मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
गोपीचंदाख्यान

कीर्तन आख्यान - गोपीचंदाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


गोपीचंद हा बंगालचा राजा होता. ह्याच्या आईचे नाव मैनावती असे होते; हिने जालंधरनाथ हा गुरु केला होता म्हणून गोपीचंदाने

त्यास कूपांत टाकून दिले. परंतु पुढे त्याच्याच कृपेने गोपीचंद विरक्त झाला; ही कथा ह्या आख्यानात सांगितली आहे.

कूपांतोनि जालंधर ॥

कानिफा काढीतसे स-स्वर ॥

दृष्टी पहाती नारी नर ॥

जैसा भास्कर उगवला ॥१॥

दिव्य रत्नाच्या सभोवती ॥

जो-हर परीक्षवंत जैसे मिळती ॥

तैसे सात शत शिष्य निश्चिती ॥

दर्शन घेती सद्गुरूचे ॥२॥

पूर्णिमेचा निशा-कर ॥

त्यासी आवडी लक्षिती चकोर ॥

तेवि नगर-वासी नारी-नर ॥

जालंधर पाहत ॥३॥

मैनावती प्रेमेकरोनी ॥

मस्तक ठेवोनि सद्गुरु-चरणी ॥

प्रेमे अश्रु वाहती नयनी ॥

तेणे चरण दोन्ही धुतले ॥४॥

जालंधर सिद्ध महा-राज देख ॥

कानिफा तयाचा साधक ॥

त्याने युक्ति करोनि अमोलिक ॥

भू-पतीसी जीवविले ॥५॥

भस्म न करिता त्याची काया ॥

अ-मर केले स-त्वर राया ॥

निरसोनि सकळ माया ॥

केली छाया कृपेची ॥६॥

रायासि अनु-ताप जाला पूर्ण ॥

म्हणे सद्‍गुरूंचे धन्य महिमान ॥

आता संसार-माया त्यजुन ॥

वैराग्य घेणे निश्चित ॥७॥

मग प्रधानासि विचारोनी ॥

पुत्र बैसविला भद्रासनी ॥

जालंधरासी नमस्कार करोनी ॥

कर जोडोनी विनवीत ॥८॥

म्हणे मी शरणागत पूर्ण ॥

जोग द्यावा जी मजकारण ॥

काही न करावा अनमान ॥

म्हणोनि चरण धरियेले ॥९॥

यावरी सद्गुरु बोलती वचन ॥

वैराग्य नव्हेचि तुजलागून ॥

नको टाकू संसार-भान ॥

शेवट होणे अ-घटित ॥१०॥

विष घेववेल ग्रासोग्रासी ॥

पायी चालवेल आकाशी ॥

बाही पोहोनि सागरासी ॥

पैल तीरासी पाववेल ॥११॥

मुठीत धरवेल कृशान ॥

कुडी सांडिता धरवेल प्राण ॥

आकाशाची मोट जाण ॥

वस्त्रांत बांधोन आणवेल ॥१२॥

पृथ्वीचे वजन होईल कोडे ॥

करवेल ब्रह्मांडाची घडामोड ॥

परि वैराग्य बहुत अवघड ॥

जाण रोकडे नृप-नाथा ॥१३॥

आम्ही अशिर्वाद दिधला राया ॥

तेव्हा अ-मर जाली तुझी काया ॥

आता वैराग्य घेवोनिया ॥

व्यर्थ कासला शिणतोसि ॥१४॥

गोपीचंद देत प्रत्युत्तर ॥

स्वामीची कृपा मजवर ॥

असता माया अ-निवार ॥

बाधू न शके सर्वथा ॥१५॥

पूर्ण अनुतापी वोळखोनी चिन्ह ॥

वैराग्य दिधले त्याजकारण ॥

सैली मुद्रा कंथा लेवोन ॥

वि-भूती-चर्चन सर्वांगी ॥१६॥

सद्गुरु म्हणती ते अवसरी ॥

भिक्षा मागे घरोघरी ॥

रायाची पट्टराणी सुंदरी ॥

गेला मंदिरी तियेच्या ॥१७॥

आलेख म्हणोनिया तेथे ॥

म्हणे भिक्षा लौकरी आणि माते ॥

ग्रामवासी लोक बहुत ॥

आश्चर्य करित तेधवा ॥१८॥

वैराग्य-शील देखोन भर्ता ॥

आक्रोशे रुदन करी कांता ॥

म्हणे कैसी विपरीत जाली बार्ता ॥

काय नृप-नाथा हे केले ॥१९॥

म्या किंचित अ-न्याय केला राया ॥

यास्तव टाकिली प्रपंच-माया ॥

नख न लगे तया ठाया ॥

कुठार कासया पाहिजे ॥२०॥

परम सकुमार तुमची कांता ॥

यावरी चर्चिली शुभ्र विभूती ॥

नाना उप-चार भोग संपत्ती ॥

टाकोनि अनु-तापी का जाला ॥२१॥

तुमचे चरण नृप-नाथा ॥

कोणती येवोनि धुईल कांता ॥

हेचि बहुत वाटे चिंता ॥

सांगा तत्त्वता मजपासी ॥२२॥

गोपीचंद देत उत्तर ॥

गंगा यमुना सरिता थोर ॥

माझे चरण निरंतर ॥

धुतील माते सर्वथा ॥२३॥

गोपीचंदासि पुसे गोरटी ॥

कोण बोलेल तुम्हांसि गोष्टी ॥

म्हणोनि चिंता वाटते मोठी ॥

उठाउठी सांगा ते ॥२४॥

यावरी म्हणे वैराग्यशील ॥

किनरी सांगेल गोष्टी प्रांजल ॥

तुम्ही टाकोनि माया-जाळ ॥

व्यर्थ हळहळ न करावी ॥२५॥

यावरि बोले कुरंग-नयनी ॥

कोण तुम्हांस बैसवील भोजनी ॥

हेचि चिंता अ-पार मनी ॥

मजलागोनि वाटती ॥२६॥

गोपीचंद बोले प्रत्युत्तरी ॥

तुज ऐशा माता घरोघरी ॥

कर-तळ भिक्षा निर्धारी ॥

निरंतर घालतील ॥२७॥

कांतेसि बोलोनि ऐशापरी ॥

तेथोनि निघाला झडकरी ॥

सोळावे राण्या ते अवसरी ॥

शोक करिती आक्रोशे ॥२८॥

ते स-विस्तर सांगता वार्ता ॥

तरी ग्रंथा विशेष वाढेल कथा ॥

गोपीचंद त्यजोनि माया मम-ता ॥

निघे तत्त्वता वेगेसी ॥२९॥

सद्गुरु-कृपा होतांचि पूर्ण ॥

मन ते होवोनि गेले उन्मन ॥

स्व-रूपी लागले अनु-संधान ॥

नाठवे मी कोण सर्वथा ॥३०॥

भिक्षा मागता नगरांतरी ॥

गेला मैनावतीच्या घरी ॥

म्हणे माते दुध-भात निर्धारी ॥

भोजन सत्वरि घालावे ॥३१॥

पुत्र देखोनि वैराग्य-शीळ ॥

जननी हर्षली ते वेळ ॥

म्हणे माझे उदरी येवोनि सकळ ॥

उद्धरिले कुळ सु-पुत्रा ॥३२॥

जैसे होते मातेच्या मनात ॥

तैसेच तुज घडले सत्य ॥

धन्य सद्गुरु जालंधर-नाथ ॥

महिमा अद्भुत तयाचा ॥३३॥

निरसोनि सकळ मम-ता माया ॥

अ-मर केली तुझी काया ॥

पूर्ण कृपेची केली छाया ॥

त्याचिया पायां चिंतावे ॥३४॥

मातेसि नमस्कार करोनि ॥

गोपीचंद निघाला तेथुनि ॥

म्हणे द्वादश वर्षे फिरोनि ॥

दर्शनालागी येईन ॥३५॥

माता सिकवी तये क्षणि ॥

छप्पन्न देश पाहे नयनी ॥

परी चंपावती तुझी भगिनी ॥

तिच्या दर्शना न जावे ॥३६॥

परम लाघवी ते वेल्हाळी ॥

तुज पाडील माया-जाळी ॥

म्हणोनि तीस नेत्र-कमळी ॥

पाहू नको सर्वथा ॥३७॥

ऐकोनि मातेचे वचन ॥

मौनेचिकेले गमन ॥

गोपीचंद त्वरेकरोन ॥

करीत गमन तेधवा ॥३८॥

नाना-परीची तीर्थे आनेगे ॥

दृष्टीसि पाहे मनो-वेगे ॥

तो ग्रंथी विस्तार लिहिता सांग ॥

कथा विशेष वाढे की ॥३९॥

असो पाहिले देश बहुत ॥

गोपीचंद महा-विरक्त ॥

उदास स्थाने पहात पहात ॥

पर-देशासि पातला ॥४०॥

त्याची भगिनी चंपावती ॥

भद्रावती-नगरी होती ॥

तिचिया घरासी अवचिती ॥

गोपीचंद पातला ॥४१॥

आदेश म्हणोनि अंगणात ॥

म्हणे भिक्षा घाली माते ॥

चंपावती बाहेर येत ॥

तो देखिला अतीत दृष्टीसी ॥४२॥

दासी म्हणती तिजलागोनी ॥

आम्हासि विपरीत दिसे स्वामिनी ॥

गोपीचंदा ऐसा नयनी ॥

जोगी आम्हांसि भासतो ॥४३॥

चंपावती न्याहाळोनि पाहे ॥

तो आपला सहोदर होय ॥

ह्रदय दाटले परम मोहे ॥

सद्गदित होय तेधवा ॥४४॥

दासी पुसती जोगियाप्रती ॥

तुमची जन्म-भूमि कोणती ॥

कवणे देशी पूर्व-स्थिती ॥

आम्हांप्रती सांगावे ॥४५॥

ऐकोनि जालंधराचा सुत ॥

तयांसी काय उत्तर देत ॥

गौडबंगाल-देशी निश्चित ॥

कांचन-नगर असे की ॥४६॥

तेथे त्रैलोक्यचंदाचा सुत ॥

गोपीचंद मी राजा निश्चित ॥

गुरु-कृपेने अकस्मात ॥

जालो विरक्त संसारी ॥४७॥

ऐसे ऐकोनिया वचन ॥

चंपावती करी रुदन ॥

म्हणे बंधु वैराग्य पूर्ण ॥

काय निमित्त घेतले ॥४८॥

सोळा शते राण्या लावण्य-खाणी ॥

त्यांविरहित पट्टराणी ॥

दिव्य मंदिरे हेम-वर्णी ॥

रत्‍न कोंदणी बैसविली ॥४९॥

इंद्र-पदा ऐसे निश्चिती ॥

तुझे राज्य होते भू-पती ॥

ते विलास टाकोनिया प्रीती ॥

उदास-वृत्ती धरिली का ॥५०॥

आता रत्‍न-खचित मठ जाण ॥

तुजलागी देते बांधोन ॥

ये स्थळी निरंतर राहोन ॥

उदास न होणे सर्वथा ॥५१॥

रत्‍न-खचित मेखळा ॥

करोनि देते मी भू-पाळा ॥

चंपावतीचिया डोळा ॥

अश्रु-पात वहाती ॥५२॥

यापरी भगिनी ते वेळ ॥

घालू पहातसे माया-जाळ ॥

परी गोपीचंदासि वैराग्य-बळ ॥

निश्चय न ढळे सर्वथा ॥५३॥

सद्गुरु कृपा जालिया पूर्ण ॥

प्रपंची निवळे त्याचे मन ॥

चंपावतीच्या मंदिरातून ॥

अति त्वरेने निघाला ॥५४॥

छपन्न देश हिंडोनि जाण ॥

घेत सिद्ध पुरुषांचे दर्शन ॥

ऐसी द्वादश वर्षै पूर्ण ॥

लोटोनि गेली अनायासे ॥५५॥

मागुती आला कांचन-पुरा ॥

आपुल्या मंदिरी बैसली दारा ॥

भिक्षा स-त्वरा तिसी मागे ॥५६॥

गोपीचंद विचार करी चित्ती ॥

जन्म-भूमीस जावे मागुती ॥

एकदा भेटोनि मातेप्रती ॥

मग तीर्थासी निघावे ॥५७॥

जावोन मैनावतीच्या घरी ॥

दर्शन घेतले ते अवसरी ॥

मातेने दुध-भात झडकरी ॥

भोजन घातले तेधवा ॥५८॥

सकळ सिद्धांचा मेळा ॥

ते देशा गोपीचंद चालिला ॥

गुरु-कृपेने जिंकोनि काळा ॥

अमर झाला अनायासे ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP