मार्गशीर्ष शुद्ध १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
छत्रपति राजाराम जिंजीस !
शके १६११ च्या मार्गशीर्ष शु. १३ रोजीं मराठ्यांचा राजा राजाराम हा जिंजी येथें जाऊन पोंचला. या वेळीं महाराष्ट्रांत मोठी आणीबाणीची परिस्थिति निर्माण झाली होती. संभाजीच्या वधामुळें सर्वत्र सुडाची भावना धुमसत होती. राजाराम हातीं यावा म्हणून मोंगलानीं रायगडास वेढा दिला. त्या वेळीं कांही मसलत करुन राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. तेथेंहि राहणें धोक्याचें झाल्यावर त्यानें पन्हाळ्यावर आपलें वास्तव्य केलें. पुढें पन्हाळ्याकडे सुद्धां बादशहाच्या फौजा येऊन धडकल्या. तेव्हां आपल्या साथीदारांसहित यात्रेकरुंचा वेष धारण करुन राजारामानें जिंजीकडे प्रयाण केलें. जिवास जीव देणारी अनेक मंडळी त्याच्याबरोबर होतीच. सेनापति पानसंबळ, प्रल्हाद निराजी, नीळकंठ मोरेश्वर, नीळकंठ कृष्ण, खंडो बल्लाळ, कृष्णाजी अनंत, खंडोजी कदम, मानसिंग मोरे, संताजी जगताप, रुपाजी भोसले इत्यादि अनेक राजनिष्ठांनीं राजारामाला फारच मदत केली. राजारामाचा हा प्रवास अत्यंत हालाचा व जिकीरीचा असा झाला. अनेक संकटें त्याच्या मार्गांत निर्माण झालीं. पाठीमागून बादशहाच्या फौजा पाठलाग करीतच होत्या. कर्नाटकांतील प्रत्येक शहरीं मोंगली अधिकारी राजारामास पकडण्यास टपलेले होते. मध्यंतरी अनेकांना बादशहाच्या लोकांनीं पकडून नेलें. कांहींचा शिरच्छेद करण्यांत आला. कित्येकांना भयंकर अशा शिक्षा झाल्या. परंतु हे सर्व लोक खंबीर मनाचे होते. त्यांनी सर्व कष्ट सोसले आणि आपल्या धन्यास सुखरुपपणें मार्गशीर्ष शु. १३ रोजीं जिंजीस पोहोंचतें केलें. राजाराम जिंजीस पोहोंचल्यावर अर्थातच तिकडील हिंदु सत्ताधीशांना मोठाच धीर आला. हिंदु धर्म नाहीसा होऊन सर्वत्र यावनी राज्य होणार ही जी भीति कर्नाटकांत निर्माण झाली होती ती आतां नष्ट झाली. सर्व सत्ताधीश फौज व नजराणा घेऊन राजारामास येऊन मिळाले. मोंगलाविरुद्ध प्रचंड सामना द्यावयाचा हेंच एक ध्येय या वेळी मराठ्यांच्यापुढें होतें.
- १५ नोव्हेंबर १६८९
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP