मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
गोपीचंदाख्यान

गोपीचंदाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


पद - राह जोगी - ताल त्रिवट.
सावध सावध सावध मनुजा निजरुपी सावधरे ॥धृ॥ हिताहित मना न विचारीसी का झांकुनि नेत्र सदा । कामकर्दमी लोळसि निशिदिनी मानुनि सौख्य सदा । बीज लाबुनि सरे सुख तेंवी घडे आपदा । इंद्रिय ग्राम विराम पडे मग हरिसी स्मरसी कदा ॥१॥
सिंह जळी प्रतिबिंब विलोकुनी निरखुनि देत बुडी । हंस गगनिंच्या ताराउदकी पाहूनि घेत उडी । मूढ तसा मृगनाभि उपेक्षूनि हिंडत बुद्धि कुंई । तेंवि सखा हरि सोडुनियां दुरि फिरसी देश धडी ॥२॥ सावध. ॥
ऐन्द्रजाल मृगतोय, तसें जगदंभरसें विलसे । स्वप्निं दिसे, गज मत्ततुरंगम, संभ्रम तेविं सखा असे ॥
क्रूर भवार्णविं, कर्णधार प्रभु, आन उपाय नसे । पूर्णरंग जगदीशपदीं, मग दुर्गम काय असे ॥ सावध. ॥३॥

॥ आत्मस्वरूपावधान ॥
श्लोक - कोहं, कथमिदं जातं, कोवै कर्तारविद्यते ॥ उपादानं, किमस्तीह, विचार: सोयमीदृश: ॥२॥
आत्मा नित्योहि सद्‍रुपो, देहोऽनित्योह्यसन्मय: ॥
तयोरैक्येप्रपंश्यंति, किमज्ञानमत: परम्‍ ॥३॥

॥हिताहितविचार॥
श्लोक :- एकाकी चिन्तयेन्नित्यं विविक्ते हितमात्मन: ॥
एकाकी चिन्तयानोहि परं श्रेयोऽधिगच्छति ॥१॥
अहितहितविचारशून्यबुद्धे: श्रुतिसमयैर्बभिरितररकृतस्य ॥ उदरभरणमात्रकेवलेच्छो: पुरुषपशोश्च पशोश्च को विशेष: ॥२॥
येतो वासर तोचि, तेचि रजनी, व्यापार नानापरि । प्राणी हे करिताति, आयुसरत, हे नेणवे अंतरी ॥ तुच्छें, चर्वित चर्वणोपमसुखें, जी तींच ती भोगितां । संसारीन तिरस्कृती उपजते, ही कोण निर्लज्जता ॥३॥

॥ संसारमुखनश्वरत्व ॥
पद :- (सोरट) कधीं सुख पारावार । कवीं होय हाहाकार ॥ वाहे नेत्रीं अश्रुधार । नसे कोठें वार ॥ जीवन यौवन धन सकल, अति चंचल ॥१॥
आज पुत्रा आलिंगन । उद्यां त्यांचे विसर्जन ॥ आज प्रेमे संभाषण । उद्या विलाप रुदन ॥ संसार हें दु:खसदन । नव्हेचि तें, शांतिस्थान ॥ शांति सुख व्हावें तरी, आनंदधामा चाल ॥२॥
श्लोक :- यावत्स्वस्थमिदं देहं याबन्मृत्युश्च दूरत: ॥
तावदात्महितं कुर्यात्प्राणान्ते किं करिष्यसि ॥१॥
आत्मसंपतिसाधनं अभयं सत्वसंशुद्धिरित्यादि भगवद्‍भक्तिश्च
अभंग:- गळां पडेल यम फांसी । मग कैचा हरी म्हणसी ॥१॥
श्लोक:- अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतनयन्‍ ॥१॥
दोहरा: - विरचित्त मोको जपे । सदा निरंतर होय ॥ ताजोगिकों सुलभ हों । और लहे नहिं कोय ॥१॥
श्लोक:- हरिर्हि साक्षात्भगवान्‍ शरिरिणा । मात्मा झषाणाभिवतोयमीप्सितम्‍ ॥ हित्वा महारंतं यदि सज्जते गृहे । तदा महत्वं वयसा दंपतीनाम्‍ ॥१॥
इदं हि पुंसस्तपस:श्रुतरय वा । स्विष्ठस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयो: ॥ अविच्युतोर्य: कविभिर्निरुप्यते । अदुत्तमश्लोकगुणानुवर्णनम्‍ ॥२॥
एको वशी निष्कियाणां बहूनां । एकं बीजं बहुधा य: करोति ॥ तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरा । स्तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम्‍ ॥३॥

जगी सुखभ्रान्ति.
श्लोक:- गतसारेऽत्र संसारे सुखभ्रान्ति: शरीरिणाम्‍ ॥
लालापानमित्रांगुष्टे बालानां स्तन्यविभ्रम: ॥१॥

भवार्णवक्रूरत्व.
ओंव्या:- संसार म्हणिजे महापूर । माजि जलचरें अपार ॥ खंडू धांवती विखार । काळसर्प ॥१॥
अशा ममता देहबेडी । सुसरी करिती ताडातोडी ॥ नेऊनि दु:खाचे सांगडी । माजी घालिती ॥२॥
अहंकार नक्रें उडविलें । नेवोनि पाताळीं बुडविलें ॥ तेथोनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥३॥
काम मगरमिठी सुटेना । तिरस्कार तागला तुटेना ॥ मद मत्सर ओहटेना । भुली पडली ॥४॥
वासना धामीण पडली गळां । घालोनी वेंटाळें वमी गरळा ॥ जिव्हा लळलळी वेळोवेळां । भयानक ॥५॥
पडिलें भ्रांतिचे आंधेरे । नागविलें अभिमान चोरें । आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥६॥
बहुतेक आवर्ती पडले । प्राणी बाहतची गेले ॥ जिहीं भगवंतासि भोभाइलें । भाषार्थबळें ॥७॥
देवें आपण घालोनि उडी । तयांसि नेले पैलथडी ॥ येरतीं अभाविकें बांपुडी । बाहतचि गेलीं ॥८॥
गद्य: - रसो वै स: रसं ह्येवायं लब्ध्वाऽ‍ऽनंदी भवति ॥
पद:- (भैरवी). राहें सदा प्रभुपायीं । मन तूं राहें सदा प्रभुपायीं ॥धृ.॥ सुख सुख म्हणुनी जोडिसि विषयां । परि दु:खचि त्या ठायीं ॥ मन. ॥१॥
विद्या धन जन मान प्रतिष्ठा । शाश्वत एकहि नाहीं ॥ मन. ॥२॥
भक्तिरसें शाश्वत सुख जोडे । न जोडे । न मिळे अन्य उपायीं ॥ मन. ॥३॥

आख्यान
आर्या: - पूर्वी उत्तरखंडीं झाला विख्यात नृवरवंगपती ।
त्रैलोक्यचंद्र ज्यातें पौरुषजित सकल मांडलिक नमती ॥१॥
ओंव्या: - मैनावती तयाची कांता । सद्‍गुणखाणी लावण्यसरिता ॥ पुत्र कलत्रें राज्य करितां । काळें अवचिता ग्रासिला तो ॥१॥
पुत्र गोपीचंद ते अवसरीं । पितयामागें राज्य करी ॥ बाराशतें करोनि नारी । विषयसरोवरीं क्रीडतसे ॥२॥
श्लोक:- मातेसवें नृपसभार्य विनीतवृत्ति । वर्ते परी पतिवियोजाधि चित्तीं ॥ पावे न शांति, धरि बुद्धि उदास भाव । जों सद्विवेक उपजोनि करी न ठाव ॥१॥
होतां विवेक न रुचे कुख नाशिवंत । सत्संग लाभ बहुमानि विशुद्ध चित्त ॥ हा देह मृत्युवश नाश टळे न याचा । आत्माचि शाश्वत सुखीं अधिकारी साचा ॥२॥
त्या सद्‍गती कशि मिळे मज हें कळेना । हें तत्व संयमधनाविण आकळेना ॥ सांगेल कोण मजला हितबुद्धि सारी । मैनावति सतत हें स्वमनीं विचारी ॥३॥
ओव्यां :- तंव त्या नगरामाजे एक । सिद्ध जालंधर सात्विक ॥ मायाममता त्यजोनि देख । आत्मसुख पावला ॥१॥
(हें ऐकून त्यापाशीं जाऊन.)
मैनावती करी प्रार्थना । म्हणे भवदु:ख दरिद्रनाशना ॥ मज देवोनि अभय दाना । हित साधना सांगावें ॥२॥
जालंधर म्हणे तिजलागीं । जोगी नव्हे मी भवरोगी ॥ भस्म चर्चोनि सर्वांगी । उघडा जगीं फिरतसें ॥३॥
गोपीचंद राजा भूपती । त्याची माता तूं मैनावती ॥ थोर साधु पाहोनि निश्चिती । शरण त्या प्रती जाई कां ॥४॥
ऐकोनि सद्‍गुरुचे वचन । पुढतीं केलें साष्टांग नमन ॥ म्हणे सर्वभावें आलें शरण । तुमचें महिमान जाणोनि ॥५॥
मैनावतीचा सुद्ध भावार्थ । देखोनि तुष्टले सद्‍गुरुनाथ ॥ मग मस्तकीं ठेवोनि ह्स्त । उपदेश त्वरित दिधला ॥६॥
अवकाश करोनि नित्य काळीं । मैनावती येवोनि बैसे जवळी ॥ ज्ञान चर्चेची नव्हाळी । सप्रेम मेळी सुखरुप ॥७॥
साक्या:- एके दिवशीं अंतरांगणी स्फटिकशिलेवरी राजा ॥ मंगल स्नानालागिं बैसला सेविति सकलही भाजा ॥१॥
तो मांडीवरि जननि बैसुनि प्रेमे कौतुक पाहे ॥ परि क्षण एकें दु:ख क्षोभें नयनांतुनि जल बाहे ॥२॥
अश्रुबिंदु नृपकंधीं पडता उपरीवरि करि दृष्टि ॥ तो शोकाकुल जननि चक्षुयुग करि अश्रुजलवृष्टि ॥३॥
ओव्या :- राजा म्हणे वो जननी । काय कष्ट वाटले तुज लागोंनी ॥ तें दु:ख आठवोनि मनीं । रुदन सदनी करितेस ॥१॥
बत्तीस लक्षणी तूं भूपाळा । दिससी मदनाचा पुतळा ॥ आयुष्य सरता येईल वेळा । तैं काळ तुजला ग्रासील ॥२॥
सुंदर सुकुमार स्वरूप देख । हें अग्नींत होईल राख ॥ म्हणोनि मज वाटले दु:ख । करीत शोक बैसलें ॥३॥
त्रिलोकचंद तुझा पिता । ऐसाचि होता नृपनाथा ॥ काळें ग्रासिला अवचिता । जळोनि गेला अग्निंत ॥४॥
राज्य संपत्ति पुत्र धन । हें नाशिवंत अवघें जाण ॥ अभ्रच्छायेचें शीतलपण । जाय नासोनि क्षणमात्रें ॥५॥
तरी त्यजोनि ममता माया । आतां सावध होईं राया ॥ सद्‍गुरुसि शरण जावोनिया । अमर काया करावी ॥६॥
राजा म्हणे मातेप्रती । मृत्युलोकीची ऐशीच रीती ॥ तयालागी मी निश्चीती । काय करुं सांगिजे ॥७॥
मैनावती देत उत्तर । जालंधर असतां योगीश्वर ॥ तरी मी तुझी काया अमर । करवित्यें साचार त्या हातीं ॥८॥
परि तूं दैवहीन दिससी बाळा । म्हणोनि सद्‍गुरु टाकोनि गेला ॥ मैनावतीचिया डोळां । अश्रुपात लोटले ॥९॥
ऐसें बोलतांच जननी । राजा खोंचला अंत:करणीं ॥ अन्याय आठवोनि मनीं । मौन धरोनि राहिला ॥१०॥
अनुतापें खेद करी मानसीं । म्हणे मी अविवेकी पापराशी ॥ विचार न करोनि चित्तासी । जालंधर कूपीं टाकिला ॥११॥

दिंड्या:- असो; या परी लोटतां काळ काहीं ।
तेथ आले कानिफा जोगि पाही ॥
गुरु जालंधर शोधितां मिळेना ।
शिष्य घेऊनि धुंडिती देश नाना ॥१॥
गुरुबंधू कानिफा नगरिं आला ।
सवें घेऊनि सर्वही जोगिमेळा ॥
असें ऐकुनि तोषली राजमाता ।
पूजि सद्भावें आणुनि गृहिं महंता ॥२॥
पुसे सद्‍गुरुची शुद्धि योगियाला ॥
हंसुनि बोले कानिफा तैं सतीला ॥
तुझ्या पुत्रें ठेविला गुप्त रुपें ।
बंदिशाळे बहुकाळ दुष्ट भूपे ॥३॥
सुताहातीं अन्याय घोर झाला ।
गुरुद्रोही उदयासि कोण आला ॥
परी न करी मानसीं दु:ख नाये ॥४॥
जाणशी तूं सद्‍गुरु कृपाराशी ।
शरण जातां रक्षील तव सूतासी ॥
तरी शांतपणें बांधुनी निजसूतातें ।
येथ आणुनि भेटवीं शीघ्र मातें ॥५॥

ओव्या:- तो गोपिचंद निर्भय मनीं । निजला होता सूख सदनीं ॥ माता अकस्मात येवोनी । काय बोलत पुत्रासी ॥१॥
मैनावती म्हणे निदसूरा । काय निवांत बैसलासी गव्हारा ॥ काळ समीप आला खरा । त्याचा दरारा न मानिसी ॥२॥
पुत्र कांता धन संपत्ती । ही दोन दिवस होवोन जाती ॥ समागमें कोणी न येती । सांग निश्चिती नृपनाथ ॥३॥
तुझा भाग्योदय झाला जगी । ऐसे वाटतें मजलागीं ॥ म्हणोनि कानिफा जोगी । आला आपुल्या नगरासी ॥४॥
जालंधराचा शिष्य थोर । माझा बंधु सहोदर ॥ त्यासि शरण जावोनि सत्वर । काया अमर करावी ॥५॥
तुझा अन्याय देखोन । जरी बोलिले क्रोधायमान ॥ तरी बहुत शांती धरोन । उत्तर न देणें सर्वथा ॥६॥
क्रोधें बोलती योगीश्वर । परी त्यांचा राग वरिच्यावर ॥ जेवि अंतरी असोनि मोह फार । दापितसे पोर निजमाता ॥७॥
नवनीताहूनि मृदु केवळ । चंद्रापरीस अति शीतळ ॥ जळाहूनि अति पातळ । अंतर तयांचें ॥८॥
मग कानिफा सन्निध येवोनि । साष्टांग नमस्कार घातला धरणी ॥ सद्भावें जोडोनी पाणी । आदेश म्हणोनि बोलिला ॥९॥
आर्या:- पुसतां कोण असें नृप बोले मी गोपीचंद अपराधी ॥
योगींद्र म्हणे कैशी झाली तुज परम घोर अशुभा धी ॥१॥
ओव्या:- कोणता भरंवसा धरोनी मानसीं । तुवां छळिल जालंधरासी ॥ सांग सत्वर मजसीं । अविवेकी पूर्ण तूं खरा ॥१॥
ऐकोनि कानिफाचे वचन । अनुतापें द्रवला नृपनंदन ॥ थरथरां कांपे भयें करून । म्हणे अपराधी मी खरा ॥२॥
कानिफा अभय देत त्यासी । आतां भिऊ नको मानसीं ॥ तुज मी युक्ति सांगतों जैसी । तैसी वेगें करीं कां ॥३॥
आर्या: - राया त्वां अविवेकें केली आज्ञा अघोर गुरुघाता ॥ परि किंकरीं विवेकें रक्षुनि गुरु टाळिलें नरकपाता ॥१॥
त्या सेवकांसि सांगुनि आणावें शीघ्र येथ सद्‍गुरुला ॥ तनु मन धन प्राणार्पण करितां तारिल क्षमानिधी तुजला ॥२॥
मग आणुनि चरणीं म्हणे मम प्राण ॥ रक्षाया योग्य न हे घ्या टाळुनि दुर्गति, करा त्राण ॥३॥
योगींद्र म्हणे राया क्षमिला अपराध हो चिरंजीवी ॥ संयमपर अपकारा विसरति शरणागतिं करूनि कवि ॥४॥
अज्ञान भाव ज्ञानें अनुतापें दग्ध पापमद झाला ॥ मोहतमे होउं तसा तुच्छ उदासीन भावहि निमाला ॥५॥
यापरि गतमळ आत्मा आनंदचि होय ओकसदा ॥ दुर्गति न शिवे त्यातें कीं तो स्थिरबुद्धि योग्य मोक्षपदा ॥६॥

पुणे प्रार्थना समाज.
डिसेंबर १८९१


N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP