मार्गशीर्ष वद्य ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
पुण्यश्लोक शाहूचें निधन !
शके १६७१ च्या मार्गशीर्ष व. ३ या दिवशीं छत्रपती शाहूमहाराज यांचें निधन झालें. संभाजी व येसूबाई यांचे हे पुत्र. संभाजीच्या अमानुष वधानंतर सूर्याजी पिसाळाच्या फितुरीमुळें रायगड किल्ला, औरंगजेबाच्या हातीं जाऊन राजमाता येसूबाई व शाहू यांना कैदेंत जावें लागलें. एकूण सतरा वर्षे ते बादशहाच्या अटकेंत होते. त्यानंतर मोंगलांचा मांडलिक म्हणून शाहू सुटूं शकत होता; पण ज्या स्वातंत्र्याकरितां मराठे तीस वर्षे लढत होते तें गमावून मराठे शाहूचें स्वागत करण्यास तयार नव्हते. सन १७०७ मध्यें अजमशहानें मराठ्यांत दुफळी करण्यासाठीं शाहूची कैदेंतून मुक्तता केली. १७०८ मध्यें शाहूनें सातारा येथें आपणांस राज्याभिषेक करुन घेतला; आणि त्या वेळेपासून ताराबाईचा पक्ष स्वतंत्र म्हणून नांदूं लागला. तेव्हां आरंभापासून मदत करणार्या बाळाजी विश्वनाथाला पेशवाई देणें शाहूला प्राप्त झालें. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, बाळाजी बाजीराव यांना हाताशीं धरुन त्यानें राज्यविस्तार खूप केला. मरतेसमयीं त्याला पुत्र नव्हता. शाहूविषयीं सर्वांना मोठा आदर वाटत असल्यामुळें त्यांच्या मृत्यूनें सर्वांनाच दु:ख झालें. " मनुष्यमात्र लहानथोर, दासदासी पदरचे, त्यांचा बाप प्रतिपालनकर्ता, तें दु:ख स्मरून क्लेश जाले, ते लिहावयास असमर्थता आली, कारण असा प्रभु दयावंत दुसरा जाला नाहीं. धन्याचे राज्यांत अपराधी झाला तरी, ‘हत्यारें करुन घ्या’ परंतु ‘मारा’ असा शब्द ज्याचे मुखीं आला नाहीं, अजाबबाहु, अजातशत्रु, पुत्रमित्र अशा एकरुप व्यवस्थेनें वागावयाचें, कोणास गैरभाषण केलें नाहीं. असा पुण्यश्लोक राजा निधन पावला. ...... एकच हाहा:कार झाला." शाहूमहाराजांनंतर त्यांची पत्नी सकवारबाई सती गेली. शाहूच्या कारकीदासंबंधानें एके ठिकाणी म्हटलें आहे - "अशी काशी तसें सातारा - पुणें विद्यापीठच जालें, आज्ञा कोणीं उल्लंघन न करावी. ऐसें सार्वभौम राज्य केलें. नीतिन्यायेंकरुन प्रजेचें पालनपोषण केलें. रयतेस उपद्रव काडी मात्र नाहीं. पर्जन्यवृष्टि यथाकाल होऊन पृथ्वीनें धान्य-पीक बहुत द्यावें ऐसें सुभिक्ष जालें. -"
- १५ डिसेंबर १७४९
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP