भूमिका -
सुवेळाचळावर रामरावणाच्या भयंकर युद्धात लक्ष्मणाने रावणाचा प्रिय व पराक्रमी पुत्र इंद्रजित यास यमसदनास पाठविले. त्या पुत्रशोकाची आग रावणाचे मस्तकात भडकली व स्वतः युद्धाचे स्थळी येऊन त्याने एका महत्त्वाच्या शक्तीने इंद्रजिताला मारले. त्या शक्तीचा भयंकर कडकडाट व तेज पाहून सूर्यादी सुद्धा घाबरले; पण ही शक्ती बलवान मारुतीरायांनी पकडली व तिला चूर करणार तीच शक्ती म्हणाली-मारुतीराया, तुम्ही ब्रह्मचारी असून मी स्त्री आहे. तुम्ही नारीला स्पर्श करुन व्रताचा भंग करीत आहात. हे तिचे भाषण ऐकताच हाती धरलेली शक्ती मारुतीने सोडली. मग तिने आपला पराक्रम दाखविला. पुनः गगनात जाऊन अत्यंत आवेशाने लक्ष्मणाचे वक्षस्थळावर आपटली. त्यामुळे लक्ष्मणाची छाती फुटली व तो मूर्च्छित झाला. त्या वेळी श्रीरामरायांनी केलेला शोक या आख्यानात पाहावा.
सुषेण वैद्यांनी सांगितले की, द्रोणाचलावर संजीवन करणारी वनस्पती आहे, ती सूर्योदयाचे आत येथे आणल्यास मी लक्ष्मणास पूर्वीसारखा करीन. श्रीराम म्हणतात, ’कुणी लक्ष्मणाप्रति माझ्या वाचवा म्हणे रघुवीर’ हे पद करुणरसाचा नमुना फार श्रेष्ठ आहे. कुणी पाच दिवसांत, कुणी तीन दिवसांत, अंगदाने तीन प्रहरांत वल्ली आणण्याची प्रतिज्ञा केली. पण या वेळी रात्र १॥ प्रहर झाली होती. सूर्योदयापूर्वी वल्ली कोणाकडूनही प्राप्त होणे शक्य नाही. याबद्दल रामरायाचे उद्गार हृदयास पीळ पाडतात.
मग एक वीर पुढे आला व रामरायास वंदन करुन मी वल्ली ताबडतोब आणतो. ’क्षणात द्रोणाचलावरील वल्ली येथे आणतो. किंवा ही सुवेळा भूमी क्षणार्धात द्रोणाचलावर नेतो; पण आपण आज्ञा करा.’ ही श्री परमभक्त मारुतीरायांची शक्ती व भक्ती पाहून रामरायांनी त्यास जाण्याची आज्ञा केली.
मारुतीरायांनी ’जयजय रघुवीर समर्थ’ म्हणून भरारी घेतली. वायुवेग तर राहोच, पण मनाचे वेगाने मारुती चालला. तेथून कमीत कमी दोन हजार मैल तरी द्रोणाचल पर्वत होता.
मारुतीस विघ्न करण्यासाठी रावणाने कालनेमीची योजना केली होती. त्याने रस्त्यात सुंदर उपवन केले व तेथे आपण ऋषी होऊन बसला. मारुतीस तहान लागली होती तरी पाणी पिऊन जा असे त्याने सांगितले. मारुतीरायास हा कपटी आहे हे लक्षात आले व त्याचा प्राण घेऊन मारुती पुढे गेला.
द्रोणाचलावरील दिव्य वनस्पती लक्ष्मणास आराम होण्यासाठी मारुतीने द्रोणाचलास ती देण्याची विनंती केली. पण वल्ली न देता शक्य तो राम वगैरे सर्वांची त्याने निर्भत्सना केली. मारुतीरायाने रागाने पुच्छाने त्यास आवळून उपटून हातावर घेतला; त्याचा गर्व संपून तो शरणागत झाला.
नंदिग्रामी अर्धरात्री भरतास भयंकर स्वप्न पडले. जागा होऊन पाहतो तो आकाशात अत्यंत दैदिप्यमान शक्ती कोणी रामरायावर टाकण्यासाठी नेत आहे, असे वाटून त्याने बाण सोडून द्रोणाचलासह मारुतीस खाली पाडले. मारुतीचे मुखातून रामराम ध्वनि निघत आहे हे पाहून भरताने त्यास प्रार्थून हकीगत विचारली. मारुतीरायांनी त्यास सर्व वृत्त सांगूनाता माझी हाताची शक्ती क्षीण झाल्यामुळे पुढे जाणवत नाही, आता रामायण संपले ! ’कपी तू चिंता न करी । बैस माझे बाणावरी । पाठविलें सुवेळापुरीं । अर्धक्षण न लागला ॥’ बाणाचे आधारावर मारुतीस बसविले व भरताने बाण सोडला तो सुवेळाचळी त्वरित पोचला. सर्वांनी ती वल्ली पाहून आनंद व्यक्त केला. सुषेणाने वल्लीचा रस लक्ष्मणाचे मुखात घालताच झोपेतून उठावे त्याप्रमाणे लक्ष्मण जागा झाला व सर्वत्र आनंदी आनंद झाला.
१.
दिंडी
पुत्रशोकाची आग चढे माथां ॥
आटोपेनाचि राग लंकनाथा ॥
महाशक्ती विक्राळ काळ माता ॥
शीघ्र सोडी सौमित्र प्राणघाता ॥१॥
२.
साकी
शक्तिपात भय क्रम संतापें कापे विरंची गोल ।
वाटें सुटला कुपित शिवाच्या नेत्राग्नीचा लोळ ॥१॥
३.
आर्या
भ्याला मूर्च्छित झाला शक्तीला वारिना प्लवंग पती ।
तें उग्र तेज पाहातां सूर्याच्या पापण्याहि गपगपती ॥१॥
४.
कामदा
अससि वानरा ब्रह्मचारि तूं ।
दुरवरी मना हें विचारी तूं ॥
कठिण धर्म हा तूं स्वीकारिला ।
तरि करुं नये स्पर्श नारीला ॥१॥
५.
श्लोक
सौमित्रा वरते भ्रतार करते आहे तनू जोवरीं ।
नवर्याच्या प्रितिची खचित पंचप्राणाचि मी नोवरी ॥
जाते लग्नघडी आली म्हणुन ही मी माळ घालाया ।
आतां सोड मला विलंब जाहाला येथेंचि बोलावया ॥१॥
६.
श्लोक
सोडली प्रथम जी धरिली करी । प्रकट ती करणी आपुली करी ॥
संचरे पुनरपी गगनोदरी । उठवी प्रतिध्वनी गिरिकंदरीं ॥१॥
उन्मिळा पतिउरावर आदळे । देखती सकलहि कपिचीं दळें ॥
पाडिला दशरथात्मज दूसरा । जो रणीं रघुविराप्रति आसरा ॥२॥
७.
ओवी
सौमित्राचें वक्षस्थळ । न लावितां अर्ध पळ ॥
आवेशें फोडून उतावीळ । निघून गेली महाशक्ती ॥१॥
८.
पद
धाकटया दशरथ प्रिय पुत्रा । लागली शक्ति सौमित्रा ॥धृ.॥
नसे धीर वडिलांचे नेत्रा । अश्रुपूर अभिषेके गात्रा ॥
सितेहून दुःख हें शतपट की । पातला मारुती घटकी ॥१॥
९.
साकी
त्या काळीं सौमित्र विरश्री जिव शर चापा सोडी ।
निजे धरिणिची करुन शय्या गगनाची पासोडी ॥१॥
१०.
ओवी
अवघेची पडले आकांती । विझली वीरश्रीची कांती ॥
विजय मानुनी लंकापती । लंका नगरीं प्रवेशे ॥१॥
११.
श्लोक
गेलें राज्यहि हाय हाय करुनी स्वर्गस्थ झाला पिता ॥
नेली चोरुनी जानकी उपवनीं फळ मूक पाणी पिता ॥
माझे साठिं वृथा अतां मरण या बाळास कीं पातलें ।
रे मूर्खा चतुरानना, तरि मला जन्मास कां घातलें ॥१॥
१२.
श्लोक
ज्याचे मस्तकिं स्वस्थ राहे धरणीं मेरु वरी मोहरी ।
तो हा तीजवरी तटस्थ पडला सिंधू आला पोहरी ॥
अनंता आली अंतता आयुरदा आनंति झाली खुजी ।
केलें हें अघटीत काय, वाहवा शाबास दैवा तुझी ॥१॥
१३.
साकी
मारविलें ठेवूनि उपोषित तुज वर्षें चवदा ही ।
काय आतां जगीं आहे छी छी जगण्याची चव दाही ॥१॥
१४.
पद (चाल-ये धांवत अंबाबाई)
जय लाभ रावण घडे, लक्ष्मण पडे पडे रघुवीर ।
ठेवूनि शिरावर शीर ॥ बा रे, हें करिसि तूं काय,
त्यजिल कीं माय, तुझी प्राणसी ।
उन्मिळा पावें मरणासी ॥
जाहाले सर्व श्रम वृथा, भेटेना सिता, अतां आपणांसी ।
मी दाऊं वदन कोणासी ॥ हा शोक सिंधु आगळा,
फोडुनि गळा, रडे रघुवीर ॥ठेवून०॥
अस्वलादि कपिगण जाती, पुनरपि जाती, विपिन सेवाया ॥
नाडला बिभीषण वाया ॥ निंदितिल आपपर लोक,
लागला शोक, पाठ पुरवाया । अपकीर्ती मात्र उरवाया ॥
स्त्रीसाठिं वाढलें वैर, जाहलें गैर, रडे रघुवीर ।
ठेवूनि शिरावर शीर ॥
१५.
दिंडी
गेला माझा सौमित्र पाठिराखा ।
चकोराचा या पूर्ण चंद्र राका ॥
मला बोला विषवल्लि अंकुरा खा ।
कपीगण हो, एवढा मान राखा ॥१॥
मला प्रेमें बोलली याचि माय ।
माझा वत्स घेवूनी वना जाय ॥
तुझा बंधू सेवील तुझे पाय ।
सांभाळावें विशेष बोलुं काय ॥
१६.
श्लोक
येताना दिसलों आलों तुम्ही आम्ही लंकेंत बापा खरे ।
जातांना पडतील पाहुनि मला शंकेंत बा पाखरें ॥
राज्याचा सगळा विभाग सहसा साधावया आपुला ।
भावाचा स्वहितार्थ आड विजनीं यानें गळा कापिला ॥
१७.
पद
बा रे किंचित मसि बोल कांहीं । उठ सावध हो लवलाही ॥
गोरज समयीं आज निजण्याची । येवढी कां केलि घाई ॥
जिव धन खर्चून आदर केला । रावण जाणून व्याही ॥
रुसून पित्याकडे गेलासि माझी । सांगाया पुढें कुचराई ॥
प्रेमामृतपणें विष्णुदास म्हणे । मजकडे निरखून पाही ॥
१८.
कामदा
समजलों तुला राग कां आला । असून मारुती वीर आपुला ॥
धरुन शक्ति कां नाहिं मोडली । मजवरी कशी यानें सोडली ॥१॥
१९.
श्लोक
यानें पूर्वज जन्मतांचि आमुचा धावूनिया ग्रासला ।
नेतां चोरुन चोर जानकि वनीं हा स्वस्थची बैसला ॥
शक्ती घातकी सोडतां नच आली लज्जा मनीं बेश्रमा ।
वत्सा लक्ष्मणा, किमर्थ करिसी ऐशा वरीं उश्रमा ॥१॥
२०.
श्लोक
प्राणाला हरतील प्राण म्हणुनी जे मानिलें आपुले ।
केले तूज पुढें प्रसंग पडतां मागेंचि ते लोपले ॥
स्वाभावें परि जाति जाति वरती हीं जातिचीं माकडें ।
केला त्यासि समागम आधी हा दोष आम्हांकडे ॥१॥
२१.
श्लोक
ती रघुपतिची अशीं उत्तरें ।
ऐकतां कपिची चमु उत्तरे ॥
बोलती रडती अति घाबरे ।
वाचणें नलगे मरणें बरें ॥१॥
जव काल नाहिं आला रवि उदयाला ।
तव काल नाहीं मृत्युभय लेश याला ॥
उदयाअधि वल्लि आणितां द्रोणाचलाची ।
अश्वाकृती करिन प्रकृति या मुलाची ॥
२२.
पद (चाल-उद्धवा शांतवत)
कुणी लक्ष्मणाप्रति माझ्या वाचवा म्हणे रघुवीर ॥ध्रु.॥
जोवरी उद्यांचा नाहिं गगनांत उगवला भानू ।
तोवरी आणिल जो वल्ली तो धन्य त्याचे गुण वानूं ।
जो करिल यासि जिवदान आम्हि त्यास पित्यासम मानूं ।
चाल- हा केल्या अंगिकार । होईल थोर उपकार ।
किति बोलुं वारंवार । बोलतां होतो उशीर ॥१॥
कुणी तो सबळ चपळ निळ बोले ।
द्या आज्ञा मजला स्वामी । घेवोनि वनस्पति येतो परतुन तीन दिवसां मी ॥
तो त्यासि चिकित्सक बोले, हें कार्य पडेना कामीं ॥
चाल-मग द्विविध मैंद बळ खाणी । बोलती प्रतिज्ञा वाणी ।
येण्यास परत निर्वाणीं । द्विरात्र पाहिजे धीर ॥२॥
कुणी शत मत कथा वर्जोनि । गर्जोनि म्हणे कपिराजा ।
सोडून अतां भय चिंता तुम्ही स्वस्थ करा निद्रा जा ।
मी रविरथ गतवत जातो । आज पहा पराक्रम माझा ।
चाल-दवडाया अवघा खटका । पाहिजे दहा सक घटका ।
हा सत्य नेम नव्हे लटका । सुग्रीव बोलें गंभीर ॥कुणी॥३॥
अंगदाख्य पुत्र वालीचा । युवराज नातु इंद्राचा ।
उर कंटक दशकंठाचा । प्रिय पात्र रामचंद्राचा ।
बलवंत दंत नागाचा । जो काळ आसुर वृंदाचा ॥
चाल-तो म्हणे जोडुनि हात । येतों मी चार प्रहरांत ।
मग विष्णुदास म्हणे स्वस्थ । ठेविलें शिरावर शिर ॥४॥
२३.
दिंडी
रात्रिमाजि जावोनि वल्लि आणी ।
असा वीर जन्मला नाहिं कोणी ।
असें क्रोधें बोलतां चापपाणी ।
कपी भूमि शिंपिती नेत्र पाणी ॥१॥
२४.
श्लोक
ज्याला सदैव नमितो प्रभु आमराचा ।
त्याला विकल्प येतो आजि पामराचा ॥
बोला विकल्प येतो तरि काय बोला ।
बोला परीस धरणें बरवा अबोला ॥१॥
२४. पद (चाल - इस तनधनकी)
उठवितो दशरथ भूप कुमारा ।
आज्ञा करा परि श्रीरघुवीरा ॥धृ॥
करतळीं अमृत कर चंद्रबिंबा ।
चोळीन ज्या परी परिपक्व आंबा ॥
काढीन सार सुधारस सारा ।
आज्ञा करा परी श्रीरघुवीरा ॥१॥
दंडोनिया सहदेव नगारी ।
उदया आधीं रवि घालिन गारीं ।
पुनरपि नये कधि अंबर उदरा ।
आज्ञा करा परी श्रीरघुवीरा ॥२॥
लक्ष्मणाकडे करितांचि हात ।
पाडीन यमधर्माचे मी दांत ॥
तोडिन कर दंड पाशचि सारा ।
आज्ञा करा परी श्रीरघुवीरा ॥३॥
तुडवून टाकीन दंत शत तुंडे ।
क्षणमात्रें आणिन अमृतकुंडें ॥
विष्णुदास म्हणे धीर उदारा ।
आज्ञा करा परी श्रीरघुवीरा ॥४॥
२५.
साकी
क्षणात द्रोणाचलावरी ही नेईन भूमि सुवेळा ।
किंवा येथें येईन जाईन रात्रीतुन शत वेळा ॥१॥
२६.
श्लोक
तदा वाटे चिंताविधि मधें हनुमंत तरणी ।
भुभुःकारें जेव्हां नमन करुनी रामचरणीं ।
म्हणे जातों देतों क्षण न लगता वल्लि आणुनी ।
उडाला आकाशीं जय जय रघूवीर म्हणुनी ॥१॥
२७.
पद
धाकटया दशरथ प्रियपुत्रा । लागली शक्ती सौमित्रा ॥
घडी किती जातो त्या वेगां । पिता म्हणे गणित न करा वेगा ।
पाहाता लांगुल भुजंगा । गमें ती स्वर्गींची गंगा ।
आली दधि सिंधू निकट कीं । पातला मारुती त्या घटकीं ॥१॥
२८.
ओवी
गुरु कपटाचा काल नेमी । सिद्धीस ने जो नेम नेमी ।
ज्याला अभ्यास साधला नेहमीं । घातपात करावयाचा ॥१॥
२९.
साकी
खळ रावण त्या खळासि धाडी कपिला विघ्न कराया ।
द्विज रुपानें मार्गीं बसला सजला फुकट मराया ॥१॥
३०
श्लोक
कोठून येणें पुढें कोठें जाणें । येथें विसावा क्षणमात्र घेणें ।
असल्यास क्षुधा तुम्ही घ्या फराळा । विचार अगदी धरुं ने निराळा ॥१॥
३१.
ओवी
मार्ग क्रमण्याचे व्यापारी । तृषानळें पीडलो भारी ॥
उदक प्राशितां सरोवरीं । मगरी पायीं झोंबली ॥१॥
३२.
श्लोक
आणावया खचित मी द्रोणागिरीला ।
जाणें असे सहज मालक चाकरीला ॥
घ्या दक्षिणा सकटही तुम्हि रामनाम ॥
आतां म्हणा अखेरिचा मुखीं राम राम ॥१॥
३३.
दिंडी
लक्ष्मणाते व्हावयासि आराम ।
तुला प्रार्थी तो दाशरथी राम ॥
वल्लि देतो होईल तुझें नाम ।
गिरीराया हें उचित असे काम ॥१॥
३४.
श्लोक
कुणाचा आहे राम कुणी कुठला तो कोण लक्षुमण ।
नाहीं ठाऊक यक्ष राक्षस असे क्षत्रीय कीं ब्राह्मण ॥
वल्लीचें तरि पान एक इथलें आप्राप्त देवां नरा ।
यासाठीं अगदीच नांव तूं इचें सोडून दे वानरा ॥१॥
३५.
पद (पुरवणी)
मलिना मतिमंदा द्रोणा । निर्दया मूढा पाषाणा ।
न चले माझे पुढें बहाणा । पायिंच्या पायिं बर्या वहाणा ।
केलें हें आर्जव फूकटकी ॥पातला० ॥१॥
३६.
कामदा
बिघडली बहु रुद्र प्रकृति ।
उग्र रुप दिसे कुंकुमाकृती ॥
भ्रुकुटी युव धनू ऊर्ध्व सरकली ।
पुच्छ आपटितां भूमि थरकली ॥१॥
दिधलि लांगुलें वेष्टनें तिनें ।
तृण आरोपिती जेवि वेष्टून ॥
बळें आकर्षिता लागल्या कळा ।
घटित जाहला गर्व मोकळा ॥२॥
३७.
पद
कपींद्रा चुकलों आतां सोडी । बंधनें पृच्छाचीं काढीं ॥
नको करुं मसि ओढाओढी । येतो मी स्वयें ठेवुन गोडी ॥
आतां तुझी कळली बळकटीकी ॥ पातला ॥१॥
३८.
श्लोक
तटतटा तुटती गिरिची मुळें ।
प्रतारणा कपिसी घडल्यामुळें ॥
काढला उपटिला धरिला करीं ।
करतळीं कुणबी जशि भाकरी ॥१॥
३९.
ओवी
अर्धरात्रिचा मान भरतां ।
दुःस्वप्न झालें राज भरतां ॥
कृष्णसर्प वास हस्ता ।
दंश करिता जाहला ॥१॥
४०.
साकी
प्रचंड द्रोणाचल वल्लीचा लोळ दिसे गगनांत ॥
दुःस्वप्नाची हेचि प्रचीती शंका ज्याचें मनांत ॥१॥
४१.
कामदा
शरकरस्थळी भेदतां पडे ।
उडिन मारवे तेधवां पुढें ॥
बहुत जाहला जीव घाबरा ।
आठवि मारुती श्रीरघुवीरा ॥१॥
४२.
पद (चाल - कोणी तुज गांजियलें)
बा यथार्थ हा वृत्तांत सांग वानरा ।
तूं किमर्थ आठविसी जानकीवरा ॥
आहेस परम आप्त मित्र खचित वाटतें ।
पाहतां नेत्रीं अश्रुबिंदु दाटते ॥
येतो हर्ष शोक पोटीं कां गिरिधरा ॥बा०॥१॥
सांग नाम तूं आहेस कोण कोठला ।
तो वनांत रामचंद्र कोठें भेटला ॥
ज्याचे संगें स्त्रीसहित बंधु दूसरा ।बा यथार्थ० ॥२॥
ते त्रिवर्गहि त्रिकाल आहेत कीं सुखी ।
तूज शपथ तूं त्वरित बोल या मुखीं ॥
भावे बोले विष्णुदास जोडुनी करा । बा यथार्थ० ॥३॥
४३.
दिंडी
कपी बोले रघुवीर चापपाणी ।
रामकार्या घातकी पापखाणी ॥
अतां कां रे प्रार्थिसी दीनवाणी ।
परी दिससी तूं सितापती वाणी ॥१॥
४४.
श्लोक
तो सितावियोग घोर काननांत पाहिला ।
शोकयुक्त म्यां नमून देह त्यासि अर्पिला ॥
कांहिं कामीं पातलों मी स्वामिकार्य सारथी ।
रामदूत वायुसूत माझें नाम मारुती ॥१॥
४५.
श्लोक
झाली वाट भली प्रसंगिं कळली बंधूसि बंधू दया ।
पहिल्यानें जातों यथार्थ स्वर्गभुवनीं सौमित्र मित्रोदया ॥
त्याचे मागुन रामचंद्र जातो तत्शोक पारायण ।
गेल्या जानकिहि समाप्त जहालें अवघेंचि रामायण ॥१॥
४६.
साकी
जानकीदास रावण रामासी थोर वाटलें वैर ।
त्यजिली वीरश्री लक्ष्मणानें शेवटि केलें गैर ॥१॥
४७.
ओवी
बाणें भेदिलें करस्थळ । तेणें झाले प्राण विकळ ॥
आतां घेऊन द्रोणाचल । जाणें मजसि घडेना ॥१॥
कपी तूं सर्वथा चिंता न करी । बैसे माझे बाणावरी ।
पाठवितों सुवेळापुरीं आर्ध क्षण न लागतां ॥२॥
४८.
दिंडी
काढि बाण आकर्ण वोढि चाप ।
म्हणे झाला हा वैरी वडिल बाप ।
आला उदया द्याया अम्हा ताप ।
आतां यासी दंडितां नाहीं पाप ॥१॥
४९.
साक्या
धावति कपि द्रोणाचल पर्वत दगडभार उतराया ।
म्हणति आम्हाला बा सेतू तूं संकटसिंधु तराया ॥
लक्षुमणाच्या वदनीं वल्लि दिव्य सुधारस वोपी ।
उठला तेव्हां तो गमला जणुं गेला होता झोपी ॥
५०.
पद (पुरवणी)
आनंदें देती भुभुःकार । करिती कपि जयजयकार ॥
मानुनि मारुति उपकार । जाहला मग रघुविर फार ॥
विष्णुदासावर लंपट की । पातला मरुति त्या घटकीं ॥१॥