दक्षिण डगरीवर या वेळीं उभें कोणसें राहे;
नजर किलबिली थेट खालती फेकुनि कोणी पाहे.
हाक मुलीची ऐकुनि आला शेतांतूनी बाप,
मानाजीचें घाबरलें मन कितीतरी निष्पाप.
परंतु पाहुनि दोघांना तो क्षणभर झाला मूक;
आलें ध्यानीं, काय जाहली होती त्यांची चूक.
आणि तयाला मुरारचें ही कौतुक होतें फार;
परिचित होती थट्टा असली मुरारची अनिवार.
आज पाहुनी समोर खालीं विनम्र दोघांनाही,
डोळ्यांचें तो पुरें पारणें आपुल्या फेडुनि घेई.
तीच मनींची इच्छा आता बळावली शिरजोर,
अश्रु आले नयनीं, अपुली बघुन पोरकी पोर !
क्षणांत दिसलें -‘ आपण घेउन परस्परांचे हात,
मड्गल वाद्यस्वरीं देतसूं परस्परां हातांत !’
तों आशेचें चित्र लोपलें ! माघारा तो गेला-
भावि सुखाच्या सुधारसाचा सेवित कल्पित पेला !
क्षणांत हसली इकडे बाला, पाहूं लागे खाली;
कधी नव्हे ती आली होती गालीं नाजुक लाली !
मनिंचे सारे निश्चय आता मुरारचे ढासळले,
हसर्या गालांकडे तियेच्या डोळे त्याचे वळले.
भाव मनींचा अन्तरडिगचा कळला परस्परांना;
परन्तु आता तिसरें बोलुनि उगिच मोडिती माना.
एक बोलतां एक निघावा अर्थ तयांतुन कांही,
आणि नेमका मनांतल तो रीत प्रेमाची ही.
शब्द बोलले, शब्द सोडले बोल बोलतां त्यांनी,
परस्परांचे पूरक झाले मनामधे उमगोनी.
भावनेंतली भाषा जों जों ओठांवरती थाम्बे,
मुकीं होउनी तोण्डें, भाषण डोळ्यांचें तो लाम्बे.
धीर तयाने कितितरि केला बोलायातें कांही,
परि हेतूचा शब्द एकही वदनीं फुटला नाही.
विचार नाना मनीं येउनी खळबळ कांही चाले,
झणीं हेरलें सगुणेने हें, परी न कांही बोले.
तोंच घडयाचा ये भरल्याचा कानांवर आवाज,
आणि मावळे गालांवरचि सुन्दर हसरी लाज.
वाकुन आंतिल कुडच्याने ती फाजिल पाणी काढी,
डोक्यावर तो ध्याया, चुम्बन गुण्डाळी ती जाडी.
मुरडुन वरती तों सगुणेची नजर चोरटी वळली,
चुकुन मिळाले डोळे आणीक मनिंची भाषा कळली.
मुरार होउनि पुढें, वाकुनी घडयास घाली हात,
उचलुन डोक्यावर देतांना बोटें मिळलीं आंत !
स्पर्श जाहला ! अड्ग थरारे ! रोम उभारे अड्गी !
पुन्हा एकदा मनांत झाली खळबळ कांहीं जड्गी !
धडा ठेवुनी तोण्डावर तो झाडी भिजलीं बोटें,
शिन्तोडयाने राग मुखावर उसना तीच्या उमटे.
डोळेभर मग पाहुनि त्याला, गेली ती वर नीट;
परी न्यहाळी अजून पुढली मुरार पाऊलवाट !
भानावर तो क्षणांत येउनि दीर्घ उसासा टाकी,
आज न राहे चित्त तयाचें त्याच्याजवळी बाकी !
गुरांवासरां पाजुनि पाणी नीट मळ्याल गेला;
खळखळ मागिल ओढा नाई अपुल्याशीं रड्गेला !
घरा पोचली सगुणा होउनि नव्या विचारीं दड्ग,
न कळे तिजला वृत्ति मनाची होय कशाने भड्ग.
गोन्धळलें मन, ओढ लागुनी मोहक आंतुन कांही,
एकसारखें गोड सुराने हृदयीं कुणिसें बाही.
विस्मित नयनीं जरा थरारे भीती आणिक लाज;
नव्या सृष्टीचें दार उघडलें तिच्यापुढे कीं आज?
तशीच जाउनि घरांत ठेवी डोईवरचा माठ,
मोहनमन्त्रें आणि भारुनी उभी राहिली ताठ.
आवरुनी मन तोंच, भोवती पाहूं लागे कांही,
परी पित्याची प्रेमळ मूर्ती घरांत दिसली नाही.
तशीच गेली मागिलदारीं धावत वेगें नीट,
बापाजवळी जाण्यालाही व्हावें लागे धीट.
तुळशीपुढती आसन घालुनि मुख पूर्वेला करुनी,
पिता तियेचा बसला होता ध्यान रवीचें धरुनी.
नवीन नव्हतें कांही, होता नित्यक्रम हा त्याचा,
डोळे मिटुनी हात जोडुनी पुटपुटला तो वाचा.
परंतु नाही धीर निघाला सगुणेला त्या काळीं,
लडिवाळपणें मागुनि गेली मानाजीच्या जवळी.
हात टेकले खान्द्यावरती, बोटें होतीं गार,
तोंच जिवाची सगू पाहिली ध्यान निमालें पार !
‘किति वर आला दिसू ह्यो बाबा ! लई लाम्बलं ध्येन?
टळून ग्येला वक्त ! न्हाई का न्याहरीचं ध्येन?
व्हतं चालल कसलं इक्तं ध्येन आजला बाईई?
बोलुनि इतुकें पित्याकडे ती डोळे लावुनि पाही.
‘लई लाम्बलं खरंच , पोरी, पन् या द्येवासड्ग -
करित व्हतों मी ग्वाष्ट जराशी, गाऊनश्येन अभड्ग.
इच्यारली म्यां ग्वाष्ट जिवाची, द्येव बोलला कांही,
म्हनुन् लागला येळ जरासा ! न्यहारिला चल् बाई !
अजूनश्येनी गुरांवासरां न्हाइ दाविलं पानी !
चल् ग बाळे ! ’ बोलत उठला तिज तो कुर्वाळूनी.
सगुणा हसुनी पुढे चालली; बाप मागुनी जाई,
आश्चर्यै ती उत्सुक झाली प्रश्न कराया कांहीं
मनास विचारी - ‘ ग्वाष्ट कशाची ? द्येव बोलला काय ?’
ओठावरचे प्रश्न राहिले परि ओठावर, हाय !
मनास लागुनि चटका त्याचा उत्सुकली ती फार,
घरकामाने परी विसरली मनिचे सर्व विचार.
अम्बेराई मानाजीची सर्व सम्पदा होती,
राई म्हणजे होते त्याचे केवळ पाचूमोती.
अम्बेराईभोवतालचीं काळवटीचीं रानें,
केली होती निजकष्टार्जित पुञजी मानाजीने.
ऐन सुखाच्या परी घडीला सोडून बाळ सगूला.
मालकीण ती गेली, आणिक विटला तो वेळूला !
काळाचा हा घाव बैसतां, सोडून वेळूगांव,
अम्बेराईमधे राहिला विसराया तो घाव.
मित्र जिवाचा एक शिलोजी राहे वेळूगांवीं,
प्रेमळ त्याची कान्ता सगुवर निर्मळ माया लावी.
मित्राजवली ठेवुनि अपुली मानाजी मग बाळ,
अम्बराईमधि कण्ठाया जाय एकला काळ.
एकान्तानें चित्त विरसतां परन्तु फिरला बेत;
हळूच त्याने शिलोजिला मग कथिला मनिंचा हेत.
अवघड वाटे किती तयांना; तळमळ परि पाहून-
उदारधीं ती बाळ सगूला करिती दूर, रडून !
वेळू गावीं जीव अडकला आता मित्रासाठी,
भेटायाची चुकली नाही परि त्याची परिपाठी.
सगू, शिलोजी, अम्बेराई तीन जिवांचे पाश;
उतले आता मानाजीला, लागे त्यांचा ध्यास.
परि कान्तेच्या स्मृतिंनी जेव्हा व्याकुळ झाले प्राण,
गिळिलें त्याने दु:ख पाहुनी संगू- सुखाची खाण.
माया लागे सगुवर त्याला वर्षे झाली सोळा,
आज जिवाची सर्व सम्पदा एक पोटचा गोळा.
सुशीलतेने, गुणिलपणाने आकर्षुन पित्याला,
माया लावी सगू; पिताही साड्गे ज्याला त्याला.
शेजाराचे केळमळ्याचे मालक तालेवार
अम्भेरीचे पाटिल होते कदम गाजले फार.
लेक तयांचा मुरार झाला खेळगडी सगुणेचा,
ओढयाकांठीं काळ लोटला त्यांचा बाळपणींचा.
कधि खेळांतिल पदार्थ तीचे मुरार खाई सारे,
सगुणेवरती रुसून जाई केव्हा भरतां वारें.
तिने उपाशी लटूपटीच्या राहावें संसारीं,
समजावून मग तिने गडयाला आणावें माघारी.
केव्हा मिळतां खाया कोठे, अधे त्याच्यासाठी
राखुन, देई हळुच त्याला भेटुन ओढयाकांठी.
मानाजीच्या कौतुकलेल्या हृदया भरतें येई,
लागट असली पोर पोरकी जीव ओढुनी घेई.
खपून राणी कधी करी ती हलके त्याचें ओझें,
हुशार केलें तिल पित्यानें, जरी पुरविलीं चोजें.
केव्हा सगुणा करी पेरणी, केव्हा राखी माळा;
केव्हा हाकी मोट पित्याची मुरारसड्गें बाला.
शेतकापणी म्हणजे होती तिची जिवाची हौस,
घ्ररकामें ही आवरुनी ती जनका दे सन्तोष.
ध्याननन्तर आज पित्याच्या नव्हती जीवा शान्ती;
गोड सगूशीं शब्द बोलणें, बोले तें वरकान्ती.
झालें तिजला आज कसेंसे बघुनी त्यास उदास,
न कळे, कसल्या आंत वेदना व्याकुळ करिती त्यास !
काम सुचेना ओढयाकांठी उदास झाली सृष्टी,
मधेच केव्हा गहिवरुनी मन, भरुनी येई दृष्टी !
कुणा पुसावें ? तिच्या मनाची हुरहुर न कुणी जाणे;
आणि कमण्डलु पुढे चालला गुज्जत अपुलें गाणें !