नानाकर्माचरण ॥ निजांगीं नलागे कर्तेपण ॥ ऐसें अलिप्त निजज्ञान ॥ द्यावया श्रीनारायण संतुष्टला ॥६६॥
देखोनी तेव्हां ब्रह्मयासी ॥ अतिस्नेह भगवंतासी ॥ निजज्ञानधनदेतसे त्यासी ॥ जन्मला कुशीं ह्मणवूनियां ॥६७॥
जैसा दिपला हरिणा पुढें ॥ पाहोंविसरला आणिकेकडे ॥ तैसा आवडीच्यानि पडिपाडें ॥ ब्रह्मयाकडे हरि पाहे ॥६८॥
कां चुंबकाचिया वाटा ॥ लोह भवे न लागतां झटा ॥ तैसें झालें हो वैकुंठा ॥ जिकडे पाहे स्रष्टा तिकडे देव ॥६९॥
जेवीं आदित्याचींफुलझाडें ॥ नित्य सन्मुख सूर्याकडे ॥ तेवीं आवडीचेनि पडिपाडें ॥ चतुर्मुखापुढें सन्मुख देख ॥३७०॥
उफराटी हे चाली कैशी ॥ शौरी भुलला स्रष्ट्यासी ॥ येणें आवडलेपणें त्यासी ॥ गुह्यज्ञानासी सांगेल पां ॥७१॥
सांगावया त्या गुह्यज्ञानवाव ॥ स्वयें तुष्टला श्रीवासुदेव ॥ येणें विरिंचीचा जीवभाव ॥ स्वयें स्वयमेव चमत्कारला ॥७२॥
पुढिलें निरोपणीं आवडी ॥ स्रष्टा उठिला धडफुडी ॥ अवधानाची परवडी ॥ निजनिवाडीं थोरावली पैं ॥७३॥
देहावेगळें अंतःकरण ॥ करूनि निवडिलें अवधान ॥ श्रवणीं एकाग्रता पूर्ण ॥ स्वयें संपूर्ण सरसावला ॥७४॥
अष्टदळें जैसीं कमळें ॥ तैसे टवकारिले आठही डोळे ॥ चारी मुखें एकेवेळें ॥ सप्रेममेळें लांचावली ॥३७५॥
श्रीगुर्श्रीहरी तुष्टमान ॥ देखोनि उठावले ते नयन ॥ श्रवणापूर्णीं आपण ॥ दृश्यभेदाविण निजज्ञान सेवूं ॥७६॥
श्रवणीं ऐसें तें शुभाक्षर ॥ आह्मीच सेऊं साचार ॥ ऐसा दृष्टीचा चमत्कार ॥ देखणेपणें द्वार श्रवणाचें व्यापी ॥७७॥
घ्राण ह्मणे मी सवेगें ॥ सुगंधवृत्तीसी धांवेन वेगें ॥ श्रवणनयनांपुधें लगबगें ॥ उभे स्वानंदयोगें सुखेंसी पैं ॥७८॥
ऐकोनी सद्गुरूच्या गुह्यज्ञाना ॥ रसना विसरे विषयवासना ॥ नचाखतां सद्गुरुगुह्यज्ञाना ॥ ब्रह्मरस रसना सेवूं धावे ॥७९॥
स्पर्श पांगला शरीरपांगे ॥ देहबुद्धीसी घालूनि मागें ॥ स्पर्शावया लागवेगें ॥ मी रिघोन सर्वांगें श्रीरंवसंगीं ॥३८०॥
धन्य धन्य श्रीगुरुसप्रेमज्ञान ॥ बाह्यांसी येतसे स्फुरण ॥ खेंव द्यावया आपण ॥ भुजाहि सच्चिद्ध आलिंगूं पाहती ॥८१॥
ऐसा इंद्रियांचा विवाद ॥ ऐकोनि शब्द जाहला निःशब्द ॥ मोनें सेवावया परमानंद ॥ हरिनामाचा छंद सर्वांगीं गर्जे ॥८२॥
ऐसा सर्वांगीं परिपुरता ॥ सर्वांगें जाहला धडौता ॥ यापरी देखोनि विधाता ॥ कळलें भगवंता परमार्थीं ॥८३॥
श्रवणीं जें पडेल वचन ॥ तें तत्काळचि होईल आपण ॥ यालागीं निजगुह्यज्ञान ॥ श्रीनारायण उपदेशी ॥८४॥
ऐसा पुरता जो असेल ॥ त्यासि सद्गुरुज्ञान गवसेल ॥ येर्‍हवीं आहाच बोलतां बोल ॥ वाचेचें फोल करावें नलगे ॥३८५॥
यालागीं श्रद्धाळू सात्विक । गुरुसेवेचा नीच सेवक ॥ गुरुआज्ञेचा पाइक ॥ तोचि निष्टंक ज्ञानार्थीं ॥८६॥
जो वीतरागी सविवेक ॥ जो सद्भावें विश्वासिक ॥ जो लोकेषणेरहित रंक ॥ तो निष्टंक ज्ञानार्थीं ॥८७॥
विकल्पशून्य ज्याचें मन ॥ वासनारहित निजभजन ॥ तो मुमुक्षांमाजीं चिद्रत्न ॥ अधिकारी पूर्ण ब्रह्मज्ञाना ॥८८॥
ऐशीं विधात्याचीं पूर्ण लक्षणें ॥ निर्धारूनि श्रीनारायणें ॥ त्यासि पूर्णब्रह्म निरूपणें ॥ ज्ञानार्थ परिसणें सावधान श्रोतीं ॥८९॥
हें कल्पादीचें जुनाट ज्ञान ॥ स्वयें श्रीनारायण ॥ एका विनवी जनार्दन ॥ श्रोतीं अवधान मज दीजे ॥३९०॥


References : N/A
Last Updated : July 30, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP