आवेगाने गाडी धावे सैतानापरि धीट,
मधेच गगना गर्जुन टाकी, फुड्कुन कर्कश शीट.
वेगासरशीं झाडें, डोड्गर पळती मागे मागे,
मुरास वाटे ‘सृष्टी ही का सोडुन जाया लागे?’
धावूं लागे सैरावैरा मानस त्याचें क्षुब्ध,
पुढेच धावे गाडीसड्गे परि तो राहे स्तब्ध.
सृष्टीचे पट अस्फुट गेले जेव्हा पुढुनी दुर,
जीवन दिसलें मागिल, उठलें आणि मनीं काहूर.
तोंच तुणतुणें, डफ वाजवुनी कुणी लावणी गाई,
मुरारचें मन खडबडुनी तों सहज ओढलें जाई: -
दारुची लावणी
गुणगम्भीर धनी ।पुरे निशापाणी । झाली संसाराची धुळधाणी !
विनवितें जोडुन ।हात, पायां पडून । सोडा दारु ऐका एवढी वाणी ॥ध्रु०॥
होती दारीं झुलत ।किति लक्ष्मी डुलत
भरल्या घरांत नव्हती वाण,
गुरें ढोरें वाडा । बैल गाडी घोडा ।
धनधान्य बाळें गुणखाण.
शेतवाडींत किति । पिकलें सोनें -मोतीं
फुलाफळांनी भरली राई,
पाखरांना चारा । गरिबांना थारा
करत्याची किती चतुराई !
मोहर आला किती वैभवाला !
किति कीर्तीस बहर पालवला !
प्रीत जडली थोर । गेला जिवाचा घोर
एक झालों राघूमैनेवाणी,
पुरे निशापाणी । झाली संसाराची धुळधाणी !
गेला सुखाचा काळ । किती सड्गे , न ताळ
फिरलीं भोवती सोनेरी किरणें,
नव्हतें जीवास भान ।केलें प्रीतीचें पान
जणु ढगांत बिजलीचें फिरणॆं.
तोच मोहावया ।आली कशी बया
गेली जादूभुलावण करुनी,
काय साड्गावी गत । सख्या, नेलें सड्गात
तिनें रात्रन्दिन हात धरुनी.
झाली क्षणांत वैभवाची माती !
गेलीं घरें, गुरें शेतीभाती !
लागे दैवाचा बाण । झाली घरांत वाण
आढया गेलें वळचणीचें पाणी !
पुरें निशापाणी । झाली संसाराची धुळधाणी !
घरी झाला अन्धार । डोळां पाण्याची धार
नाहीं उरला घरामधि दाणा,
पाड्घराया नुरे । हुडहुडी भरे
कुठ्ली मायेची ऊब् ध्यानीं आणा.
घडले उपास पोटा । प्राण आले कण्ठा
बाळें झालीं किती दीनवाणि,
जणु दुधार सुरी । जाई चिरत उरीं
बान्धवांची जीवघेणी वाणी !
साड्गूं कुणा जिवाची मी हाय !
पाहूं पोटी कुणाच्या मी माय !
आता , बाळांची आण ज! द्याहो एवढें दान
किती गाऊं नाथा, रडगाणीं !
पुरे निशापाणी । झाली संसाराची धुळधाणी !
गोड रड्गले गाणॆं त्याचें, जन झाले तल्लीन,
चवली, पैसा कुणी अणेली देती थोर लहान.
गाणें ऐकुनि अनुतापाचे डोळ्यांमधुनी पाणी -
टपके खाली गालावरुनी पानदहिवरावाणी.
खिशांत गेला कर स्वभावें, दिसली सगुची भूतीं,
‘जपून वागा !’वचन थाम्बवी; न करी आशापूर्ती.
शाहीराला अश्रूंवांचुन द्यावें त्याने काय !
कोण जाणतो व्याकुळलेल्या दीन मनाची हाय ?
दोन दिसांनी मुम्बापुरिच्या परेळच्या गिरणींत,
मुरार गेला उद्योगाला दीनजनांसमवेत.
गिरणीमध्ये दिसले त्याला पोटाचेच हमाल,
पूर्वस्मृतिंनी त्याच्या, केला हळवा जीव कमाल.
वाटे त्याला ‘पोट - अरेरे ! काय चीज ही देवा !
पोटासाठी हाय, करावी कुणीं, कुठे ही सेवा !’
आणि मागलें जीवित दिसलें मनश्चक्षुला सर्व,
आणि कळालें कसा जाहला हरण आपुला गर्व !
कशी बशी मग मिळे नोकरी पज्चवीस रुपडयांची,
उपकाराच्या भारें झाली गुलाम वृत्ती त्याची.
परेळमधल्या कोन्दटलेल्या गल्लीमधली खोली -
अता मुराचा आश्रम झाली, जमीन जींतिल ओली
काळीं भुरकीं जुनीं केम्बरें कधिचीं लोम्बुन वरती,
भिववित होतीं भेसुर रुपीं नजर नवी ओझरती.
भिन्तीवरला मेन्चटलेला धुरकट काळा रड्ग,
दारिद्र्याचें रुप दावुनी करी मनाचा भड्ग.
ओबडधोबड भिन्तीमधल्या पुढती आल्या कोचा,
ढेकुण-पिसवा -डांसां झाल्या निवास मधल्या खाचा.
कोन्दटलेल्या दमट हवेची भरुनिया दुर्गन्धी,
मृत्युलोकच्या व्यापाराची चालवि तेजीमन्दी.
भेसुर येउन तीच कल्पना किंवा काय मनांत.
रविचीं किरणें धजलीं न मुळी शिरावायाला आंत.
कर कर वाजुन दार मोडकें, गळे पिठाचा चूर,
सताड उघडें पडलें तरिही राहे आंतच धूर.
निजावयाला पुरेल इतुकी लाम्बी रुन्दी थोर,
कुणीं म्हणावें ‘इथे डाम्बले तुरुड्गांतले चोर.
तीन वितींची निरुन्द पडवी दाराच्या बाहेर,
बाया, बापे आणि मुलांचे झालें जणु माहेर.
दाराजवळी उम्बर्यास हा लगटुन नाला वाहे,
दारिद्रयाचें रडकें गाणें वाटॆ विवळत राहे.
कृष्ण तयाचा रड्ग आणि दे दुर्गन्धीचे वारे --
करपुन टाकित होतीं हॄदयें , सोडुनि तीव्र फवारे.
समोर रस्त्यामधे दुभड्गुन भूमी आंतिल नाला--
फुटुन, येउन वरति उफाळुन, लागे वाहायाला !
घाण परसली, पाण्यासड्गे वाहत येउन नर्क,
जन भवतीचे निजसंसारीं तिथेच झाले गर्क !
मृत्युलोकची वैतरणी ही कितिक जिवांना रोज-
मोक्षपदाला नेई, हळुहळु हरुनी आंतिल ओज.
सभोवताली बकाल वस्ती आणि माजली घाण,
श्वासासरशीं दुर्गन्धीने वाटे जाती प्राण !
बघतो यांना कोण अरेरे ! जो तो अपुल्यासाठी,
श्रमती त्यासच काय लागते देवाघरची काठी !
धनवन्ताची उदार दृष्टी कोठे निजली आज,
अजून किंवा हाय ! अम्हांला वाटत नाही लाज !
नर्कामध्ये इथे कष्टतां बन्धू दीन अनेक,
श्रीमन्तीच्या सुखांत लोळे धनपति यांचा एक.
किति जीवांनी एकासाठी जीवन हें होमावें ?
आत्मयज्ञ हे काय कुणाच्या ध्यानी न मुळी यावे?
कृत्रिमतेला धरुन उराशीं निसर्ग केला दूर,
हर हर ! आम्ही स्वर्ग साण्डुनी, तरिच गाळितों पूर !
अन्ध होऊनी कुठवर ऐसें उलटें चालायाचें,
निजतेजाने मानवांमधे केव्हा चमकायाचें ?
सुधारणेचे किरण अजूनी का नच येथे शिरले ?
औदार्याचे वेत मनींचे काय हवेमधि विरले !
मुरार राहुनि इथे एकला कण्ठी अपुला वेळ,
व्याकुळ होई मनांत, पाहुन दुर्दैवाचा खेळ.
सवय न त्याला कधि कष्टाची , होउं लागले हाल.
भाकर- तुकडा नीट मिळेना ! भवती चिन्ताजाल !
रोज सकाळी उठुन करावें स्नान नळावर त्याने,
आणि उपाशी कामावर मग जावें निरुपायाने.
दुपार टळल्यावरी मिळावी चटणीभाकरी खाया,
अर्ध्या पोटीं असें राबतां सुकूं लागली काया.
रात्री तुकडा खांता दिसे घराचें चित्र,
भरुन डोळे यावे आणिक पुढे दिसावे मित्र !
कधी कधी तर चटणीभाकर सारुनि पुढली दुर,
बसल्या जागीं खिळून बैसे, दाटुनि नेत्रीं पूर !
तोंच विझावी चिमणी आणिक पसरावा अन्धार,
कीं दीपाला दु:ख न बघवे त्याचें हें अनिवार !
तोंच सगूने हातीं बाळें धरुनी पुढती यावें,
करुण वाणिने -- जपुन वागा’ --पुनरपि हें साड्गावें,
आवेगाने जावें त्याने धरावयाला पाय --
चित्र समोरिल तों लोपावें ! हृदय जळावें हाय !
थकून येतां सायड्काळीं त्याने स्वस्थ पडावें,
खेडयामधलें जीवन सुन्दर डोळयांपुढती यावें;
वाटे त्याला- "झुन्झुरकाचा उठुन कोणी रानीं -
कामा लागें; कमण्डलूवर जाइ गुरें घेवोनी.
झुळझुळ वाहे वारा; झाडें, वेली देती डोल,
अम्ब्यावरती किलबिल मज् जुळ पक्षी गाती बोल.
हिरवीं रानें पाहुन भवती प्रसन्न मानस झाले,
भावि सुखाच्या आनन्दाने अपुल्याशीं तो बोले.
हासत त्याने कमण्डलूच्या जळांत केलें स्नान,
गुरें वळूनी, आनन्दाने परत गाठिलें ठाण.
गोढयामध्ये बान्धुनि त्यांना घाली ताजा चारा,
धडपड करिती मुकीं वासरें ; काढी मग तो धारा.
घेउनि अपुलीं गरीवींतलीं दोन मुलें साड्गातीं,
करी न्यहारी; मालकीण ही वाढी कुतुकें हातीं.
नन्तर जुपुनी मोट, गाइलें सुन्दर त्याने गाणें,
पाटामधलें साथ करी जळ मज् जुळ झुळझुळवाणें.
श्रमतां यापरि उल्हासाने, झाली सयड्काळ,
वृक्ष रड्गले, रम्य रड्गतां मावळतें आभाळ.
दिव्य तयाची शोभा पाहत परतुन छपरा आला.
लडिवाळपणें धरि पोटाशीं चुम्बुनि तो बाळाला.
पत्नीसड्गे गोष्टी करितां , जाय सुखें तो झोपीं,
तारे करिती खडा पहारा ! शान्त जहाली कोपी !"
तोंच मुराने ‘सगू सगू !’ ही खरीच मारुन हाक
दचकुन यावें भानावरती , आशा व्हावी खाक,
तळमळ होउनि जीवात्म्याची , लोटावी मग रात,
हळूच बोले- ‘कां म्हुन् आलों ? जाला माजा घात !’
दोन लोटले मास कण्ठतां अशा परीने काळ,
मुरार राहे मूकपणाने सोशित हा जज्जाळ.
वृत्त तोटकें सगुला कळवी एकच धाडुनि पत्र,
अन्तर्यामीं दु:खें ठेवी, भोगुन हाल परत्र !
असा दुपारीं कापुस फोडित मुरार होता बसला,
कामावांचुन विचार नव्हतां चित्तीं कोणा कसला.
झाली होती दुपार म्हणुनी समोर कोणी एक,
भरवित होता घास, घेउनी साड्गाती निज लेक.
आनन्दाने बाळें होती प्रश्न विचारित कांही,
हासुन देई बाप उत्तरें, आई वाढत पाही.
काम थाम्बुनी हातामधलें मुरारची ती दृष्टि,
दृश्यावर या खिळून, झाली डोळ्यांमधुनी वृष्टी !
कामावरच्या अधिकार्याची निष्ठुर कर्कश वाणी,
कानावरती कडकडली तों नभिंच्या बिजलीवाणी.
मधुनी मधुनी पाहत बसतो असा सोडुनी काम,
म्हणुन तया तो घ्याया साड्गे कायमचा आराम !
परी अरेरे ! चित्र मनाचें दिसतें अधिकार्याला,
कठोरही तर हृदय लागलें असतें पाझरण्याला.
क्षण हि न राहे कटुवचनांची ऐकाया लाखोली,
दुर्दैवाने घालवितां , तो गांठी अपुली खोली !
रवि अस्तवुनी सायड्काळी पसारावा अन्धार,
भीषण छाया करीत जाव्या दूर दूर सज् चार,
गभीर यावें रुप सृष्टिला सान्ध्य तमस्तेजाने,
तों पेटावीं, वणवा लागुन, दुरिल डोड्गरारानें,
अणि भडकुनी आग भोवती व्हावा हाहा:कार,
आंतिल कीटकजीवांची मग तडफड व्हावी फार,
आणि पळावें जीव घेउनी इकडे तिकडे त्यांनी,
तों गांठावें जिभल्या चाटित चहुंकडुनी ज्वाळांनीं,
नेणुनि यांतिल कांहीही पर दु:ख, दूरच्या कोणीं -
‘किति देखावा सुन्दर, मोहक !’ अशी वदावी वाणीं !
परि जीवांची तडफड व्हावी, सापडुनी नच माग,
त्यापरि झाली मुरारची स्थिति पेटूनि भवति आग..
दारुण चिन्ता मनास जडली, पार उडालें चित्त,
खावें आतां काय ? सगूला कोठुन द्यावें वित्त
मिळकत झाली त्यावर नाही पुरतें पोटहि भरलें,
आणि अता तर आधाराचे धागेदोरे सरले.
नैराश्याने हृदयी पुरता खड्गुनिया तो गेला,
अनुभूतीच्या कटुक विषाचा सेवित पडला पेला !
दुसरे दिवशीं अखेर जाउनि धीटपणें चौकांत -
उभा हमालीसाठी राहे करपुनि तो हृदयांत !
तया सुदैवें काम मिळालें तोडी उचलायाचें,
सगुणेवरची प्रीती हृदयीं हर्षभराने नाचे.
परि होईना काम नीटसें , बळें बळॆं करि जोर,
धाप लागली ! लाल जाहले, डोळे काळेभोर !
ओळखिलेंही नसतें कोणी असें पालटे रुप,
काम कराया सजला धरुनी प्रीतीचाच हुरुप.
दोन दिसांनी असाच थकुनी पडला मार्गीं धीट,
दारीं जाउन, रक्त ओकूनी पडला येउन झीट !
शेजार्यांनी नेउन त्याला निजवियलें खोलींत,
तडफड होउनि कण्हावया तो लागे मग ओलींत !
जवळी नाही कुणी जिव्हाळा आणि स्थिति असहाय,
पश्चात्तापें जळूं लागलें अन्तर, खाउनि हाय.
तोंच पलिकडे मजूर हौशी कुणि अवशीं रड्गेल,
काढुनि डफतुण् तुणॆं बैसले गाया गीत सुरेल.
ऐटदार कडकडित तापल्या बसे डफावर थाप,
गोड लावणीस्वर वरघाटी आले तोच अपाप -
४ विरहगीत
[चाल- नका टाकूनि जाऊं ]
तुझ्या नांवाची गोड लई जिवा, सुभगे साजणी ॥ध्रु०॥
रानामन्दीं हरनावानी
बागडतांना, फूलरानी
तुजि ऐकीलि कोकीला-वानी, ग !
ज्वानी अड्गी तूझ्या भरली
लिम्बकान्ती मोहरली
नैनजादूची पडे मला मोहनी ग !
पिर्त जडली, बोली झाली
फिरलों सड्गं रानोमाळीं
हरली जीवाची तहानभूक, गडणी ग !
आता रुसवा कां ग आला ?
येळ केला भेटायला,
व्याकुळ होऊन जिव लागे झुरणी ग !
गाणें ऐकुन आग मनाची वाढे भरवेगाने,
तीव्र घातले घाव जिव्हारीं त्याच्या, जणु कीं गानें.
अता सगूचें दर्शन कसलें ? कोण जिवाला भाई ?
ओकओकुनी जीव तयाचा व्याकुळ होउन जाई !
काय जहालें सगुचें ? जाणुनि सारें अन्तर्ज्ञानें -
कमण्डलूनें साडिगतलें तिज नाही का हें गानें ?