समाधि प्रकरण - अध्याय पांचवा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


देखोनियां नाचत नामयांते । रंगी तया श्रीहरिसन्निधीतें ।
बोले तदां ते जननी जगाची । श्रीरुक्मिणी हांसुनि मंदवाची ॥१॥
नाम्यासि या विष्णुपदासि न्यावें । सायुज्य मुक्तीप्रति यासि द्यावें ।
हा योग्य आहे अतिभक्त नामा । आज्ञा करावी सुरसार्वभौमा ॥२॥
हरी मुखा पाहुनि नामयाच्या । बोले महामेघ - गभीर - वाचा ।
नेतों तुला मुक्तिपदासी नामा । देईन सायुज्य अलभ्य तें मा ॥३॥
या भीमकीला तरि हेंचि माने । आरुढ हो हंसयुतें विमानें ।
जायीं पदी राहुनि सौख्य भोगीं । जेथें सदां राहति भक्तयोगी ॥४॥
हे ऐकतां विठ्ठलवक्त्रवीणा । नामा वदे केवळ दीनवाणी ।
वंदी पदाब्जीं उभयांस माथां । उपेक्षितां कां मजला अनाथा ॥५॥
नको नको मुक्ति तुझी दयाळा । विमान हंसान्वित हें कशाला ।
देयीं तुझ्या केवळ प्रेमळांतें । जे इच्छिती मुक्ति अखंड त्यातें ॥६॥
भांडार तूझें हरि हेंच मोटें । तें मुक्ति देयीं स्वजनासि नेटें ।
नको नको मुक्ति कदापि मातें । वैकुंठ तेंही मज किंकरातें ॥७॥
जीवंत मी भोगित मुक्ति येथें । राहें सुखें सेउनि पंढरीतें
नाचोनि रंगी तुझिया समोरा । श्रीभीमरावाळवटी उदारा ॥८॥
हे दास तूझे मिळताति तेथें । करीन संकीर्तन भक्तियुक्तें ।
गायीन गाथा तुमच्या अनंता । नानावतारीं करिसी अनंता ॥९॥
ज्या ज्या युगीं त्वां अवतार कीजे । मीही तसा होउनियां विराजें ।
आयी ! पुसावें तुम्हि विठ्ठलाते । कोठें न होतों हरिच्या समेतें ? ॥१०॥
जेव्हा जळीं हा झषरुप झाला । मी भक्त सत्यव्रत त्याच वेळां ।
जेव्हां घडे कूर्मशरीरधारी । मी जाहलों मंदर या शरीरीं ॥११॥
जेव्हां घडे देव वराहरुपी । मी जाहलो कंकरभूमिरुपी ।
खांबांत झाला नरसिंह जेव्हां । प्रल्हाद मी सन्निध भक्त तेव्हां ॥१२॥
जैं जाहला वामन ब्रह्मचारी । मी पादुका तैं घडलों विचारीं ।
हा जाहला भार्गवरुप जेव्हां । मी जाहलो तीक्ष्णकुठार तेव्हां ॥१३॥
जेव्हां घडे राघव चापपाणी । मी मारुती दास यथार्थ मानी ।
हा कृष्ण तैं उद्धव मींच झालों । याच्याच बोधें बरवा निवालों ॥१४॥
हा पंढरीनायक मीच नामा । उभा असे सन्निध जाणसी मा ।
नाचें पुढें मी जननी अखंअ । मुक्तीहुनी हें सुख फार गोड ॥१५॥
भक्तीविना इच्छिल मुक्ति कोणी । धिगधिक्तया मी अति तुच्छ मानी ।
नको नको मुक्ति कदापि माये । मी भक्तियोगें भुवनीं न माये ॥१६॥
तूं मुक्ति ते वो फळ जाण आयी । हें सौख्य त्या मुक्तिपदांत नाहीं ।
नि:सार ते मुक्ति कशासि मातें । नामामृतप्राशन नात्ति जेथें ॥१७॥
नि:सीम जे भक्त असेति त्यांची । वंदीन मी धूळि पदांबुजाची ।
मुक्तीहुनी ते शतकोटि वाटे । विशेष तें प्रेम मनीं न सांटे ॥१८॥
श्रीराम नारायण वासुदेव । मुकूंद विष्णु विभु देवदेव ।
श्रीरुक्मिणीनायक दीनबंधू । स्वछंद मी गायीन हा प्रबंधू ॥१९॥
नामामृतातें बहुसाल प्यालों । बोधें तयाच्या अतिमत्त झालों ।
निजाबुभूती सति नित्य भोगीं । मी मुक्तिदासीविषयी विरागी ॥२०॥
म्यां लोटिलें मुक्तिपदासि लातें । भजोनि भावें पुरुषोत्तमातें ।
कर्माख्य माझें पट तें गळालें । मी पांडुरंगांगणिं नित्य लोळें ॥२१॥
तूं आदिमाता म्हणवोनि तूंतें । मी बोलिलों हृद्गत गुह्य माते ।
हें गूज माझें कवणासि दाऊं । सांगे सती हें कवणासि देऊं ॥२२॥
मौनेंचि म्यां सांठविलें स्वचित्तीं । न बोलतां विठ्ठलपाय चिंतीं ।
हा अंतरात्मा हरि एक जाणे । तूं मावली जाणसि वो सुजाणे ॥२३॥
हे नामदेवामुखिंची सुवाणी । ऐकोनि हांसे मग कृष्णराणी ।
श्रीरुक्मिणी धन्य म्हणोनि राहे । ज्ञानेश्वरें ऐकुनि मात तेहे ॥२४॥
श्रीभीमकीतें विनवोनि बोले । जे ऐकतां सज्जन तैं निवाले ।
तें ऐकिजे सर्वहि संतलोकीं । हा श्रेष्ठ संवाद असे त्रिलोकीं ॥२५॥

द्रुतविलंबित.
वदत ज्ञानमणी जननीपुढें । परिस वो कथितों सति साबडें ।
सकळ जाणसि तूं जगदीश्वरी । तदपि बाळगिरामृत स्वीकरी ॥२६॥
परम भक्ति घडोनि जनाप्रती । सुजडतारक होसिल तूं सती ।
गहन चित्पदिंची अनुभूति तूं । अससिं वो परमेश्वर शक्ति तूं ॥२७॥
म्हणुनि हें तुजसीं अनुवादतों । अनुभवामृत तूंज निवेदितों ।
अमर ते हरिभक्त अखंड ते । कुशल वर्तति नाशविहीन ते ॥२८॥
हरिपदाब्जरजोत्तम लाधले । म्हणुनि ते पुरुषोत्तम जाहले ।
न गणिती तरि मुक्ति-महापदा । पतनवंत गणोनि महाऽऽपदा ॥२९॥
हरिपदाब्जरजीं महिमा असे । तसि कदापि न मुक्तिपदीं दिसे ।
हरिनखांशुविमिश्रमहाजळा । शिव धरी मुकुटीं परमोज्ज्वळा ॥३०॥
घडत मज्जनयोग महेश्वरा । शिव महावन डाकिनि शंकरा ।
घडत भीमरथी त्रिजगोद्धरा । विलसते नरलोकयशरकरा ॥३१॥
मिळुनियां तरि इंद्रनदीप्रती । बहुत पावलिसे जगिं उन्नती ।
हळुच हे उत्तरे फणिआलया । म्हणति भोगवती समुदें जिया ॥३२॥
कलुष गौतम सन्मुनि पावला । घडत गोवध पातक त्याजला ।
म्हणुनि तो शिवभक्ति बरी करी । हर तयाप्रति दे भुवनोद्धरी ॥३३॥
शिवजटेंतुनि वोघ निघे तदां । अमल ब्रह्मगिरीशिखरी मुदा ।
करुनि गौतम ते कुशवेष्टिता । लभत मज्जन पाचत मुक्तता ॥३४॥
गोदावरी ते भवबंध नाशी । तारी कळीमाजी महाजनांसी ।
भगीरथें प्रार्थुनि देवदेवा । मागीतली लोकनुतप्रभावा ॥३५॥
पित्राचिया उद्धरणार्थ वेगें । शिवें दिल्हा वोघ महानुरागें ।
भगीरथातें म्हणवोनि लोकीं । भागीरथी ख्यात असे त्रिलोकी ॥३६॥
मंदाकिनी निर्जरलोकवासी । भागीरथी मानवोदोष नाशी ।
पाताळलोकीं अळकावतीतें । त्या सागरा उद्धरणार्थ जाते ॥३७॥
हे तीर्थ झाली पदरेणुसंगें । तो स्वामि आम्हां हृदयांत रंगे ।
त्या सांडितां मुक्ति अम्हांसि कैशी । फळे तूं सांग समर्थ होसी ॥३८॥
तीर्थादि हे किंकर ज्या विभूचे । आम्ही असों केवळ दास त्याचे ।
नामींच आम्हां सकळार्थसिद्धि । मुक्ती अम्हां वंदिति नित्य आधीं ॥३९॥
हें एवढें बीज अम्हांसि ठावें । म्हणोनि यातें पडलें भजावें ।
आहे अम्हां विठ्ठल वित्त पूर्ण । याचे कृपे मुक्ति गणील कोण ॥४०॥
हें ऐकतां विठ्ठल ज्ञानियाची । वाणी सुधातुल्य महारसाची ।
प्रेमें अलिंगी मग हस्त माथां । ठेवी सुतोषें परिपूर्ण भक्ता ॥४१॥
॥ इति श्रीज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिवर्णने रुक्मिणीनामदेव
ज्ञानदेवसंवादोनाम पंचमोध्याय: ॥ श्लोक ३०६ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP