मालिनी.
द्शरथपुत्र तोषें पुत्र चौघां समेतें जनकनृपति-कन्या सुंदरी त्या सुनांतें ।
वळवावि गजयानि प्रेम पोटी न माय सबळ निजपुरातें चालला भव्यकाय ॥१॥
वैतालीय वृत्त
मिथिलापुर योजन त्रयी बहुविघ्नाकुल भूपती तयीं ।
प्रणमोनि गुरुसि हें पुसे " मज देवा भय फारसें दिसे ॥२॥
"सुखदायक हें नसें पुढें शकुनाचें मज चोज हें घडे ।
बहु वाइट हें निमित्त जी दिसतें कां मज सांग सत्य जो " ॥३॥
मग बोलत सद्गुरु तया " नृपती, तूं न मनीं कदा भया ।
पुढती शकुनावली बर्या दिसती जी नरनाथ कुंजरा ॥४॥
" भय निर्भय सूचवीतसे हरिचें कौतुक सर्वही असे ।
नयनीं उगलें निरीक्षिजे सुखदु:खादिक सर्व साहिजे ॥५॥
"रिचती मृग दक्षिणें तुला, शुभ वाटे क्षितिपाल हें मला, " ।
वदतां घनवात सुटला लयकालानिलसा च वाटला ॥६॥
तव भार्गव देखिला पुढें बलदपें मनिं फारसा कढे ।
नवनीरदनील शोभतो विलासे मूर्धि जटाकलाप तो ॥७॥
करिं बाण धनुष्य शोभलें फिरवी घोर कुठार तो बळें ।
करि सिंहसमान गर्जना दिसतो अंतकसाम्य लोचनां ॥८॥
कृतवीर्य-कुमार-मारका प्रबळ क्षत्रिय जीवहारका ।
अजराजसुतें विलोकितां दिसला काळभुजंग आयता ॥९॥
भयविव्हल तो नमी पदें विसरे अर्चन तें यथाविधें ।
मुखिं बोलत " रक्षसें " नमि दंडापरि भीतमानसें ॥१०॥
" जय भार्गव-वंश-हीरका अधमक्षत्रियदावपावका ।
शरणांगत लोकरक्षका करुणेनें मज तारि तूं निका ॥११॥
" बहुतां दिवसां कुमार हे मज वृद्धा न गणोनि धूर्जटि ।
नयनीं निरखी चहूं कडे, तंव देखे रघुनायका पुढें ॥१३॥
कठिणोत्तर फारसा वदे " असतां मी जगतीं महामदें ।
मम नाम धरोनि हिंडसी मज राजवन्यवनाग्नि नेणसी ? ॥१४॥
" अति जीर्ण धनुष्य शांकरी लवितां मोडुनि शीघ्र ये करीं ।
जिणिली जनाकात्मजा बरी भुवनीं वीर विराजसी परी ॥१५॥
" जरि हें धनु वैष्णवी असें करिसी सिद्ध गुणीं, तदां दिसे ।
पुरुषार्थ तुझा रघुत्तमा ! न घडे तैं वधितों नराधमा " ॥१६॥
कठिणोत्तर ऐकतां जनां तम दाटे सकळांसि लोचनां, ।
धरणीं चळकांप सूटला प्रळयाचे परि काळ वाटला ॥१७॥
रघुनायक रोषसंकुलें निरखी भार्गववक्र तें छळें, ।
" बहु बोलसि काय या परी मज देईं धनु वैष्णवी करीं ॥१८॥
" द्विज यास्तव सर्व सोसणें मजला हें पडलें असें उणें ।
क्षणमात्र न लागतां गुणें चढवीं वैष्णव चाप, पाहणें ! " ॥१९॥
लघुविक्रम रामकेसरी असुडी भार्गवकार्मुका करीं ।
गुण योजुनि तैचि लौकरी लववी इक्षु तसा महा-करी ॥२०॥
शरधींतिल बाण काढिला धनुषीं लावुनि काय बोलिला: - ।
" मज दाखवि लक्ष्य भार्गवा, शर माझाचि अमोघ हा नव्हा ॥२१॥
" पर लोक पदद्वयांतरी मज दावी शर लक्ष्य लौकरी. ।
जरि जाण विलंब तैं नुरी तुज साचें वदतों " म्हणे हरीं ॥२२॥
विकृताननभार्गवाप्रती स्मरलें पूर्विल वृत्त या रिती ।
अति खिन्नमुखें वदे तदा, " रवि-वंशोद्धरणा विशारदा ॥२३॥
" रामा महाभुज पराक्रम राजसिंहा, आलें कळों निशिचरार्द्दन तूं परमात्मा, ।
तूं तो पुराण पुरुषोत्तम आदिविष्णू सृष्टिस्थितीनिधनकारक तूंचि जिष्णू ॥२४॥
" मी बाळभाव असतां हरितोषणाला गेलों जवें करुनि चक्र सरोवराला ।
तेथें तपें निशिदिनीं भजतां परेशा संतोषला मज अनन्यगतीस ऐशा ॥२५॥
" झाला प्रसन्न जगदीश भुजंगशायी जो नीलमेघनिभ-सुंदर-काम-देही ।
हातीं अरी धवलशंख गरारविंद म्या देखिला प्रभु सनातन तो मुकुंद ॥२६॥
" बोले तदा विभु मला सुमुखें सुहासें, ‘वत्सा, उठें, तप पुरें, म्हणवोनि तोषें ।
‘ हा देह फार दमिला, तुज मी प्रसन्न झालों, तपासि फळ हेंचि यथार्थ जाण ॥२७॥
" तूझें मनोरथ समस्त सुपूर्ण झाले, माझा चिदंश धरि हैहयराजहेंळे, ।
मारी रणीं नृप महाबळ कार्तवीर्य तूझा पिता वधुनि स्वस्थ असे अनार्य ॥२८॥
" ज्या कारणें तप दुरंत महंत केलें त्याच्या श्रमासि तुज सार्थक आजि झालें ।
तूं एकवीस समयीं समरी नृपातें मारोनि दे अवनि सर्व हि कश्यपातें ॥२९॥
" त्रेतायुगीं दशरथात्मज राम होतो, तैं देखसी मज पुन्हां वरसार देतों ।
माझें तदा हरुनि घेउन तेज सारें, तैं शांति पावसि सरे जडकर्म वारें ॥३०॥
" तूं गा विरिंचिदिनकल्प वसोनि लोंकी विज्ञानयोग तप आचरिजें विवेकीं, ।
ऐसें वदोनि जगदीश अदृश्य झाला तैसेंचि म्यां करुनि तोषविलें अजाला ॥३१॥
" आदेश पाळुनि यथाविध सर्व केलें सांगीतलें तदनुसार घडोनि आलें ।
मी धन्य धन्य ! तुज या नयनीं विलोकी झालासि गोचर असा मज याचि लोकीं ॥३२॥
" ब्रह्मादिकां सुरवरांसि अलक्ष्य ऐसा तूं राहसी प्रकृतिपार विशुद्ध तैसा ।
षड्भाव जन्ममरणादि तुझ्या शरीरीं नाहीं षडूर्मिगुण मायिक मोहकारीं ॥३३॥
तूं निर्विकार गमनादिक भाव शून्य तत्रापि दाखविसि लौकिकभाव-पूर्ण ।
जैसें जळीं दिसतसे परिफेनजाळ, अग्नीस धूम गुण तूज तसे विशाळ ॥३४॥
" आलीकडेचि तुजहोनि तुझ्याचि योगें मायास्त्रजी सकळ कार्य तुझ्या प्रसंगें ।
मायावृतत्व जगिं जोंवरि जाण आहे तोंकाळ तूज जन जाणति हें न साहे ॥३५॥
शार्दूलविक्रीडित.
" नाही जों बरवा विचार घडला, तों हे अविद्या खरी
पाडी दिग्भ्रमणांत लोक समुदे स्पर्धा सुविद्ये करी ! ।
हे देहादिक सर्व तत्कृत, यया संघांत जे बिंबली
चित्सत्ता, जगतींत ’ जीव’ म्हणुनी हे नाम ते पावली ॥३६॥
" जों देहेंद्रियवायु बुद्धि मन या ठायीं अहंता असे
तों कर्तृत्वहि भोक्तृता सुख महादु:खा विभागी दिसे ।
आत्मा संसृतिहीनबुद्धिविषया वांचोनि आहे, तरी
पाहा हा अविवेक, बधनवशें संसार सारा करी ॥३७॥
" जीवा आत्मसमागमें घडतसे चिद्रूपता निश्चयें,
आत्मा जीव समागमेंचि पुढती मोहें जडत्वासिये ।
जैसें अग्नि जळासि मेळ न घडे, सीतोष्णता ज्यापरी
वाढे तै अधिका गुणीच तसला चिज्जाड्य दोहीं परी ॥३८॥
"जो नेणे तव पादभक्ति सुजनी सत्संग सौख्यामृता
तावत्संसृति, दु:खर्निवृतिसुखां पावेचि ना तत्वता ।
सत्संगें दृढभक्तियोग घडतां, तेणें तुला भावितां
मायाबंध तुटे, तदा हळु अहंकारासि ये क्षीणता ॥३९॥
"विज्ञानामृतसिंधु-सद्गुरु तया लाभे सुखात्मा, तदा
तद्वाक्यें करुनाकटाक्षमहिमे माया सुटे दु:खदा ।
यासाठीं तत्र पादभक्ति विमला मज्जन्मजन्मांतरीं
राहो, त्वत्पदभक्तिमंतपुरुषीं सत्संग सर्वापरी ॥४०॥
" मी जाणें, तव भक्तिहीन कुनरा कल्पांत कोटीवरी
नोहे ज्ञान, विरक्ति, मुक्तिसुख हें शंका नको अंतरीं ।
जीनें संसृतिबंध सर्वहि तुटे, माया अशेषीं अटे,
मिथ्याहंकृतिपाश निश्चय सुटे, संकल्पेमरु घटे ॥४१॥
" देवा, त्वत्पदभक्तियुक्त नर ते त्वद्वर्मपीयूष तें
लोकीं वृष्टि करुनियां निवविती मेघा परी आइते ।
ते सारें जग हें पुनीत करिती ते आपल्या पूर्वजां,
वंशस्था, कुलजां पवित्र करिती हें सांगणें कैं अजा ॥४२॥
" आतां तूज नमो नमोस्तु जगतीनाथा, कृपासागरा,
दीनोद्धारण, भक्तभावन नमो श्रीराम सर्वांतरा ।
म्यां केले परलोक इच्छुनि असें जे पुण्य गांठी मला ,
तें सारे तव ‘बाणलक्ष्य, दिधलें आतां ननो जी तुला’ ॥४३॥
झाला त्या समयीं प्रसन्न मुनिला श्रीराम सौख्यांबुधी
बोले, " सर्व घडो तुझ्या मनिं जसें आहे तसें धीर धी,
देतों मी तुज काम पूर्ण समुदे, टाकी यया संशया, "
ऐसें ऐकुनि जामदग्न्य पुढती बोले विभूराजया ॥४४॥
" तूझा पूर्ण अनुग्रहो मजवरी आहे रमानायका
त्वत्पादांबुजभक्ति हे दृढ असो सत्संग देयीं निका ।
या स्तोत्रा पढतील त्या नरवरां अत्यंत विज्ञान दे
देहांती तवपादाविस्मृति न हो ऐशा वरा शीघ्र दे " ॥४५॥
वसंततिलका.
तो कामकल्पतरु राघव, सर्व दानी "ध्यावें" म्हणोनि वदतां मुनि तोष मानी, ।
तो पूजिला रघुवरें ऋषि भक्ति भावें संभाविला, नमुनि पाठविला सदैवें ॥४६॥
आज्ञापिला मुनि, महेंद्रगिरीस गेला वृद्धा नृपा दशरथा अति तोष झाला ।
बंदी वसिष्ठचरणां मग राघवाला भेटे, म्हणे " तनुज हा मज आजि झाला" ॥४७॥
पाहे मुखा घडिघडी, जळ पूर्ण नेत्रीं वाहे, तदा प्रबळ कंप समस्त गात्रीं ।
गेले अरिष्ट मग तुष्टमनें पुरातें गेला सपुत्र सुख पावुनि शांतचित्तें ॥४८॥
शृंगारिले नगर राजविदी दुकानें माड्या गृहें वसनपल्लवतोरणानें
रंभा सपूग, रुचिरागरु धूपदीपें रांगोळिया कनककुंभ सुगंधलेपें ॥४९॥
संमार्जनें विविध सेचन गंधतोयें फल्लांबुजस्त्रज विचित्र अनेक पाहे ।
शोभे अनंतगुण मोक्षपुरी अयोध्या हे साम्यता सुरपुरी न पवे प्रसिद्धा ॥५०॥
जे मुक्तिदाननिपुणा पहिली गणाया आली असें सकल दीन जनोद्धाराया ।
ऐंद्री पुरी असुख दे सुकृतक्षयीं ते या कारणें न कधिं या उपमेस येते ॥५१॥
नारी नरी विलसती अमरी प्रमाणें ज्या शोभती कनकवासविभूषणानें ।
सानंद युक्त समलंकृत मानवांची थाटी भरे, बहुतसी भरली जनांची ॥५२॥
मालिनी.
मिरविति गजरानें नोवरे मस्तहस्ती वळघुनि जननेत्रां फार आनंद देती ।
करिति नगरनारी आरत्या रत्नताटीं उडविति सुमलाजा सादरे कंबुकंठी ॥५३॥
उपजाति.
प्रदीप दीपावलि लक्ष कोटि अनंत चंद्र प्रतिमासुधाटी
तमा नसे ठाव दिसेचि कोठें ब्रह्मावबोधासम काळ वाटे ॥५४॥
प्रवेशतां राउळ राजदासी ओंवाळिती आरतिया प्रभूसी
सर्वार्थ ते पावति, राम डोळां देखोनि त्यां अर्थ नसे निराळा ॥५५॥
श्रीरामजी, सगुण सौमित्र ते यमळ, कैकेयिपुत्र सुमती
अमृतध्वनि.
चौघेबरे दिविजवृंदेंद्र साम्य निजदारा समेत रमती, ।
चौघी सती मिथिलनाथात्मजा अमरयोषा तशा गुणवती
शोभायमान जननेत्रां-मनां अमृतपाणासि ज्या करविती ॥५६॥
माता पिता सुहृद जाती अमात्यगण तोषें जया निरखिती
सानंदले त्रिदशनाथीं, अखंड मति ठेवोनि लोक वसती ।
विष्णू जसा जलघिकनयासमेत रमताहे फणींद्रसुपती
तैसा रमे सदनि साकेतवास धृतमायातनू रघुपती ॥५७॥
वसंततिलका.
युद्धाजितें स्वसदना प्रति कैकयातें भेटावया भरत तो अनुजा समेतें ।
नेला नृपा दशरथा विनवोनि यत्नें, श्रीरामलक्षण घरीं, नरलोकरत्नें ॥५८॥
शार्दूलविक्रीडित.
पौलोमीसह इंद्र देवभुवनीं जैसा उपेंद्रे सदा
दे माता अदितीस तोष अपुल्या क्रीडारसें सर्वदा ।
तैसा राम विदेहराजतनया बंधू-सखा लक्ष्मणें,
कौसल्या जनकासि फार सुख दे सर्वज्ञ सर्वागुणें ॥५९॥
साकेतानगरीं रघुत्तम वसे, सत्कीर्ति लोकत्रयीं
गाती देव मनुष्य, नागवनिता सानंद रत्नालयीं ।
जो नित्योत्सव निष्प्रमाण, निगमां संवेद्य. निर्माय जो
नित्यानंदविभूति मानुषवपू क्रीडे सुखें त्या भजों ॥६०॥
वसंततिलका.
हें बालकांड सुजना अति तोष देतें, नाना विचित्रवचनें मन रंजवीतें,
वीतें अनेकविध भोगसुखादिकातें, साम्राज्य पुत्र धन दायक कामितातें ॥६१॥
अनुष्टुप्.
बालकांड सुधाभांड, रामकीर्तिकरंड हें ।
संसार-मत्त वेतंड चंडपंचानन स्वयें ॥६२॥
मृडानीवल्लभें प्रेमें बोधिली स्वप्रिया उमा ।
अतएव जगीं शोभे महिमा सकलोत्तमा ॥६३॥
योगी निरंजनें भावें, यथामति बलोदयें ।
चिद्बोधरामायण हें वर्णिले भक्तिनिश्चयें ॥६४॥
संत सद्गुरुपादाब्ज मकरंद सुधा झरी ।
सेविली कविवाग्वल्ली, फळली मधुराक्षरीं ॥६५॥
देशवाणी प्राकृत हे म्हणोनि न गणा कधीं ।
येथें प्रविलसे पूर्ण ब्रह्मबोध सुखावधी ॥६६॥
बालकांड
समाप्त.