मंगलाचरण.
शार्दूलविक्रीक्रीडित.
चिद्विद्याजगदंबिकास्तनरसीं अत्यंत माधुर्यता
आहे, जाणुनि सेवनार्थ महती आशा मनीं वाढतां ।
तेव्हां श्रीगणनाथ कुंजरमुखें अत्यादरें स्वीकरी,
नित्यानन्दविलासविग्रह नमूं निर्विघ्न भक्तां करी ॥१॥
जे कुन्देन्दुतुषारगौरवदना श्वेतांबुजीं संस्थिता ।
वीणा-पुस्तक-कीर-पंकज करीं श्री शारदा बा बरी
सद्विध्या नमिली सुबोधफलदा वाग्देवता सुन्दरी ॥२॥
पृथ्वी.
सहस्त्रदळपंकजीं, अमित चंद्रसूर्यद्युती, वराभयकरांबुजा सहित सद्गुरु शोभती ।
प्रसन्नवदनेक्षणें सकलदेवतारुप ते, स्मरूं हृदयमंडपीं अमित-मोह - विध्वंसिते ॥३॥
वसंततिलका.
ज्याची कृपा सकलभेद-तमासि नाशी, चिद्बोधलाभ घडवी निजसेवकांशी ।
तारी भवांबुधिपुरीं पदपद्मनौका, ते वंदिले गुरु सुरक्षक हीन रंका ॥४॥
वंशस्थ.
‘क्षमा करावी’ म्हणवोनि वंदितां, क्षमास्वरुपी, गुरुनाथ ते स्वतां ।
‘प्रसन्न व्हावें, म्हणवोनि बोलतां, अखंड जेथें वसली प्रसन्नता ॥५॥
आर्या.
करुणाकटाक्षमात्रें, पामर वेदार्थ वर्णिती वक्रें ।
महिमा हे चरणांची, विलसे गुरुराजराजदेवाची ॥६॥
भुजंगप्रयात.
नमस्ते नमस्ते सदानंदराशी, नमस्ते नमते विभू चिद्विलासी ।
कृपासागरा, स्फूर्ति द्यावी मतीला मनीं वाटतें, वर्णिजे रामलीला ॥७॥
वसंततिलका
वाणी पवित्र करणें गुणकीर्तनानें ऐसें मला गमतसें तुमच्या कृपेनें ।
बैसोनि हृत्सरसिजीं मज बोलवावें, या बाळकासि जगिं धन्य असें करावें ॥८॥
मालिनी
न पुरविती सुताची मायबापें शिराणी तरि कवण तयांतें तोषवी भर्वसेनी ।
ह्मणउनि करूणाब्धी सद्गुरुबापदेवा, नमन करुनि पायीं प्रार्थितों रामसेवा ॥९॥
शार्दूलविक्रीडित.
जो साकेतनिवास राघवकुलालंकार चूडामणी
ध्यातों मी नवहेममंडप वरी सद्रत्नसिंहासनीं ।
वामांकी जनकात्मजा भरतही सौमित्र ते सन्मती
पार्श्वी सायुध तिष्ठति, नत पुढें बुद्धांजुळी मारुती ॥१०॥
शार्दूलविक्रीडित.
आत्मा जो जगदीश जो अखिल जो योगींद्र-हृद्गेह जो
सत्तामात्रक जो चिदेकरस जो आनंद जो आद्य जो ।
मायासर्जक जो महापुरुष जो सद्भक्तमांदार जो
शर्वाराधित जो सुपर्णगति जो त्या रामचंद्रा भजो ॥११॥
ज्याचें कीर्तन सर्व संकट हरी तारी भवाच्या पुरीं
ज्याचें ध्यान हृदंबरी विवरितां चिद्ब्रह्मसत्ता वरी
तो योगींद्रहृदब्जषट्पद हरी गाईन अत्यादरी ॥१२॥
वसंततिलका.
योगी निरंजन जगद्गुरु बापदेवा लक्ष्मीधरा नमुनि सांद्रमहानुभावा ।
विज्ञानदीप उजळी जगिं सत्वराशी, जो का अनादि भवमोहतमासि नाशी ॥१३॥
उपजाति .
चिद्बोधरामायण रामगाथा । वाटे वदावी कविराजचित्ता ।
वाग्देवतासद्गुरुच्या प्रसादें । बनाजिनें हे रचिली विनोदें ॥१४॥
झाले पुरा कवि कितेका परी विविध ज्यांच्या रसाळ कविता
कैं लोपल्या असति पृथ्वीवरी अमित कैं पावल्या शिथिलता ।
ऐसें असोनि मज झाली प्रवृत्ति रघुनाथ स्वयें वदविता
त्याचे उदार गुण वाणीपवित्रकर तैशी न देवसरिता ॥१५॥
शार्दूलविक्रीडित.
जो पृथ्वीभरवारणार्थ विबुधीं संप्रार्थिला श्रीपती
तो झाला वसुधातळीं रविकुळीं मायामनुष्याकृती ।
मोठा राक्षसभार नासुनि पुन्हा ब्रह्मत्व तो पावला
ठेवी सुस्थिर कीर्ति या त्रिभुवनी सीतापती वंदिला ॥१६॥
वसंततिलका.
विश्वोद्भव स्थिति लयाप्रति आदिहेतू मायाश्रयी विगतमाय अचिंत्यवस्तू ।
आनंद्रसांद्र अतिनिर्मल बोधरुपी तो जानकीरमण वंदित सत्प्रतापी ॥१७॥
रुग्धरा.
कैलासाग्रीं विराजे वटविटपितळीं हेमसद्रत्न - पीठीं
बैसोनी ध्याननिष्ठा परमशिव तया बोलली कंबुकंठी ।
अंबा जे आदिमाया त्रिभुवनजननी या जगा उद्धराया
स्वामी विश्वाद्यमूर्ती, तुम्हि कवण मनीं ध्यातसा ? देवराया ॥१८॥
शार्दूलविक्रीडित.
मी तों नम्र तुझ्या पदाब्जयुगुळीं सद्भक्तिमंता सती
दीनानाथ दयाळ सर्व हृदयी तूं वर्तसी गोपती ।
साक्षी चिन्मय जाणसी मज मनी जे आवडे तत्वतां
सांगावें मज सद्रहस्य जगतीं नाथा बिभू सर्वथा ॥१९॥
भुजंगप्रयात.
जरी गौप्य सांगूं नये अन्य कोणा, तरी सांगती श्रेष्ठ साधु प्रपन्ना ।
प्रिया भक्तकल्पद्रुमा मी अनन्या असे दिव्यपादाब्जभृंगी सुधन्या ॥२०॥
असें प्रार्थितां हांसले मंदवाणी तदा बोलिले सच्चिदानंदखाणी ।
प्रिये, ऐक तूं पूसली गोष्टि आतां, यथायोग्य जे लोकउद्धारणार्था ॥२१॥
शार्दूलविक्रीडित.
आत्माराम सुखैकधाम विभु जो चिन्मात्र अद्वस्तु जो
मायानाटक जो अमायवपु जो निर्नाम-रुपाख्य जो ।
विज्ञानांजनसाध्य जो अमल जो चिद्रत्नभांडार जो
योगीहृन्मठदीप जो अखिल जो त्या रामचंद्रा भजो ॥२२॥
द्रुतविलंबित.
रविकुलोद्भवभूपतिच्या तपा, फळचि हा जगदीश करी कृपा ।
दशरथात्मज तो विभु जाहला जनकराज-सुता -पति वंदिला ॥२३॥
उपजाति
तो ध्येय मातें गिरिजे विचारी अनादि जो विश्वविलासकारी ।
जो जाहला राक्षसयूथनाशा मायावतारी, भजतों परेशा ॥२४॥
शालिनी.
चिद्विद्या ते जानकी जाण नारी जीच्या योगें देव तो खेळकारी ।
झालीं दोघें देवकार्यार्थ लोकीं एका अंकी जाण वर्णद्वयांकी ॥२५॥
भुजंगप्रयात.
असें ऐकतां पार्वती देवदेवा पुसे मागुती भक्तिनम्रस्वभावा ।
"कृपासागरा राम तों देहधारी मनुष्यापरी क्रीडतो लोकचारी !" ॥२६॥
उपजाति,
"सीतार्थ कां शोक करी ? वदावें सर्वज्ञ मातें न दिसे स्वभावें !
साह्यार्थ कां मेळवि वानरांतें ? समर्थ तैं काय नव्हे अनंतें " ॥२७॥
शार्दूलविक्रीडित.
ज्ञानानंद सुधासमुद्र हरि हा चिन्मात्र, सर्वाद्य जो
झाला दाशरथी किमर्थ ? वदिजे, योगींद्र हृद्गेह जो
इच्छा द्वेष सुखादिलिप्त दिसतो सन्मित्र शत्रू जया
औदासिन्य असे स्वभाव दिसती हें कां ? वदा स्वामिया ॥२८॥
द्वेषें रावण मारणें; जनकजाकामीं वनीं हिंडणें !
कार्यार्थी कपि-मित्रभाव करणें, वाळी वृथा मारणें !
लोभें कांचनकृष्णसार वधणें ! शोकाग्नि संतापणें !
ऐसे दीसति भाव राघवगुणी, तैं श्रेष्ठ कोण्या गुणे ? " ॥२९॥
बोलि तैं जगदीश शंकर " जगन्नाथे ! शिवे सुन्दरी
राजारामसुखैकधामविभुला हे भाव कैंचे तरी ।
लीला नाटक देवकार्यकरणीं ब्रह्मादिकीं प्रार्थितां
झाला मानुष-विग्रही अमल तो क्रीडे तसा तत्वतां ॥३०॥
ऐकें तूं इतिहास यावरि तुला मी सांगतों तो धरीं
चित्तीं तूं जगदीश नाटकतनु क्रीडे अनेकां परी ।
तो निर्दोष समस्त तोयकलशीं व्यापोनि भानू जसा
राहे लिप्त तयांत काय गवसे श्रीराम लोकीं तसा ॥३१॥
तूं धन्या हरि भक्ति नम्र-मनसा विज्ञानइच्छावती
जाणावा जगदीश चिन्मयतनू हा भाव तुझा सती, ।
नाहीं या जगतींत म्यां निगदिलें चित्तत्व जें गुह्य तें
सांगों जाण सये अनुक्त परि हें तूं प्रेमसिन्धू तुतें ॥३२॥
इंद्रवज्रा.
सर्वांतराधीश निगूढ - आत्मा सर्वांसही चालविता परात्मा ।
तत्सनिधानें जन सर्व खेळे त्या चुंबका सन्निध लोहमेळें ॥३३॥
उपजाति.
हें जाणति ना जन मूढ-बुद्धी अनाद्यविद्यावृत जे प्रमादी ।
अज्ञानधीवेष्टित शुद्धबोधीं आरोपिती अज्ञ असे विरोधी ॥३४॥
शार्दूलविक्रीडित.
संसारीं रत जे सुखादिविषयीं संसक्त दुर्भार त्या
दुष्कर्मी जडले न जाणति कदा हृन्मंदिरीं राहत्या ।
कंठी रत्न असोनि विस्मृत जसे संभ्रांत ते शोधिती
आत्मा सर्वग अंतरीं न कळतां मूढांशि तैशी गती ॥३५॥
शालिनी.
जैसा भानू स्वप्रकाशें विराजे तेजोरुपी तेंवि चित्पूर्ण साजे ।
तैसा राजा राम, बोधात्मकाला मूलाविद्या काय बाधी तयाला ॥३६॥
उपजाति.
अभ्रभ्रमें चंद्र फिरे तसा हा विमूढ-नेत्रांसि दिसे पहा हा ।
तैसेचि देहेंद्रियमानसांनीं केलें तया चित्कृत लोक मानी ॥३७॥
भुजंगप्रयात.
दिवा-रात्रि हा भाव सूर्या असेना प्रकाशात्मका देधवांही दिसेना ।
तसा राम, चैतन्यसारासि विद्या नसे मोहकारी सुजाणे अविद्या ॥३८॥
उपजाति.
अज्ञान साक्षी अरविंदनेत्रा,मायाश्रया केवल बोधमात्रा ।
नसे कदा संसृतिबंध-वार्ता इच्छारुपा अति भोगवंता ॥३९॥
भुजंगप्रयात.
अवो पार्वती, येचि अर्थी तुला मी महा गुह्य तें सांगतों मोक्षगामी ।
मरुत्पुत्र - वैदेहकन्या - विभूचा अति श्रेष्ठ संवाद हा गोड साचा ॥४०॥
(इति बालकांडे प्रथम: सर्ग: )