(अमर धरणीसहित ब्रह्मादिकां वरप्रदान)
भुजंगप्रयात.
म्हणे पार्वती, धन्य झालें कृपेनें गळाली अविद्या मनोग्रंथि येणें ।
मुखीं अमृतास्वादनें प्राणनाथा तृषा दूर झाली भवभ्रांति आतां ॥१॥
कथा विस्तरें सांगिजे देवदेवा कृपासागरा प्रार्थितें शुद्धभावा ॥
नव्हे तृप्ति जी आस जीवास मोठी पुसों आवडे स्वामि या रामगोष्टी ॥२॥
सुतोषें महादेव बोले प्रियेला, सती धन्य तूं पूससी रामलीला, ।
जगन्नाथ मायाविलासें यदृच्छा धरी देह नाना, करी भक्त - रक्षा ॥३॥
अध्यात्म -रामायण रामचंद्रें मुखेंचि मातें कथिलें सुरेंद्रें ।
चितत्व जें गुह्य अदेय तें ही सांगों तुला भक्तिमतीस पाहीं ॥४॥
शार्दूलविक्रीडित.
संतापत्रय नाशितें चरित हें अज्ञान विध्वंसितें
बंधा सोडवितें भयास हरितें पापासि संहारितें ।
दीर्घायुष्यसुपुत्र-लाभ करितें दारिद्र्य निर्दाळितें
माया-मोह मदादिकांसि दभितें चिद्ब्रह्म हें दावितें ॥५॥
स्त्रग्धरा.
पृथ्वी अत्यंत भारे व्यथित सुरमुनीसंगमें ब्रह्मलोका
गेली ते दु:ख सांगों दशवदनचमूपीडितऽपत्ति जे कां ।
तेव्हां क्षीरोद-तीरा अमरधरणिसी तो विधी जाय वेगीं
प्रार्थी सर्वाधिपातें नमुनि निजशिरीं सादरें सानुरागीं ॥६॥
शार्दूलविक्रीडित.
स्तोत्रें वेद पुराण जे निजगिरा वेदांत सिद्धें पदें
आनंदें सुगमें स्तवोनि हरिला संतप्रार्थिता चित्पदें ॥
केलें तैं अपणासि दृष्टिविषयी ब्रह्मयासि पै तेधवां
तार्क्ष्यस्कंधवरासनी विलसला तैं देखिलें माधवा ॥७॥
पृथ्वी
अनंतशशिभास्करासम सुकांति ते शोभली
सुनीळ जलदा परी तनु मनोज्ञ ते देखिली ।
सहस्त्रदळसाम्य त्या अरूणकोमळांघ्रिद्वया
प्रपन्न - जन दु:सहा समुळनाशि जें का भया ॥८॥
ध्वजांकुशयवाब्जकें कुलिशऊर्ध्वरेखादिकें
सदा विलसताति जीं मुनिमनांतरी कौतुकें ।
नखेंदुवरमंडलें अरुण उन्नतें सोज्वळें
प्रपाद अति शोभती कमठ पृष्ठ उच्चस्थळें ॥९॥
सुरम्यतर पोटर्या कुसुमबाणतूणा परी
बर्या सरळ मांडिया कदळिदंडशोभा हरी ।
विशाळ कटि, नाभि तो अति गभीर, पोटावरी
वलित्रय विराजती त्रिजगसीमरेखा परी ॥१०॥
विशाळ हृदयावरी द्विजपदांक तें साजिरें
मृगेंद्रसम आस्य तें विलसतें बरें गोजिरें ।
विशाळ भुज चारि ते दिगिभशुंडदंडाकृती
सुहेममणि अंगदें कटक मुद्रिका शोभती ॥११॥
सुकंबुसम कंठ तो , विलसती सुरेखावळी,
मनोहर मुखांबुजीं दशनरत्नभा आगळी,
सहास्ययुत वक्र तें, चुबुक रम्य साजे परी,
कपोल अति शोभती मुकुरबिंबयुग्मापरी ॥१२॥
तिलप्रसुन नासिका, नयन पद्मपत्राकृती,
कृपास्पद कटाक्ष ते सुकरुणारसें वर्षती, ।
मनोजधनु भोंवया, सुजलजेक्षणे बाण ते
सुधाब्धितनयांतरा - प्रति निरंतरी विंधते ॥१३॥
विशाल अति भाल तें सरस सप्तरेखावली
अनंत महिमाक्षरीं लिखित पत्रिका शोभली ।
सुकेश कुरळाकृती अलिकुलें जशीं मीनलीं ।
मुखाब्जमधुपान तीं करिती वक्रकेशच्छलीं ॥१४॥
शिरीं मुकुट शोभतो अमितचंद्रसूर्यापरी
सुवर्णमणियुक्त तो अतुल चित्रशोभा करी ।
सुगंध मृगनाभिचा तिलकबिंदू साजे जया
सुरम्य मकराकृती श्रवणिं कुंडलें ही तया ॥१५॥
कपोलयुगुलावरी लखलखीत साजे प्रभा,
गळां सुमणिमालिका सपदकें धरी कौस्तुभा,
लयार्कशिखिच्या परी अरि विराजतो ज्या करीं ।
स्मरा विमल मानसें सकल पातकां संहरी ॥१६॥
कराब्जदळसंपुटीं विमल शंख ऐसा दिसे
सहस्त्रदळपंकजी धवल हंस जैसा बसे ।
गदा दितिसुतांतका सकल भक्ततापां हरी
अशीं शुभ वरायुधें विलसताति देवाकरीं ॥१७॥
सुवर्णरुचि साजिरा सुपट कांसिला जो कटा
सरत्न वर मेखळा लसित घंटिका वाजटा ।
पदीं ध्वनित नूपुरें पतितपावनें तोंडरें
अनेक जड उद्धरी ब्रिद धरोनि अत्यादरें ॥१८॥
असा कमलजापती निरखितां विरिंची दिठी
नमोनि करुणाघना चरणपकजां दे मिठी ।
त्यजोनि तनुभाव तो विमलचित्त भृंगापरी
करोनि पदि गुंतला न निघवे अनेकापरी ॥१९॥
भुजंगप्रयात.
करी स्तोत्र तोषें रमानायकाचें मुखीं गद्गदें अक्षरें रम्य वाचे ।
"प्रपन्नातिंहंत्या प्रभो हे उदारा, तुला वंदितों मी सुरोत्तंसहीरा ॥२०॥
मन प्राण बुद्धींद्रियें युक्त कोणी मुमुक्षू तुला चिंतिति भर्वसेनी ।
अविद्यात्मकीं कर्मपाशी सुटाया महा मोहमाया - निधी संतराया ॥२१॥
उपजाति.
स्वेच्छाविलासें स्त्रजिसि जनांला पाळोनियां संहरिसी स्वलीला ।
परंतु नाहीं तुज लेंप कांही स्वानंदबोधानुभवात्मकाही ॥२२॥
तशी शुद्धि येना अदात्यासि ये ही पढो वे कर्मी व्रतीं निष्ठ त्याही ।
जशी त्वत्कथा भक्तिमंतासि तारी करीं सुद्ध ते अंतरा ज्या प्रकारीं ॥२३॥
तुझी देखिलीं पादपद्में अनंता, मनाच्या मळासी जळाली अहंता ।
मुनी भक्त साधू सदां चित्तसद्मीं धरोनी सुखें अर्चिती मुक्तिकामीं ॥२४॥
आम्ही भावितों अर्थ इच्छूनि तुला भवब्रह्मइंद्रादि हा देवमेळा ।
महानंद देहीच भोगावयातें सदा भाविती ज्ञानसंपन्न तूंतें ॥२५॥
शार्दूलविक्रीडित.
पादांभोजसमर्पिता तुलसिका निर्माल्य माला हरी
तीची सन्महिमा विलोकुनी करी स्पर्धा रमा अंतरीं ।
राहे नित्य समस्तसंपतियुता वक्षस्थळी ही जरी !
अध्रिस्पर्शनकामुका सतत जे सापत्निकेचे परी ! ॥२६॥
यासाठी तव भक्त नेच्छति कदा ते सुंदरा इंदिरा ।
त्वत्पादार्पितमालिकाभिलषिती मोक्षार्थदा शेखरा ।
श्री देऊं न सके सुभक्ति फळ दे तत्सार हें जाणते
ज्ञानी इच्छिति. केवि मूढ जन ते लक्ष्मीस आराधिते ॥२७॥
यासाठीं परमेश्वरा, तव पदीं सद्भक्ति राहो, मला
नेदी भक्तिविना कदापि, दुसरी आशा नसे ते मला ।
संसारामयतप्त त्यांसि परमा-मात्रा तुझी भक्ति कीं
या साठी मज तेचि दे निशिदिनीं, दात्या नमो मस्तकीं " ॥२८॥
असें प्रार्थितां देवदेवा विरिंची तदा बोलिला श्रीपती रम्य-वाची ।
"विधी देवसंघें धरित्री समेतें मनीं काय इच्छूनि आलासि येथे ? ॥२९॥
तदा सर्व वृत्तांत सांगे हरीला "महिमाजि तो रावणें व्याप केला ।
त्रिलोकासि जिंकोनि सारीं सुरांची पदें घेतली हें निवेदी विरिंची ॥३०॥
मही भार साहों शकेना खळांचा महा राक्षसांच्याहि सेनाबळांचा ।
न चालों शके धर्म यज्ञादि कांही नसे भागसंप्राप्ति देवादिकां ही ॥३१॥
बहु त्रास दीला सुरां सज्जनांला मुनींचे थवे भक्षिती दुष्ट हेळा ।
पुढें काय कीजे । वदे देवदेवा घडे केंवि लोकां तुझी पादसेवा ॥३२॥
मनुष्या करीं मृत्यु त्या योजिलासे घडावें सुखें योगमायाविलासें ।
वधावें जगत्कंटका हे मुरारी, असें ऐकतां बोलिला शार्डगधारी ॥३३॥
शार्दुलविक्रीडित.
"पूर्वी म्यां वर कश्यपासि दिधला, त्याच्या तपें तुष्टलों
इच्छी पुत्र मला म्हणोनि सखया ऐसें तया बोलिलों ।
होतों पुत्र तुझा असें निगदिला तो सूर्यवंशांतरी
आहे भूपति जाण तूं दशरथा सत्यात्मकाचे घरीं ॥३४॥
कौसल्या जननी तिच्याचि उदरीं होणें मला जाणिजे
चौ रुपें आपणासि निर्मुनि करी हे खूण त्वां मानिजे ।
कैकेयी प्रसवे सुबाहु भरता, देवी सुमित्रा सुता
दोघांते प्रसवेल, निश्चय असा तूं ऐकिजे तत्वतां ॥३५॥
मन्माया जनकात्मजा भगवती होईळ ते चित्कळा
देवी तीस पुढें करुनि रचणें हे सर्व लीला मला ।
यासाठीं सुरनायकीं सकळिकीं होवोनि शाखामृगें
वर्तावे सकळा क्षिततिं बरवें चिंतोनि मातें उगें " ॥३६॥
भुजंगप्रयात.
असें ऐकतां तोषला तो विधाता मुखें सांगतो देवसंघा समेता ।
" घडावें तुम्ही वानरांचे स्वरुपी शिळापर्वतीं युद्धकर्ते प्रतापी ॥३७॥
भुजंग प्रयात.
महीलागि आश्वासिलें देवनाथें नमस्कारिती सर्व आद्या विभूतें ।
सुखें चालिला सत्यलोकासि धाता म्हणे पूत केलें हरीनें अनाथा ॥३८॥
(इति बालकांडे तृतीय: सर्ग: )