उधळणुकीचें वृत्त समजलें मातापितरां सारें,
सुटलें कांहीं वेळ तयावर रागाचेच फवारे.
परन्तु रागाआड दाटते अनुरागाची लाट,
अथाड्ग शान्ती आंत सागरीं, वरती खळबळ दाट
कोडकौतुकें पुन्हां लागलीं पूरवूं आईबाप,
सगुणेसड्गे चित्त तयाचें रमलें पूर्ण अपाप.
औदार्याला पुन्हा कधी जर आली त्याच्या भरती,
सगुणा अपुल्या पावित्र्याने करी तिथेला परती.
परि जातीच्या स्वभावधर्मा औषध नाही कांही,
मित्रसड्गती न कळे त्याचा पैसा कैसा जाई.;
सगुणेपासुन दुरावल्यावर दुबळें होई चित्त,
सढळ करीं खर्चुन टाकी मित्रांपायीं वित्त.
कुणी बोलले, ‘मेळविलें धन तसेंच आता जाई !’
कुणी बोलले, ‘पदरीं आणिक पडली अम्बेराई !’
कुणी बोलती , ‘कधी रावबा कुणा न देती कांही,
तरिच सम्पदा मुरारहातीं वाटुनि आता जाई !’
असे लागले चार चव्हाटयांवर कुणि बोलायाला,
परि न जरा ही वार्ता याची शिवली रावमनाला.
मन लेकाचें उद्योगाने कोठे तरि गुन्तावें,
रात्रन्दिन ही एक कल्पना अता पित्याला भावे.
व्यापाराची गोष्ट हिताची पटली दोघां फार,
दिवाळीला तरि जाय पहाया मुम्बइचा व्यापर,
अम्भेरीचे मित्र सड्गती चार घेतले त्याने,
खर्चायाला दिलें चाड्गले, हासत त्यास पित्याने.
वळणे बान्धुन व्यापार्यांशीं त्याने चतुराईने,
काम आपुले केलें; त्याची कुणी हुशारी वाने.
आणि तयाने व्यापाराचें ठेउनिया प्रस्थान,
मनीं योजिलें, सुरु करावा मोसम येतां छान.
मजेंत गेले दिवस तयाचे उरले सुरले चार,
मित्रासड्गे तेथ उडविली त्याने रोज बहार.
अम्भेरीचीं कुणी माणसें, पोरें तरणीताठीं.
गिरण्यांमध्ये राबत होती केवळ पोटासाठी.
भेटायला मुरार गेला त्यांना सहज दुपारीं,
हाल तयांचे बघुन चरकला मनामधे तो भारी !
वाटॆ त्याला - ‘पोट -अरेरे ! काय चीज ही देवा !
पोटासाठी -हाय ! करावी कुणीं कुठेही सेवा?
वैभव त्यांचे आणि आपुलें क्षण तो तुळुनी पाहे,
आणि भाग्यवान् स्वतास मानुनि, देवा प्रार्थित राहे.
दोन दिसांनी घोडेशर्यत होती तेथे थोर,
पहावया ती गिरणीमधले जाय लहानहि पोर.
मित्रगणांनी आग्रह करुनी त्यास पहाया नेलें,
पणास लावुन पैसा, त्याला पुरें अकिंचन केलें.
खचला नाही धीर मुराचा; होता तो दिलदार,
त्यांत गांवचे मित्र जिवाला होते केवळ प्यार !
मोहमयीला सोडून आला मुरार अम्भेरीला,
वृत्त आपुलें कथिलें त्याने सारें सरळ सखीला.
सगुणा रुसली, फुगली, त्याला शब्द बोलली दोन,
शान्तपणाने ऐकत वचनें , परी तो सेवी मौन !
थण्डी सरली; कडक उन्हाची तिरिप राहिली मागे,
प्रखर आपुली भास्कर किरणें हळुहळु सोडूं लागे;
खेडोपाडीं कोठे कोठे आटुनि गेले ओढे,
हवाल झाले लोक, न मिळतां प्याया पाणी गोडें.
ओढयाकांठीं कुणी काढिती वाळूमध्ये हेळ.
दूरावरुनी आणुनि पाणी कुठे भागली वेळ.
लोक झर्यावर भरती पाणी, तेच गुरेंही पीतीं,
वास मारतां, वाटूं लागे रोगराइद्ची भीती.
गुरें पटापट मरुं लागली वार्याच्या रोगाने,
तापसरीची सांथ पातली, फैलावत वेगाने.
अम्भेरीला घरटीं पडले दोन अजारी लोक,
सुरु जहाला कुठे मुलाचा, कुठे आइचा शोक !
औषधपाणी कोणा द्याया, कुठे कुणीही नाही,
दीन जनांचे मरण ओढवे हरहर सांथीपायीं !
हां हां म्हणता, कहर उसळला अघोर अम्भेरींत,
न कळे कसली परमेशाच्या ही कोपाची रीत !
परगांवाच्या कुणि वैद्याच्या लोळण घॆती पाया;
परिश्रमाने हात टेकले ! केलें गेलें वायां !
कुणि वैद्यांनी तुमडी भरली हीच साधुनी सन्धी,
सम्पत्तीची व चढूं लागली डोळयावरती धुन्दी.
कुठे पोटच्या द्याया डाळिम्बाचा दाणा,
शेतकर्याने डाळिम्बाला विकला एक दिवाणा!
एका औषधथेम्बा आलें मोत्याचें जणु मोल
पैका आणिक धान्य जहालीं आता मातीमोल !
कुणी रडावें कोणासाठीं न कळे कोणा कांही,
‘पडला !’ कोणी म्हणतां म्हणतां ‘गेला !’ तो लवलाही !
अभिषेकाचीं सत्रें बसलीं; दिधलें कोणी देणॆं !
पाझर देवा तरी फुटेना झाले दीन शहाणे !
मुरारदनीं कोण भयड्कर धान्दल झाली आता,
तापसरीने बिमार पडलीं बाप आणखी माता.
आज आठ दिन किती रावबा फणफणती तापाने,
आणि चार दिन आई निजली केवळ थरकापानें.
पाणी किंवा अन्न घोटलें मुखीं जराही नाही,
तोण्डें सुकलीं ! वाणी थकली ! बघतीं मग नयनांही.
मुरार- सगुणा एकसारखीं होतीं जवळ बसून,
मानाजीने सेवा केली रात्रन्दिवस कसून,
सगुणेच्या तर डोळयांवरची झोंप उडाली पुरती,
औषधपाणी देतां आली कितिदां डोळां भरती !
तों सासूने हात उचलूनी परिश्रमाने फार,
मुखावरोनी हळू फिरविला, गाळुनि अश्रू चार.
डोळयांमध्ये प्रेमळ भाषा साठुनि आता राहे,
ओठ हालुनी, पुन्हा अश्रुंचा ओघळ घळघळ वाहे !
मुरार होता डोकें चेपित तिकडे डोळे वळले,
दाटुनि आले थेम्ब अश्रुंचे, आणि हळु ओघळले !
बोलायाला शब्द मनांतील गेली त्यांशीं कांहीं,
तोंच मनाच्या आघाताने मूर्छित झाली आई !
धडकी भरली सगुच्या हृदयीं; माम्बावून मुरार-\
इकडे तिकडे धावे, कांही करण्यातें उपचार !
समोर होते बघत रावबा सारें टक लावून,
तोच गडयांनी नेले त्यांना आंत हळू उचलून.
तळमळ झाली तीव्र मनाची, रडूं लागले राव,
मानाजींनी समजावियलें बसतां हृदयीं घाव.
आता आई बरळूं लागे वायूच्या झटक्याने
किति दाबावे ? एकसारखी बोले ताररवाने.
‘सगुना माजी लई गुनाची ! घरदाराची जोत !
लक्षिमि माज्या हीच घराची, हिनं उजवलं गोत !
इळा घॆउनी कुट निगालिस येडयावानी पोरी ?
डोळां पानी येउन जालिस कां ग गोरीमोरी ?
कुनीं जिवाला तुज्या दुकवलं ? कां ही आटाआटी ?
काय दळाया जातिस?... कन्सं कोनाचीं मोडाया ?
रडूं लागला तुझा पोरगा, घे आदी पाजाया !
मुरारि माजा, तूं बी माजी, सगुने घॆ त्यें पोर !
मला धरुं दे पोटाशीं तरि - किती ग जालं थोर ! ’
बरळ बोलली, हसली, रडली आई तों निमिषांत,
बोले इतुकें आणि करांनी धरीं मुराचे हात !
टकमक लावी नजर मुखावर, ठरवुन भेसुर दृष्टी,
जवळी घेउन त्यास वदे मग करुनी डोळां वृष्टी.
‘मुरा, पोरगी लई ब्येस ही ! लक्षिमि सौसाराची !
नग असा तूं पैका उदळूं, सगुना लइ थोराची !
पानी ! पानी दे ग बा ... ळे .... ! ’ अडखळला तो बोल,
डोकें धरिलें मुरारने मग माण्डीवर समतोल.
‘मालक.. गेलं ..का..शे..ता...ला..!’ ऐसें बोलुनि कांही,
दोन आचके देऊन, गेली कायम सोडून आई !!
काय साड्गणॆं घरांत झाला कसला मग आकांत !
सगुणॆला तर शोकावेगें क्षणभर आली भ्रांत !
दीनांची ही माय हरपतां रडूं लागला गांव !
अन्थरुणावर शोकाग्रीने करपुन गेले राव १
प्रेमळतेचें छत्र लोपलें ! मुरार झाला दीन !
गुरें लागली हुम्बाराया ! दिवस लोटले तीन.
आज लागुनी मनास कांही आग, तळमळे बाप,
शोकव्याकुळतेने त्याचा चढूं लागला ताप.
रात्र पसरली काळी काळी गोलार्धावर दाट,
मात्र पाण्ढरी चमके वरली स्वर्गड्गेची वाट.
मानाजीला खूण रवबा करिती भरल्या डोळां,
हात मुराचा धरिला ! झाले कण्ठीं प्राणहि गोळा.
‘शेत्दीभाती पग् ही ... उदळूं नग प... राना...वा..नी !’
शब्द लोपले पुढलेल, गेले खोल, न आले कानीं !
मानाजीवर आणि मुरारवर दृष्टी एकच वेळ-
टाकुनि, त्यांनी झणि आटपला इहलोकींचा खेळ !!
बोलत ऐसें , गाळित अश्रू वृध्द परतले कांही !
आकाशाची कुर्हाड पडली सगू सुरारावरती,
मानाजीच्या आधारें तीं दु:खे परि सावरती !
सगुणेच्या तर डोळ्यांमधलें खळलें नाही पाणी,
कितीतरी दिन फुटली नाही मानाजीला वाणी.
मुरार झाला व्याकुळ हृदयीं, परि मन शमवायाला.
मित्रसड्गतीं काळ घालवी; खुपला म्हणुनि न भाला.
तप्त जगावर वर्षर्तूची पडली पहिली धार,
आणि निमाला तापसरीचा धूमधडाका पार.
हळू हळू मग शेतीभाती, धन्दा चालू झाला,
विसरुन दु:खें मुरार लागे दक्षपणॆं कामाला.
आणि सुभान्या रानी चाले स्वैरपणाने गात,
कमण्डलूचा ओढा त्याला देई अपुली साथ !