मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
नामदेवनिरुपण

नामदेवनिरुपण

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


आर्या:- शिष्य म्हणे गुरुवर्या ऐकाव्या सत्कथा असें वाटे ॥ सद्‍बोधामृतदानें लावावे मज निवृत्तिच्या वाटे ॥१॥
संतोषोनि गुरु म्हणे बापा तूं भाग्यवंत मज गमसी ॥ कीं विफला जनवार्ता टाकुनि परमार्थसाधनीं रमसी ॥२॥
तरि सादर श्रवण करी कथितो तुज भक्तवृत्त परम हित ॥ ज्ञानापरीस श्रेय:साधन हरिभक्ति सत्वपरमहित ॥३॥
पंढरपूरात झाला प्रभुचा प्रिय भक्त नाम ज्या नामा । चित्त जयाचे पावे हरिच्या भजनेंचि नित्या आरामा ॥४॥
नामस्मरणीं ज्याची अनुपम रति त्यासि उचित हें नाम ॥ कीं चित्त विमल त्याचें प्रेमल भक्तीस होय निजधाम ॥५॥
देव असेंही त्यातें म्हणती जो दिव्यसंपदे थारा ॥ देऊन्नि यत्नें रक्षी नश्वर मानोनि सकल संसारा ॥६॥
दुर्लभ तत्सम मानव म्हणोनि वाटे अयोनिजन्मा तो ॥ दावी भक्तीपंथातें लोकीं त्यालाची जन सदा गातो ॥७॥
स्वात्मनिवेदन भावें करुनि प्रभुला तयावरी ठेवी ॥भार समस्तहि तत्कृत अन्ननिवेदनहि कां न प्रभु सेवी ॥८॥

श्लोक: -- परिसुनि अशि ख्याती ज्ञानदेवास वाटे ॥ बहुत नवल चित्तीं आदरें प्रेम दाटे ॥ उपजलि मनि मोठी आवडी संगतीची ॥
सुजनचि बहु मानी थोरवी सद्गतीची ॥१॥
करुं नामदेवासवें तीर्थयात्रा ॥ मना शान्तिदा शुद्धिदा तेवि गात्रा ॥ क्रमूं पुण्यक्षेत्रे जिथे साधुसंत ॥ मुनी तापसी भेटती भाग्यवंत॥२॥
चिंतोनिया मनिं असें करि निश्वयाते । जावोनि पंढरिस भेटत नामयातें ॥ सत्कारपूर्वक तयाप्रति नामदेवें ॥ पूजूनि पाय धरिले सुविशुद्ध भावें ॥३॥
दिंडी -- म्हणे झाला बहु लाभ आजि मातें ॥ कृपा करुनि म्ज दिलें दर्शनातें ॥ ज्ञानखाणी तुम्ही ज्ञानराज योगी ॥ काय सेवा मज घडे तुम्हां जोगी ॥१॥
आळशावरि जान्हवी स्वये लोटे ॥ अभाग्या पथिं संपदा दिव्य भेटे ॥ तेवि केली मजवरी कृपा मोठी ॥ स्वयें दिधली पामरालागिं भेटी ॥२॥
साकी :-- आदर पाहुनि बहुत तोषला ज्ञानराज चित्तीं ॥ म्हणे धन्य तूं प्रेमळ हरिचा दास धन्य तव भक्ति ॥१॥
आवडि माझ्या मनी उपजली तव सहवास घडावा ॥ परम तुष्ट मी झालों पाहुनि तुझिया सिविमल भावा ॥२॥
श्लोक: -- तरी जाऊं संगे चला तीर्थयात्रा ॥ करूं साधना तोडि जें मोहफांसा । तुझ्या संगतीने जिवालागी व्हावा ॥ विसावा मनीं योजिले याच भावा ॥१॥
म्हणे नामा दीना मज न बरवी थोरवी अशी ॥ तुम्हां पूजी माझी मति विमलभावें तुम्हई वशी ॥ असे मातें वंद्या बहु तुमचि आज्ञा हितवहा ॥ चला येतो संगे जरि हरि न देईल विरहा ॥२॥
तो भाव प्रेमळ विलोकुनि ज्ञानराजा ॥ संतोष पावुनि म्हणे हरिला पुसें जा ॥ देईल श्रीहरी जरी तुजला अनुज्ञा ॥ येईं तरी मजसवें सुविशंक प्राज्ञा ॥३॥
साकी :--- पाहूनि निश्वय निघे भक्तवर निरोप हरिचा घ्याया ॥ स्मरोनि भावें चित्तीं पूजी त्या जगताच्या राया ॥१॥
म्हणे इच्छितो ज्ञानराज मजसह जाया तीर्थाते ॥ परि तव भक्तीवाचुनि साधन अन्य गमेना मातें ॥२॥
जप तप नेम व्रत तीर्थाटनीं गुंतुनि तुज विसरावें ॥ क्षुद्रफलाचा लोभ धरुनियां कर्मजाल पसरावें ॥३॥
न रुचे हें कधि परि ज्ञानेश्वर मनिंचा हेतु दयाळा । कसा न पुरवूं सांग विहित मज बोधुनिया जगपाळा ॥४॥
दिंडी :-- करुण वाणी ऐकुनी सेवकाची ॥ प्रकट होऊनि अंतरी भेटि साची ॥ देह भक्ता जी दुर्लभा ज्ञानियातें ॥ प्रेमदृष्टीने शांतवी तन्मनातें ॥१॥
म्हणे जावें निश्विंतमने तीर्था ॥ विसर माझा न पडेल तुज परार्था ॥ पुरविं ज्ञानेश्वर चित्तिंचा हेतु बापा ॥ भक्त माझा न उपेक्षि आर्ततापा ॥२॥
आर्या:-- या परि निरोप घेउनि बोले ज्ञानेश्वरा अगारा या ॥ राहुनि आजि करावें पुनीत मागें धरोनियां पायां ॥१॥
प्रात:काळी जाऊं तीर्थाटन संगमे करायला ॥ त्वत्संगासम न दुजें साधन भवसिंधु हा तरायाला ॥२॥
श्लोक:-- असो क्रमिति रात्र ती सुरस सत्कथालापनीं ॥ सदैव मनिं दक्ष जे षडरिवृत्तिंच्या दापनिं ॥ प्रभातसमयी गृहा त्यजुनि तीर्थमार्गाप्रती ॥ सवें चरिति कापडी परम शुद्ध ज्यांची मती ॥१॥
नानास्थाने पाहिलीं रम्य क्षेत्रें ॥ तीर्थस्नाने न्हाणिली स्वीयग्गात्रें ॥ साधुवृंदे भेटतां आप्तकामें ॥ भावें त्यांते वंदिले पूर्ण प्रेमें ॥२॥
परी नामयाच्या मना शांति नोहे ॥ म्हणे तीर्थयात्रा दयाळा नको हे ॥ हरीभक्तिला हो जो विघ्नकारी ॥ भवाब्धींत जे मग्न त्यां केविं तारी ॥३॥
दिंडी:-- अशी ऐकुनि ज्ञानेश खिन्नवाणी ॥ म्हणे वसतो सर्वत्र मोक्षदानी ॥ अभिन्नत्वें पाहतां तोची एक ॥ सर्व आहे आदरीं हा विवेक ॥१॥
सेव्यसेवकभाव हा कल्पिलासे ॥ ब्रम्ह एकचि मूढास विविध भासे ॥ तत्वनिश्चय मनिं करुनि सुदृढ बापा । वारिं ज्ञानें नि:शेष त्रिविध तापा ॥२॥
साकी: -- परिसुनि नामा म्हणे बहुमुखीं ऐकिलि अशी कहाणी । रहिणि वाचुनि वृथा गमे मज अद्वैताची वाणी ॥१॥
सोडुनि भक्ति केवल बोधें भवभय न कधीं आटे ॥ यास्तव मुनिजन आप्तकामही धरिति भक्तिच्या वाटे ॥२॥
नारद तुंबर सनक सनातन सनंदनादिक योगी । नामस्मरणे भजनकीर्तनें भक्तिसुखाने भोगी ॥३॥
चला जाउं तरि फिरुन पंढरिस राहुनि एके ठायीं ॥ गाऊं अनुदिन हरिगुण प्रेमें मन ठेवुनि हरिपायीं ॥४॥
श्लोक:-- ज्ञानदेव तें ऐकुनि म्हणे । नामया तुझे ज्ञान बा उणे ॥ वाटतें मला त्यजिं असत्पथा । भेदभक्तिचा यत्न हा वृथा ॥१॥
परि असो चला जाउं मागुतीं । जरि गमे तुला पंढरिप्रती ॥ क्लेशकारि जो वाटतो तुला । तीर्तवास तो नावडे मला ॥२॥
परतुनि पथिं येतां नामदेव तृषेनें ॥ श्रमुनि बहुज झाला आर्त चंडत्विषेनें ॥ जल तरि बहुधाही शोधितां आढळेना ॥ असह बहु तृषार्ती जाय कैशी कळेना ॥३॥
पुढें चालतां देखिला आडवाटे । महाकूप अल्पोदके शुष्क वाटे ॥ तटीं जाउनी पाहता त्या ठिकाणीं ॥ तळीं खोल भासे असे काहिं पाणी ॥४॥
नसे वाट कूपीं तळीं जावयाला ॥ नसे पात्रही पाणि काढावयाला ॥ कशी प्राप्ति होई कळेना जळाची ॥ कशी शांति पावे तृषा नामयाची ॥५॥
चिंतोनि ज्ञानेश म्हणे उपाय ॥ मातें सुचे टाळिल जो अपाय ॥ योजूनि सिद्धी अणिमादि जावें ॥ कूपांतरी प्राशुनि तोय यावें ॥६॥
नामा म्हणे दुर्लभ योगसिद्धी ॥ पावेल कैसा जन अल्पबुद्धी ॥ पीडा तृषेची सकळां जनांला ॥ कैशी हरावी नकळे मनाला ॥७॥
दिंडी -- असे बोलुनि तत्काळ स्तब्ध झाला ॥ लीन भावें अंतरी आठवीला ॥ प्रेंमकुसुमें पूजिला दीनबंधु ॥ म्हणे पावें संकटी कृपासिंधु ॥१॥
चंडतापे चालतां पथीं श्रांत ॥ बहुत व्याकुळ जाहलो तृषाक्रांत ॥ उद्क अल्पहि प्यावया मज मिळेना ॥ प्राण कैसा वांचेल हें कळेना ॥२॥
श्लोक:-- जरि कृपा करिशी जगजीवना ॥ तरि कुठेहि न उणें मग जीवना ॥ तव पदीं मम मानस हें असे ॥ स्थिर तरी मज क्लेश कसे असे ॥१॥
बहू कष्ट पांथांसि होतात वाटे ॥ जलावाचुनि चालता एथ वाटे ॥ जरी कूप हा जीवनें पूर्ण वाहे ॥ तृषाक्रांत पांथांप्रती कष्ट नोहे ॥२॥
दिंडी -- अशी कष्टी ऐकता दासवाणी ॥ कृपा करि तो तत्काळ कृपादानी ॥ कूप उदकें होऊनी पूर्ण बाहे ॥ ज्ञानराजा आश्चर्ययुक्त पाहे ॥१॥
नेत्र उघडुनि जो नामदे पाहे । कूप होउनि परिपूर्ण जलें बाहे ॥ म्हणे देवा धन्य तूं दीननाथा । तूंचि भक्तांचा संकटी एक त्राता ॥२॥
साकी :-- पाहुनि अद्‍भुत भक्तिभाग्य हें ज्ञानेश्वर बहु डोले ॥ धन्य नामया धन्य भक्ति तव ज्ञानापरिसहि मोलें ॥१॥
श्लोक -- असो सत्वरी पंढरीलागि जाती ॥ यश श्रीहरीचें अहोरात्र गाती ॥ प्रभाती पुसे ज्ञानराजा अनुज्ञा ॥ गुहा जावया नामया पूतप्रज्ञा ॥१॥
आर्या:-- प्रेमालिंगन देउनि बोळविला ज्ञानदेव भक्तवरें ॥ ज्ञानापरीस भगवद्भक्तीचें भाग्य थोर होय खरें ॥१॥
शिष्य म्हणु गुरुराया अत्यद्‍भुत गोष्ट ही मला वाटे ॥ शुष्कीं कूपीं कैसें एकाएकी भरोनि जल दाटे ॥२॥
गुरु शिष्यासि म्हणे बा अन्योक्ती जाण ही अशी वार्ता ॥ ज्ञान अपूर्णचि साधन तारी एकान्त भक्तिच भवार्ता ॥३॥
ओवी -- शुष्क कूप तें अभक्तहृदय । ज्ञानबोधे आर्द्र न होय । प्रेमरसेंचि दाटोनि जाय । कूप जैसा जलौघें ॥१॥
ज्ञानदेव ज्ञानयोग । नामभक्तियोगाचा संग । संपादिता होय अभंग । हेचिं वर्म जाणावें ॥२॥
नामयाची तीर्थावली । अभंगछंदी मूळ रचिली । तीच भावार्थे समर्पिली । नानापद्यप्रबंधे ॥३॥

मुंबई प्रार्थना समाज
सन १८९०



N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP