संग्राहिका - सौ. यशोदा पाटील
लग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
सोयरा जोडावा आपणाहुनी जड
यांच्या वजनानं येशीचं कुलूप पडं
सोयरा जोडावा गडगंज हाती
यांच्या वजनानं येशी उघडती राती
सोयरा जोडावा आपणाहुनी वरमुठी
जेवण करावं मसुराची डाळरोटी
मोठे मोठे याही माझ्या नानाला मिळाले
हरणे माझे बये तुझ्या करणी भाळले
नानानं ग माज्या मोठया मोठया वगा केल्या
लेकी पाटलाला दिल्या सुना मोठीयाच्या केल्या
नाना तुमची सून मला ईहीण करावी
बाप म्हणे नको बाई
भाऊ भावजया मान राखायाच्या नाही
बाप म्हणे नको बाई
व्याही मी करु गेले मुंबईचा ग दलाल
भांगी म्या भरीयेला संगमेरीचा गुलाल
व्याही मी करु गेले दीर दाजीबा संगं चला
मांडवी नारळीचा पायघडयाची बोली बोला
व्याही मी करु गेले जावाणंदाच्या मेळयामंदी
सोन्याची मोहनमा सून राधाच्या गळ्यामंदी
व्याही मी करु गेले जात जमात पाहूनी
आम्ही पाटलाच्या सुना आलो हिल्लाळ लावूनी
ईवाय पावन्यानं सारी भरली वसरी
जावईबुवांना टाका बनात दुसरी
ईवाय करिते मी मावसभारु ग हावसेनी
गाडीवर रुखवत माझ्या भरीला मावशीनी
जावायापरास मला ईवायाची गोडी
बाई मी तांब्यान तूप वाढी
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP