मार्गशीर्ष वद्य १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग !
शके १७०२ च्या मार्गशीर्ष व. १ रोजीं मराठेशाहींतील सुप्रसिद्ध वीर रामचंद्र गणेश कानडे यांनीं वज्रेश्वरीजवळ इंग्रजांशीं लढतां लढतां प्राणत्याग केला. या वेळीं इंग्रजांनीं वसई या महत्त्वाच्या ठाण्यावर हल्ला करुन तें हस्तगत करण्याचा विचार केला होता. दोनतीन दिवसांपूर्वीच किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्या होत्या. गाँर्डननें वसई घेण्याचा निश्चय केला होता, अशा आणीबाणीच्या प्रसंगीं नानांनीं जुना कसलेला सेनापति रामचंद्र गणेश यास वसईस मदतीसाठी म्हणून पाठविलें. रामचंद्र गणेश घाटांतून जात असतां इंग्रज सेनानी हार्टले व मुसा नारन यांनीं त्याला अडविलें. वज्रेश्वरी उर्फ वज्रयोगिनीचा पर्वत सुप्रसिद्ध असून त्याचा आश्रय लढाऊ फौजांस चांगलाच होता. कांहीहि होवो, पण वसईस मदत पोंचवून इंग्रजांचा पराभव करावयाचा हा निश्चय रामचंद्र गणेशाचा होता. हार्टले व मुसा नारन यांच्याशी निकराचा सामना झाला. मार्गशीर्ष व. १ या दिवशीं धुकें पडलेंले होतें. तेव्हां न दिसतां रामचंद्र गणेश हार्टले यास पकडण्यास अगदी तोफखान्याजवळ आला आणि आतां शत्रूस हस्तगत करणार तो अभ्रपटल दूर होऊन एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. मराठे शूर गडी अगदींच जवळ आल्याचें हार्टलेच्या ध्यानीं येतांच त्यानें तोफांचे वार केले. मराठे मुळींच डगमगले नाहींत. अशा या भयंकर प्रसंगीहि ते तोफ पकडण्यास धांवले. इतक्यांत एक गोळा रामचंद्र गणेश यांस लागला व ते तात्काळ ठार झाले. परमेश्वरहि इंग्रजांचा साह्यकर्ता झाला. अभ्रसुदर्शन वज्राबाईनें जर दूर केलें नसतें तर लढाईचा रंगच बदलला असता; पण मराठ्यांच्या दुर्दैवानें विपरीतच घडलें. आणि रामचंद्र गणेश धारातीर्थी पतन पावले. आदल्याच दिवशीं वसई इंग्रजांच्या हातीं आलेली होती. या दोन गोष्टींमुळे मराठे जास्तच खवळून गेले आणि पुढें त्यांनीं प्रचंड आवेशानें युद्ध करुन गाँडर्डला तह करण्यास भाग पाडलें. अशा प्रकारें रामचंद्र गणेशाच्या मृत्यूमुळें अधिक महत्त्वाची कामगिरी झाली. रामचंद्र गणेश यांनी लढाईचें शिक्षण सदाशिवरावभाऊंच्या हाताखालीं घेतलें होतें.
- १२ डिसेंबर १७८०
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP