समाधि प्रकरण - अध्याय बारावा
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.
पद्मासनीं बसुनि निर्मळ ध्यान चित्तें
सोपान नेत्र करि मीलन तैं अनंतें
प्रेमप्रसन्ननयनीं निरखोनि त्यातें
दिल्ही समाधि सुखदायक सज्जनातें ॥१॥
तेथें स्वयें नरहरी परितिष्ठताहे
एकांश कोटिशतकल्प असाचि राहे ।
भक्तासि पावन करी निजकीर्तनानें
देवादिदेव पुरुषोत्तम तोचि जाणें ॥२॥
ज्याची समाधि सुख वंदिति लोक तीनी
संवत्सरें विलसला गुणरत्नखाणी ।
‘सोपान ’ मंत्र जपतां भय मृत्यु कांपे
ज्यांचे चरित्र पढतां भवताप लोपे ॥३॥
ऐशी समाधि हरि देउनि भक्तराया
स्थापोनि कीर्ति अपुली स्वजना तराया ।
आरूढला गरुड केवळ भक्त खांदी
ज्यातें सुरासुर मुखें स्तविताति बंदी ॥४॥
सोळासहस्त्र तरुणी निजपट्टराणी
ते उद्धवादि हरिदास महाविमानीं ।
ब्रह्मादि देव सुरपन्नगकिन्नरांशीं
आले ऋषीश्वर समस्तहि पंढरीसी ॥५॥
भीमाचि ते निरखिली वर चंद्रभागा
वैकुंठसाम्य पुरि पंढरि पापभंगा ।
श्रीमल्लिकार्जुन सदाशिव जेथ नांदे
त्या देखतां नमिति निर्जर सुप्रमोदें ॥६॥
त्या राउळीं परम सुंदर वीट जेथें
श्रीपांडुरंग निवसे सुखधाम तेथें ।
संपूर्ण भक्त करितीं पददर्शनातें
संतोष पार न दिसेचि जयां मनांतें ॥७॥
त्यानंतरे निरखिलें सकळांसि देवें
जे बद्धहस्त परितिष्ठति सर्व सेवे ।
आज्ञा दिल्ही ह्मणतसे अपुल्या स्थळातें
जावें सुखें बहुत तोष दिल्हा अम्हातें ॥८॥
आलां तुम्ही सकळ या क्षितिमंडळातें
मत्कारणीं निरखिले अति उत्सवातें
ऐसें वदोनि सकळांप्रति दिव्य पानें ।
वांटी विडे निजकरें अपुल्याचि मानें ॥९॥
बोलाविले प्रथम भक्त विकुंठवासी
प्रल्हाद-पुंडलिक मुख्य-महत्तमांसी ।
त्यानंतरें विधिसमेत सुरां समस्तां
तैं गौरवोनि हरी पाठवि लोककर्ता ॥१०॥
इंद्रादि देव मग दिक्पति स्वर्गवासी
जाती विमान वळघोनि महाविलासी
जाती ऋषी सकळही मग योगपंथें
ते संत सिद्ध सनकादिक मुख्य तेथें ॥११॥
ते नारदादि दृढभक्त नमोनि गेले
गंधर्वगुह्यकसुरासुर तैं मिळाले ।
ते अप्सरादिगण वंदुनि देवदेवा
जाती सतोष निलया कृतदेवसेवा ॥१२॥
शेषादि पन्नगकुळें अतळादि लोकां
गेले नसे कलिमलादिक मृत्युधोका ।
ते मानवी बहुत भक्त नमोनि पायी
जाती स्वदेश - निलया सुटले अपायीं ॥१३॥
नामा स्वपुत्रसह सन्निध नित्यकाळीं
राहे समीप हरिच्या अतिप्रेमशाली ।
गावोनि नाचुनि करी हरिकीर्तनातें
जो नित्यकाळ रिझवी हरिच्या मनातें ॥१४॥
तैसाच भागवत तो परसा विनोदें
नाचे सदां हरिपुढें निजभक्तिमोदें ।
जे नित्य सन्निध न सोडिति पादपद्मा
जे एकही निमिष नेणति देहसद्मा ॥१५॥
ते राहिले सकळ पंढरपूरवासी ।
जे नित्यकाळ भजती विभुविठ्ठलासी
जे मीनले सकळ निर्जर उत्सवासी ॥१६॥
ऐसा महोत्सव अपूर्व करोनि देवें
सत्कीर्तिघोष रचिला जगिं वासुदेवें ।
हे नामदेव कविता रसिका अभंगीं
होती पुरातन सुधासम साधुसंगीं ॥१७॥
ते श्लोकरुप रचिली हरि अंतरात्मा
प्रेरीतसे ह्मणुनियां निजबुद्धिसीमा ।
मी काय मूढमति वर्णिन दैवयोगें
हें सांग सर्व रचिलें विभु पांडुरंगें ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP